“ती”

सैन फ्रांसिस्कोच्या हॉटेल मधल्या मोठ्या बाल रूम मधे भरली होती कांफ्रेंस. सकाळ पासून एका मागोमाग एक प्रेजेंटेशन बघत-ऐकत जेवणाची वेळ होतच आली होती. शेवटचा लेक्चर एक भारतीय मूळच्या महिलेचा होता. “सू पैट” असे तिचे नाव. ती स्टेज वर आली, अंधुक प्रकाशात तिचा चेहेरा काही दिसला नाही. प्रेजेंटेशन सुरु झाले आणि आम्ही सगळे आपल्या खुर्चीवर नुसते खिळलो. प्रेजेंटेशन केव्हां संपले समजलेच नाही. तिचा आवाज, बोलण्याची लकब आणि एनिमेशन सोबत असलेल्या स्लाइड्स. ज़बरदस्त!! जेवणासाठी हॉलबाहेर पडताना अशीच अवस्था होती सगळ्यांची.

आपल्या जेवणाची प्लेट घेवून मी खुर्चीवर बसलो. “मे आय ज्वाइन यू?” विचारत खांद्यावर कुणीतरी थाप मारली. परक्या देशात कोण ओळखतंय मला म्हणून मागे वळून पहिले तर “ती” होती. आत्ताच तिचे प्रेजेंटेशन झाले होते. खुर्चीवर बसतांना माझ्याकडे बघून म्हणाली “तू विवेक बारलिंगे न!!’ .. मी जरा चरकलोच. पश्चिमी फोर्मल सूट घातलेली, नखशिकांत स्मार्ट दिसणारी समोरची बाई चक्क मराठीत माझ्या नावासकट “तू” बोलत होती.

“पण तुम्ही...” मी ओळखण्याचा प्रयत्न करीत विचारणार इतक्यात बोलली ती... “अरे मी सुनंदा पटवर्धन. खामगावला फर्स्ट इयरला आपण एकाच वर्गात होतो”. आठवणीतून एक चेहरा चमकला. पण ही “ती” कशी? या विचारात असतांनाच तिला कुणीतरी हाक मारली आणि “लेट अस मीट इन द इवनिंग” म्हणत ती गेली.

ती वर्गातली सगळ्यात हुशार मुलगी होती. पण आम्ही कुणीही तिचे मित्र मैत्रिणी नव्हतो. साधारण सुती सलवार कुर्ता, त्यावर तेल चोपून केलेल्या दोन वेण्या, स्लीपर घालून, एका जुन्या सायकल वर कॉलेजला यायची ती. फार मोजकं बोलणारी आणि कामाशी काम ठेवणारी. जवळ कुठल्यातरी झोपडपट्टीत राहते असे माहित होते. आमच्या सारख्या टपोर मुला मुलींचा घोळका मस्तीत असायचा नेहमी. मात्र ती लेक्चर संपला की लायब्रेरी ला जायची अन नंतर घरी. कॅन्टीन, सिनेमा वगैरे कुठेच नाही. तिची कोमल नजर असायची माझ्यावर हे बऱ्याचदा जाणवले होते मला. पण कधी लक्षच दिले नाही तिच्याकडे.

वर्ष संपायला आले तेव्हां प्रक्टिकल बुक ची हूरहूर लागली. पोरं म्हणाली, सुनंदा ला पटव. तिची भेटली तर झालंच समजा. मी त्या दिवशी लेक्चर संपल्यानंतर लायब्ररी ला गेलो. तिच्या समोर बसून वाचायला लागलो. २-३ दिवस लोटले. मग एके दिवशी तिच्याकडून बुक मागून घेतली. दोन दिवसात देतो म्हणून १० दिवस गेले. शेवटी रविवारी ती माझ्या घरी आली. माझी बुक कोरीच होती तेव्हाही. घेवून गेली थोड्या रागातच. दुसऱ्या दिवशी लायब्ररी मधे मला एक प्रक्टिकल बुक दिली. सुंदर अक्षरात पूर्ण लिहिलेली. त्यावर माझे नाव लिहिलेले होते. मी काही बोलणार इतक्यात निघून गेली होती ती. परीक्षा संपली, माझ्या वडिलांची औरंगाबादला ट्रान्स्फर झाली आणि आमचे शहर बदलले. त्यानंतर आज भेटली होती ती मला इथे.

“आहेस कुठे? चल” म्हणत ओढतच ती मला तिच्या गाडीत घेवून आली आणि एका छानशा बंगल्या समोर थांबली. चहा वगैरे घेतांना तिने स्वत: बाबतीत सांगितले. तू कॉलेज सोडून गेल्यानंतर त्याच सुट्टीत माझे वडील गेले. गरिबी पायी ग्रेजुएशन नंतर शिक्षण सुटले. त्या वर्षीच भावाने लग्न लावून दिले. पण नवरा दारू पीत होता. दररोज मारहाण करायचा. एके दिवशी ट्रकखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. त्या मागे दोन वर्षाचा मुलगा आणि मी. कॉम्पुटर चे कोर्स केले. प्रयत्न केल्यानंतर एका कंपनीच्या कम्प्युटर डिपार्टमेंट मधे नोकरी लागली. लोन काढून एडवांस्ड कंप्यूटर चा कोर्स केला आणि एका मल्टीनेशनल कंपनीत सिलेक्ट झाले. एक वर्षानी अमेरिके ला पोस्टिंग झाली. तीन वर्षांपासून इथेच आहे. काही महिन्यानी वर्षी प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे मग मुंबईला. मुलगा लोणावळ्यात बोर्डिंग स्कूल मधे आहे हल्ली. एका भेटीतच कित्ती तरी बोलून गेली ती.

“तुझे काय? इथे कसा?”

.. माझे काही खास नाही. औरंगाबादला ग्रेजुएशन पूर्ण झाल्यानंतर कैटची परीक्षा दिली. MBA केले. एका आयटी कंपनीत कैम्पस मधेच बंगलौरला नोकरी लागली. ५-६ वर्ष होत आले तिथे. आता आई टिपिकल आई सारखी “अरे परक्या शहरात एकटा किती दिवस राहणार. आता कर की लग्न” वगैरे. एका क्लाइंट ची शोर्ट टर्म असाइनमेंट आहे म्हणून इथे आलोय मागील रविवारी. क्लाइंट नेच कांफ्रेंस अटेंड करायला पाठवले आहे.... मी बोललो

जेवण वगैरे आटोपले. निघणार तितक्यात दोन मिनिटे थांब म्हणून आत गेली. आली तर तिच्या हातात एक छोटासा बटवा होता. तिने तो माझ्या हातात दिला. उघडून पाहतो तर त्यात माझा हरवलेला कॉलेज चा आइडेंटिटी कार्ड, एक रुमाल आणि पेन होता. लायब्ररीत सुटले असावे कदाचित. खूप सांभाळून ठेवेलेले होते. मी तिच्या कडे पाहिले. तिने नजर चुकवायचा प्रयत्न केला पण तिच्या डोळ्यातले अश्रू ती लपवू शकली नव्हती.

रात्री हॉटेल मधे आल्या नंतर आईला फोन लावला. आणि बोललो “तुला या वेळी एक सरप्राईज देणार आहे” !

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.