‘पणती’

सुप्रिया काळजीत पडली. देवकी अजून घरी आली नव्हती. तिने तिच्या मैत्रिणींना फोन केला, मैत्रिणी परीक्षा संपवून कधीच घरी पोहोचल्या होत्या. त्यात अजून एक धक्का म्हणजे त्या म्हणाल्या की, देवकी आज परीक्षेला आलीच नाही!

सुप्रिया सैरभैर झाली. तिने सुनिलला फोन लावला पण त्याचा फोन स्विच ऑफ होता.

‘नक्कीच सुनिल कुठल्या तरी मिटिंगमधे असेल…’ सुप्रिया स्वतःशीच म्हणाली. तिने सुनिलला एक मेसेज करून ठेवला.

कुठे गेली असेल देवकी? परीक्षेला का गेली नसेल? कुणा मैत्रिणीच्या घरी तर गेली नसेल ना खेळायला?

पण देवकी असं न सांगता कुठेच जायची नाही. वर्गात कायम पहिल्या नंबरवर येणारी देवकी खेळण्यात पण तितकीच पुढे होती. शाळेत सर्वांची लाडकी आणि मनमिळावू.. तिच्या मैत्रिणी कायम तिच्यासोबत राहायला धडपड करायच्या. शाळेत झालेल्या पूर्वतयारी परीक्षेत देवकी सगळ्यात पुढे होती. तिला स्कोलरशीप मिळणारच ह्यात कुणालाच शंका नव्हती.

स्कोलरशीपची परीक्षा आज होती. देवकीचं सेंटर थोडं लांबच्या शाळेत होतं. तिथेच अजून काही मैत्रिणींच देखील सेंटर असल्यामुळे ते सगळेजण ऑटोने जाणार होते. म्हणून देवकी थोडी लवकरच निघाली होती. पण आता अजून तरी ती घरी आली नाही. तेवढ्यात सुनिलचा फोन आला. देवकी अजून घरी आली नाही हे वाचून सुनिलदेखील घरीच निघाला.

इकडे सुप्रियाला एका अनोळखी नंबरवरून एक कॉल आला…

'हॅलो, आई मी देवकी बोलतीये… '

'अगं कुठेस तू?… काय झालं? बरी आहेस ना?… तू घरी का नाही आलीस अजून?… मैत्रिणीकडे गेलीस का?'

'अगं हो हो सांगते.. मला बोलू तर दे.. मी ठीक आहे आणि मुकुंद काका मला घरी सोडायला येतंच आहेत. मी १० मिनिटात घरी पोचते'

'हॅलो… अगं पण कोण मुकुंद…' परंतु देवकीने आधीच फोन ठेवला होता.

सुप्रियाला काहीच कळेना. कोण हा मुकुंद काका? ह्यांच्या कुठल्या भावाचं किंवा मित्राचं नाव मुकुंद आहे का??

काही वेळातच सुनिल घरी पोचला. त्याला ही हकीकत सुप्रियाने सांगितली. त्याला देखील कळेना कोण हा मुकुंद काका? आलेल्या नंबरवर फोन लावणार इतक्यात -

'आईsss' अशी हाक त्यांना ऐकू आली. देवकी धावतच आईला बिलगली. सुप्रियाने तिला घट्ट मिठीत घेतलं. देवकीच्या काळजीने तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं.

सुनिलदेखील देवकीच्या डोक्यावरून हातफिरवत होता. देवकीसोबत कुणी तरी आलंय ह्याच्याकडे त्यांचं लक्षच नव्हतं.

काही क्षणातच सुनिल भानावर आला. त्याने त्या व्यक्तीला नमस्कार करून बसायला सांगितलं.

सुप्रिया देवकीचा अवतार बघत होती. मातीने मळलेली, अस्ताव्यस्त केस आणि घामेजलेला ड्रेस. सुप्रिया हे पाहून घाबरली. तिला अपघाताची शंका आली.

'मी मुकुंद देशपांडे. मी बा.वि.मं.शाळेत शिक्षक आहे. इथे जवळच राहतो.मुक्तांगण सोसायटीमधे. तुम्ही बसा ना. देवकी ठीक आहे आणि ती कुठे होती ह्याबद्दलच मी तुम्हाला सांगणारे.

सुनिल आणि सुप्रिया सोफ्यावर बसले. सुप्रियाने मुकुंदला पाणी दिलं. ते घेऊन मुकुंद बोलायला लागला–

'आज सकाळी माझे वडील त्यांची बँकेची कामे करायला निघाले होते.त्यांचं वय आता ७० च्या घरात आहे. तसं आम्ही त्यांना एकटं जाऊ देत नाही पण आज माझी पत्नीदेखील मुलाच्या शाळेत गेली होती. म्हणून बाबा एकटेच बँकेत निघाले. त्यांना हृदयविकार आणि डायबेटीजचा त्रास आहे. सकाळी ते निघाले खरे पण आपल्या मुख्य रस्त्यापर्यंत गेले तोच त्यांना चक्कर आली. एका झाडाच्या आधाराला जावं म्हणून ते रस्त्याच्या बाजूला जायला निघाले तेवढ्यात एक तरुण त्याच्या सुसाट बाईकवर त्यांना धक्का देऊन निघून गेला. बाबांचा झोक गेला आणि त्यांना थोडसं लागलं. पण त्यामुळे ते अर्धवट बेशुद्धीत गेले.

आजूबाजूला फारशी वर्दळ नव्हती. जे कुणी होते ते आपल्या कामात गुंग. एक वयस्कर व्यक्ती रस्त्याच्या बाजूला खाली बसलेली आहे हे कुणाच्या ध्यानात देखील आलं नाही.

तेवढ्यात तुमची देवकी तिथून जात होती. मला नंतर कळालं की ती परीक्षेला जात होती. तर तिने माझ्या बाबांना पाहीलं. ती त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना पाणी दिलं. पण बाबा अर्धवट बेशुद्धीत असल्याने त्यांना स्वतःचा पत्ता नाव सांगता येईना. देवकीने एका ऑटोवाल्याला थांबवलं. त्याच्या मदतीने ती बाबांना जवळच्या दवाखान्यात घेऊन गेली. तिथे तिने डॉक्टरांना थोडक्यात माहिती दिली.

आम्ही बाबांच्या खिशात एक कागद ठेवतो ज्यात त्यांचे सगळे तपशील असतात. ते पाहूनच डॉक्टरांनी बाबांना औषध उपचार चालू केले.

त्यांनी मला फोन करायचा प्रयत्न केला पण मी वर्ग घेत असल्याने मला समजलं नाही. घरचा फोन बंद आणि माझी पत्नी मुलाच्या शाळेत असल्याने तिचा फोन बंद.

हे पाहून देवकीने तिथेच थांबायचं ठरवलं. शेवटी एकदाचा माझा फोन लागला. मी धावतच हॉस्पिटलला पोहचलो. बाबांना आता कुठलाही धोका नव्हता. डॉक्टरांनी मला देवकीची ओळख करून दिली आणि तिच्या मदतीचीही जाणीव करून दिली.

शेवटी तुम्ही काळजी कराल म्हणून मीच तिला सोडायला आणि तुमचे आभार मानायला आलो. मला जाणीव आहे, की आजच्या प्रसंगामुळे तिची परीक्षा चुकली. मी स्वतः एक शिक्षक आहे. ह्या परीक्षेचं महत्व मी जाणतो तरी पण माझ्या दृष्टीने तिने जीवनाच्या परीक्षेत खूप मोठं यश मिळवलंय. तिचे उपकार मानावे तितके कमीच.. आम्ही देतो ते पुस्तकी शिक्षण पण असे प्रसंग देवकी सारख्या मुलांना सगळ्यांपेक्षा वेगळं ठरवतात. ह्यात तुमच्या संस्कारांचा खूप मोठा वाटा आहे. धन्यवाद.. येतो मी'

हे सगळं ऐकून सुप्रिया-सुनिलच्या डोळ्यात अश्रू आले. आपल्या घरात प्रकाश पसरवण्यासाठी ‘दिवा’चं हवा असं नाही, ते काम ‘पणती’ देखील करू शकते. तेवढ्यात देवकी तिथे आली. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू घरभर आनंदाची उधळण करत होतं.

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.