"वाचवा वाचवा , आइ अग माझ एकुन तर घे s आइssssssss मरेन ग मी" आगीचा नुसता पोळ त्यात भाजणारी ती लेक

"मर मेले तुझ्या नशिबान मर तु. अग तुला ह्यासाठि जन्माला घातली नव्ह. मह्या नशिबीच का हे देवान वाढुन दिल. तु मर हेच तुझ प्रायस्चीत्त बघ. माझ मेलीच नशिबच खराब तुझा बा गेला तो मला हे दिस दाखवायला"


तितक्यात सायरन चा आवाज "व्हाव व्हाव व्हाव "


पोलीस त्या आइला पकडुन घेउन गेले.

"ये sssss काय ग रखमा चल जरा जेल ची हवा खाशील तेव्हा डोक ठिकाणावर येइल. मरायच असत तर जन्माला तरि का घालतात मुलाना. काळीज आहे कि दगड "

मुलीला देखिल रुगणालयात नेण्यात आल. पण जबाब देण्याच्या आधीच ति देवाघरि गेलि .

पोलिसांनी सरबत्ती सुरु केली. पण रखमा काहिच बोलायला तयार नाहि एक मट्ठ गोळा बनुन बसली होती. खुप चोप दिला पोलीसानी पण काहि फायदा नाहि. का केल असेल हिने अस. इतकी चांगली देखणी पोर तिची आणि आइ असुन इतकी कृरपणे कशी वागली असेल ती. पोलिस तपासात कळल कि घरी फक्त म्हातारे सासरे आहेत. तेही खुप आजारी नवरा एक वर्षापुर्वी आत्महत्या करुन गेला. घरची परिस्थीती खुप गरिबीची थोडी शेती आणि हातमजुरी करून उदरभरण चालल होत. पण पोरिला जाळायच कारण उलगडेना. शेजार्यांकडुन इतकच कळल कि सहा महिन्यापुर्वी तिची मुलगी शहरात नोकरीला लागलेली होती. अचानक घरि आली आणि दोघी मध्ये खुप वाद झालेत. पोलिस थकली शेवटी केस चा निकाल आता कोर्ट ठरवणार होती. एक सरकारी वकिल तिच्या बाजुने लढायला आली. वकील प्रिती ..अगदि गरीब घरातुन शिकुन पुढे आलेली प्रिती..खुप सोज्वळ आणि सालस होति. प्रिती रखमाला भेटायला आली. खरतर तिला फार आश्चर्य वाटलं की रखमा इतक्या कृरपणे मुलीला कसं मारू शकते. पोलिसांनी प्रितीला थोडक्यात घटना सांगितली. प्रितीला मात्र रखमा बद्दल एक आपुलकी वाटत होती तीच मन तिला सांगत होत की ती इतकी क्रूर नाहीये. प्रितीने मनाशी ठाम निर्णय घेतल रखमाला इथून बाहेर काढायचच. पोलिसांच्या सांगण्यानुसार रखमा काहीच बोलत नव्हती. तिला इथून बाहेर काढायच तर तीच बोलणही गरजेचं होत. प्रिती जितकी हुशार तितकी कार्यतत्पर देखील होती. तीच शिक्षणापूर्वीच आयुष्य खेड्यात गेल्याने रखमा सारख्या स्त्रियांना ती जाणून होती. प्रिती लौकप मध्ये गेली तिच्याजवळ जाऊन बसली, “रखमा मी प्रिती” तिच्याजवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करू लागली पण रखमा मात्र कुठेतरी शून्यात हरवलेली. डोळ्यातून आसू पण आणि नजर स्थिरावलेली. तितक्यात पुन्हा पोलिसांनी हंटर झाडला.

“ओ मॅडम ती अशी नाही बोलायची बघा”

“ थांबवा हे सगळं , ही केस आता माझ्या हातात आहे ना मला बघू द्या काय ते”

प्रीतीला पोलिसांचा त्या क्षणी खूप राग आला होता. प्रीतीने खूप प्रयत्न करून पण रखमा काहीच बोलली नाही. निशब्दपणे कुठेतरी हरवलेली .त्या दिवशी प्रीतीला रिकाम्या हातानीच माघारी जावे लागले.

दुसरा दिवस उजाडला. प्रीती सकाळीच पोलीस चौकीत पोहोचली .आज रखमाला ती बोलते करण्याची जणू खूणगाठच बांधून आली होती .ती रखमा जवळ जाऊन बसली,रखमा अगदी तशीच बसलेली अगदी नखभर ही हालचाल नाही .

प्रीतीने रखमाचा हात हातात घेऊन तिला आवाज दिला . “आई. काय आश्चर्य शब्द ऐकताच रखमाची चलबिचल झाली .ती इकडे तिकडे काही शोधू लागली .

प्रीतीने पुन्हा आवाज दिला ,” आई मी प्रीती.. तुमची वकील “. रखमाने प्रीतीकडे बघितले आणि रडायला सुरुवात केली .” माझ्या पोरीचे नशीब खोटे तिने माझ्या पोटी जलम घेतला . आईबापाच्या जीवापायी स्वत:चा जीव गमावला तिने, मी मेली मला फाशी द्या जगायची लायकी नाही माझी,” तिच्या रडण्यात एक प्रायश्चित जाणवत होते ,तिचा तो आक्रोश आणि मन हलके झाल्यानंतर प्रीतीने तिला स्वताची ओळख करून दिली

रखमा जणू त्या एका शब्दातच हरवलेली होती. आता जाऊन कुठे ती बोलण्याच्या मनस्थितीत आली .

“ आई तू असे का केले , तुझ्या पोटाचा गोळा होता तो मग? रखमा पुन्हा रडायला लागली, हळूहळू तिने बोलायला सुरुवात केली.

“पोरी मी चुकले माझ्यातला राक्षस जागा झाला. आजवर लय हलाखीत दिस काढल्यात बघ .आजवर संसारात सुख नाय भेटले. सासरी आली तशी सासूने छळले. तिच्यापासून कुठ मुक्ती मिळाली तवर नवर्याचा मार सुरु झाला .दिसभर मरमर काम केलय आजवर. अन रातीला नवर्याचा मार. कातड्याचे पार चामडे अन काळ्जाचा पार दगड झालाय”

तिचे हुंदके सुरूच होते .”नवर्याने दारूपायी होते नव्हते ते शेत विकले. हातात पैका नाय. सगळीकडे उधारी, लोक मारायला उठले तरीबी तो काय सुधारला नाय. मग काय गेला वाऱ्यावरर सोडून आम्हाला. दोन येळचे जेवण भेटावे म्हणून मिळेल ते काम करत होते गावात. कसेबसे पोरीला बारावी शिकवले. ते बी मास्तर चांगले होते म्हणून पैका न घेता शिकू दिले .”

माझ फाटलेले लुगडे अन हाल बघून पोरीला लय रडू यायचे. कुण्या मैत्रिणीच्या वळखीने शहरात नोकरीला गेली तिकडे शेण खाल्ले तिन. आता कुणाकुणाला समजवायचे म्हणून तिलाच संपवली. म्या बी दुसरे काय करणार नव्ह. लय इट आला होता. पोटच्या गोळ्याला मारण माझ्या फाटक्या नशिबी आल. ”ह्या शब्दानंतर ती पुन्हा रडत रडत शून्यात गेली .

प्रीती हे सगळे ऐकून फार अचंबित झाली .किती सोसलाय रखमाने . किती ठिणग्या उडाल्या तिच्या संसारात. आणि त्याच ठिणग्यांनी आज् पेट घेतला आणि त्या आगीत सापडली ती तिची मुलगी .

पण इथेच सगळे संपत नव्हते. प्रीतीला अजून हेच कळेना कि नक्की काय केले होते रखमाच्या मुलीने. तिने चौकशी करून तिच्या मैत्रिणीला शोधून काढले, तिने जे काही सांगितले ते याहूनही भयानक होते.

रखमाची मुलगी फार समजूतदार होती. आईचे कष्ट तिच्या जीवाची तळमळ तिला बघवत नव्हती .म्हणून ती शहरात नोकरीला आली. ती फार चंचल नव्हती. आईचे दुखः दूर करावे, पैसे कमवून तिला द्यावेत या चांगल्या हेतूने ती जगत होती. पण काही लोकांच्या दुष्कार्माला ती बळी पडली. तिच्या मैत्रिणीकडून कळले कि तिच्या मुलीचा बॉस फार नालायक माणूस होता. त्याने तिला फसवून तिचे अश्लील व्हिडियो आणि फोटो काढले. त्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करू लागला. स्वता:चे हट्ट, शरीराची भूक भागवायला तो तिचा वापर करू लागला. रखमाची मुलगी फार भेदरली .तिला आईचे फाटके लुगडे सलत होते आणि हे सगळ्यांना कळले तर होणारी बदनामी याची भीती मनात दाटली. बरेच दिवस तिने हा अत्याचार सहन केला. एक दिवशी अचानक तिला कळले कि त्या क्रूरकर्मातून तिला दिवस गेलेत ती पूर्ण तुटली आणि तिथून सरळ आईकडे गेली. रखमा तिला बघून खुश तर झाली दोन पैसे घरी आले म्हणून आनंदात होती पण त्या आनंदात त्या मुलीची दशा तिला दिसली नाही . इकडे तिचा बॉस तिच्या जाण्याने पिसाळला. ती परत येणार नाही हे त्याला कळले. पण त्या नराधमाला फक्त स्वताचे सुख हवे होते.

ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी रखमाच्या मुलीने सकाळपासून उलट्या सुरु केल्या . रखमाला भीती वाटू लागली. रखमाने मुलीला डॉक्टर कडे नेल. रखमाची पायाखालची जमीनच सरकली. तिच्या काळजाला नव्हे दगडासारख्या काळजाला जणू दरीच पडली. घरी येऊन रखमाने तिला खूप मारले. तितक्यात तिच्या मुलीला बाहेरून कुणीतरी आवाज दिला. रखमाची मुलगी तर अर्धमेली झाली. तो नराधम तिथेही येऊन पोचला. त्याने रखमाला स्वतःच त्याची माहिती दिली. सगळे व्हिडियो क्लीप आणि फोटोही दाखवले .

रखमा आधीच खूप संतापली होती. इतक्या वर्षात तिने खूप काही सोसले होत आणि पुन्हा हे तर तिच्या सहनशक्ती पलीकडचे होत. तिने कुठलेही चौकशी न करता पूर्णतः मुलीला दोषी ठरवले. संतापाच्या भारत तिने मुलीला पेटवले .

एव्हाना सगळी गोष्ट प्रीतीच्या लक्षत आली होती. खरेतर दोष दोघींचा नव्हता. दोषी होता तो नराधम जो सगळे करून देखील मोकाट फिरतोय आणि त्याच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही. पण आज मात्र ह्या दोघींचे जीवन बरबाद झाल होते. प्रीतीने सगळी हकीकत रखमाला सांगितली. रखमा स्वतःला खूप मोठी गुन्हेगार समजू लागली, तिला स्वतःचा खूप राग आला यापेक्षाही खूप वाईट वाटले कि मुलगी इतक्या अत्याचाराला सामोरी गेली आणि तिला समजून न घेतातच तिने तिचा क्रूरपणे बळी घेतला .

प्रीतीने केस सर्वतोपरी लढवली. रखमाला तिच्या कर्माचे प्रायश्चित करून पुन्हा एक चांगली व्यक्ती बनविण्याचे प्रीतीने ठरवले. केस सुनावणीत रखमाला मात्र आजन्म कारावास झाला. पण प्रीतीच्या मदतीने रखमा कारागृहात बरीच चांगली कामे करू लागली. सगळ्यांची सेवा सुश्रुषा करणेही तिने स्वीकारले त्यात ति खुशही होती कारण जे घडायचे होते ते घडून तर गेल आणि जेलमधून बाहेर येऊन ती करणार तरी काय होती. संसार तर संपलेला होता . उरल्या होत्या फक्त ठिणग्या .....

 कविता अमित महाजन


marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.