पाठलाग…एक गुढकथा  !!


 

मोहन दचकून जागा झाला, डोळे चोळत आजूबाजूला पाहीलं तर मोहिनी आणि छोटी रसिका गाढ झोपलेले होते.. साधारण रात्री अडीच तीन चा सुमार असावा. अर्धवट झोपेतच तो बेड वरुन उठला, आणी स्वयंपाक घरात फ्रीज जवळ गेला, गेली ८ वर्षं त्याच घरात वावरत असल्या मुळे या सगळ्या साठी त्याला दिवे लावायची गरज पडली नव्हती.  फ्रीज च दार उघडताच तो परत दचकला.. आणि लगेच ताळ्यावरही आला... दार उघडताच फ्रीज मधला दिवा पेटला आणी त्याचे डोळे दिपले..

गार पाणी प्यायल्यावर जरा बरं वाटलं.. हातोहात तोंडात चमचाभर साखर टाकून त्यानी घशाची उरली सुरली कोरड घालवली. परत बेडवर आला तेव्हा मोहिनीची झोप जरा चाळवली,

"अरे ? काय करतोयस ?" अर्धवट झोपेतच तिचा प्रश्न शांतता चिरत गेला.

"काही नाही तहान लागली होती तु झोप"..... अर्थात हे ऎकायला मोहीनी जागी होतीच कुठे ?

दहा पंधरा वेळा कुस बदलूनही मोहन ला हवी ती कंफर्टेबल पोझीशन काही मिळेना, असं का होतंय कळंत नव्हतं. त्यातून उद्या सोमवार... मॉर्निंग मीट... आठवड्याचं प्लॅनिंग.. उशीर होऊन चालणार नव्हता.  बराच वेळ बेडवर बसून काढल्यावर शेवटी डोक्यावरुन पांघरुण घेउन झोपू म्हणून आडवा झाला आणि ब्लॅंकेट तोंडावरून घेतलं. झोपेची आराधना सुरु असतांनाच  गुदमरायला लागलं आणि नकळत ब्लॅंकेट बाजूला केलं गेलं..

आता बायको आणी मुलीचा देखील त्याला हेवा वाटायला लागला.. इतके दिवस आपणही घोडे विकुन झोपत होतो याचा विसर पडून "च्यामारी लोक एवढे कसे गाढ झोपतात ? " असा त्रागा करायला लागला... जरा हलचाल जास्त केली तर मोहिनी उठेल म्हणून तो जास्तच उठ बस करायला लागला. पण आज खरंच मोहन च्या वैतागाची रात्र होती. या वैतागातच नकळत डोकं खाजवण्यासाठी हात चालले असावेत पण वेदनेची एक तीव्र जाणीव एका स्पष्ट किंकाळीच्या स्वरुपात त्याच्या तोंडून बाहेर आली.

आता मात्र मोहिनी दचकून जागी झाली, रसिका रडायला लागली...पण क्षणभरच.. लगेच आंगठा चोखत परत झोपली..  मोहन थक्क झाला आपल्याला नक्की काय झालं आणी आपण एवढ्या जोरात का किंचाळलो हे त्याला कळत नव्हतं.

"काय झालं मोहन ? "........तिच्या आवाजात आश्चर्यच जास्त असावं..

"अगं काही नाही... आठवत नाही.."

"कमाल करतोस तु... एवढ्या जोरात किंचाळतोस आणी काही नाही म्हणतोस ? "

"मोहीनी प्लीज हवालदारासारखे प्रश्न करु नकोस... अगं नाही आठवत नक्की काय झालं ते..."

"वाईट स्वप्न होतं का ? "

"मला काय कुक्कुलं बाळ समजलीस ? स्वप्नात घाबरुन किंचाळायला ? "

"बरं मग जे काय आठवतंय ते सांग"

"अगं मला झोप येत नव्हती, बेचैन झालो, तुम्ही गाढ झोपला होतात"

"हाउ मीन.... म्हणून ओरडलास ? ".......सौं चा संताप प्रगट झाला.

"बावळट पणा करु नकोस....मी एवढा काय हे वाटलो का ? "

"हे काय हे ? मग सांग ना का केकाटलास ते..."

"एक मिनिट तिकडे चल.... आपल्या बोलण्यानी रसिका परत जागी व्हायची"

दिवा लावून दोघेजण हॉल मध्ये बसले, मोहन नी सांगीतलं.. की अचानक तो दचकून जागा झाला आणि........

सगळं ऎकल्यावर मोहिनी मूड मध्ये आली, नॉर्मल होऊन तिनं थट्टेच्या स्वरात  विचारलं...

"कुठे इथे दुखलं म्हणतोस ? " हात बहूदा योग्य जागी गेला असावा, मोहन नी कळवळत तिचा हात झटकून टाकला.  मोहिनीचे डोळे विस्फारले, मोहन कधीच असं वागलेला नव्हता, झटकलेला हात पहाता पहाता आता ओरडायची पाळी मोहिनी ची होती... तिच्या दोन बोटांना चिकटपणा जाणवून त्याचा रंग लालभडक होता.......

वैताग, चेष्टा यांची जागा आता भीतीनी घेतली. मोहीनी चा चेहेरा पांढराफटक पडला, अनेक वेळा तिनं धीर करुन हात पाहीला पण नक्कीच ते रक्त होतं... २-४ मिनिटांचा तो पॉज अतिशय भीषण होता. पण मोहीनी लवकरच नॉर्मल ला आली.

"अरे अर्धवट झोपेत पाणी प्यायला गेलास तेव्हा किचन रॅक किंवा सेल्फ ला डोकं आपटलं असेल नीट आठवून पहा"

"छे गं...टाळकं आपटलं असतं तर मग सांगीतलं नसतं का ? " मला नक्की माहितीये कि मी कुठेच अडखळलो नाही.

"अरे पण मग ती जखम ? "

"तेच उमजत नाहीये..."

"एक मिनिट.... बेडरूम मध्ये चल...."   .......... दोघे बेडरूम मध्ये गेले..

"हे पहा ही तुझी उशी......" " माय गॉड....."

"बघू......" "काय चाललंय काय ?"

मोहन च्या उशीवर सुद्धा रक्ताचा एक डाग.. पूर्ण न वाळलेला.... आता मात्र दोघांची झोप पार उडाली. बराच वेळ दोघे गप्प, विचार करत बसले, डोकं चालत नव्हतं, शेवटी मोहिनीच म्हणाली.

"ए मी दोघांसाठी कॉफी करु का ? "

"चालेल... मस्त आयडीया... चल मी पण येतो तुझ्याबरोवर किचन मध्ये एकटी नको जाऊस.. "

"काय ? एकटी नको जाऊस.. ? ही ही ही.... आपल्याच घरात भीतोयस का ? सोनू एकटी झोपलीये बेडरुम मध्ये..... "

वास्तवीक नॉर्मल डायलॉग चालले होते नवरा बायको चे... पण का कुणास ठाउक दोघेही झपाट्यानं बेडरूम च्या दिशेनी पळाले... राधिका शांत झोपली होती.  आता मात्र वातावरण कमालीचं गंभीर झालं. कॉफीची तर तल्लफ होती, आता एकटी जायला मोहिनी पण बहूदा कचरत असावी, आणी लहानगीला एकटं टाकून किचन मध्ये जायची दोघांचीही हिंम्मत होत नव्हती.... काय झालं होतं असं ? कि फक्त वातावरणाचा परीणाम होता ?  कुणी आलं आहे का आपल्या घरात ? ही जाणीव आंगावर काटा आणत होती.

अत्यंत कंटाळवाणे असे ते अडीच तीन तास उलटले, बाहेर पक्षांची किलबील सुरु झाली, बेडरूम च्या खिडकीचा पडदा बाजूला सरकवून ग्लास सरकवताच बाहेरुन स्वच्छ आणि गार हवा आत आली तसं एकदम प्रसन्न वाटायला लागलं.. मग मात्र मोहीनी नी दोघांसाठी दोन मग भरुन कडक कॉफी आणली...अक्षरश: असंख्य वर्षांनंतर ब्रश न करताच दोघांनी मग तोंडाला लावले. साडे सहा वाजता ते घर एकदम नॉर्मल होऊन मोहन सुद्धा भर भर आवरत ऑफिस ला जायची तयारी करु लागला.

"मोहन....टीफिन तयार आहे....मी सोनू ला घेऊन निघतेय".....

"ठीक आहे... मी बाथ घेऊन निघतोय लगेच"

"चल बाय... हॅव अ गूड डे "

दरवाजा ओढला जाउन लॅच लागल्याचा रोजचा आवाज आला आणी मोहन बाथरूम मध्ये घुसला.. मस्त पैकी वॉश घेउन फ्रेश होणं गरजेचं होतं. नाही म्हटलं तरी रात्रीचं जागरण, मनस्ताप यांचा हॅंगोव्हर होताच. शॉवर च्या धारा डोक्यावर पडल्या आणि गेल्या ६-७ तासात कसलेच भास झाले नसल्याची खात्री पटली. आंघोळ कशी बशी आटोपली आणि ऑफिस गाठलं. आता मात्र कसलाच विचार करायला वेळ नव्हता. ऑफिस च्या रुटीन मध्ये आणि कामाच्या दगदगीत कसलाच विचार करायला सवड मिळत नव्हती.

वर्किंग अवर्स तर झकास गेले, आता घरी पोहोचायची घाई सुरु झाली. ते सुद्धा अगदी सामान्य पणे पार पडलं. मोहिनीनी दरवाजा उघडला तेव्हा दोघांच्याही चेहेर्‍यावर फक्त वर्किंग सॅटीस्फॅक्शन होतं. डोक्यावरची जखम आठवली ती, वॉश बेसिन जवळ गेल्यावर... पण आता चेहेराच धुवायचा असल्या मुळे झोंबणं वगैरे कटकट नव्हती.

"अगं जरा बघतेस का ? "

"एक मिनिट आले.... हं..काय पाहू ? "

"डोक्यावर नक्की कुठे आणी किती लागलंय ते पहा नं जरा... "

"अरे तिथेच आहे... पण जखम आहे बरं.."

"हं..... म्हणजे काहीतरी लागलं हे निश्चीत"

"का ? तुला संशय होता का ? माझ्या हाताला काय कुंकू लागलं होतं ?"

मोहिनी मग कामाला / स्वयंपाकाला लागली. किचन मधले खमंग वास वातावरण नॉर्मल करत गेले. जेवण आटोपून, टी.व्ही. वरच्या न्युज, आणि सिरियल्स यांचा कोटा संपवून झोपायला निघाले तेव्हा साडेदहा वाजले होते. रात्र आणी झोप आठवल्यावर मोहन किंचितसा अस्वस्थ झाला.

वास्तवीक सगळा दिवस अगदी निर्विध्न गेलेला असल्या मुळे मॅडम रोजच्या प्रमाणेच सगळी आवरा आवर करून शयनगृहात प्रवेश करत्या झाल्या तेव्हा मिस्टर बेड वर मांडी घालून बसलेले दिसताच मोहिनी अभावितपणे खुदकन हसली. त्या आवाजानं सुद्धा मोहन केवढा दचकला....
“अरे काय झालंय तुला नक्की ? केवढयांदा दचकलास ? “
“अगं मी जरा माझ्याच विचारात होतो.”
“कालचा प्रकार का ? “
“ह्म्म....दिवसभर कामात विचारही नाही केला, पण आता मात्र....”
“लिव्ह इट.. नको विचार करुस जास्त...” हे मोहिनी म्हणाली खरं पण त्या वाक्यातला फोलपणा तिचा तिलाच जाणवला.
“चल झोपुया आता.......... होप आज तरी झोप लागेल..”
“नक्की लागेल, कालचं जागरण आणि आज दिवसभरची कामं.. नक्की गाढ झोप लागणार”
बेडरूम चा दिवा मालवला गेला. खरंच दिवसभर च्या दगदगीमुळे थकलेली मोहिनी काही मिनिटातच गाढ झोपी गेली.

मोहन ची मात्र झोप उडाली असावी..डोकं सतत आठवणीच्या फायली सर्च करत असावं... पण कालच्या जखमेशी संबंधीत कोणताच प्रसंग आठवत नव्हता. मोहन तसा फार आस्तिक नसला तरी, अगदिच नास्तिकही नव्हता. देवाचं नाव घेत त्यानी निद्रादेवीची आराधना सुरु केली. झोप नाही आली पण डोकं जरा स्थिर झालं. निदान संदर्भ लावण्या एवढं तल्लख बनलं. चेहर्‍यावर भीतीचे भाव न दिसता आता चौकस / शोधक चेहेरा झाला.

कुठे तरी ट्युब पेटली आणि त्याला आठवली ती मागच्या विक एंड ची ट्रिप....
ऑफिस चे तिन मित्र आणि हे दोघे अशी चार कपल्स गाड्या काढून कोकण भटकायला निघाले. नक्की कुठे जायचं वगैरे काहीच ठरलं नव्हतं, परिसर पाहत, विचारत काहीच न ठरवता भटकायचं होतं.

पुण्यातून भोर मार्गे महाड पर्यंत मस्त एंजॉय करत, आणि अत्यंत धोकेदायक अश्या घाटातून आपापल्या ड्रायव्हींग ची कौतूकं करत / करवून घेत मंडळी महाड ला जेवायला थांबली. जेवणाचा फर्माईशी कार्यक्रम, सगळ्यांच्या विविध आवडी जोपासत गॅंग भरल्या पोटानी हॉटेल बाहेर पडली. आता दोन रस्ते समोर होते पहिला मुंबई कडे जाणारा, आणि दुसरा पोलादपूर कडून पणजी ला जाणारा.

कोकणातलं निसर्ग सौंदर्य उत्तमच.. हिरवीगार झाडी, तांबडी माती, सगळंच कसं मोहक होतं. संध्याकाळपर्यंत कुठलाच हेतू न ठेवता भटकून झाल्यावर एका छोट्याश्या गावात मुक्काम केला, खेडं कोकणातलं असल्यामुळे आवश्यक सामग्री सोबत ठेवायची काळजी मंडळींनी घेतली होतीच. मुलांचं हुंदडणं, धावणं, गप्पा ते अगदी अश्या प्रसंगी अनिवार्यपणे खेळायची अंताक्षरी होता होता मध्यरात्र झाली.

सगळे शांतपणे घोरत पडले आणि जाग आली ती सकाळी पक्षांच्या कीलबीलाटामुळेच. चक्क सुर्योदयाची वेळ, अत्यंत प्रसन्न अशी सकाळ. स्वच्छ हवा, च्यामारी पुण्यासारख्या धुराड्यात रहायचा आज खर्‍या अर्थानी कंटाळा जाणवावा इतकी मस्त सकाळ अनेक वर्षांनी पाहील्याचं सगळ्यांनीच मग आपापसात वेगवेगळ्या शब्दांमध्ये कबूल केलं.

जवळच एक प्राचीन देवस्थान असल्याचं समजलं आणि सगळे चालत चालत तिकडे निघाले. अर्थात गावकर्‍यांनी आफाट स्तूती केलेलं ते जुनं मंदीर फार काही खास किंवा प्रभावी मुळीच नव्हतं, मुलं मात्र मोकळ्या जागेत बेफाम झाली होती. आई वडिलांचं लक्ष मुलांकडेच होतं.  सतिश ची मुलगी रुपाली अशीच धावत असतांना एक मोट्ठा पक्षी वेगात उडत तीच्या डोक्याजवळून उडत जाउन जवळच्याच एका झूडूपावर बसला. अभावितपणे सगळ्यांनीच ओरडून तिला जवळ बोलावलं आणि त्याला हुसकावून लावलं. तो पक्षी  (नक्की कोणता पक्षी होता कोण जाणे..) मात्र चांगलाच धीट असावा... जरा समोरच्या झाडावर जाऊन चोच घासत बसला....

नंतर मात्र खास लक्षात ठेवावं असं काहीच झालेलं नव्हतं... रात्री सगळ जण आपापल्या घरी उद्याच्या रुटीन साठी तयार होण्या साठी झोपले होते.. विचार करता करताच झोप लागली असावी मोहन ला परत विचार करायला उसंत मिळाली तीच मुळी दिवसभरची कामं, रात्रीचं जेवण  आटोपल्यावर...

मोहन विचार करुन कंटाळला,  किचन मध्ये मोहीनीची कामं उरकली असावीत, भांड्यांचे आवाज येत नव्हते. अंदाज बरोबर होता, मोहिनी बाहेरच येत होती... अचानक दोघं समोरा समोर आले आणि दचकले... दुसर्‍याच क्षणी ते दचकणं हसण्यात बदललं आणि वातावरण स्वच्छ झालं. 

“अगं तुला तो पक्षी आठवतोय का ?

“तो म्हणजे ? कुठला पक्षी ?

“तो कोकणात दिसलेला गं “

“आत्ता तो आठवायं काय कारण ? “ इथे पण आलाय का ? मोहिनीनं सहजच विचारलं आणि मोहनचं अंग का कुणास ठाउक एकदम शहारलं....

“अरे काय झालं एकदम ?

“काही नाही.... मोहन उच्चारला पण कुठे तरी त्याच्या शहारण्यात भितीची लहर होती हे त्याच्याच लक्षात आलं.

एवढं काय अस्वस्थ होण्या सारखं होतं हे आठवण्यात हे कळत नव्हतं पण वातावरणात आता एकदम दडपण आलं होतं हे मात्र नक्की.

मग मात्र कोंडी फोडण्या साठी मोहनच बोलायला लागला....

“मोहिनी.... खरं सांगू ? मला आत्ता त्या पक्षाची नजर जरा विचित्र होती हे जाणवायला लागलंय..तेव्ह्या आपण पिकनीक च्या मूड मध्ये होतो..

“हो रे... तसा तो रोखूनच पहात होता” पण तुला अचानक का आठवतंय ते ?

“काही नाही असंच आठवलं”

“अनिवेज, लेट्स स्लीप नाउ”

“ह्म्म... प्रयत्न करतो”

“आता काय झालं बाबा आणखी ?

“तेच, डोक्याची ती जखम, मला खात्री आहे तो वेगळाच काही प्रकार वाटतो,”

“म्हणजे  ?

“डेफिनेटली माझं डोकं कुठेच आपटलं नव्हतं, मग जखम झालीच कशी ?

“मोहन प्लीज आता नको हा विचार... सकाळी थंड डोक्यानी विचार करु मी सॉलीड थकलेय आता”

“ठिक आहे, झोप तु”

अर्थातच मोहीनीला त्याचा या फुटकळ परवानगीची गरज नव्हती.  बेड वर कलंडताच ती शांत झोपी गेली.

झाल्या प्रकारानी मोहन ची झोप मात्र पार उडाली. दिवसभर चा शारीरीक थकवा आणी घरी आल्या पासूनचे हे विचार. याचाच प्रभाव म्हणून की काय मोहन ला कमालीची अस्वस्थता आली, बेडरूम मध्ये कसलं तरी दडपण जाणवायला लागलं. सतत आपल्यावर कुणीतरी रोखून बघत आहे असे भास व्हायला लागले.

या दडपणातच केव्हा तरी डोळा लागला असावा, पण जाग कशा मुळे आली हे कळायची संधी मिळत नव्हती. मोहन फ्लॅट च्या बाल्कनीत उभा होता आणि अपार्टमेंट च्या आवारातल्या नारळाच्या झाडावर दोन सुस्पष्ट हिरवे ठिपके जणू त्याच्या कडेच त्वेषानी पहात होते. ती हिरवी नजर चूकवायचा तो आटोकाट प्रयत्न करत असावा पण ते जमत नव्हतं जणू कसल्या तरी प्रभावाखाली तो तसाच लाकडासारखा उभा होता.

किती वेळ तो या स्थितीत उभा होता कुणास ठाउक पण अचानक शरीराच्या संवेदना पुर्ववत होऊन हलचाली सुरु झाल्या आणी त्या नजरेच्या टप्यातून लांब होण्याच्या अनिवार इच्छेने तो गर्रकन मागे वळला आणि कशाला तरी अडखळून पडला.  झाडावरचे हिरवे ठिपके क्षणात चमकून विझले आणि आतून मोहिनी धावतच बाल्कनीत आली.

धडपडीत मोहन कशावर तरी आपटून भूईसपाट झालेला, दोन्ही हात डोक्यावर गच्च धरलेले, डोळे पांढरेफटक पडलेले, त्याची ती आवस्था पाहवत नव्हती. डोळे आणि चेहेरा यांच्यावर मुर्तीमंत भीती पाहून मोहिनी जागीच थिजली.

उरलेली रात्र भयाण गेली. न फारसं बोलणं झालं न धड झोप. सकाळी मात्र दोघांनीही लीड घ्यायचं ठरवलं फार काही अकल्पीत घडण्या आधीच रुट कॉज पर्यंत जायचं ठरवलं गेलं त्या साठी नेमकं कोणत्या दिशेनी जायचं हे माहीत नसून सुद्धा. दोघांनीही आठवडाभराच्या रजा कळवल्या. दोघांनी आपापल्या परीनं विचार केला. गडबड नक्कीच त्या ट्रीप पासून झाली असावी यावर एकमत होतं.

मोहन चा मोबाईल खणखणला...... ऑफिस ची कटकट असावी या कल्पनेनं जरा चिडक्या स्वरातच त्याने हॅलो केलं....   पलीकडचं बोलणं ऎकून बहुदा त्याला धक्का बसला असावा.

“काय रे कुणाचा आहे फोन ?’

“अगं विनायक चा अपघात झाला.... तो अत्यवस्थ आहे.

“अपघात ? कसा झाला, केव्हा झाला ?

“अगं जस्ट तुझ्यासमोर मोबाईल वर कळलंय मला ते ही मोजक्या शब्दात.. प्रश्नांची सरबत्ती काय लावलीयेस लगेच”

“ओके...पण नक्की काय झालंय ते तरी कळलंय का ?

“नाही... चल आपण डायरेक्ट हॉस्पिटल लाच जाऊया.

“ठीक आहे मी आवरते”

“ते आवरणं जरा आवरतं घे हं...”

“हो माहितीये...”

हॉस्पिटल च्या आवारातच विन्याची बायको भेटली.. परिस्थिती पाहवत नव्हती.. मोहन आ.सी.सी.यु च्या दिशेनी गेला आणि मोहीनी तिच्या जवळ बसली.

विनायक ची स्थिती पाहून मोहन हदरला... मुख्य मार डोक्यालाच होता.  सकाळी सकाळी अपघात व्हायला हे गेला कुठे होता हे जाणून घ्यायचं होतं. बाहेर येऊन पाहतो तर मोहीनी शॉक मध्ये.... आता हिला का एवढा धक्का बसावा हे नवं कुतुहूल.

“वहीनी काय झालं नक्की ?’

“भाउजी.. मोहिनी सांगेल तुम्हाला... सांभाळून रहा”

“ऑं सांभाळून राहू ? आहो मी अत्यंत सेफ ड्रायव्हींग करतो”

“एक मिनिट मोहन... मोहिनी त्याला थांबवत बाहेर घेउन गेली.

“अगं मला नक्की सांगशील का काय झालंय ते ?

अरे आपल्या सारखाच प्रकार... सतत तिन दिवस डोक्याला लागत राहिलं त्यांच्या. आणी आज मॉर्निंग वॉक च्या वेळी एका पक्षानी जणू त्यांचा पाठलाग करत सहा सात वेळा चोचा मारल्या... त्याच्या पासून लांब पळतांना एका भरधाव कार नी उडवलं त्यांना... मोहिनीनं एका दमात कसं बसं सांगून टाकलं आणि सुस्कारा सोडला....

आता मात्र मोहन ला आपण काय संकटात आहोत याची जाणीव झाली. कदाचित पुढचा नंबर आपला या कल्पनेनं त्याला घाम फुटला. पण दोघांना एक बरं वाटलं... निदान या पुढची स्टेप साधारण काय असु शकेल याचा अंदाज तरी बांधता येत होता.

विनायक च्या सासर्‍यांकडून हिच कहाणी जरा डीटेल कळाली एवढंच. मोहन नी मग त्यांना त्याच्या बाबतीतलं सांगून टाकलं. एवढा तंतोतंत प्रकार म्हणजे योगायोग नाही हे त्यांच्या घ्यानात आलं. काही वेळ शांत राहून मग ते मोहन ला म्हणाले,

“मोहनराव तुमचा आभारी आहे तुम्ही बोलला नसतात तर शेवटपर्यंत फक्त औषधोपचारच करत बसलो असतो.”

“माफ करा पण मला नक्की समजलं नाही तुम्ही काय म्हणताय ते “

“आहो तुमचा प्रकार ऎकल्यावर विनायकरावांना नुसता अपघात झाला कसं म्हणायचं ?”

“बरोबर आहे.... आता उद्या परवा माझा नंबर लागणार बहुतेक”

“आहो त्यासाठीच म्हणतोय... नुसती औषधं नकोत.. आपल्याला “महंतांकडे” जावं लागणार आहे”

“महंत ? कुणी मांत्रीक आहेत का ? “

“छे छे... मांत्रिक असं नाही म्हणता येणार.. पण अत्यंत जाणकार म्हणवले जातात”

मोहिनी मग घरी गेली.  आम्ही दोघेजण महंतांच्या घरी पोहोचलो.  वेल फर्निश्ड फ्लॅट आणि महंत यांना पाहील्यावर मोहन तर आपण नक्की कशासाठी आलोय हेच विसरला. आहो अगदि चार चौघांसारखे दिसणारे महंत असल्या संकटात काय मदत करणार अशी शंका लगेच त्याचा मनात आली.

महंत मंदपणे हसले, जणू मोहन च्या मनातले विचार त्यांना ऎकू आले. मोहन ओशाळला.. पण महंत म्हणाले...

“आहो खरं आहे ते.. तुम्हाला काय वाटलं ते कळलं मला, पण ते नॅचरल आहे. “ विनायक च्या सासरेबूवांनी मग त्यांना शक्य तितक्या तपशिलवारपणे सगळं सांगीतलं. दोनच मिनिटं महंत डोळे मिटून स्वस्थ बसले,  पण तेवढा पॉज खूप गंभीर वाटला दोघांनाही.

“मोहन अतिशय वाईट दिवशी कळत नकळत तुम्ही लोक एका अत्यंत वाईट जागेवर फिरलेला आहात. नऊ दिवसांपुर्वी आमावस्या होती, तुम्ही लोक याच दिवशी एका असंस्कारीत जागेवर फिरलात आणि कुणाला तरी चाळवून आलात.” महंताचा कणीदार आवाज शांतता चिरत गेला. मोहन काही बोलणार त्या आधिच महंत पुढे बोलू लागले,

“मला सांगा त्या ओसाड जागेवर नुसते फिरलात ?”

“हो म्हणजे एका जुन्या मंदिराकडे जातांना जरा वाकड्या वाटेनं गेलो...अर्थात ते पण चूकून”

“ह्म्म.. पण नक्कीच काहीतरी तपशिल चूकतोय असं मला वाटतंय.. तुम्ही आठ जण आणि बच्चे कंपनी असे होतात.. अगदी निरागस लहान मुलांना सहसा दोष लागत नाही पण माझ्या मते विनायक आणि तुम्ही, तुमच्या कडून नक्कीच काहीतरी गैरप्रकार झालेला आहे.”

“आहो खरंच सांगतो... मोहन चा आवाज उगाचच अपराध्या सारखा झाला

“मोहन अस्वस्थ होऊ नकोस.. अजाणतेपणी देखील चूक झालेली असू शकते ना ! अगदी नीट आठवून पहा, त्या भागात कुठल्या मोठ्या दगडाला लाथ मारलेली असू शकेल, किंवा त्यावर थुंकलेलं असू शकेल....”

मोहन चा चेहरा आता वेडावाकडा झाला, महंतानी ते लगेच ओळखलं असावं.

“बोल मोहन... काहीच लपवू नकोस  पुढचे उपाय तुझ्या अचूक सांगण्यावर अवलंबून आहेत. आणि हो.. ज्या अर्थी तुम्हा दोघांना त्रास झाला, चूका तुमच्या दोघांच्याच आहेत... बाकीचे लोक सेफ आहेत.”

अगदी नीट आठव आणि सांग...

एक एक पाउल आठवत मोहन ते भटकणं आठवत होता. बाकी दोघेजण तो काय सांगतोय याच्या प्रतिक्षेत होते. यावर विचार करायल आठवायला विन्या सोबत असता तर मदत झाली असती असा विचार मोहन च्या मनात आला.

“ते शक्य नाही मोहन... विनायक अत्यवस्थ आहे तुलाच आठवावं लागेल.  महंत म्हणाले आणि हेच आपल्याला या संकटातून बाहेर काढतील याची मोहन ला खात्री झाली. तेवढ्यात चहा आला. गरम चहाचे घुटके चाखल्यावर मोहन ला जरा हुषारी आली.

“तु आठव मोहन मी आलोच.. “ महंत म्हणाले आणि आत निघून गेले. सतत आठवायचा प्रयत्न करूनही मोहन ला विषेष असं काही आठवेना. मोहन स्वत:वर प्रचंड वैतागला स्वत:च्या मेमरीची किव वाटायला लागली एवढा. महंत दहा पंधरा मिनिटांनी प्रसन्न चेहेर्‍यानी बाहेर आले. हातात एक उदबत्ती होती. तिला वास असावा पण सुगंध म्हणता येईल असं नव्हतं.

नक्कीच तो वास पाला पाचोळा जळतांना येतो तसा वाटत होता पण अगदी १००% तसा नव्हता. एवढी बारीक उदबत्ती पण धूर मात्र खूपच येत होता. पाहता पाहता हॉल धूरानी भरुन गेला. वासाची उग्रता आता नकोशी वाटायला लागली. अत्यंत घनदाट जंगलात वणवा पेटावा आणि लांबून तो जळका वास ज्यात झाडं पानं, आणि काही निष्पाप प्राणी सुद्धा जळत असल्याचा वास मिसळला असावा असा वास अगदी असह्य होत गेला.

हळू हळू वार्‍यानी तो जळका वास दुसरीकडे वाहून नेला, आणि मोहन भानावर आला. हॉल मध्ये ना जळका वास होता ना धूर. एक मंद शब्दात सांगता न येणारा सुगंध मात्र दरवळत होता.

“काय मोहनराव... आठवलं का ? “

“मला काही अस्पष्ट दृश्यं आठवतायत.”

“जे आठवेल ते सांगा”

“त्या दिवशी चालत असतांना दूरवर कुठे तरी काहीतरी जळत असल्याचा वास आल्याचं जाणवलं..पण जवळपास कुठेच धूर दिसला नव्हता. पण वास निष्चित मघाशी या हॉल मध्ये आला तसाच होता. थोडं पुढे गेल्यावर मात्र वास नाहीसा झाला. १०-१५ पावलं पुढे गेल्यावर विनायक एका बाजूला आडोश्याला गेला, मी मागे वळून त्याच्याकडे गेलो... मग माझ्या लक्षात आलं की तो “लघुशंकेला’ उभा आहे. मी पण मग त्याच्यापासून थोड्या अंतरावर उभं राहून उरकुन घेतलं... “

“हेच ते....”  उदबत्ती चा प्रभाव... महंत म्हणाले.... मोहनराव.. हेच तुम्हाला मघाशी आठवत नव्हतं ना ?

माझ्या लक्षात येतंय आता, काय झालं असावं ते.....

सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना सतत वापरा साठी अभिमंत्रित केलेले ताईत देतो.  सगळ्यांनीच ते सतत वापरायचे आहेत. उद्या मला थोडीशी तयारी करावी लागेल. परवा पहाटेच आपण परत त्या जागी जाणार आहोत.  नक्कीत खरं रहस्य तिथेच कळेत. मला खात्री आहे त्याच परीसरात जुनं कदाचित आज वापरात नसलेलं स्मशान असायला हवं.

महंतांच्या या बोलण्यानी दोघांचीही पाचावर धारण बसली.

“अरे घाबरून जाउ नका... हे ताईत सोबत असतांना तुम्हाला प्रत्यक्ष ईजा होणं शक्य नाही. डॉक्टर काय म्हणतील याचा विचार न करता सर्वप्रथम यातला एक ताईत विनायक च्या गळ्यात घातलाच पाहीजे. एक लक्षात ठेवा, त्या जागेत नक्कीच तुम्ही नकळत का होईना लघुशंका केलीय... काहीतरी जुनाट, अतिप्राचीन, अतिप्रभावी असं तुम्ही चाळवलंय..

महंत बोलत होते तसं या दोघांचं टेंन्शन वाढत होतं, हार्ट्बिट्स वाढत होते, हाता पायाला कंप सुटलेला जाणवत होता. महंतांनी मग एक पुडी सुद्दा दिली आणि ती विनायक च्या उशाशी ठेवायला सांगीतलं.

भक्क डोक्यानी दोघेजण हॉस्पीटल मध्ये पोहोचले तर सगळे त्यांचीच वाट पहात होते.  विनायक ची तब्येत सतत खालावत चालली होती. डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करत होते पण पेशंट कडून रिस्पॉन्स मिळत नव्हता.

तात्या म्हणजे विनायक चे सासरे मग गप्प बसले नाहीत..  डॉक्टरांना  पटत नसतांना सुद्धा त्यांनी तो ताईत विनायक च्या गळ्यात घातलाच, आणि रक्षेची पूडी त्याच्या उशाखाली ठेवलीच.. यानंतर मात्र विनायक आहे त्या अवस्थेत स्टेबल आहे असं डॉक्टरांना जाहीर करावंच लागलं.

खूप जास्त नाही पण कणाकणाने विनायक ची तब्येत सुधारत होती. डॉक्टरांचे उपाय उत्तम असले तरी या मागे महंत यांची उपाययोजना होतीच. या गडबडीत रात्रीचे साडेनऊ कधी वाजले पत्ताच लागला नाही. मोहीनी चा फोन आला तेव्हा मोहन घरी जायला निघाला. मनावर अनेक गोष्टींचा ताण होता. उद्या महंत काय तयारी करणार आहेत याची उत्सुकता होती.  परत एकदा या धूंदित गाडी चालवतांना एका ठीकाणी करकचून ब्रेक दाबावा लागून कार कंट्रोल करावी लागली.

कधी एकदा घरात जाऊन झाल्या गोष्टी बायको शी बोलतो असं मोहन ला झालं होतं. फ्लॅट समोरच ही घाई महागात पडली, कशावरून तरी पाय घसरला आणि परत एकदा मोहन चितपट झाला. आपल्याच घरची कॉलबेल वाजवणं मुष्किल होणं म्हणजे काय प्रसंग असेल विचार करा. शेवटी दरवाजा कसा बसा वाजवून दार उघडायची वाट पहात मोहन दारासमोर बसला होता.

दार उघडताच नवर्‍याला दारासमोर फतकल मारुन बसलेला पाहून मोहीनी आवाकच झाली... नकळत थोडंसं हसली..

“मोहन ठीक आहेस ना ? “

“तुला गंम्मत वाटतेय ही ? पाय घसरुन पडलोय मी”

“गंम्मत कसली रे... पण परवा पासून तिसर्‍यांदा पडलायस..”

“आधी हात दे... “

महाशय मग घरात प्रवेश करते झाले. मग, जेवण, मुरगळलेल्या पायावर मॅजिक स्प्रे मारणं, जेवणानंतर पेन रिलिव्हर गोळी घेणं झाल्यावर मोहन नी महंत, त्यांचे अंदाज, त्यांचे उपाय आणि परवा तिकडे जायच्या प्लॅन बद्दल सांगत, एक ताईत तिच्या आणि एक चिमुकल्या रसिका च्या गळ्यात घातला.

“माय गॉड मोहन हे फार भयानक आहे रे...”

“कुठून त्या भागात ट्रिप काढायची दुर्बुद्धी झाली कोण जाणे”

“तुझ्या लक्षात येतंय का मोहन... हा ताईत नसता तर कदाचित तुझ्या कारचा सुद्धा अपघात होउ शकला असता, आणी इथे कदाचित तू जास्त जोरात धडपडू शकला असतास”

“हो लक्षात येतंय... आणि काय काय पुढे मांडून ठेवलं आहे देव जाणे”

आज मात्र मनावरचा ताण असेल म्हणून म्हणा, दोन दिवसांचं जागरण असेल म्हणून म्हणा, किंवा महंतांचा ताईत होता म्हणून म्हणा दोघांनानी बरी झोप लागली.

सकाळचं सगळं आटोपून आज कधी नव्हे ते मोहन देवाला नमस्कार करून बाहेर पडला. हॉस्पिटल मध्ये बातमी निष्चित आनंदाची होती. २४ तासात कल्पने पलीकडे प्रगती दिसत होती. मग तासभर मोहन ऑफिशियल फोनाफोनी करत बसला.

साडे अकरा ला तात्या आणि मोहन मेडीकल इन चार्ज ला भेटू शकले.

“काल अती रक्तस्रावामुळे पेशंट खूपच नाजूक अवस्थेत होता. ब्लड प्रेशर जरा नॉर्मल झाल्यावर आम्ही सरळ एम.आर.आय. केलं... फॉर्च्युनेटली सेलेब्रल डॅमेज नव्हतं. पण पेशंट सतत क्रिटीकल होत होता. दुपार पासून पेशंट स्टेबल व्हायला लागला आणि आता नक्कीच उत्तम डेव्हलपमेंटस आहेत”

टेंशन झपाट्यानं कमी होत होतं. दुपारी चार साडेचार ला महंतांचा तात्यांना फोन आला.  आम्ही त्यांच्याकडे जायला निघालो. तिकडे पोहोचल्यावर महंतांनीच आम्हाला मेडीकल रीपोर्ट सांगीतला, मंद हसत म्हणाले, “माझी तयारी झालीय. आता थोडंसं तुमच्या तयारी बाबत सांगतो.”

“या प्रसंगातले मोहनराव तुम्ही सोबत असालच, पण विनायक अत्यवस्थ असल्या मुळे आपल्या बरोबर येऊ शकणार नाही.”

“हो मला पण तोच प्रश्न पडला होता. “

“कल्पना आहे मला... बरं त्यांच्या पत्नीला सोबत नेणं ठीक नाही... तात्या तुम्ही बोललांत का त्यांच्याशी ? म्हणजे काय प्रकार घडलाय याची कल्पना दिलीय का त्यांना ? “

“फार विस्तृत नाही बोललो... फक्त जरा बाहेरची बाधा आहे असं सांगीतंय... “

“हे उत्तम... आता सांगा तुमची मुलगी कशी आहे.. आय मिन, हळवी आहे की खंबीर..? “

“महंतजी, ती चांगलीच खंबीर आहे... मी सांगताच म्हणाली.. मला शंका येतच होती म्हणून...”

“हे पहा जर ती सोबत येऊ शकत असेल तर काही रिझल्ट्स लवकर येतील.” “तुम्ही आहात पण विनायकरावांशी तुमचं रक्ताचं नातं नसल्या मुळे त्यांच्या ऎवजी अशा विधींमध्ये तुम्ही काहीच करु शकणार नाही”

“आहे ती एका पायावर येईल... विनायक साठी काय वाट्टेल ते दिव्य करेल ती”

“हे मात्र खरं आहे “  “ तात्यांच्या प्रखर विरोधाला न जुमानता विन्याशी लग्न केलंच ना तिनं ? “ मोहन च्या या वाक्यानी वातावरणातला ताण जरा हलका झाला.

पहाटेच उठून आंघोळीच्या पाण्यात खाली पडलेली औदुंबराच्या झाडाची पाच पानं टाकून साबण न लावता स्नान करायचं, अर्धी आंघोळ झाल्यावर पाण्यात चिमुटभर हळद टाकायची, आंघोळ झाल्यावर कापूर आरती घ्यायची. कुलस्वामिनीला वंदन करुन काहीही न खाता पीता त्या जागेवर जायचं होतं.. पायात चामडी चप्पलच चालणार होती... अनवाणी असल्यास अत्युत्तम.

महंतानी आम्हाला एवढंच करायला सांगीतलं. पण चामडी चप्पल आणण्या पासून तयारी होती. नाही म्हटलं तरी परत तिथं जायचं म्हटल्यावर जरा धाकधूकच वाटायला लगली होती.

“औदुंबर म्हणजे साक्षात दत्तगुरुंचा वास असलेला वृक्ष’ त्यासोबत हळद म्हणजे देवीची कृपा.... ताईत कालभैरवाचे आहेत, हे सगळं आपल्या सुरक्षेसाठी. बाकी काय ते जागेवर कोणत्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल यावर ठरेल.”  महंतांनी खूलासा केला.

“मी कुणी अघोरी मांत्रीक वगैरे मुळीच नाही, आपण त्या शक्तींशी लढणार नसून त्यांची समजूत काढणार आहोत, माफी मागणार आहोत. जगात चांगल्या आणि वाईट अश्या दोन्ही शक्त्या आहेत, पण आजवर चांगल्या शक्तीचाच शेवटी विजय झालेला तुमच्या लक्षात येईल. माझ्या अंदाजानी जे काही तुमचा पाठलाग करतं आहे, ते जुनं आहे, मृत्यु पुर्वी पवित्र असणारं असायला हवं... दुरात्मे असते तर परतीच्या प्रवासाताच त्रास सुरु झाला असता. पण लक्षात घ्या उथळ पाण्यालाच जास्त खळखळाट असतो... जे लवकर आंगावर धावून आलं ते उसनं आवसान असणारं असायची शक्यता असते... उलट आठवड्यानंतर गाठणारं जागृत झालंय ते नक्कीच प्रभावी, दाहक, आणि संतापी असु शकेल.”

महंतांचं बोलणं, त्याचा धीरगंभीर आवाज, गोष्टी सांगायची पद्धत खूपच प्रभावी होती. ऎकत रहावसं वाटत होतं. पण हे एखादं प्रवचन नसून उदया साठीच्या सूचना आहेत हे उमजून मन आणि डोकं यावरचा ताण वाढत होता.  

तिथं गेल्यावर नक्की जागा शोधावी लागेल. जरा त्या परीसराचं चित्र डोळ्यासमोर आणून ठेवा. एक उदबत्ती हवं तर सोबत घेऊन जा, घरी शांत वातावरणात लावा. पण शक्यतो अगदीच आठवत नसेल तर... कारण उदबत्तीचा प्रभाव तुम्ही पाहीलाय, परत त्या वातावरणात एकटे जाल, आणी अस्वस्थ होऊ शकाल, सुर्योदयापूर्वी प्रवास सुरु झालाच पाहीजे हे पक्क लक्षात ठेवा.

माझ्या अनूभवावरून सांगतो, यात विघ्न येतील, हे होऊ नये असं वाटणारे तसा पराकोटीचा प्रयत्न करतील, यात तुमच्यात भीती उत्पन्न करणं, या विधिवर अविश्वास निर्माण होणं, वस्तू न सापडणं, असं काहीही होऊ शकेल. गाडीत आजच पेट्रोल भरुन ठेवा, गाडीच्या किल्ल्या जानव्याला किंवा ते नसेल तर पॅंट च्या एखाद्या हूक का बांधून ठेवा. मघाशी सांगीतलेली सामग्री या पिशव्यांमध्ये आहे, तुम्ही दोघांनीही पिशव्या भल्या पहाटे लगेच हाताशी लागतील अशा ठेवा. कार मध्ये रात्रभर न ठेवणं उत्तम.

गेल्यावर सहसा आपण आपापसात फार बोलणार नाही. अगदीच आवश्यक असेल तेव्हा, आणि शक्यतो खुणांमध्येच  संभाषण करू.  मन शक्यतो निर्विचार ठेवा. हे कठीण आहे पण तुम्हाला प्रयत्न करावाच लागेल. या घटनांवर आता विचार करणंच सोडा. माणसांच्या विचारची आवर्तनं या शक्तींना कळू शकतात. अगदी हजारो मैलावारून सुद्धा. असं झालं तर तुमच्या मनाचा ताबा घेणं या शक्तींना सहज शक्य  होतं, तुम्ही मग त्यांना हवा तसा विचार करू शकता. यासाठीच या सूचना देतोय.

लक्षात ठेवा ताईत गळ्यात असे पर्यंत तुम्हाला कोणतीही इजा करु शकणं या शक्तींच्या आवाक्यात नाही,  जागेवर कदाचित काही भास होऊ शकतील, मनाची चलबिचल होऊ शकेल.. म्हणूनच  मनात विचार करायचा नाहीये.  तिथं गेल्यावर फक्त मी विचारेन त्याला चटक्न उत्तर द्यायचं फार विचार न करता, तुम्ही कोर्टात साक्ष देत नाही हे ध्यानात घ्यायचं.

महंत भेटले आता काळजीचं कारण नाही असं जे आम्हाला वाटत होतं ते अगदिच तसं नसून खरं तर आता आम्हाला आमच्या वाढीव जबाबदार्‍या कळत होत्या.

मोहन, तुझीच कार नेणार असू, तर सकाळी या पूडीतली रक्षा आणि कुंकू एका नारळाला लावून एका फटक्यात गाडीसमोर म्हणजे इंजीन / रेडीएटर समोर फोडून मागे फेकुन द्यायचा आणि तीकडे मुळीच वळून पहायचं नाही.

शेवटी सगळ्यात महत्वाचं, जे जे त्या दिवशी त्या भागात फिरले होते, त्या त्या लोकांचे तिथे फिरतांना घातलेले कपडे एका गाठोड्यात सोबत आणायचे... लक्षात आलं ना ? सगळे कपडे... ज्यांना आजवर त्रास झालेला नाही त्यांचे सुद्धा. एका विशिष्ठ विधित आपण त्यांना नष्ट करणार आहोत.

महंत म्हणाले आणि आमचं काम किती कठीण आहे याची परत एकदा जाणीव झाली.  उरलेल्या दोन कपल्स ना त्या दिवशीचे कपडे मागायचे, आणि आम्ही ते नष्ट करणार आहोत हे सांगायचं... जरा कठीणच वाटत होतं हे काम...

“अचानक तुम्ही असं का म्हणताय हे ते लोक विचारतील, तरीही.. काय वाट्टेल ते सांगून आणा,  पण ते कपडे तुमच्यात राहता कामा नयेत. या समस्येच्या समूळ नायनाटा साठी हे आवश्यक आहे.”

“महंतजी ... मी लगेच कामाला लागतो. हे दोघंजण बारा गावचे मुंजे आहेत... ते घरी नसतील तर पंचाईत व्हायची”

“अगदीच घराला कुलुपं असतील तर नाईलाज आहे.. पण तसं नसेल तर मात्र हटकून सगळे कपडे आणाच, शिवाय त्या दिवशी जर कुणी सिंथेटीक मटेरीयल ची फूटवेअर्स वापरली असतील तर ती सुद्धा मोज्यांसकट नष्ट करावी लागतील. आता वेळ दवडू नका, आपण शक्यतो भल्या पहाटेच निघू. “

महंतांचं बोलणं संपलं आणि आम्ही त्यांचा निरोप घेतला. दोघांनाही मी फोन केले, सुदैवानी दोघंही घरीच होते. सुधीर नी फार लांबड न लावता कपडे, बूट, मोजे असे सगळे जिन्नस आमच्या हवाली केले. त्याला विनायक च्या अपघाता संबंधी कळलं होतं...

सुधीर ला मग मी शक्य ते सगळं सांगून टाकलं... थोडासा धक्का बसला तरी तो बराच नॉर्मल वाटत होता..

“मोनु लेका मी पण खरं तर सर्वत्र पिचकार्‍या टाकत चाललो होतो रे.... “ सुधीर.... जमल्यास मी काही करायची गरज असेल तर माझ्या बद्दल सुद्धा त्या महंताना विचारुन बघ ना... “

आगाउपणा करत मग मी महंतांना फोन केला... हि माहीती त्यांना माहीत असावी असं मला वाटलं म्हणून...

“अरे वा..... मोहन एक करा तुमच्या या मित्राला सोबत घेता आलं तर घ्या...अगदी छान झालं तुम्ही मला फोन केलात ते... “

“विचारतो त्याला.... बहुदा नकार नाही देणार तो..”

“नाहीच देणार मला कल्पना आहे”   कशी ? ते महंतांना विचारायची माझी हिंम्मत मात्र झाली नाही..

सुधीर उत्साही... लगेच तयार झाला, आहो पहाता पहाता त्यानं औदुंबराची पानं आणली सुद्धा महाशय आमच्या पेक्षा तिथं जायला जास्त उत्सुक दिसले.

दिनेश कडे मात्र गड लढवावा लागला, म्हणजे दिनेश आणि वहीनी लगेच तयार झाल्या, पण त्या दिवशीचा ठेवणीतला आणि अतिशय आवडता ड्रेस द्यायला त्याचा मुलगा मुळीच तयार नव्हता. शेवटी सुधीरनीच एक व्हिडीओ गेम, चार मोठ्या डेअरी मिल्क चॉकलेट्स आणि आईसक्रीम अशी लाच देउन सहजगत्या ते कपडे हस्तगत केले.

याला म्हणतात प्रसंगानूरुप वागण... मुलाला रडत ठेउन ते कपडे हस्तगत करणं फार त्रासदायक झालं असतं मोहनला. उद्याच्या कठीण प्रसंगात सुधीर खूपच उपयोगी सिद्ध होणार याची मला खात्री झाली. तिथून मग आम्हा तीघांचा मोर्चा परत एकदा हॉस्पीटल ला पोहोचला.

वहीनींना समजावून सांगण्याचा एपीसोड झाला. त्या तयार राहणार होत्या.. एवड्यात माझा मोबाईल खणखणला...

महंतांचा फोन....

“मोहन एक सांगायचं राहीलं... हॉस्पिटल मध्ये उद्या संध्याकाळ पर्यंत कोणत्याही कारणाने, कुठली प्रोसिजर करतांना, स्पंजींग करतांना, विनायक च्या गळ्यातला ताईत काढायचा नाही... उशा खालची रक्षेची पूडी तिथेच ठेवायची, स्ट्रेचर वरुन कुठे नेलं तरी पुडी त्याच्या उशाखालीच असली पाहीजे हे विसरु नका म्हणावं”

शेवटी तात्या या जबाबदारी साठी आम्ही परत येई पर्यंत हॉस्पीटल मध्येच राहणार होते.. वहीनींना सगळं नीट तेच समजावून सांगणार होते.  रात्री साडेबाराला तात्यांनी  मोहनला फोन करुन ती संपूर्ण तयार असल्याचं सांगीतलं.. आता मात्र सुधीर सोबत आहे या मुळे मोहन ला धीर आला.

एखाद्या मोहिमेवर जाण्या आधी जशी मानसिक शारिरीक तयारी केली जाते तसंच काही मोहन ला वाटत असावं.. त्याच्या चेहेर्‍यावरून ते स्पष्ट कळत होतं. चिंता होती ती हॉस्पीटल ची जबाबदारी स्विकारणार्‍या तात्यांची. महंतांच्या म्हणण्यानुसार या कालावधीत विनायक च्या तब्येतीत प्रचंड उतार चढाव येऊ शकणार होते. अगदी एखाद्या वेळी तो असह्य होऊ शकणार होता.

तात्यांनी हे संबंधीत वैद्यकीय अधिकार्‍यांना सांगुन ठेवलं होतंच...पण येत्या काही तासातच आयुष्यातल्या एका अद्वीतिय प्रसंगाला मोहन सामोरा जाणार होता.

असंख्य विचारांचा डोक्यात कोलाहल माजून डोकं चांगलंच ठणकायला लागलं आणि मोहन नं शेवटी पेनकिलर घेतलीच. निदान काही तास शरीर आणि डोकं यांना विश्रांतीची नितांत गरज होती.

महंतानी दिलेल्या सुचना एवढ्या परफेक्ट होत्या कि सकाळी सगळ्या वस्तू हव्या तेव्हा लगेच सापडल्या. घाई घाईत सगळं आटोपत असतांना मोहिनीच्या तोंडाचा पट्टा सुरुच होता. शेकडो सुचना ऎकून शेवटी मोहन चा संयम सुटला.

“हो गं.. मला काय दूधखूळा समजलीस काय ?”

“खरं बोललं तर सख्या आई वडीलांना सुद्धा राग येतो मोहन”

“वाद विवाद स्पर्धा नाहीये मॅडम इथे... जरा कमी सुचना देत जा... “

“गरज आहे म्हणून दिल्यात.. वेळ जात नाहीये म्हणून बोलत नाहीये मी “

“हे बघ मला सगळ पाठ झालंय आता... आणि मी काही विसरत नाही माहित आहे ना तुला ?’

“काय आव आणतोस मोहन ? नको तिथं नको ते काही करु नये हे लहानपणी शिकला होतास ना ? मग त्या रानात कसा विसरलास ? “

हा टोमणा मात्र जहरी होता.. यावर चिडून मोहन काही बोलणार एवढ्यात सेलफोन वाजला... आता आणखी काय नवीन सांगतात महंत या काळजीत नंबर न पहातच त्यानं फोन रिसिव्ह केला.. पण फोन सुधीर चा होता.

“ हॅलो.. अरे मोहन.. मी तयार आहे आणी तुझ्याकडेच यायला निघतोय..”

“ओके हरकत नाही... “

“आणि हो.... आपण माझ्या इओव्हानीच जाउ या.. सेंट्रो नको.. जागा कमी पडेल..”

“बर.. मग तु ईकडेच ये.. आपण तो नारळ उतरवून टाकू तुझ्याच गाडी समोर.”

“ठिक आहे मी निघतोय... “

देवाला मन:पुर्वक नमस्कार करुन मोहन सुधीर ची वाट पहात थांबला, वास्तवीक एवढ्या पहाटे फक्कडसा चहा मिळाला असता तर मजा आली असती असा विचार त्याच्या मनात सारखा येत होता. अजून तांबडं फुटायला देखील सुरुवात झालेली नव्हती.

गॅलरीतून समोरचा रस्ता आणि अपार्टमेंट मधली झाडं दिसत होती, का कुणास ठाउक अचानक कुठल्या तरी झाडावरुन कोणी तरी आपल्यावर नजर ठेवुन आहे असा त्याला भास झाला. कुठेतरी आपण काय प्रसंगात आहोत याची त्याला जाणीव झाली. सुधीर च्या सोबत असण्याने अगदीच रिलॅक्स झालेला मोहन ताळ्य़ावर आला.  आता गॅलरीत उभं राहणं सुद्धा त्याला बेचैन करायला लागलं.

इथेच ही परीस्थिती आहे तर चार तासांचा प्रवास, आणी मुख्य़ जागेवर काय समोर असेल या कल्पनेनं मोहन शहारला. एवढ्यात गेट समोर सुधीर ची इनोव्हा आली आणि मोहन बायकोला सांभाळून रहा, शक्यतो घराबाहेर जाउ नकोस, असल्या सुचना देत परत एकदा नमस्कार करुन आला.

खालून सुधीर हॉर्न देत होता, जणू त्याला परत पिकनिक लाच जायचं होतं... आपण यात अडकलो नसतो तर कदाचित याच बेफिकीरीनं परत त्याच जागेवर गेलो असतो असंही मोहन ला वाटलं. एकदाचे दोघेजण महंतांच्या घराच्या दिशेनी निघाले... ठरल्या प्रमाणे नारळ उतरवून..... त्याची गाडी दिसेनाशी झाली आणी मोहीनी थोडीशी तणावातच घरात गेली..

मोहन च्या घराचा दरवाजा बंद झाला. 

महंत तयारच होते. त्याच्या चेहेर्‍यावर कुठेच तणाव दिसत नव्हता. प्रशस्त गाडॊ पाहून त्यांनाही बरं वाटलं. त्यांच्या तयारीचं सामान मागे ठेवतांना एक  प्लॅस्टीक ची काठोकाठ भरलेली चार पाच लिटर्स ची कॅन पाहून सुधीर नी विचारलंच..

“हे काय आहे महंतजी  ? “

“ताजं गोमुत्र”  एवढंच त्रोटक उत्तर आलं. मग मात्र फार बोलायचं नाही हे आठवून तिघे विनायक च्या घरी वहिनींना आणायला निघाले. त्या सुद्धा या अग्निदिव्यासाठी तयारच होत्या. मुळीच वेळ न दवडता त्यांनी मग प्रवास सुरु केला. ड्रायव्हींग ला सुधीर असल्या मुळे मोहन अधिकच रिलॅक्स झाला.

प्रवासात विघ्नं येतील असं वाटलं होतं पण नवल म्हणजे तसं काहीच झालं नाही. उपाशी पोटी सगळं करायचं असल्याने मध्ये कुठे थांबणं झालंच नाही. फक्त एका ठीकाणी पाणी मात्र घेउन ठेवलं.  मुख्य रस्ता सोडून गाडी त्या भागाकडे जायला लागली तेव्हा सुधीर नी जस्ट कंफर्म करायला कोणती वळणं घ्यायची वगैरे बोलायला सुरुवात केली.

अर्थात दोघांनाही जवळपास एकमेकांईतकीच माहीती होती. महंतांकडे लक्षा जाताच इतका वेळ लक्षान न आलेली एक गोष्ट ध्यानात आली आणी ती म्हणजे गेल्या दोन दिवसांत नसलेली एक भगवी शाल... महंताच्या खांद्यावर ती शाल आत्ता प्रथमच दिसत होती.  चेहेरा शांत, कसलं तरी ध्यान लावल्या सारखा, डोळे मिटलेले. बहुदा कोणती तरी साधना करत असावेत.

अर्धा तास पुढे गेल्यावर अचानक महंत म्हणाले,

“जरा थांबा............”

सुधीर खरंच खूप धीराचा आणी स्टेबल असावा.. त्यानी शांत पणे गाडी साईडला नेउन  थांबवली.

“काय म्हणता महंतजी ? “ सुधीर नी विचारलं.

“आता सावध राहीलं पाहीजे. ईथून पुढे मला जरा “भारलेला” परीसर जाणवतोय. एकदा परत सांगतो... आता धोकेदायक प्रदेशात प्रवेश होतोय.. सगळ्यात आधी... सुधीर हा ताईत गळ्यात घाल.. तुमच्या ते लक्षात आलेलं दिसत नाही.. अचानक कुणी काही विचारलं तरी संभाषण करु नका, मी खूण केल्याखेरीज कशालाच “हो” किंवा होकारार्थी प्रतिसाद देउ नका,

“तुम्ही म्हणजे मोहन आणि विशाखा तू... तुम्ही पिडीत आहात... तुम्हाला कसलेही भास होऊ शकतील, अभासी दृष्यं दिसू शकतील, कोणत्याही प्रसंगी तूम्ही माझ्या होकारा शिवाय निर्णय घायचा / सांगायचा नाही. आपण आपापसात मूळीच बोलणार नाही, विधी काय करायचेत ते माझ्या खूणेनुसार तुम्हाला फॉलो करायचे आहेत.”

“गडबडून किंवा घाबरुन जायचं कारण नाही. माझ्या खूणा ते चूकवु शकणार नाहीत.. माझ्या कुठल्याच इंद्रियावर ते ताबा घेउ शकणार नाहीत.” पण तुमच्या मागे अशी आराधना नाही म्हणून सावध करतोय एवढंच.”

“सुधीर तुझी मन:शक्ती तपासलीय मी, तु सोबत आहेस हे खूप चांगलं आहे. तुम्हा तिघात तु जास्त सावध आणि डोळस रहा... तुझ्या बाबतीत एकच चिंता आहे... तुझा बेफिकीरपणा.. त्याला आवाक्यात ठेव.. तुझ्या बेफिकिरीचा फायदा हा की तुझ्यावर नियंत्रण या शक्तींना कठीण जाईल. याचाच आपण फायदा उचलायचा प्रयत्न करणार आहोत, पण तु सुद्दा माझ्या खूणांवर लक्ष ठेवायचं आहे.“

“गुरुकृपेनं कदाचित फार कठीण प्रसंग येणारही नाहीत पण आपली मानसीक तयारी असलेली चांगली”

“महंतजी, माझ्या सोबत गाणगापूर ची रक्षा आहे, ती सोबत ठेवू की, तिथं जायच्या आधी कार मध्येच ठेवु ? “ विशाखा वहिनिंनी विचारलं आणि महंतांचे डोळे चमकले...”
“तेच म्हणत होतो प्रवास एवढा निर्विघ्न कसा झाला !!” आपण सगळेच तिथं उतरण्या आधी ही विभूती कपाळाला लावू.. अतिरिक्त आणि खात्रीची सुरक्षा म्हणून..”

गाडीमधलं वातावरण एकदम गूढ एका वेगळ्याच दुनियेतलं झालं. आपण आता एका भयानक सृष्टीत जणु प्रवेश करतोय असे भाव तिघांच्या चेहेर्‍यावर आले. महंत निष्चल होते. १५-२० किलोमिटर सरळ गेल्यावर या तिघांनाही इथूनच आपण वळलो होतो हे आठवलं, सुधीर काही विचारणार एवढ्यात महंतांनी त्याला गप्प राहण्याची खूण केली. क्षणभर डोळे मिटून त्यांनी त्याला "होकारार्थी" खूण करुन पुढे चलण्याचं सुचवलं.

आता मात्र तिघं गंभीर झाले. काहीच न बोलता सगळे विधी, क्रिया कशा करायच्या हे प्रश्नचिन्ह त्यांना अस्वस्थ करत होतं. वास्तवीक स्वच्छ सुर्यप्रकाश होता पण वातावरण बरंच "जड" झाल्याचं तिघांनाही जाणवायला लागलं होतं. भर दिवसा सुर्यप्रकाशात "अंधारल्या सारखं" जाणवलंय तुम्हाला कधी.. अनुभव अंगावर काटा आणणारा होता. वारा पार पडला असावा. आजुबाजुची झालं एकदम जणु स्तब्ध होती. एक पान सुद्धा हलतांना दिसत नव्हतं. जणु या प्रदेशावर कुणीतरी "बांधणी" केली असावी असंच वाटायला लागलं तिघांना.

अचानक महंतांनी थांबायची खूण केली तेव्हा सुधीर या इफेक्ट बाहेर आला. गाडी त्यानं नेहमी प्रमाणेच व्यवस्थीत साईड ला पार्क केली. महंत दरवाजा उघडून खाली उतरले. परीसर पहाताच त्यांचा चेहेरा गंभीर झाला. काही वेळ ते तसेच डोळे मिटून उभे राहीले. तोंडानी बहुदा मंत्र म्हणत असावेत. एका खिशातली कसली तरी रक्षा त्यांनी उजव्या तळहातावर ठेवून फुंकली. काही चिमुटच रक्षा पण त्या नंतर चा परीणाम दर्शनीय होता. एक अनाहून दडपण जे गेले काही मिनिटं जाणवत होतं ते अचानक नाहिसं झालं. वातावरणातला स्वच्छपणा परत आला. तिघेही विस्मयचकीत होऊन हा थरारक अनुभव घेत होते.

"खूप प्रभावी जागा" महंत गाडीत आल्या आल्या म्हणाले. .. तिघे गप्पच...

"खूपच मोठ्या संकटात आहात मोहनराव.." परिसर संपुर्णपणे भारलेला आहे. असं समजा जणु आपणा कुणाची ना इथे हुकुमत आहे ना आपल्याला इथे सहजा सहजी प्रवेश !"

अरे तुम्ही गप्प का ?  मी बोलतोय म्हणजे बोलायला हरकत नाहीये.. निदान अर्धा तास तरी... पण एक मिनिट अवांतर विचारु नका, शंकासमाधानाचा कार्यक्रम आपण परत गेल्यावर ठेवू.

महंतजी आम्ही काय काय केलं पाहीजे हे तुम्हीच सांगा.  काय काळजी घ्यायची ते सांगा. शक्यतो आम्ही न बोललेलंच बरं....

ठिक आहे..

एकंदरीत ही जागा अनादि काळातली साधू तपस्वी यांच्या मोठ्या  आश्रमाची किंवा मठाची असावी असं मला वाटतंय.. नक्कीच काहीतरी महाभयानक घडून इथे काहीतरी अपुर्ण राहीलंय. काय ते समजून घेण्या साठी मी त्यांच्याशी संपर्क साधणार आहे. संवाद साधायचा प्रयत्न करणार आहे. माझं वर्तन अघोरी नसल्या मुळे मला वाटतंय कि “ते” नक्कीच संवाद साधतील. तुम्हाला मात्र इथे सहज प्रवेश मीळेल असं वाटत नाही.

एक मात्र नक्की कि हे दुरात्मे नव्हेत, पवित्र मृतात्मे आहेत. तुमच्या मित्रमंडळींचा इथे चूकीच्या दिवशी प्रवेश झाला असणार.. त्यातून ही जागा “घाण करायचा” प्रमाद झालाय. असुरी वृत्तींच्या आत्म्यांना बळी वगैरे हवा असतो ते इथे चालायचं नाही. म्हणूनच काम खूप कठीण आहे. अघोरी प्रकारात आत्म्यांवर हुकुमत प्रस्थापीत करुन कामं करुन घेतली जातात, इथे मला त्यांची समजून काढावी लागेल, क्षमा मागावी लागेल.

हे आत्मे प्रचंड प्रभावी आहेत, शक्तिशाली आहेत, लाखो वर्षा नंतरही त्यांचा या प्रदेशावर असलेला प्रभाव पाहून माझी खात्री झालीय की लढून कोणी यांना हरवू शकेल याची शाश्वतीच नाही. उपाय वैदिक आणि पवित्रच असतील.

अर्थात तुम्ही इथे आला आहात म्हणून तुमच्यावर हल्ला वगैरे होईल ही भिती आधी मनातून काढून टाका. “ते” तुम्हाला फक्त शिक्षा करत आहेत. तुमचे प्राण घेणं हा त्यांचा हेतू असता तर मला भेटण्या आधीच “त्यांनी” ते करुन टाकलं असतं अगदी जगाच्या पाठीवर कुठेही असता तरी. थोडा फार त्रास होईलही.. पण प्राणघातक काही असणार नाही. जर तुमच्या पैकी कुणाला “त्यांच्याशी” संपर्क साधता आलाच, तर जरूर त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. विचारात मनोभावे क्षमायाचना असू द्या, नक्कीच याचा फायदा होईल.  

मी सुद्धा हेच करणार आहे पण ते मला करता येतं.. माझा संपर्क सुरु आहे कदाचित माझे विचार त्यांच्या पर्यंत पोहोचत देखील असणार आहेत.

महंतांच्या सांगण्या मुळे तिघांच्याही मनावरचं दडपण उतरलं, आता मनात आली ती क्षमाभावना, तिघेही मग आपोआप मनस्वी कर्तव्यभावनेनं पुढच्या प्रसंगांना तयार झाले.

“तरी सुद्धा अत्यंत सावधपणे डोळसपणे हे करावं लागणार आहे.. या पवित्र आत्म्यांमध्ये काही दुरात्मे, पीडीत, सुडानं पेटलेले आत्मे अचानक सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.” महंतांनी भानावर आणलं. आपण सत्यनारायणाची पूजा करायला आलेलो नाही याची जाणीव झाली.

“आपल्याला साधारण २-३ किलोमिटर्स तरी आत जावं लागेल. तिथेच मुळ केंद्रबिंदू असावा. मी दिलेल्या सगळ्या सूचना लक्षात ठेवा,  श्रीगुरु आपलं रक्षण करतीलच. “

सोबत नेलेलं सामान घेउन मग चौघांचा पायी प्रवास सुरु झाला. वातावरण तसं गुढच होतं... पावला पावलाला आपण अधिकाधिक धोकेदायक प्रदेशात जातो आहोत ही भावना दडपण आणत होती.  पायाखाली एखादी वाळकी काडी जरी मोडली तरी दचकावं एवढी शांतता जाणवत होती.

“नको मोहन.... एकही वस्तू उचलायची नाही...” महंतांचा कणखर आवाज कानात शिरला आणि मोहन जागीच थांबला... महंत वळले त्यांनी खूणेनीच मोहन ला हातातून पडलेली कॅरी बॅग उचलायची खूण केली.. अत्यंत प्रभावी भागात आपण आलेलो आहोत हे सगळ्यांनाच कळून चूकलं... 

“माय गॉड म्हणजे तो आवाज ? महंतांचा नव्हता तर...” मोहन विचार करत होता, आणि महंतांनी जळजळीत नजरेनं त्याच्याकडे पाहीलं.. त्या नजरेतच बोलायला, विचार करायला बंदी आहे ही सुचना होती. १०-१२ पावलं चालल्यावर महंत थांबले, त्यांनी त्यांची ती अभिमंत्रीत शाल निट खांद्यांवर घेतली. एक शब्दही न बोलता त्यांनी तुळशीच्या काड्यांनी बनवलेल्या छोट्याश्या झाडू नी जागा साफ करायला सुरुवात केली, त्यांना झाडतांना पाहून विशाखा लगेच पुढे झाली, पण आता मोहन नी तीला अडवलं.....तिघांकडे पाहून मग महंत मंदपणे हसले.  मंडळी उपचारास सज्ज झाल्याचं पाहून एक समाधानाचं स्मित त्यांच्या चेहेर्‍यावर खुललं.

पाहता पाहता त्यांनी १२-१५ फूट व्यासाचं एक स्वच्छ वर्तुळ बनवलं... कुंकवाची एक स्पष्ट सिमारेषा आखली. हे सगळं करत असांना सतत ते मंत्र म्हणत असावेत. मग त्या जागेवर गोमुत्र शिंपडून वर्तुळाच्या केंद्रभागी एक यज्ञकुंडासारखी रचना केली.  वर्तुळाच्या आतूनच एका संध्यापात्रात पाच पवित्र नद्यांचं पाणी, गोमुत्र, रक्षा एकत्र करुन अभिमंत्रीत केलं... खूणेनीच तिघांना जवळ बोलावलं. अर्थातच वर्तुळात प्रवेश करण्या आधी त्यांना थांबवून, त्यांच्या अंगावर तो अभिमंत्रीत द्रव शिंपडला.. महंतांनी खूण करताच तिघे वर्तुळात प्रवेश करते झाले.

आत येताच तिघांना जाणवलं ते अतिशय पवित्र वातावरण. वर्तुळाबाहेरचं जग आणि हे यात जमिन आस्मानचा फरक होता.

“बसा... “ महंत म्हणाले आणि तिघं बसले. “आता आपण आपापसात बोलु शकू... निट लक्षात घ्या मी सांगे पर्यंत वर्तुळाबाहेर जायचं नाही, काय वाट्टेल ते झालं तरी.  लवकरच मी योजना सुरु करणार आहे.. त्या बरोबर तुम्हाला विलक्षण अनुभव, भास होणं शक्य आहे. पण या वर्तुळात तुम्ही संपूर्णपणे सुरक्षीत असाल.  विधी पुर्ण होण्या आधी जर बाहेर पडलात तर मात्र तुम्हाला वाचवणं कठीण असेल. मला कसलीच शंका विचारायची नाही, किंवा माझ्याशी बोलायचं नाही. तुम्ही बोललात तरी माझ्याकडून प्रतिसाद मिळणार नाही.”

महंतांनी यज्ञकुंडात मग अग्नी पेटवला.... त्यात समिधा, उदी, आणि काही जिन्नस टाकले, आणि स्पष्ट शब्दात काही अनाकलनीय मंत्र म्हणायला सुरुवात केली. आता मात्र बाहेर कोलाहल वाढायला लागला, संताप, चीड, वेदना, भीती अश्या सगळ्या भावनांचा कोलाहल... किती संख्या होती कुणास ठाऊक पण “ते” असंक्य होते यात शंका नव्हती. कान सुन्न करणारे आवाज... डोकं गलबलून जाईल एवढा गोंधळ. कुणी बाहेर खेचलंच  तर क्षणार्धात आपलं अस्तित्व संपेल या भितीनं तिघं कापायला लागले.

अचानक सुधीर किंचाळला.... त्याच्या बाजूचं कुंकवाचं वर्तुळ पेटलं होतं.. बाहेर आता कर्कश्य किंकाळ्या सुरु झाल्या होत्या.  वर्तुळ विझलं आणि गुरकावण्याचे आवाज यायला लागले. कानात बोटं टाकूनही आवाज मुळीच कमी होत नव्हते, डोळे मिटल्यावर जास्त भयावह दृष्यं दिसत होती.

सर्वत्र धावपळ सुरु होती, वातावरण धूरानी भरलेलं होतं कोण कुठल्या दिशेनी पळतंय याचा पत्ता लागत नव्हता. जणू अग्नीचं तांडव माजलं होतं.. धूरात असह्य जळकी दुर्गंधी पसरलेली, मागे ट्रिपला आल्यावर असाच काहीसा वास आल्याचं मोहन, सुधीर यांना आठवलं आणि त्यांची हिंम्मत आणखिच खचली.  जिवंत जाळण्या पासून अनन्वित कत्तल होत असावी असं वाटत होतं.

बाहेरुन काही भयावह कृद्ध चेहेरे हातत कसली तरी धारदार शस्त्र घेउन यांच्या दिशेनी धावून आले आणि यांची बोबडी वळली. हे आत आलेच कसे हे वाटण्या आधीच एकानी विशाखाचं शिर एका झटक्यात धडावेगळं केलं. सुधीर तशातही उठलाच.. धावून जायला, तेवढ्यात अंगावर कसले तरी थेंब पडले आणि तो भानावर आला. विशाखा शांतपणे डोळे गच्च मीटून बसली होती, मोहन गर्भगळीत होऊन थरथरत होता, महंत मात्र मंत्रपठण करत यज्ञकुंडात समिधा टाकत आणि सर्वत्र ते पवित्र जल शिंपडत होते. त्या थेंबांमुळेच आपण भानावर आलो हे त्याच्या लक्षात आलं.

किती तास हे चाललं होतं कुणास ठाउक पण हे आवाज, हा गोंधळ, हे भास सहन करायची शक्ती तिघांचीही संपली होती. ठरावीक कालावधी नंतर महंतांचं ते पाणी शिंपडणंच त्यांना भानावर आणत होतं.. पण या दोन जगातला फरक सहन करायला त्यांचा मेंदू, त्यांची सहनशक्ती कमी पडत चालली होती.

आता वर्तुळाबाहेरचे आवाज बदलले आणि संतापाची जागा केविलवाण्या आवाजांनी घेतली. कुणीतरी सतत काहीतरी सांगत आहेत असा संमिश्र सामुदाईक आवाज कानात घुसत होता. महंत उठले, दोन्ही हात वर करत ते मोठ मोठ्यानी मंत्र म्हणत आवाहन करत असावेत. बाहेर अचानक किंकाळ्या सुरु झाल्या, धडपड, खुरडत घासत, विव्हळत सरपटण्याचे आवाज यायला लागले. ओले, चिकट, गरम आवाज....... काळजाचा ठोका चूकावा असा प्रसंग.. सामान्य मानवाच्या सहनशक्ती पलीकडचा.

महंतांचं पठण सुरुच होतं. हळू हळू त्यांचा आवाज खालच्या पट्टीत येउन पुटपूटण्या इतपत कमी झाला, बाहेर आता फक्त कुजबूजण्याचे आवाज राहीले.

महंतानी तिघांना उठायची खूण केली. हातात यज्ञकुंडातली रक्षा, गोमुत्र आणि आजवर कधिच न पाहिलेली फुलं दिली. महंतांनी केलं तेच करायचं माहीत असलेल्या तिघांनी, त्यांनी ते बाहेर फेकताच, यांनीही बाहेर फेकलं.  महंत आता झारीतुन यज्ञकुंडात जल टाकत होते.  एक दोन वेळा कुंकवाचं वर्तुळ पेटून शांत झालं. बाहेरचे आवाज आता संपूर्ण बंद झाले होते.

महंत आता गंभीरपणे खर्जात काही तरी पुटपुटत होते.. अचानक सोसाट्याचा वारा सुटला, वातावरण धुळीनं न्हाउन निघालं, पण आश्चर्य म्हणजे कुंकवाचं वर्तुळ आहे तसंच होतं.

महंतांनी त्या तिघांच्या तळहातावर पाणी देउन संकल्प सोडायला सांगून  यज्ञकुंडात काही समिधा, तूप, अर्पण करायला सांगितल्या. यथायोग्य विधी झालेत.

“आता वर्तुळा बाहेर यायल हरकत नाही”

एक शब्दही न बोलता तिघं बाहेर आले.  शरीर आणि मन का कुणास ठाउक थकलेलं जाणवलं सगळ्यांनाच. गाडीत बसल्यावर महंत म्हणाले,

“आता आपण त्या प्राचीन देवळात जाणार आहोत.” “उरलेलं महत्वाचं कार्य तिथंच करायचं आहे.”  तिघं चपापले अजून काय बाकी आहे या विचारानं त्यांना ग्रासलं असावं.. वास्तवीक आत्ता पर्यंत त्यांना खास असं काहीच करावं लागलेलं नव्हतं. तरीही ते अनुभव सामान्य माणसाच्या कल्पने पलीकडचेच होते. महंत नसते तर आपलं काय झालं असतं हा विचारच त्यांना अस्वस्थ करत होता. त्या मंदिरात पोहोचल्यावर परत एक वेगळी जाणीव झाली.

“इथं काहीतरी सापडलं पाहीजे”

“काहीतरी म्हणजे ? “

“प्राचीन घटनेचा काही तरी अंश इथे असायला हवा” या भागात मला तश्या इंट्युशन्स येताहेत. चला जरा गाभारा साफ करुन घेउ” महंतांचं एक होतं.. ते बोलता बोलता लगेच कृती सुरु करायचे... काय आणि कसं सुरु करायचं या विचारात तिघं गुंतले असता महंत गाभारा साफ करत होते. विशाखा ओशाळली,  “आहो प्लीज मला सांगा........ सकाळी प्रवासाला निघाल्या पासून आत्तापर्यंत काहीच केलेलं नाहीय मी....

मंदपणे हसत महंत म्हणाले “ विशाखा आत्ता पर्यंत आपण काहीच केलेलं नाहीये... फक्त चपापणी केलीय... जे काय केलंय त्या पेक्षा महत्वाचं काम अजून बाकी आहे” “तेव्हा तुम्ही तिघं फ्रेश तरतरीत रहा,जर मी थकलोच तु तुमची इनर्जीच तुम्हाला वाचवेल”  महंत सहजच बोलले असावेत पण तिघांचं धाबं दणाणलं.

गाभारा साफ झाल्यावर महंतांनी देवाची मुर्ती असलेला भाग साफ करायला  सुरुवात केली.. मुर्ती पाहताच महंत सावध झाले.

“अच्छा असं आहे तर......” महंत म्हणाले... आता यावर काय ? हा प्रश्न येणार हे त्यांना माहितच असावं..

“मुर्ती खूप प्राचीन आहे.... कालभैरव, महादेवाच्या कुठल्या तरी उग्र रुपाचं दैवत असावं.... कोकणात हे नवं नाही... पण दैवत नक्कीच उग्र आहे.... “

“त्याचं काय झालं महंतजी, आम्ही इथे जस्ट पिकनिक सारखे आलेलो....मंदीर कसलं आहे त्याची काय स्पेशालीटी आहे... हे पाहीलंच नाही.....

“ह्म्म्म... तसं तुम्ही लोकांनी काहीच पाहीलं नाहीत हो..... एक मिनिट... मला नीट पाहु द्या.......हो हे दैवत “कालभैरवासारखंच”  आहे.  मुर्तीच्या मागे पहावंच लागेल. अर्थात तिथे लगेच काही सापडलं असं नाही... वर्षानुवर्षं साफ सफाई, पूजा, संध्या वगैरे न घडलेल्या त्या ओसाड मंदीरात धूळ, कोळीष्टकं, पक्षांची पिसं, वाळका पालापाचोळा हेच विखुरलेलं होतं. 

महंतांचं काही केल्या समाधान होई ना..........ते काय शोधत होते कुणास ठाउक... पण तिघंजण आता कंटाळल्या सारखे वाटत होते.. आणि हो........ आता पोटातही कावळे कोकलायला लागले होते.... कावळे ?.. मोहन च्या अंगावर सरसरुन काटा आला.... चक्क शहारला तो.  तिघांनी दचकून त्याच्याकडे पाहीलं.

“काय झालं मोहन ? “

“महंतजी... थोडं आठवतंय..... आम्ही पाहिलेला तो मोठ पक्षी.... एखाद्या मोठ्ठ्या कावळ्या सारखाच होता... फक्त रंग कावळ्या सारखा नव्हता... पण चोच मात्र अगदी तिक्ष्ण होती.... आमच्या डोक्यावरुन घिरटी घेत तो एका झाडावर चोच घासत बसला...

“कावळा........ “ त्याचं तुम्हाला हुसकावून लावणं.. तुमच्या हाकलण्यामुळे मुळीच न घाबरणं.... इथेच रहस्य आहे... एक गोष्ट तर नक्की आहे.. इथे नक्कीच कसलं तरी अत्यंत उग्र अनुष्ठान सुरु असतांना काहीतरी घडलं होतं.... चला मला ती जागा दाखवा...अंधार पडण्या आधी मला उलगडा व्हायलाच पाहीजे..

अंधार पडण्या आधी म्हणजे ?  अभावितपणे विशाखाच्या तोंडून वाक्य निघालं आणि महंत हसले....

“हो ते सांगायचं राहीलंच... आपल्याला बहुतेक रात्रभर मुककाम करावा लागणार.... जो उपाय करायचा त्याचं नक्की रुट कॉज अजून सापडलं नाहीये...”

“महंतजी... तिकडे सगळे जण काळजीत असणार म्हणून वहीनी तसं म्हणाल्या असाव्यात....” सुधीर...

“कल्पना आहे मला.. पण त्यांना कळेल आपण मुक्कामी आहोत ते...” तुम्हा दोघांच्या घरी पण कळेल. मी केलीय ती व्यवस्था....

“ऑं ? त्यांना कसं कळणार.. मी शंभर वेळा पाहीलंय.. मोबाईल सिग्नल्स नाहीयेत या भागात.. म्हटलं बोलायचं नाही पण SMS करायला हरकत नाही... इती.. सुधीर...

“मी पाठवलाय SMS” महंत म्हणाले.. “ तिघांनी अविश्वासानं महंतांकडे पाहीलं..

“अरे गोंधळु नका…….. आमच्या कुंडलीनीचं नेटवर्क कधी फेल होत नाही.. “ महंतांच्या या वाक्यनं ताण एकदम नाहीसा झाला..

का कुणास ठाउक पण काहीतरी सापडत नव्हतं महंतांना... सुमारे पाउण तास साफसफाई झाल्यावर, महंतांनी आपली आयुधं काढली. मुर्तीच्या समोर कसलं तरी यंत्र वाटावं अशी रांगोळी काढली. ही रांगोळी सुद्धा जगावेगळीच असावी. क्षणात नॉर्मल रांगोळीसारखी दिसणारी हि रांगोळी, मध्येच लालसर, हिरवट होऊन चमकायची (निदान तसं वाटायचं तरी)  चंदनाच्या खोडात कोरलेल्या आठ पणत्या गाईचं तूप घालून पेटवल्या गेल्या.

या नंतर आमच्या आपेक्षेप्रमाणेच महंतांच्या स्पेशल उदबत्त्या निघाल्या, आता मात्र त्या अतिप्राचिन मंदिरातलं वातावरण एकदम भारुन निघालं. तिघंजण आवाक होऊन बघत होते.

“कुठेतरी विहीर असायला  हवी” असं म्हणत महंत मंदिरच्या आजूबाजूला गेले सुद्धा.

महंत जाताच तिघंजण चपापले.. एकट्यानी त्या गूढ मंदिरात थांबणं हा विचारच अस्वस्थ करणारा होता. चेहेर्‍यावर काळजी घेऊन महंत परत आले तेव्हा या तिघांचे चेहेरे काळवंडायला लागले होते...“काय झालं महंतजी ?”

“इथे गडबड आहे.... प्रचंड गडबड.... मंदिराची रचना पाहता, हा देव पाहता, इथल्या पुजा अर्चा, इथलं यज्ञकर्म, हे सुचीर्भूत होऊन होत असणार होतं... एवढ्या प्राचीन काळात इथं पाण्याचे हातपंप, किंवा महापालीकेचे नळ थोडीच असणार होते ? .......... प्रशस्त विहिर असायलाच हवी होती...पण ती नाहीये”

“हे भयंकर वाटतंय.. ही विहिर कोणीतरी जाणून बूजुन बूजवलेली आहे.... “  या विहिरीत अतिप्राचीन असं काहीतरी गाडलं गेलंय... आता हे बाहेर काढणं गरजेचं आहे..पण लगेच ते आपल्या आवाक्यात नाही.. विहिरीची नक्की जागा शोधावी लागेल... गावकर्‍याची मदत घ्यावीच लागेल..”

महंत एका दमात हे बोलून गेले खरे.. पण मोहन, सुधीर, आणि विशाखा जणू गलितगात्र झाले.  एका हजारो वर्षांपूर्वीची विहिर शोधायची ? आणि खोदायची सुद्धा ? काही तासांपूर्वीचं महंतांचं वाक्य त्यांना आठ्वलं...

“आत्ता पर्यंत आपण काहीच केलेलं नाहीये... फक्त चपापणी केलीय... जे काय केलंय त्या पेक्षा महत्वाचं काम अजून बाकी आहे” “तेव्हा तुम्ही तिघं फ्रेश तरतरीत रहा,जर मी थकलोच तु तुमची इनर्जीच तुम्हाला वाचवेल”

“माफ करा पण आपण हे सगळं लगेच सुरु करणार का ? “ मोहन....

“अर्थातच... वेळ कुठंय महाराज आपल्या कडे ? काही न करता आपण परत जाऊ शकू असं वाटतं तुम्हाला ?

“पण विहिर शोधायची कुठे ? “ विशाखा चा एक भावडा पण प्रामाणिक प्रश्न..

“महंतजी.. आपण पाणी शोधणारा पहायचा का गावात ? नाहीतर.. काही बोअरींग करणार्‍यांकडे असतं पहा .. जमिनिखालचं पाणी शोधणारं यंत्र...”  इति सुधीर...

महंत खळखळून हसले....

“सुधीरराव... तुमचे उपाय आवडले मला... पण या जागेत नाही चालायचे.. तुम्हाला वाटतं इथे हे लोक येतील म्हणून ?  जाउ द्या मला कळलंय कुठे असणार आहे ती विहिर..

एव्हाना संध्याकाळचे पाच वाजत आलेले. मंदिराच्या उजव्या बाजूला उंबर,पिंपळ,वड, औदुंबर अशी अनेक झाडं होती..तो परिसर पाहताच महंत समाधानी झाले.

“जनरली जिथं वड, पिंपळ, औदुंबर असली झाडं असतात तिथं हमखास जमिनी खाली पाणी असतंच.. “ चला तिथंच जरा संशोधन करु...  त्या भागात जाताच अचानक तापमान कमी होऊन अंगावर शहारा आल्या सारखं सगळ्यांनाच झालं.

“अगदि योग्य दिशेने जातोय आपण. “ कदाचीत आपण त्या बुजवलेल्या विहिरिवर उभे आहोत.. महंत म्हणाले आणि भितीची एक स्पष्ट लहर तिघांच्या शरीरात प्रवेश करती झाली.

“चला मी गावातून काही मदत मिळते का पहातो... तो पर्यंत  तुम्ही इथेच मंदिरात रहा.. दुसरी कडे कुठे जाऊ नका... महंत म्हणाले तशी तिघांची पाचावर धारण बसली.  इथें या भयाण प्रदेशात महंतांवाचून रहायचं ? आणि त्यांना जास्त उशिर झाला म्हणजे ? या कल्पनेनं त्यांच्या अंगातलं त्राणच गेलं जणू..

त्यांचे पांढरे फटफटीत चेहेरे पाहून महंत काय समजायचं ते समजले. थोडसं हसत त्यांनी सांगायला सुरुवात केली..

“अरे घाबरताय काय एवढे ? तुम्हाला संरक्षण दिलंय की, आणि काय झालंय आत्तापर्यंत ? “ “आणि महत्वाचं म्हणजे मी गावात जात नाहीये मदत मागायला.... इथुनच कळवतोय त्यांना... पण त्या साठी मी काहीवेळ ध्यानस्थ असेन .. मला तेव्हा डिस्टर्ब करु नका अगदी कोणत्याही परीस्थितीत.. एवढ भान ठेवा.”

“इथून कळवताय म्हणजे ? “

“माझे विचार प्रक्षेपीत करणार..गावकर्‍यांना ते जाणवतील एवढे.... पण त्यातही एक समस्या येउ शकते “

“अरे बापरे...मग ? पण काय होईल असं वाटतं तुम्हाला “

“आपण एका भारलेल्या प्रदेशात आहोत... इथं सगळं आपल्याच मनाप्रमाणे होऊ शकेल असं नाही.. माझं विचारप्रवर्तन ते थांबवु शकतात.. गावकर्‍यापर्यंत हे प्रक्षेपण पोहोचु नये असं ते नक्कीच करु शकतात.... मग मात्र.............”

“मग काय ? संपलंच का सगळं  ? आता मात्र यांचा धीरच सुटायला लागला.

“संपतंय कसलं सगळं ?  सगळं संपवूनच निघणार आहोत आपण...  गोंधळू नका, घाबरुसुद्धा नका, काय आहे मी एक शक्यता सांगीतली.. जरी समजा त यांनी असं काही केलंच.. तर दुसरा उपाय आहे ना माझ्या कडे”

एका खास बैठकीवर महंत बसले... अगदी सहजच ते ध्यानात गेले असावेत.  शांत चेहेरा, कसलेही भाव नाहीत, त्यांच्या चेहेर्‍यावरुनच त्यांच्या साठी हे सगळं किती सोपं आहे याची जाणीव होत होती. सुमारे पंधरा वीस मिनिटं ते ध्यानात असावेत, त्यांनंतर ते प्रसन्न मुद्रेनं जागे झाले.  आता हे काय सांगतात ते ऎकायला तिघं जणु कानात प्राण आणून तयार होते.

“झालं बघा काम.. गावातही कळलं आणि त्यांनाही...” अजून एक आनंदाची बातमी.. आपल्या कार्यात त्यांचा अडथळा न होता मदतच होणार आहे. पण मोठा संघर्ष होईल हे नक्की... मंदिरातच  कुठे तरी आपल्याला कुदळ आणि पहार मिळेल.. तेव्हा आता कामाला लागा... म्हणजे शोधायला लागा......

महंतांपासून योग्य अंतर मेंटेन करत तिघं ही आयुधं शोधायला लागले. दिवस मावळायला लागलेला...दुरवरुन काही पक्षांचं कर्कश्य ओरडणं ऎकू येत होतं. आजवर कुठल्याच पक्षाचा असला कर्णभेदक आवाज यांनी ऎकला नव्हता. ते ओरडणं होतं कि गुरकावणं होतं हे त्यांनाच माहीत. जसजसा अंधार पडत चालला होता तसतसं हे पक्षांचं ओरडणं आक्रोश वाढत होता.

शेवटी एकदाची विशाखा वहिनिंनाच कुदळ सापडली... मोहन ला पहार... दोन्ही आयुधं पार गंजलेली दांडा नसलेली.. आता याचा वापर करुन कशी काय विहिर उकरणार हा प्रश्न उभा ठाकलेला. कुदळ आणि पहार पाहताच महंत झपाट्यानी यांच्या कडे आले.

सुर्य मावळायच्या आधी पहीला प्रहार होणं आवश्यक होतं... चला ती पहार द्या इकडे... असं म्हणत महंत त्या जागेजवळ पोहोचले सुद्धा. क्षणभर डोळे मिटून त्यांनी पहिला प्रहार केला....... सगळी कडे जणू हाहाक्कार झाला.... सर्व दिशांनी किंकाळ्या, धावपळ, आक्रोश, सुरु झाला. महंत लगेच मंदिरात आले.. त्यांनी त्यांच्या खास उदब्त्त्या लावल्या.... आजूबाजूचा गोंधळ आता टीपेला पोहोचला आणि ध्यानीमनी नसतांना समोरचा पिंपळ मुळासकट उन्मळून पडला... प्रचंड आवाज, जणू भुकंप आल्या सारखी जमिन हदरु लागली. मंदिर नामषेश होणार कि काय असं वाटावं एवढी जमिन हादरत होती. बघता बधता समोर एक विशाल खड्डा पडून वातावरण उग्र, कुबट दुर्गंधानी भरुन गेलं...   

गुदमरुन टाकू पाहणारा तो वास, त्या किंकाळ्या, धडपड, सोसाट्याचा वारा आणि वाढणारा अंधार, हे सगळं भयानकतेत वाढ घालत होतं.. मंदिर जवळपास आडरानात असल्यामुळे, दिवे, मेणबत्त्या, कंदिल, गॅसबत्ती असं काहीच मिळायची सुतराम शक्यता नव्हती.

हे सगळं असह्य होऊन मोहन नं देवाकडे पाहीलं... आणि त्याचं लक्ष वेधून घेतलं ते... रांगोळीच्या यंत्रा नी.. हे यंत्र चकचकीत हिरवं होऊन चमकत होतं... या सगळ्या गदारोळात महंत नेहमी प्रमाणेच शांत होते. आता ते खांद्यावर झोळी घेउन त्या खड्ड्या कडे जात उच्च रवाने मंत्रोच्चार करत होते. या तिघांना मंदिरा बाहेर यायचं नव्हत, पण शक्यतो महंतांच्या जवळपास राहण्याकडेच त्यांचा कल दिसून येत होता.  सहाजिक आहे या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाच्या अगदि कल्पनेपलिकडच्या नक्कीच होत्या.

जमलं तेवढं त्यांच्या कक्षेत राहून मंडळी, सुन्न होऊन ते अघटीत प्रकार पहात होते. एव्हाना उन्मळून पडलेल्या पिंपळा च्या आजूबाजूची जमिन पुरती खचून तिथे एक मोठी विहिर स्पष्ट दिसायला लागलेली. काहीतरी त्या विहिरीतून सतत बाहेर पडतंय असंच या तिघांना वाटत राहिलं.

मंत्रपठण सुरुच होतं.. शब्दा शब्दाला बाहेरचा कोलाहल वाढत होता. आडरानात आजूबाजूच्या झाडा झुडपात बहूदा काजवे उडत असावेत, पण त्याचं ते चमकणं भितीदायकच वाटत होतं. डरकाळ्या, गुरगुरण्याचे आवाज मुळीच थांबत नव्हते, रांगोळी आता कधी हिरवी तर कधी गुंजासारखी लाल होऊन चमकत होती. झोळीतली रक्षा महंतांनी विहिरीच्या दिशेनी फुंकत एक एक पाउल विहिरीच्या दिशेनी चालायला सुरुवात केली. 

विहीरीत महंतांनी अंगारा टाकताच तिघांचे डोळे दिपवणारं काही तरी चमकलं आणि विहिरीतुन असंक्य पक्षांचा थवा बाहेर पडला. ते भयानक दृष्य पाहून तिघं जवळपास बेशुद्ध पडायचे बाकी राहीले.. अभावितपणे मग त्यांचे हात महंतांनी दिलेल्या ताईत वर गेले.  समोरच्या दृष्यात काहीच फरक पडला नाही पण कुठे तरी त्या पक्षांनी उडायची दिशा बदलली असं उगाच वाटून गेलं.

महंत सतत अंगारा फुंकत होते, मंत्र म्हणत होते. हळू हळू आवाज कमी होत स्मशान शांतता झाली... दुरवरुन दिवे किंवा कंदिल मंदिराच्या दिशेनी येतांना दिसल्याचा उगाचच तिघांना भास झाला.. पण ते खरंच होतं... गावकरी मंदिराच्या दिशेनीच येतांना आता स्पष्ट दिसायला लागले.

२०-२५ माणसं हातात कंदिल घेउन मंदिराच्या परिसरात दाखल झाले.. अस्पष्ट प्रकाशात या चौघांना पाहून त्यांच्या चेहेर्‍यावर प्रचंड आश्चर्य होतं.. अर्थात यांच्या पैकी कुणाचीच त्यांच्या जवळ यायची हिंम्मत झाली नाही. गावाला अंधारात या मंदिरात कुणाला बघायची सवयच नसावी किंवा मानसिक तयारीच नसावी.. एक शब्दही न बोलता ते काय प्रकार चाललाय हे पहायला लागले.

बाहेर आता गोंगाट कमी होऊन त्याची जागा तडफड, घुसमट होतीये अश्या आवाजानी घेतली. महंतांच काम अविरत सुरु होतं या प्रकरात अनेक वेळा त्यांना जणू कुणी धक्के देत पाडायचा प्रयत्न केलेला स्पष्ट दिसला...मुळीच शक्यता नसतांना देखील काही वेळा विजांचा कडकडाट झाला,  तेवढ्याच प्रकाशात तो परिसर काय तो दिसला.  गावकरी तर बिलकुल विचलीत न होता हे सगळं बघत होते. जणू कधी काळी हे होणार हे त्यांना माहीत होतं..

अडीच तिन तास हा संग्राम सुरु होता, परिसर क्षणोक्षणी हादरत होता, विजांच्या प्रकाशात न्हाउन निघत होता. मग मात्र बाहेरचे सगळे आवाज संपले. त्याची जागा आता रातकीड्यांच्या किरकिरीनं घेतली. त्यातच वार्‍याचा आवाज, झाडांच्या पानाची सळसळ, असे आवाज मिसळले. आता या परिसरात सगळं अगदी नैसर्गीक असावं असं जाणवायला लागलं. दुर्गंधावर मात करत आता उदबत्त्यांचा वास दरवळू लागला.

“चला महत्वाचं काम झालं” महंत म्हणाले, आता ते गाभार्‍या समोरच्या रांगोळी समोर येउन बसले.

महंत तिथं बसल्यावर तिघांच्या लक्षात आली ती गोष्ट म्हणजे, ती रांगोळी..... आता स्वच्छ, शुभ्र होऊन चमकत होती. महंतांनी रांगोळी परत गोळा केली, आणि सामानात ठेवली.

गावातले लोक आता धीर करुन आत आले. दिव्यांच्या प्रकाशात त्यांनी या चौघांना निट न्याहाळलं. त्यातल्याच एका वद्धश्या माणसनी हा काय प्रकार झाला हे विचारलं.

तुमच्या सगळ्या शंकांचं निराकरण होइल पण उद्या... काही विधी करायचेत पण ते आता रात्री होत नाहीत. त्यासाठी सकाळ ची वाट पहावी लागेल, आणि तुम्हा लोकांची मदत सुद्धा. तुमच्या शंकांना उत्तरं द्यायला नक्कीच आवडेल पण त्या आधी मला तुमच्या कडून माहीती हवीय..

“मंडळी, मला तुमच्या कडून काही माहीती हवीय. तुम्हाला ती नक्कीच माहीत असणार.. सगळंच माहीत असेल असं नाही पण जे काय कळेल त्या मुळे हा गुंता सोडवायला मदत होईल. एवीतेवी दिवस उजाडे पर्यंत आपल्या कडे वेळ आहेच, या वेळेचा सदुपयोग करुन घ्यावा हे उत्तम”

“महत्वाचं म्हणजे माझ्या सोबत जे तिघं जण आहेत ते गेली चोवीस तास अन्नपाण्या वाचून आहेत. मी अजून आठवडा असाच काढू शकेन, आपल्या पैकी कोणी यांच्या साठी कोरडा शिधा आणू शकलात तर फार बरं होईल.”

धीरगंभीर आवाजातलं महंतांचं बोलणं ऎकून १०-१५ जण लगेच उठले,  “आम्ही आणतो काय आणायचं गुरुजी ? “ बोलणार्‍याच्या आवाजात भक्तीभाव अगदि ओसंडून वाहत होता. काय आणायचं हा प्रश्न आल्या बरोबर सुधीर ला भूकेची जाणिव झाली. डोळ्यासमोर छान छान डिश यायला लागल्या... पण लगेच महंतांचं स्मितहास्य पाहून सुधीर ला आपण कुठे आहोत, काय प्रसंगात आहोत याची जाणीव झाली.

“आहो काहीही चालेल, अगदी थोडेसे तांदूळ आणलेत तरी इथेच भात करता येईल” महंतांनी गावकर्‍यांचं काम सोपं केलं.. अर्थात कोकणातल्या रिमोट एरीयात रात्री काय मिळू शकणार होतं ?

“जे गावात जाणार असतील त्यांनी आधी इकडे या” महंत म्हणाले.  त्या पाच सहा जणांना मग महंतांनी अंगारा लावला, ताईत दिले.”

“चला आपण तो पर्यंत जरा गप्पा मारु यात..” आपल्या पैकी कुणा कुणाला हे नक्की कसलं मंदिर आहे हे माहीत आहे ? “

अपेक्षे प्रमाणेच ते कुणालाच माहीत नव्हतं... “मला तरी इथे कधी पुजा अर्चा झालीय असं वाटत नाही.. या मंदिराचा कुणी पुजारी नाहीये का ? “

“माझे पणजोबा इथं गुरव होते असं वडीलांच्या बोलण्यात ऎकल्याचं आठवतंय..” एक पंच्याहत्तरी देखील उलटून गेलेले आजोबा उद्गारले.”

“ह्म्म....... ठिक आहे मला अंदाज होताच. गेली शेकडो वर्षं हे मंदिर पुजा, अर्चा, होम हवन या पासून वंचीत आहे.

मंडळी शिधा घेउन आली, तांदूळ, चार सहा बटाटे, मिरच्या,आमसूलं अशी सामग्री गोळा झालेली दिसली, या साहित्यात मग बटाटे, मिरच्या आणि तांदूळ वापरुन खिचडी आणि आमसुलाची चटणी असा बेत झाला, कुक च्या भूमिकेत परत एकदा महंतच वावरले...अर्थात गाडं अडलं ते मिठावाचून... ते आणायचं कुणालाच लक्षात आलं नाही. काटक्या कुटक्या पेटवून तिन दगडांच्या चूलीवर झाला.

पोटात भूक असली की काय वाट्टेल ते चविष्ठ लागतं हे बहुदा या तिघांना प्रथमच जाणवलं असावं. बिन मिठाची खिचडी, आणि आमसुलाची चटणी रात्री साडेदहा नंतर एका भग्न मंदिरात खाउ असं स्वप्न देखिल पडलं नव्हतं या तिघांना... महंतांना याची सवय असावी, किंवा मानसिक तयारी तरी.

काहीच घडत नाही पाहून गावकर्‍यांना कंटाळा आला असावा.... त्यांची अस्वस्थता पाहून महंत म्हणाले, “तुमच्या पैकी कुणाच्या पाहण्यात किंवा ऎकण्यात इथे म्हणजे या भागात काही अघटीत घडतं असं झालंय का ? “

गावकरी खूलले... या मध्ये आपणही आहोत हे कळल्यावर एकदम चार सहा जण बोलायला लागले... अगदि पाण्याची गळकी तोटी गळते तसे. या सगळ्यांच्या बोलण्याचा एकूण सारांश असा,

मंदीर फार जुनं आहे. पण इकडे कुणी सहसा येत नाही. मंदिरच्या मागे एक छोटीशी टेकडी आहे तो भाग झपाटलेला आहे. कधी कधी या भागातून कर्कश्य आवाज किंकाळ्या ऎकू आल्याचे भास होतात.  एका आजोबांच्या म्हणण्यानूसार हे मंदीर, त्याच्या आजूबाजूची जमिन, नारळाची झाडं हे सगळं त्यांच्या मालकीचं पण इथल्या झाडांना कधीच फळं येत नाहीत, नवं पेरलं तर उगत नाही... जागा शापीत आहे. या भागात खूप वेळा कावळे, आणि तसेच पक्षी मागे लागून डोक्यावर चोचा मारतात. इकडे वारा नेहमीच पडलेला असतो. इथे कुणीच कधीही, कुठले प्राणी, पाहीले नाहीत... अगदि कोकणात ठीकठीकाणी आढळणारे विविध साप सुद्धा दिसत नाहीत.

२५-३० लोकांचं हे कथन जवळपास तास दोन तास चाललं होतं. या सांगण्यात सुद्धा त्यांची मुळीच एकवाक्यता नव्हती. मतभेद होते.. बर्‍याच ऎकीव गोष्टी हे लोक जणू ते त्या त्या प्रसंगात स्वत: हजर असल्या सारखे सांगायचे. मध्यरात्र उलटून गेल्यावर मात्र मंडळी फारच कंटाळली. संधी साधत त्यांनी मिळेल त्या जागेवर वहीवाटीचा हक्क प्रस्थापीत करत पाठ टेकली. महंतांचा चेहेरा विचारमग्न होता, अचानक मग त्यांनी त्या मोठ्या ओट्याच्या सर्व बाजूनी ती खास रांगोळी टाकली..

म्हणजे जरा जाडसर रेष काढली... रांगोळी अगदीच हिरवी किंवा लाल दिसत नव्हती पण नक्कीच ती मघासारखी शुभ्रपणे चमकत नव्हती.. निस्तेज पडल्या सारखी वाटत होती.. समोर बरीच रात्र  उभी होती, केव्हा पहाट होते असं जाग्या असलेल्या तिघांना झालं. महंत मात्र शांतपणे बसून अव्याहत कसले तरी मंत्र पुटपुटत होते.  त्यांच्या मनात काय काय योजना चालल्यात, आत्ता पर्यंत नक्की कसला बंदोबस्त झालाय ? आणि महत्वाचं म्हणजे आणखी काय बाकी आहे? या प्रश्नांचं काहूर मनात दाटत होतं.

सुधीर कसल्या तरी प्रसंगाची वाट पहात असल्या सारखा चुळबूळ करत होता, तर विशाखा..... तिची परिस्थीती मिनिटा मिनिटाला नाजूक होत होती... तिकडे हॉस्पीटल मध्ये काय सुरु असेल ? या प्रमदांचा काही परीणाम तिकडे झाले नसतील कशावरून ? महंत म्हणाले खरं कि त्यांनी रात्रभर मुक्काम पडेल असं तिकडे त्यांच्या अतिंद्रिय शक्तीद्वारे कळवलंय / सुचवलंय.. पण हे प्रकार आजवर कधीच न पाहीलेल्या त्या शहरी स्त्री चा एकदम विश्वास बसत नव्हता. मनावर उच्च कोटीचा ताण जाणवत होता.  एका अनोळख्या जागेत, भारलेल्या / झपाटलेल्या जागेत तीन तश्या अपरिचीतच पुरुषांसोबत रात्रभर जागणं (झोप लागणं शक्यच नसल्या मुळे) हे सगळंच तिच्या दृष्टीनं खूप अस्वस्थ करणारं होतं..

मोहन प्रत्यक्ष पिडित..... आपल्या समस्येवर उपाय सुरु आहेत याचा आनंद पण त्याच बरोबर इतरांची फरपट त्याला अस्वस्थ करत असावी... घरची आठवण अशा प्रसंगी येणं अगदिच नैसर्गीक होतं. मोहिनी काळजीत असेल का ? रसिकाचं काय चालु असेल ? अनेक तास झालेत यांच्याशी कसलाही संपर्क झालेला नाही, मोबाईल नेटवर्क नाही, महंतांबद्दल प्रश्न नव्हता पण त्यांचं ते विचारप्रक्षेपण स्विकारुन त्याचा योग्य अर्थ मोहिनीला लावता आल असेल की नाही असले प्रश्न त्यालाही सतावत होते.

महंतांनी आता मात्र या तिघांकडे पाहीलं... खूणेनीच जरा जवळ या असं सुचवलं.. तिघंजण लगेच त्यांच्या जवळ गेले.. “जास्त विचार नका करु... मी म्हटलं होतं ना ? तुमचे विचार “तिकडे” कळू शकतात.. तेव्हा आता माझ्याशी स्पष्ट बोला.. हरकत नाही. पण एक खात्रीनं सांगतो... आपण अगदि योग्य दिशेनी जात आहोत.

“आपण शंकासमाधानाचा कार्यक्रम उद्या घेउ.. तो पर्यंत तुम्ही निष्चिंत रहा... ताजे तवाने रहा.. सकाळी तुम्हाला बरंच काही पहायचं आहे. खुशाल झोपलांत तरी चालेल.. माझ्या दृष्टीनं येते तीन चार तास अत्यंत महत्वाचे आहेत. माझी साधना सुरुच राहील. त्याची गरज पडणारच उद्या.”

तिघांना बरंच हायसं वाटलं. आता जे काही बोलायचं, करायचं ते उद्याच या भावनेनं मग ते रिलॅक्स झाले, पण मनानीच फक्त.. अशा परीस्थितीत झोपणं शक्य नव्हतच. एकमेकांकडे आणि महंतांकडे पहायचा सुद्धा कंटाळा आला. विशाखा सगळ्यात लवकर यातून बाहेर आली. निट बसून तिनं मनातल्या मनात ’ॐ नमो भगवते वासुदेवाय नम: आणि दिगंबराय विद्महे अत्रीपुत्राय धिमही, तंनो दत्त प्रचोदयात !” हे जप सुरु केले. बघता बघता तिच्या मनावरचा ताण नाहीसा होत ती अगदि नॉर्मल, निर्भय झाली.... आश्चर्य म्हणजे आता रांगोळीतही शुभ्रता तसंच चकाकी येउ लागली. 

बदललेल्या वातावरणामुळे सगळ्यात आधी सावध झाला तो मोहन.... विशाखा वहिनींचा बदललेला चेहेरा, आणि वातावरणातला बदल त्याला स्वच्छ जाणवला. काय झालं हे जरी त्याला माहीत नसलं तरी वहिनींनी काहीतरी आळवलंय हे कळलं त्याला. आपल्याला असं काही का आठवत नाही ? याचा त्याला वैताग आला. आठवायचा प्रयत्न करताच आठवायचं ते, ऑफिस, मिटींग्ज, आणि कामं... हे आठवलं आणि आजच्या प्लॅनिंग चं काय झालं असेल या विचारानी तो बेचैन झाला.

सुधीर ला आता किति वाजले हे पहायचा कंटाळा आला.. घड्याळ बिघडलंय की आपणच फार लवकर पाहतोय हेच त्याला कळेनासं झालं. विचारा विचारातच तो ताड्कन उठला..त्याची चाहूल लागताच महंत त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रा करुन पहायला लागले.  आपण का उठलो हेच त्याला उमजत नव्हतं.. एक शब्द सुद्धा न बोलता तो परत खाली बसला.. थोडासा ओशाळला आणि गोंधळला... दुसर्‍याच क्षणी त्याच्या डोक्यात एक विचार आला...... आपली गाडी.. ती मागेच रस्त्यावर बेवारस उभी आहे.... गाडी निट असेल ना ?या विचारानी ग्रासलं त्याला.

ध्यानी मनी नसतांना अचानक ताण कमी का झाला हे महंतांना प्रथम कळलंच नाही. पण हा अनूभव त्यांनाही नवा असावा. पण काहीतरी झालंय खास हे त्यांच्या लक्षात आलं. काही पवित्र प्रभावी तरंग जाणवले आणि मग त्यांचं लक्ष या तिघांकडे गेलं.  दोघंजण जसे असायला हवे तसे होतेच.. आणि काही तेजशलाका विशाखा पासून प्रसवत सगळ्या दिशांनी पसरत असल्यांच दृष्य पाहून महंत हरखून गेले.. त्या दिशेनी ध्यान लावून पाहीलं आणि विशाखाचे ते अचूक मंत्रोच्चार महंतांना स्पष्ट ऎकू आले.  सहज म्हणून महंतांनी हे दोघं काय करतायत हे जाणायचा प्रयत्न केला..

एकाला ऑफिस च्या कामाची आणि दुसर्‍याला गाडीची चिंता आहे हे बघून महंतांना हसू आलं. उद्या विशाखाचं मंत्रपठण, आणि तिनं मनापासून केलेली साधना भरपूर उपयोगी पडेल या विचारानं त्यांना हायसं वाटलं.

मंडळींनी सोबत आणलेले दिवे कंदील आता मंद व्हायला लागले, जेमतेम तेल रॉकेल टाकून आणलेले.. किति साथ देणार ना ? जो तो आपल्याच विचारात दंग असल्यामुळे हे सुक्ष्म फरक तिघांच्या लक्षातच नाही आले. गांवकरी तर बहुदा घोडे विकुन निद्राधीन झालेले. सकाळ झाल्यावर तिघं हादरणार हे नक्की होतं. या परीस्थितीत / वातावरणात एवढं गाढ झोपणं ? कमाल असते ना काही जणांची ? गूंगीतही विशाखा पठण / नामजप करत होती हे त्या तेजलहरींवरुन महंत जाणत होते. परीस्थितीनं निर्माण झालेली गरज असेल किंवा मनोमन असलेली दत्तप्रभूंवरची श्रद्धा असेल महंत विशाखाच्या कामावर खूष झाले. असंच जर काही या दोघांनीही सुरु केलं असतं तर ?  या विचारानी महंत मनातच हसले. जो तो त्याच्या प्रायोरीटीज प्रमाणे विचार करत असतो नाही ?आपल्याला कसल्या इंट्युशन्स आहेत ? या जागेत जे काही आक्रीत घडलंय त्याच्या शक्यतो मुळाशी जाउन जागेचा दोष हटवणं. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे पीडीत आहेत त्यांना क्लेशमुक्त करणं.... तर विशाखाला पतिची चिंता आहे, सुधीर ला घर पत्नी, मुलगी यांची ओढ लागलीय, आणि सुधीर या सगळ्या च्या पलीकडे जाऊन मागे सूनसान रस्त्यावर उभ्या असलेल्या महागड्या गाडीची काळजी वाटतेय. .. इथल्यांना कसली चिंता असेल ?

या विचारसंक्रमणात वेळ कुर्मगतीनं पुढं सरकत होती. करण्या सारखं काहीच नसल्या मुळे दोघेजण बसल्या बसल्याच झोपले. विशाखा चे जप हळू हळू मंद होत थांबले आणि ती सुद्धा निद्रेच्या कुशीत शिरली. महंतांना जाणवलेलं आश्चर्य म्हणजे विशाखाच्या झोपण्या नंतरही एक चकचकीत वलय तिच्या सभोवताली होतंच.. एक नवा अनूभव महंत पहात होते. उद्या सांगीतलं तर हे लोक विश्वासही करणार नाहीत असा. महंत मग परत ध्यानात गेले.

एकदाची रात्र संपली.. महंत जागे झाले. समोर चं दृष्य पाहून मनातल्या मनात हसले. आता हे बघून  तिघं हादरणार हे कुणी सांगायची गरजच नव्हती. गजर लावल्यावर उठावं तसं तिघं झोपेतून जागे झाले. अर्धवट उघड्या डोळ्यांना दिवसाचा प्रकाश पाहून धडपडत उभे राहीले. लख्ख उजाडलं होतं. रात्र एकदाची संपली हा आनंद लपवायचा ठरवून सुद्धा लपत नव्हता.

हा आनंद मात्र फार काळ टीकला नाही..... मंदिराच्या ओट्यावर जिथं हे रात्रभर झोपले होते, त्या ओट्याच्या आजूबाजुला असंख्य करड्या रंगाचे तिक्ष्ण चोच असलेले पक्षी मरुन पडलेले पाहताच एकदम यांच्या अंगावर काटे आले. पक्षी खरोखर असंख्य होते सडाच पडला होता जणू.  समोर जमिनिवर एक मोठ्ठा खड्डा... पण आता एकंदरीत वातावरण स्वच्छ होतं.

या धक्क्यातून सावरण्या आधीच मग त्यांचं लक्ष त्या परीसराकडे गेलं. या चौघाशीवाय तिथं कुणीच नव्हतं.

“गावकरी गेले का सगळे ? “

“हो त्यांना जावंच लागलं. “

या प्रश्नोत्तरा नंतर मात्र महंतांनी त्यांना खूण करुन बसा असं सुचवलं.

’तुमच्या डोक्यात अनेक प्रश्न आहेत याची कल्पना आहे मला....” सगळं सविस्तर सांगतो... आधी चला माझ्या सोबत..”

महंत मग त्यांना त्या खड्डा वजा विहिरीजवळ घेउन गेले. तिथे अजूनही कुबट वास येत होताच.  धडधडत्या अंत:करणाने तिघे विहिरीजवळ गेले..

“डोकावून पहा आत काय दिसतंय ते “  महंत म्हणाले पण यांची हिंम्मत होतच नव्हती.. काय पहायला मिळणार या कल्पनेनीच त्यांच्या अंगाला कंप सुटला...

“अरे पहा ना... घाबरताय काय एवढे ? “

धीर करुन सुधीरनी आत डोकावलं आणि दुसर्‍याच क्षणी तो डोळे विस्फारत मागे सरला....चेहेर्‍यावर मुर्तीमंत भीती....आपण फार घाबरट आहोत असं वाटू नये म्हणून मग मोहन आणि विशाखा सुद्धा डोकावले.  अर्थात त्यांचीही गत सुधीर प्रमाणेच झाली.

संपूर्ण विहिर मानवी सांगाड्यांनी भरली होती, आजुबाजुला कुजकं हिरवंगार पाणी, आणि वळवळणारे अगणीत किडे.. हे दृष्य नक्कीच सामान्य माणसाला घावरवणारं होतं.

“माय गॉड.... केवढे हे स्कॅलेटन्स ! काय किळसवाणं दृष्य आहे हे ....” मोहन..

“महंतजी.. खूप भयानक प्रकार आहे... आपण फसणार तर नाही ना ? पोलीस केस होणार हे निष्चित..”

“ह्म्म... नका काळजी करु... सगळ्यांनाच नाही दिसणार हे. “ आपण सगळे या विधीत काल पासून आहोत म्हणून पाहु शकतोय. “  आता चट्कन आपण काही विधी करणार आहोत.

तेवढ्यात गावातले चार पाच जण काहीतरी घेउन आले. त्यांच्या सामानात तांदूळ, काळे तीळ, जव, असलं सगळं होतं,

“गावकरी पण येणार का या विधिला ? या सुधीर च्या प्रश्नाला, “कुठले गावकरी ? “ असा महंतांचा प्रतिप्रश्न आला. “आहो काल रात्रभर आपल्या सोबत होते ते “

“ काल फक्त हे चौघंजण आपल्यात होते”

“काय ? मग बाकीचे कुठे गेले ?” एक एक नवलच ऐकत होते तिघेजण.......

बाकीचे “ते” होते... महंत म्हणाले.

आता नीट ऎकुन घ्या म्हणजे आपण काय विधी करतोय आणि का करतोय हे समजेल...

शेकडो वर्षा पुर्वी इथं एखादा मठ किंवा साधूंचा आश्रम असावा. शंकराच्या कुठल्या तरी रुपाची इथे उग्र उपासना चालत असावी. साधक सगळेच मनोभावे अर्चना करणारे, यात मुख्य ऋषी, आणि इतर मदत करणारे असं होतं. यांची संख्या शेकडोंनी होती.  हे अनुष्ठान अनेक वर्षं चाललं होतं. याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. या साधनेमुळे निर्माण झालेली तेजोवलयं नेमकी कुठल्या तरी दुष्ट शक्तींना जाणवली.

निष्चितच या साधनेतुन निर्माण होणारी मंत्रशक्ती ही असल्या दुष्ट शक्तींचा नायनाट करणारी असावी, आणि यामुळेच या जागेत एक भिषण संघर्ष झाला. चांगल्या आणी वाईट अशा दोन्ही शक्तींचा संघर्ष हा या पृथ्वीला नवा नाही, याचं दृश्य स्वरुप बदलतं पण उद्देश्य नेहमीच आपलं वर्चस्व राखणं हा असतो.

होम, हवन, अर्चना, सुरु असतांनाच या दुष्ट शक्तींनी इथे पुर्ण ताकदीनं हल्ला केला. हल्ला अचानक होता, असं कोणी करेल याची बहुदा शक्यताच गृहीत धरलेली नसल्या मुळे पहिल्या झटक्यात साधू मंडळी, मागे हटली, इथे कदाचित “देवपुजा बंद करुन अस्तित्वाची लढाई लढली पाहीजे” हे लवकर पटलं नसावं आणि परीणामी साधू हरले, पण तरीही त्या साधनेचा प्रभाव एवढा होता की ते काही वेळ मुर्छीत झाले. अनेक वर्ष तप करणारे हे साधू बेशुद्धावस्थेतही नामजप करत असावेत...

यामुळेच कोणतं तरी अदृष्य कवच त्यांची राखण करतच होतं. आक्रमक दुष्ट असले तरी त्यांच्या मागे त्यांची अघोरी शक्ती होतीच. शत्रु फक्त मुर्छीत आहे हे कळताच या शक्ती बरोबर लढण्यात आपली अपरीमीत हानी होईल पण यांचा संपुर्ण बिमोड होणार नाही हे अघोरींनी जाणलं आणि अघोरी शक्तींचा वापर करत या सगळ्यांना या विहिरीत ढकललं.  त्यावर अत्यंत जहरी करणी करत बुजवण्यात आलं... असंख्य पक्षांना हल्लेखोर रुपात बदललं जाउन गस्त ठेवली गेली.. जेणेकरुन इथे कधीच कुणी येणार नाही. म्हणजे नायनाट जरी नाही करत आला, तरी अनेक युगं ही घटना / हे साधु जगापासून दूर राहणार अशी योजना असावी.

मी हे अगदीच त्रोटक आणि थोडक्यात सांगतोय, पण प्रत्यक्षात हा संघर्ष अनेक दिवस चालल असावा. अर्जीत शक्ती प्रमाणे काहीजण लवकर मुर्छीत झाले काही खूप उशिरा. अती तपस्वी बहुदा या परीसरात विखूरले गेले, आणी काही काळानंतर मुर्छीतावस्थेत गेले. अघोरिंनी विहिर बंद केली होतीच.. ती बहुदा परत उघडणं शक्य नसावं, कृर आणि हल्लेखोर पक्षी होतेच... परीणामी कुणीच या भागात पोहचू न शकल्या मुळे हे विखूरलेले साधू / ऋषी हे कालांतरानी आपोआप जमिनीत गेले असावेत.

तरी सुद्धा त्यांचं अस्तित्व संपलेलं नव्हतं. शक्ती क्षीण झाली असेल पण उर्जा ती उर्जाच. तिनं मग आपलं कार्य सुरु केलं असावं.. काही पक्षी साधूंच्या बाजूचे होऊन मग हा हवेतला संघर्ष शेकडो वर्ष कदाचीत सुरु आहे.

अशा या भयानक कुरुक्षेत्रात तुम्ही मंडळी सहलीला आलात, कदाचीत नियतीनं आधीच ठरवल्या प्रमाणे थोडेसे चूकलात, भटकलात आणि अशाच एका जागी चूकुन लघूशंका देखील झाली.  आजवर कदाचित इथे येउन गेलेले कुणाला काही सांगायला किंवा तर्क लावायला जिवंत राहीलेसुद्धा नसतील पण तुमच्या कुंडल्या वेगळ्या निघाल्या... लघुशंकेच्या प्रमादामुळे संतापलेला तो दिव्यात्मा कदाचित शेकडो वर्षांनी भूमी फाडत बाहेर आला, आपल्या सहकार्‍यांचं काय झालं हे त्याला उमजलं पण प्रत्यक्ष शरीर कदाचित नसल्या मुळे ती विहिर उघडणं त्याला जमलं नसावं.

मग तो दिव्यात्मा कुण्या शक्तिशाली पक्षात समावून तुमच्या मदतीला धावून आला,  अन्यथा ट्रीप हून तुम्ही लोक घरी परतलाही नसता. त्यानी तुमच्या मागे लागलेल्या कृर पक्षांचा तुम्हाला न कळताच खातमा केला असणार.. पण शेवटी त्याची योजना तुम्हाला त्यांचं अस्तित्व दाखवून इकडे परत आणायचं अशी असावी. अस्तित्व दाखवण्या साठीच त्यानी लूटू पुटूचे हल्ले केले,  विनायक चा अपघात हा बाहेरच्या शक्तींचा हल्ला नसून अपघातच होता. पण याची जाणीव नक्कीच त्या दुष्ट शक्तींना झाली.

म्हणून विनायकचं हॉस्पीटलायझेशन लांबलं.. तो अत्यवस्थ झाला. फार काही वाईट होण्या आधीच तुम्ही माझ्या कडे आलात आणि आपण तो अभिमंत्रीत ताईत त्याच्या गळ्यात घातला... तेव्हापासून तो नक्कीच अगदी स्टेबल आहे. 

मला वाटतं आता तुम्हाला नक्की काय प्रसंगात आपण होतात याचा काहीसा अंदाज आला असेल. सुधीर आणि मोहन दोघेही अव्याहत आपल्याच व्यापात गुरफटलेले, या पक्षांचे संदेश, त्यांचं अस्तित्व यांच्या लक्षातच आलं नाही, शेवटी मोहन ला किरकोळ ईजा करुन लक्ष वेधून घ्यायचा एक प्रयत्न झाला, हे महाशय तरीही दुसर्‍या दिवशी ऑफिसात रमले...

ईकडे पक्षानी विनायक चा पाठलाग करुन अस्तित्व दाखवलं... पण तो घाबरला आणि त्याच्या अपघात झाला. इथपर्यंत धोका फार वाढत नव्हता, पण “यांना” हे उमजून आता त्यांनी सुद्धा लढाईची तयारी केली.  शेकडो वर्षांपुर्वी झालेल्या त्या लढाईत “ते” सुद्धा बरेच घायाळ होऊन त्यांचा शक्तीक्षय झाला होताच.  दिव्य पक्षाचा पाठलाग करत ते सगळ्यात आधी पोहोचले ते विनायकपाशी.  हॉस्पीटल मधल्या अकाली मृत्यु पावलेल्या अतृप्त आत्म्यांशी संधान बांधत त्यांनी विनायक ला संपवायचा प्रयत्न केला, बेशुद्धावस्थेतल्या विनायक चं मन ते वाचू शकले नाहीत. तेवढ्यात आपलं संरक्षण त्यांच्या ध्यानी मनी नसतांना विनायक ला मिळालं.  त्यांना कळू लागलं त्या आधिच तुम्ही सुद्धा संरक्षीत झाला होतात.

जणू त्यांच्या नायनाटाचा आपण चंगच बांधला असल्या सारख्या या घटना होत्या.  मोठी हिंम्मत करत ते या जागेवर डोकावून गेले सुद्धा असावेत, पण इथे काही बदललेलं त्यांना जाणवलं नाही.  आपलं या जागेवरचं आगमन मात्र त्यांना लगेच कळलं, माझ्या साधनेनं मला याची जाणीव करुन दिली आणि म्हणूनच मी तुम्हाला यावर मुळीच विचार करु नका, आपापसात बोलु नका असं बजावलं होतं... केवळ त्यांना आपली म्हणजे माझी खरं तर... दिशा कळू नये म्हणून आपण ही काळजी घेतली.

इथे येताच मला जाणवलं ते म्हणजे इथे काही जण मोकळे झालेले आहेत, भटकत आहेत, आणि कदाचीत सुटकेची वाट पहात वेळ पडल्यास लढायची तयारी करुन संधी शोधताहेत. या मंदिरात येण्या आधी मी जे आवाहन केलं ते त्यांना समजलं आणि मला सुद्धा इथे मी एकटा लढवय्या नाही हे उमजलं.

या सगळ्य़ा प्रकारात तुम्ही सोबत होताच, पण फरक होता तो पाहण्यात. नक्कीच त्या विहिरीत जे अडकले नाहीत त्यांनी हे आवाहन ऎकलं आणि भौतिक शरीर नसतांना देखील आपल्याला प्रचंड मदत केली. आजूबाजूला मरुन पडलेले पक्षी पाहता त्यांच्यात किती घनघोर लढाई झाली हे वेगळं सांगायला नको. या वेळी मात्र आक्रमक हे शिथील पडले, शतकानुशतकं बंदिवासातले साधू आपल्या उच्च साधनेसह मग दुष्ट शक्तींशी शक्तीनीशी लढले, या दोघांनाही प्रत्यक्ष शरीरं नव्हती साधू साधकच असल्यामुळे या शेकडो वर्षांतही साधनाच करत असावेत, आपल्या सारख्या बाह्य शक्तींचं सहाय्य मिळताच त्यांनी या दुष्टांवर सहज मात केली. त्यातले काही जण अभासी शरीरानं आमच्यातच बसले, तेच ते उर्वरीत गावकरी......वास्तवीक ते तुम्हा आम्हाला एक ढाल पुरवत बसले, दिसले पण फक्त आपल्यालाच,

बाहेर संघर्ष सुरु असतांनाच विशाखाचा नामजप सुरु झाला, मंत्रांच्या त्या प्रभावानं तुमच्याही न कळत दुष्ट शक्त्या हतबल झाल्या, त्यांचा पुरेपूर बिमोड झाला.  मी सुद्धा हा संग्राम पाहून हादरलो, जरा माझा अंदाज चूकला असता, साधना कमी पडली असती तर आपण या जगाला कदाचित कधीच दिसलो नसतो.

एवढं बोलून महंत थोडेसे थांबले, तिघंजण तर आवाक झाले होते, गावकर्‍यांना अजूनही निटसं काही कळालं नव्हतच.

“अरे बापरे”.. एवढेच काय ते शब्द मोहन च्या तोंडून निघाले, क्षणात त्याच्या डोळ्या समोर घर, पत्नी आणि मुलगी आली. आपण कशात सापडलो, हे कळून त्याची त्या परीस्थितीतही पाचावर धारण बसली.

आजवर खूप धीट वाटणारा सुधीर तर वाचाच गमावून बसल्या सारखा झाला.....त्यातल्याच काहींशी आपण काल रात्री बोलायचाही प्रयत्न केल्याचं आठवून तो उभा शहारला..............

“मला अंधार पडताच ते जाणवलं होतं महंतजी...”  विशाखा म्हणाली आणि या दोघांनीही दचकून तिच्या कडे पाहीलं.. अगदी अविश्वासने.. पण विशाखा खरंच अगदी नॉर्मल होती.. तिच्या या बोलण्यावर महंत समाधानानी हसले..   क्रमश:

“मी पण ते ओळखलं विशाखा............” तुम्हा सर्वांमुळेच माझी शक्ती वाढत गेली, मदतनीस तर अनेक होते, त्यांनाच मग मी सपोर्ट करायला लागलो.. माझ्या छोट्याशा साधनेचा वापर करत. सेकंदा सेकांदाला माझा धीर डगमगत होता तेवढ्यात अचानक माझ्यावरचा ताण कमी झाला, साधूंचं तेज वाढलं आणि मी चमकुन तुमच्या कडे पाहीलं. या दोघांना बहुदा डूलकी लागली असावी, तुझ्या आजूबाजूला दिव्य वलय पाहून मग काही वेळासाठी मी तुझे शब्द ऎकले... तुझ्या नामजपानीच आपण बरीचशी बाजी मारली.

मी मग माझे उपाय सोडून तु जपत असलेलेच मंत्र खणखणीत आवाजात म्हणू लागलो.  तुझं जणु ध्यानच लागलं असावं  अशा परीस्थितीत तुला विचलीत करणं दुष्ट शक्तींनाच काय पण विधात्याला सुद्धा शक्य नव्हतं. हळू हळू तुमच्यात असलेले गावकरी नाहीसे झाले. तुम्हाला संरक्षणाची गरज नसल्याचं त्यांना समजलं.

दिव्यत्व आता प्रचंड शक्तीशाली होऊन आर पार ची लढाई करत होतं... मी फक्त मंत्रोच्चार करत त्यांना माझ्या कडून शक्य तो हातभार लावत होतो.  नक्की काय करायचं हे मग त्यांनीच ठरवलं आणि शेकडो वर्षा पुर्वी झालेल्या अन्यायाचा बदला घेतला गेला.......... अगदी त्यांची जी काय असतील ती भौतिक शरीरं शोधून नायनाट केला गेला.. विहरीत असलेली अस्थिपंजरं त्यांचीच... त्यांच्या  दुषकर्मांमुळेच  आज त्यांच्यात पडलेले कीडे तुम्ही पाहीलेत. सुर्यनारायण आपला प्रखर प्रकाश आता टाकायला सुरुवात करेलच.. त्या तेजात हे अस्थीपंजर बघता बघता नाहीसे होतील....... लाखो वर्ष अनंतात भटकण्या साठी... हे सगळे शक्तीहीन होऊन फक्त हाल सहन करणार आहेत.... यांना मुक्ती मीळणं अनेक युगं शक्य नाही.

प्रश्न राहीला तो मी मागवलेल्या या साहीत्याचा........... तुमच्या लक्षात आलंच असेल हे श्राद्धाचं सामान आहे.. या तत्कालीन शापीत भागात जे दुर्दैवी लोक बळी पडले त्यांची कलेवरं, अस्थी, आजही या भागात असंस्कारीत स्वरुपात विखुरलेली आहेत.. सगळ्याच जणांना शोधणं शक्य नसल्या मुळे, आपण सगळ्य़ांसाठीच एक समाईक पिंडदानाचा विधी करणार आहोत.

दिव्य साधूंची साधना, आराधना, आणि आपलं आवाहन वाया जाणार नाही... आपल्या श्राद्दा नंतर इथे नक्कीच न भूतो न भविष्यती असा पाउस पडेल, आणि वाहणार्‍या पाण्याबरोबर या अस्थी नदीमार्गे समुद्राला जाउन मिळतील..

पुर्वेला सुर्य दिमाखात उगवला... पवित्र सुर्यप्रकाश पसरताच त्या जागेवरची उरली सुरली गूढ छटा नाहीशी झाली... कधी नव्हे तो पक्षांचा किलबिलाट सुरु झाला.

“चला.. आता पुढच्या तयारीला लागू, “ म्हणत महंत विहिरीकडे जायला लागले. मागोमाग हे तिघं आलेच. महंतांनी विहीरीत पाहीलं आणि त्यांचा चेहेरा पाहून या तिघांनी सुद्धा त्यांचंच अनुकरण केलं....

न बांधलेली ती विहिर अगदी स्वच्छ होती.... शांत असं स्वच्छ पाण्यानं जवळपास काठोकाठ भरलेली विहिर...महंतांनी मग विहिरीचं पुजन केलं.. चक्क त्याच विहिरीच्या पाण्यानी त्यांनी स्नान केलं. या दोघांनी सुद्धा स्नान आटोपलं. गावातुन बादल्यांची व्यवस्था केली गेली.  मंदिरामागच्या आडोश्याला विशाखा सुद्धा सुचिर्भूत झाली. परत एकदा चार दगडांच्या चूलीवर भात शिजला,

पिंड बनवले गेले, महंतांनी थोड्याश्या कणकेच्या चार प्रतिकृती केल्या, दोन मोठ्या आणि दोन लहान, हे जरा नवं वाटताच इतरांच्या नजरा प्रश्नार्थक झाल्या.  कुणी काही विचारायच्या आधीच महंत सांगायला लागले.

“श्राद्धाची तयारी तर झालीच आहे,  पण ज्या देहांना मंत्राग्नी मिळालेला नाही त्यांच्यासाठी छोटासा विधी करायचा आहे, कणकेच्या या  दोन मोठ्या बाहुल्या पुरुष आणि दोन लहान मुला मुलींच्या प्रतिकृति आहेत. यांचं आपण मंत्रोच्चारात दहन करणार आहोत.  नक्कीच हे प्रतिकात्मक कृत्य असून भडाग्नी सारखा प्रकार नाही.  मला खात्री आहे ज्या प्रमाणे आम्ही मुर्तीत प्राणप्रतिष्ठा करतो, तसाच काहीसा प्रकार एका आवाहनाद्वारे करुन मंत्राग्नी देणार आहोत. याचा परीणाम म्हणजे अतृप्तांना गती मिळून नंतरच्या श्राद्धा नंतर ते प्रेतयोनीतुन मुक्त होऊन पितरांमध्ये जातील.”

हे सगळं ऎकून तिघं भारावले..... केवळ नशिब म्हणून आपली यांच्याशी गाठ पडली आणि या संकटातून आपणच काय असंक्य निष्पाप लोक वाचताहेत हे त्यांच्या लक्षात आलं. महंत म्हणाले तसंच घडत होतं आत्तापर्यंत... काही वेळापुर्वी सांगाडे आणी कीडे यांनी भरलेली विहीर आपोआप आपल्या डोळ्यादेखत स्वच्छ झाली... परिसरात मरुन पडलेले असंक्य घातक पक्षी नाहीसे झालेले....... सगळंच कसं यांच्या कल्पने पलिकडचं होतं....

गावातल्या लोकांच्या मदतीनं महंतानी लाकडं मागवली, छोट्या छोट्या चार चिता बनवल्या गेल्या, साग्रसंगीत मंत्राग्नी दिला गेला. पिंडदान झालं. गावातल्या लोकांना यातलं फार काही कळलं असावं असं वाटलं नाही....कोण हे लोक इथे येउन या भग्न मंदिरात अंत्यविधी आणि श्राद्द करताहेत असेच भाव त्यांच्या तोंडावर दिसत होते.

सगळं आटोपता आटोपता दुपारचे अडीच वाजले. तहानभूक विसरुन एखादं कार्य होतं म्हणजे काय हे तिघांनाही कळलं. गेल्या अनेक तासात काहीच खाणं झालं नव्हतं, चहा नाही, पाणी सुद्धा नाही अर्थात असं मिशन होतं की, त्यांच्याशी लढा सुरु असतांना या शारीरीक गरजांकडे लक्ष गेलंच नव्हतं.

आता मात्र जेवण आणि घर यांचे वेध लागले....अजून काय काय करायचं राहीलंय हे माहीत नव्हतं, त्याला किती वेळ लागणार हे सुद्धा माहीत नव्हतं. महंतांनी त्यांची ही अवस्था जाणली असावी...

“साधारण एक दिड तासात पुढचं सगळं आटपेल.... “ मला आता मंदिराचा गाभारा आणि मुर्ती शुद्ध करायचीय..

खरंच महंतांनी तासाभरात शुद्धी, आणि मुर्तीत परत प्राणप्रतिष्ठा केली.. पुजा झाली.... उदबत्ती, धूप यांच्या वासानी परिसर पुर्णपणे भारुन निघाला... कालच या मंदिराची काय अवस्था होती आणि आता त्यात जमिन अस्मानाचा फरक पडला होता.  महंतांनी सामान आवरायला घेतलं... परतीचा प्रवास, आप्तेष्ठांना हे सगळं सांगायची घाई आता तिघांच्याही तोंडावर स्पष्ट ओसंडून वाहत होता.

अगदी जगावेगळ्य़ा, थरारक प्रसंगांचे ते साक्षीदार होते..

“हे बघा आता हे मंदीर अत्यंत जागृत देवस्थान झालंय.... इथे रोज पूजा अर्चा व्हायला हवी.. जसं जमेल तसं मी इथे येत जाईनच.. ओळखीच्या दानशूर लोकांच्या मार्फत आपण या मंदिराचा जीर्णोद्धार करुया... पण इथलं पावित्र्य राखा. या विहिरीचं पाणी अत्यंत पवित्र आणि शुद्ध आहे, विहिरिला कठडा बांधा... या मंदिरात तुमच्या इच्छा खात्रिशीर पणे पुर्ण होणार आहेत. “

गावकर्‍यांच्या चेहेर्‍यावरुनच ते हे सगळं करणार हे कळत होतं...

“चार दिवसांनी या पुजा अर्चा सुरु करा अत्यंत शुभ दिवस आहे तो..” महंत म्हणाले...ते असं का म्हणाले हे मात्र या तिघांना कळलं नाही..

“चला आपल्याला आता निघालंच पाहीजे” महंत म्हणाले. आणि चौघेजण पाउलवाटेच्या दिशेनी जायल लागले देखील.....

महाड परिसरात ढगफूटी....... महाड(पी.टी.आय. न्युज)

काल संध्याकाळी अचानक महाड परीसरात ढगफूटी होऊन प्रचंड मुसळधार पाउस झाला. मुंबई पणजी महामार्गावर महाड जवळ ठीकठीकाणी दरड कोसळून वाह्तून दहा तास खोळंबली, या भागातल्या सगळ्या नद्या दुथडी भरुन वाहत असून नदीकाठी रहाणार्‍या लोकांना प्रशासनानी सुरुक्षीत जागी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सुमारे दहा जेसीबी चिखल आणि दगड काढायच्या कामात लावण्य आलेले असून अचानक तसंच ध्यानी मनी नसतांना झालेल्या या ढगफूटी बाबत हवामान खात्यानी आश्चर्य व्यक्त केले आहे. सुदैवानी यात कोणतीही प्राणहानी झाली नसल्याचं समजतं.

दुसर्‍या दिवशीची ही बातमी ऎकताच महंतांचे अंदाज आणि त्यांचे उपाय किती प्रभावी आहेत याचं परत एकदा प्रत्यंतर या तिघांना झालं.  वेळात वेळ काढून हे दोघं मग आधी हॉस्पीटल ला पोहोचले. तिथे विनायक च्या डिस्चार्ज चे पेपर्स तयार होते.

“काल संध्याकाळीच पेशंट अचानक शुद्धीत आला... बी.पी. शुगर सगळं नॉर्मल.. प्रिकॉशन म्हणून आम्ही सी.टी. स्कॅन केलं... १००% नॉर्मल रिपोर्ट आहे.. आम्ही जणू मिरॅकल पाहतोय....” हे ऎकून असंच काही तरी ऎकायला मिळेल हे माहीत असून सुद्धा यांना बरं वाटलं. “ तेवढ्यात मोहन चा मोबाईल खणखणला... फोन महंतांचा होता....

इकडची हाल हवाल ऎकुन त्यांनी काळजी घ्यायचं सांगत आमचा निरोप घेतला. गेले अनेक दिवस सुरु असलेला एक घातकी पाठलाग संपला होता आणि निदान त्या भागातून असा पाठलाग होण्याची शक्यताही नव्हती....

=============================================================================================================

समाप्त

 

marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.