लाल चुटुक् शालु तिच्या नितळ गोरया कायेवर खुलुन दिसत होता, हिरव्या चुड्याची तिच्या अवघडलेल्या हालचालींसोबत होणारी कीणकीण प्रसन्न करत होती.
सोनेरी दागिन्यांची आभा आणि लाजेने तिचा चेहरा उजळाला होता.
पहाटेपासून देवदर्शनाला जाण्याची तयारी चालु होती, चार दिवसांपूर्वी लग्न होऊन घरी आल्यानंतर नवर्यासोबत बाहेर जाण्याची तिची ही पहिलीच वेळ.
पंचगंगेचं पाणी आशीर्वाद द्यायला जलधारेच रुप घेऊन नभातुन अविरत बरसत होते, श्रावण सरी सृष्टीला चिंब न्हावु घालत होत्या, आकाश गडद काळ्या पांढर्या नभांनी भरुन आले होते, हिरवा शालु पांघरलेली वसुधा तिच्यासारखीच नव्या नवरीचा साज ल्यायल्या सारखी वाटत होती. सारं चराचर उत्साहाने भारुन गेलय अस वाटतं होत तिला, मनात असंख्य गुलाबी विचारांनी गर्दी केली होती. आज देवाचे दर्शन घेऊन भावी सुखी आयुष्याला सुरुवात करायची हे तिच्या मनात होतच पण त्यासोबत आज देवाला नमस्कार करताना सोबत हक्काच् कोणीतरी जे फक्त आपलच आहे आणि आपल्यासोबत देवासमोर नतमस्तक होऊन सहजीवनासाठी आशिर्वाद मागणार ही भावना तिच्या मनाला एक वेगळीच् सुखद संवेदना देऊन जात होती.
घरातल्या थोरा मोठ्यांना नमस्कार करुन ते दोघ मार्गस्थ झाले. गाडीत बसताना तिला काहीस अवघडल्यासारख झालं पण ते काही क्षणांपुरतच, एक अनामिक हविहविशि हुरहुर तिला सुखावत होती. बाहेर पावसाची संततधार, आल्हाददायक गारवा आणि कुठल्याश्या विचारांनी तिच्या अंगावर शहरा उठला होता. देवदर्शनाच्या निमित्ताने सुरु झालेला हा संसाररुपी प्रवास देवाच्या साक्षीने आणि आशिर्वादने सुखकर व्हावा अशी मनोमन प्रार्थना तीने देवाला केली. काहीशा संकोच्याने आणि हलक्या फुलक्या संवादाने सुरु झालेला त्यांचा संवाद आता चांगलाच फुलुन आला होता. डोंगरमाथ्यावर धुक्यातून गाडी जाताना सगळ्या जगाचा विसर पड़त होता, रस्त्याच्या कडेला फुललेल्या रानफुलांनी रंगांचे सोहळे केले होते, त्यांच्या सुगंधाने मन भारुन जात होतं. इतका रम्य प्रवास आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच अनुभवत होती ती.
मंदिराच्या घंटानादाने तिच्या लक्षात आले की ते पोहचले होते. देवाचे दर्शन घेऊन, भावी सुखी आयुष्याची याचना करुन दोघेही तिथुन निघाले. जवळच असलेल्या एका पिकनिक पॉइंटला जाऊन मग घरी परतायचा प्लॅन होता. वेळ जरी दुपारची असली तरी पावसामुळे वातावरण प्रसन्न झाल होतं. डोंगर कपारीतून वाहून येणाऱ्या पाण्यामूळ तयार झालेल एक तळ आजुबाजुला असलेल्या झाडांच्या कोंदणात शोभुन दिसत होतं. मधेच एखादा ढग सूर्यावरुन सरकल्यामुळ त्याच्या किरणांचा बाण पाण्यावर असे काही तेज उमटवत होता की हिर्यालाही हेवा वाटावा, झाडं चिंब न्हावून निघाली होती, पाऊस थांबला असला तरी फांद्या पानांवरून ओघळणारे स्फटिक मनाला मोहत होते, भिजलेल्या पाखरांची एकमेकांशी सलगी चालु होती. काही वेळ तिथेच थांबून ते क्षण मनात साठवावे या इच्छेने तिने त्याला खुणावल.
तन-मन धुंद करणारा सहजीवनातला पहिलाच पाऊस तिला वेड लावत होता. त्याच्यासोबत पावसात भिजावं अशी इच्छा तिच्या मनात होती पण बोलु कशी? या संकोचाने ती गप्प होती. बेधुंद निसर्गाच्या अलवार खुणा नवर्याला समजत कशा नाहीत? या विचारात ती असतानाच तिच्या सर्वांगावर मोत्यांच्या धारांचा वर्षाव झाला, आपसुकच तिचे डोळे मिटले गेले,दोन्ही हात लांबवून झाडावरुन गळणारे ते टपोरे मोती तळहातांवर झेलु लागली, थंड गार स्पर्शाने तिच्या सर्वांगावर शहारा उठला. एव्हाना नवर्याची खोडी तिच्या लक्षात आली होती, मघाचा लटका राग आताशा वाहून गेला, टपोरे थेंब अंगावरुन ओघळत होते, नव्या नवरीच्या शृंगारातली ओल्या हळदितली तिची काया सोनसळी किरणांप्रमाने चमकायला लागली, ओले केस मेहंदी लावल्या तळहातांनी झटकताना तो एकटक तिच्याकडे पहात असल्याने ती काहीशी बावरली, तितक्यात त्याने तिच्या कपाळावरुन गालावर आलेली केसांची बट कानामागे सावरताना दोघांची नजरानजर झाली, तो एकटक तिच्या डोळ्यात पाहत राहीला, ती लाजेने आरक्त झाली, काय करावे तिला सुचत नव्हते, मनातून हवे असताना त्याच मनाच्या भांबावल्या अवस्थेमुळे तिची तारांबळ उडाली होती. नयन बाणांनी घायाळ झालेल्या तिने स्वतःला त्याच्या भारदस्त भाहुपाशात झोकून दिले, दोघही एकमेकांच्या बाहुपाशात बंदिस्त झाले, जन्मजन्मांतरीच्या सोबतीसाठी...सहजीवनातल्या पहिल्या पावसाची चिंब आठवण त्यांच्या मनावर कोरण्यासाठी, पुन्हा एकदा पंचगंगेने त्यांच्यावर जलधारांचे मोती उधळले...