रेशीम गाठी"उद्या कोणता ड्रेस घालू?" ध्यानी मनी नसतांना ऋतुजानं अचानक विचारलं.ती आपली आवड निवडही  विचारतेय हे पाहून तो सुखावला. पवईतल्या एका नामवंत कॉर्पोरेट  ऑफिस मध्ये चिन्मय सॉफ्टवेअर इंजीनिअर  म्हणून काम करत होता. ऋतुजा  त्याच डिपार्टमेंट  मध्ये  डेटाबेस  एडमिनीस्ट्रेटर  होती. चिन्मय खूप बोलका. सगळ्यांच्या अडचणी समजून घेऊन सगळ्यांना कामात सहकार्य करायला त्याला आवडायचं . या उलट ऋतुजा . अगदी मोजकंच बोलायची. कुणाच्या अध्यात मध्यात नसायची . गप्प गप्प राहायची... आणि त्यामुळेच कदाचित त्याला ती आवडायची. तसा मुलींशी बोलण्याच्या बाबतीत तो कमालीचा लाजाळू होता. पण काही दिवसांपासून का कुणास ठाऊक ती आपल्या  प्रत्येक गोष्टीत रस घेऊ लागली आहे, आपुलकीने विचारपूस करू लागली आहे हे, त्याला कळू लागलं होतं आणि हळू हळू तो तिच्याशी मन मोकळे पणाने बोलू लागला होता.

"उद्या साडी घाल मस्तपैकी काठ पदराची!" तो म्हणाला .

"माझ्याकडे काठ पदराची नवीन साडी नाही बहुतेक." मान हलकेच हलवत  ती म्हणाली खरी, पण दुसऱ्या दिवशी ती आली ती त्याच्या मनात होतं तशीच काठ पदराची साडी परिधान करून! तो खूप खुश झाला. नेहमीपेक्षा ती साडीत खूपच सुंदर दिसत होती. इतरांची नजर चुकवून त्याने पटापट तिला मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपलं. कोपऱ्यात तिला एकटीला गाठून तो म्हणालाही, "आज खूप सुंदर दिसतेस तू!" त्याने हळूच तिच्या नाकाला चिंमटा काढला. लाजतच ती तिथून निसटली. 

त्या दिवसांपासून त्यांचं  फोनवर बोलणं सुरु झालं. तिचा फोन सकाळी, संध्याकाळी न चुकता येऊ  लागला. कधी फोनवर कुणाशी एक  मिनीटांहून जास्त न बोलणारा तो तिच्याशी तासंतास बोलू लागला. एक दिवस जरी फोनवर बोलणं झालं नाही तरी दोघं बेचैन व्हायचे. कामातही काही ना काही निमित्त करून ते एकमेकांच्या जवळ यायचे. छोट्या छोट्या गोष्टी  ती दोघं  एकमेकांशी  शेअर करायची. त्याने त्याच्या आवडीची नवीन मराठी प्रेमगीते तिच्या मोबाईल वर दिली. ती मोबाईलच्या हेडफोन वर मन लावून ऐकत बसली. मग तिनेही एक गाणं त्याला मोबाईलच्या हेडफोन  वर ऐकवलं, ते गाणं होतं, "कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी …" 

त्याच्या डोळ्यांत स्वप्नाळू भावनेने पाहत तिने विचारलं, "कसं वाटलं गाणं?"  

"खूपच भावस्पर्शी!" तितक्याच प्रेमानं तिच्या डोळ्यांना डोळे भिडवत तो म्हणाला.

कधी ती म्हणायची , "खूप कंटाळा आलाय, चल फिरायला जाऊ या…"

तोही म्हणायचा , "चल, जाऊ!"

दोघांनाही पक्कं माहित होतं की ते शक्य नाही. कारण तिला ऑफिस सुटल्यावर वेळेत घरी पोहोचायला जरा उशीर झाला की, तिच्या पप्पांचे फोनवर फोन यायचे. शिवाय ऑफिसमध्ये तिच्या शेजारची एक मुलगीही काम करत होती, जी एक नंबरची चहाडीखोर होती. ती कधीही घरी सांगेल अशी भीती  ऋतुजाला वाटायची. म्हणून नुसत्या कल्पनेतच ते आनंद मानायचे. एका धुंद भावविश्वात ते वावरत होते. 

 तो पवईच्या   बसस्टॉप पर्यंत तिला त्याच्या मोटार बाईक   वरून सोडायचा. जाताना ती त्याच्या मागे खेटून बसली की त्याला स्वर्ग सुखाचा आनंद व्हायचा. एकदा त्याने  बाईक  आणली नव्हती, तेव्हा तिच्याबरोबर तो रिक्षाने निघाला. रिक्षात ती त्याला बिलगूनच बसली. त्यानेही तिला जवळ ओढून घेतलं. मग रिक्षातून उतरल्यावर एकत्र  ज्यूस पिण्यातला आनंद तर विचारायलाच नको. कधी तो ऑफिसमधून आउट डोअर ला गेला तर  तिच्या निघण्याच्या वेळी तिला ट्रेन वर भेटायला घाईघाईत यायचा. तिलाही ट्रेन पकडण्याची घाई असायची. पण त्या दोन मिनिटांच्या भेटीनेच दिवसाचं सार्थक झाल्याचं समाधान मिळायचं. ती भेटण्याची ओढच तशी होती.

पण या जवळ येण्याने, थोड्याच दिवसांनी त्याला हळू हळू एक कळून चुकलं  कि तिच्या वागण्यात एक विचित्रपणा आहे. तो प्रेमाने बोलला  तर तिचे आढेओढे सुरु व्हायचे. ती म्हणायची "तुझं प्रेम जरा जास्तच आहे. अती तिथे माती होते" ,आणि बोलण्याचं  थांबवलं तर फोन message करू लागायची ..तिच्या अशा वागण्याने तो मात्र अस्वस्थ होत होता. 

… आणि एक दिवस ती त्याला स्पष्ट म्हणाली "आपल्याला असं नेहमी नेहमी फोनवर बोलतां नाही येणार. कुणी आजूबाजूला असलं कि जमत नाही बोलायला, आणि फोन ठेऊन कुठे बाजूला गेल्यावर फोन आला तरी प्रोब्लेम होतो. शिवाय मला तू स्पर्श केलेला आवडत नाही. प्रेम मनापासून असावं स्पर्शाची काय गरज आहे?". त्याच्या मनात आलं तिला सांगावं, "वेडे प्रेमात स्पर्शाचीही एक भाषा असते ती कधी कळणार तुला?"  पण एक ना एक दिवस तिला कळेल असे मनाला समजावत तो गप्प राहिला. 

तेव्हापासून त्याने तिला स्पर्श करण्याच टाळलं. काही देतांना, घेतांनाही हाताला स्पर्श करण्याच तो कटाक्षाने टाळू लागला. तिला त्रास होऊ नये उगीच म्हणून त्याने फोनवर बोलणं देखील कमी केलं. मात्र  व्हाट्सअप वरून  संदेशांची देवाण घेवाण सुरु ठेवली. पण या पूर्वी जशी ती स्वत:हून फोन करायची तशी करायची बंद झाली  हे  त्याला खूप खटकलं. त्यातही त्याने कधी विचारले "संध्याकाळी फोन करू?" तर तिचे उत्तर नकोच म्हणून जास्त असायचे. कधी कधी तो फोन करायचा तरी तिच्या बोलण्यात ती पूर्वीसारखी आपुलकी दिसेनाशी झाली. त्या कोरडया बोलण्याचा त्याला खूप त्रास होऊ लागला. ती अगदीच नाईलाजाने आपल्याशी बोलते असे जाणवू लागले. पूर्वी एक दिवस ऑफिसला जरा उशिराने आल्यावर ती म्हणायची, "कुठे होतास अजून? मी किती वाट  पाहत होते…" आणि आता तो आल्यावर ती  मक्ख चेहयाने कामात व्यस्त असल्याचे दाखवू लागली. त्याचे मन खिन्न होऊ लागले. तो विचार करू लागला. किती तर्हेवाईक वागणे आहे हिचे. सुरुवातीला हर्षवायू झाल्या सारखी आनंदी होती आपल्या प्रेमात, आणि आता  छोट्या छोट्या गोष्टीत उलट सुलट वर्तन करते. हिची नक्की समस्या तरी काय आहे तेच समजत नाही. अशा मुलींना एखाद्या तरुणाचे लांबून आकर्षण असते, पण जवळ आल्यावर काही दिवस एकत्र व्यतीत केल्यावर ते हळू हळू कमी होते. आपल्या सारख्या जीव गुंतलेल्या माणसाचे आयुष्य अशा मुलीमुळे यातनामय होऊन बसते. तरी त्याने स्वतःच्या मनाला समजावले,"ऋतुजात हळू हळू बदल होईल."  

एक दिवस तो घरी असतांना त्याने व्हाट्सअप वर मेसेज केला, "संध्याकाळी फोन करू का?" 

ती म्हणाली, "नको." 

यावेळी मात्र त्याने ठरवले आता आपला स्वाभिमान जिवंत ठेवायचा. दुसऱ्या दिवशी ती भेटली तेव्हा तो गप्प गप्पच  होता. 

"काय झाले? गुश्श्यात आहेस का?" तिने विचारले. 

तो फक्त "हो " म्हणाला.  

"का?"  - तिचा प्रतिप्रश्न. 

"जाऊ दे आता, नेहमीचेच झाले आहे." म्हणून त्याने उत्तर टाळले. 

"मी फोनवर बोलायला नको सांगितले म्हणून का? अरे पण काही कारण असू शकते" स्वत:ची चुकी असूनही ती थोडीशी  चिडून म्हणाली . 

"मग ते स्पष्ट कोणी करायचे तू कि मी?" तो मनातल्या मनात पुटपुटला. 

"आणि जबरदस्ती आहे का?" ती पुन्हा म्हणाली तेव्हा त्याच्या काळजात धस्स झाले. म्हणजे आपण हिच्याशी बोलायला फोन करतो ही आता जबरदस्ती वाटायला लागली हिला. 

"ऋतुजा, तुला स्वतःला कळत नाहीय, तूला कसं वागायचं आहे ते! तू कधी खूप जवळ आल्यासारखी वाटते, कधी खूप दूर गेल्यासारखी वाटते. मला अशा वागण्याचा खूप त्रास होतोय. तुझा हा चंचलपणा कमी झाला तर बरं होईल” एवढं म्हणून त्याने  संभाषण थांबवलं. असाही त्याला रोजच्या धुसफूशीचा त्रास होत होता. त्यापेक्षा न बोललेलेच बरे असा त्याने मनाशी निग्रह केला.

त्यांचा संवाद बंद झाला तरी दोन दिवसांनी तिचा व्हाट्सअप  वर  गुड मॉर्निंग चा मेसेज आला, पण त्याला रिप्लाय  करायची इच्छाच झाली नाही. आता तो ऑफिस मध्ये जात होता पण त्याला ऑफिस मध्ये पूर्ण दिवस काढणं नकोसं व्हायचं. त्यात ती समोर आली की त्याच्या मनात कससं व्हायचं. कामापुरता तिच्याशी बोलायला लागायचं, ते त्याला जड जायचं. आता हे जास्त दिवस आपल्याला जमणार नाही हे त्याला कळून चुकलं. तिची मात्र त्याला कमाल वाटायची. जणू काही झालंच नाही असे भाव तिच्या चेहऱ्यावर , आणि कुणासमोर बोलतांना दिखाव्या पुरता हसत हसत ती त्याचाशी बोलायची तेव्हा त्याचा जीव जायचा. 

परवा त्याला सहज ते गाणं आठवलं "कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी …" आणि तो कुणासमोर तरी बोलला, "हे गाणं  किती छान आहे.." तिने ते ऐकलं आणि त्याला लगेच मेसेज  केला. "हे गाणं मीच तुला ऐकवलं होतं माझ्या मोबाईलवर. आठवते का? तुला हवं आहे का?"

क्षणभर थांबून त्याने रिप्लाय केला, "नको."

थोडयावेळाने चिन्मय ऑफिस बाहेर पडला. तो गेल्यावर ऋतुजा  नुसतीच इथे तिथे पहात उभी असतांना तिच्या कानावर कुजबुज आली. चिन्मय  रेझिगनेशन देऊन कायमचा जॉब सोडून निघून गेला होता …ती लगबगीने ऑफिस बाहेर आली. त्याची मोटर बाईक धुरळा उडवत दूर दूर जातांना दिसत होती. तो तिच्या आयुष्यापासून दूर दूर चालला होता…  तिने लगेच मोबाईल घेऊन त्याचा नंबर डायल केला. रिंग वाजतंच राहिली. ऋतुजाला आपली चूक कळली होती, पण उशीर खूप झाला होता. ती पुन्हा ऑफिस मध्ये आपल्या जागेवर   जावून डोकं पकडून बसली. तेव्हढयात मोबाईलचा एस.एम.एस अलर्ट  वाजला. तिने पट्कन इनबॉक्स मध्ये पाहीलं. त्याचाच मेसेज  होता..  "गुड बाय , टेक केअर.." …येणारा हुंदका तिने दाबून धरला, पण तिच्या डोळ्यांत पाणी तरारलं.. मोबाईलच्या स्क्रीन वरची अक्षरं पापणीतल्या आसवांनी अस्पष्ट होत गेली… 

=============================================================================================================

    

 

 

marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.