"ह्या बापाला अद्दल घडवायलाच पाहिजे"
जीवनाच्या रंगमंचावर प्रत्येकजण आपापली भूमिका वटवत असतो.ती वटवत असताना प्रत्येकास आपली भूमिका श्रेष्ठ वाटत असते अन दुसऱ्याची दुय्यम..पण काळ बदलतो..दुसऱ्याची भूमिका नकळत आपल्या वाट्याला येते..अन त्यावेळी त्या भूमिकेचे कांगोरे आपणास कळतात..

एका निर्वाणीच्या क्षणी आपणास कळते की, प्रत्येक माणासाची भूमिका तितक्याच ताकदीची असते..तसेच प्रत्येक जण त्याच्या भूमिकेत चपखल बसलेला असतो..पण त्याची ती भूमिका कळेपर्यंत एक तर वेळ निघून गेलेली असते..किंवा भूमिका पार पाडणारा..

अशीच एक लघुकथा घेवून येतोय या कथेच्या पात्राची म्हणजेच सुहासची..अन त्याच्या बापाची..

सुहास एका त्रिकोणी कुटुंबात जन्माला येतो..आई वडील आणि तो..असा सुखी संसार सुरु असतो...

सुहास आतासा लहान असल्यामुळे चागल्या वाईटाची जाण नसते..आईच्या मायेच्या सावलीत आणि बाबांच्या शिस्तीत त्याचे बालपण फुलत जाते..पुढे शाळेत दाखल होतो..आईची माया तुसभर कमी होत नाही..पण बाप तो मात्र हळूहळू बदलेला दिसतो..अंगा खांद्यावर खेळवणारा तो बाप हाच का..?? असा प्रश्न पडावा.. इतपत फरक जाणवत राहतो..

जसजसा सुहास मोठा होत जातो तासतसा बापाच बदललेलं रूप त्याला प्रकर्षाने जाणवू लागते..लहानपणी डोक्यावर मिरवणारा बाप..अलीकडे हे करू नको..असच कर..अभ्यासात लक्ष घाल..अशा शब्दांचा भडीमार करत प्रसंगी डोळे वटारत असतो..सातवी पर्यंत काहीसा मवाळ असणारा बाप..आठवी नंतर अधिक कठोर जाणवतो,,

आठवी ते दहावी ह्या कालावधीत बाप म्हणजे कसाईच की काय अशी त्याच्या मनाची धारणा होते..जरा कुठे खेळायला जाव तर बाप मधे दत्त म्हणून उभा..बाप कामावर असे पर्यंत सुहास मुक्त असायचा..आई कधी रागवत नव्हती..त्याला हवे नको ते पाहत होती..त्याच कौतुक करत होती..त्यामुळे आई अधिक प्रिय होती..

पण बाप आला की चित्र पालटे..सुहास अभ्यासात गढून गेलेला दिसायचा..नुसत पुस्तक समोर धरून नाटक करून भागात नसे कारण बाप खमक्या होता..

तो मधेच पुस्तक घेऊन एखादा प्रश्न विचारत असे..त्यामुळे सुहासला त्यासाठी सुद्धा तयार रहाव लागत असे..उत्तर देता नाही आल की मग पुन्हा लेक्चर..व छडीचा मार..

राहून राहून सुहासला वाटायचं आपण बापाच्या जागी असायला पाहिजे होत..मग दाखवला असता बापाला इंगा..कधी तरी अद्दल घडवीन..नक्की..नाही, " ह्या बापाला अद्दल घडवायालाच पाहिजे"

सुहास दहावी झाला..मार्क्स चागले मिळाले..आईने खूप कौतुक केले..बापाने मात्र पुढे काय करायचं ठरवलं आहे..??

काय करशील ते विचार करून कर...कॉलेज म्हणजे निव्वळ थिल्लरपणा नाही.. वगैरे लेक्चर झाडले..झाल..सुहासच मन पुन्हा खट्टू झाल..मुलगा पास झाला त्याच कौतुक राहिलं बाजूला..वरून मनसोक्त तोंडसुख घेतलं मात्र..ह्याला बाप म्हणेल का कोण..?? " ह्या बापाला अद्दल घडवायलाच पाहिजे"..

जेव्हा पाहावं तेव्हा अभ्यास अरिअर. बाकी काही विषय नाहीत काय..?? मुलगा चांगल्या मार्काने पास झाला..त्याच सोयर सुतक नाही...ह्यांच्या आयुष्यात काही हौस मौज करायला जागा आहे का नाही..?? काय साली जिंदगी आहे..हे बाप म्हणजे मुलाच्या कुंडलीतले साप आहेत साप..जेव्हा बघाव तेव्हा फुत्कारात असतात..नाही, " ह्या बापाला अद्दल घडायलाच पाहिजे "

कॉलेज सुरु झाले..सुहास रमला कॉलेजमधे..आता ओठावर छानशी मिसरूट वजा लव फुटली..दिवसभर सुहास मस्त धमाल मस्ती चालू असायची..

संध्याकाळी पुन्हा शिस्तीचा बडगा..जरा कधी कुठे बाहेर भटकताना दिसला की,बापाच्या तोंडाचा पट्टा चालू..अशा चक्रातच कॉलेज पूर्ण झाल..

सुहासने डिग्री मिळवली..मार्क्स उत्तम..पुन्हा आईच कौतुक..अन बापाचा तोच रुक्षपणा..आता नोकरीचं बघा..खूप झाली मजा..जरा जबाबदारी घ्यायला शिका..

स्वतःच्या पायावर उभा रहा...झाल बापाच पालुपद सुरु..ह्या माणसाला आनंदी रहायला शिकवलं का नही कोणी..?? खरच " ह्या बापाला अद्दल घडवायलाच हवी "..सुहास नेहमीच असे मनात बोलत असे..समोर बोलायची अजून तरी हिंमत होत नव्हती..

एकदा लहान असताना शेजारणीच्या कागाळीवरून सुहासला बापाने वेताच्या छडीने चोपून काढले होते..तेव्हापासून सुहासच्या मनात बापाविषयी भीतीयुक्त अढी निर्माण झाली ती कायमची..

कॉलेज सरले..सुहास चांगल्या कंपनीत कामाला लागला.आता मात्र त्याला बाप काहीच बोलत नव्हता..सुहास घरी आला की बाप आईला म्हणायचा चहा दे त्याला..थकून आला असेल..सुहास मात्र काही वेगळंच समजायचा..आता पगार हवा असेल ना यांना..म्हणून चहा पाजायला सांगत असतील..नाहीतरी माझ्याविषयी आपुलकी आहे कुठे ह्यांना..

महिना झाला वर्ष सरलं..बाप रिटायर्ड झाला..पण बापाने कधी सुहासकडे पैसा मागितला नाही..सुहासने मात्र पहिल्या महिन्यात पहिला पगार त्यांच्या जवळ देऊ केला होता..तो ही भितीखातर..पण त्यांनी तो घेतला नव्हता..म्हणाले तो तुझा पहिला पगार आहे..देवाजवळ ठेव..देणारा घेणारा तोच आहे..त्याला स्मरण कर..आणि तुझे पैसे तूच सांभाळ..वायफळ उधळू नको इतक मात्र लक्षात ठेव..पण सुहासला त्यांचा आपुलकीचा उपदेश सुद्धा कारल्याहुन कडू भासला होता...त्या दिवसा पासून आजगायत त्यांनी सुहासकडे काही मागितले नव्हते..आणि सुहासनेही स्वतःहून काही दिले नाही..हा आईच्या सांगण्यावरून मात्र नाखुशीने कधी कपडे काही वस्तू आणून देत होता..पण आईच मात्र चांगल कोडकौतुक करत होता..

काही वर्षात सुहासच लग्न झाल..अर्धा अधिक खर्च बापाने केला..त्रिकोणी कुटुंब आता चौकोनी झाले..

लग्नानंतर वर्षभरातच सुहासच्या आईला देवाज्ञा झाली..नातवंडाना खेळवण्याचे स्वप्न उराशी घेऊन ती निघून गेली..

सुहासला खूप दुखः झाल..सुहासचे वडील आतून कोलमडून गेले..पण त्यांनी कोणास दर्शविले नाही..मोठ्या प्रयत्नाने त्यांनी अश्रू आवरले..चेहऱ्यावर करारी चेहरा चढवला होता..त्यांचा तो मख्ख चेहरा पाहून सुहास मनातून चिडला होता..स्वतःची बायको मेली पण ह्या माणसाच्या डोळ्यात एक टिपूस नाही..नाही माणूस आहे का राक्षस..?? पण ह्या पुढे अस होणार नाही.नाही मी घडूच देणार नाही..आता बापाला क्षमा नाही.." ह्या बापाला अद्दल घडवायालाच हवी "..त्याच्यातील मत्सरी पुरुष आता जागा झाला होता..

सुहासची आई गेल्यापासून सुहासच्या बापाचा वनवास सुरु झाला..सुहास बापाचा बदला घेत होता..तो बापाला घालून पाडून बोलत असे..आजपर्यंत उगारलेल्या शिस्तीच्या प्रत्येक बडग्याचा तो हिशोब चुकता करू लागला..पण सुनबाई प्रेमळ होती ती सांभाळून घेत होती..सुहासकडे मोकळा न होणारा बाप सुनेकडे मात्र मुलीप्रमाणे मन मोकळेपणाने बोलत होता..नाहीतरी पत्नीच्या पश्चात बाप बोलणार तरी कोणाशी..??

मुलगा तर नजरेसमोर ठेवायला तयार नव्हता..काय चुकल होत बापाच..?? मुलाच्या भवितव्यासाठी उगारलेला शिस्तीचा बडगा..आज बापावर उलटला होता..

सुहासच्या दृष्टीत बाप नालायक ठरला होता..मग मन कुठे मोकळ कराव..?? सुनेच्या प्रेमळ शब्दांनी खचलेल्या मनास थोडी उभारी मिळत होती..हीच काय ती एकमेव जमेची बाजू..

सुहासला मुलगा झाला..सहाजिक त्याला खूप आनंद झाला..आज तो बाप झाला होता..एका नवीन भूमिकेत तो शिरला होता...पण इतक्या वर्षांनी एक नवीन गोष्टही प्रकर्षाने त्याला जाणवली. ती म्हणजे, आज प्रथमच बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद जाणवला होता..भ्रम असेल समजून त्याने कानाडोळा केला..

घरात नवीन पाव्हणा रांगू लागला..बारशाच्या दिवशी..बाप खुर्चीत बसून प्रत्येक क्षण डोळ्यात साठवत होता..मनातल्या मनात सुहासचा जन्म आठवत होता..किती खुश झाला होता बाप सुहास जन्मला तेव्हा..किती उत्साहाने नाव ठेवले होते सुहास..पण तोच सुहास आज बापास उदास करीत होता..त्या वेळचे ते प्रसन्न हास्य आज मरणासन्न झाले होते..

असो बारस थाटामाटात पार पडलं बाळाचं नाव ठेवले संकेत..

नियतीचे कसले संकेत होते न जाणे..संकेत कलेकलेन वाढू लागला..सुहास कोडकौतुकाने त्यास मिरवू लागला..पण बापाकडे म्हणजेच संकेतच्या आजोबाकडे त्याला फिरकू देत नव्हता..सुहास कामावर गेला गेला की सुहासचा बाप नातावात रमत होता..त्याला खांद्यावर घे..घोडा बन अशा खेळात रमून जात होता..स्वतःचा एकटेपणा तो लहान होवून भरून काढत होता..पण हा एकटेपणा सुहास नसेपर्यंत दूर व्हायचा..सुहास आला की पुन्हा तेच दुश्चक्र..

सुहास यायच्या काही वेळ आधी बाप आपल्या खुर्चीत जाऊन बसत होता..जणू काल चक्र उलटे फिरले होते..मात्र भूमिका बदलल्या होत्या..

जिथे बाप होता तिथे आज मुलगा होता..आणि मुलाच्या जागी बाप..कधी सुहास बाप यायच्या आधी आपल्या जागेवर बसलेला असायचा..

आज सुहासचा बाप सुहास यायच्या आधी आपल्या खुर्चीत बसत होता..बाप त्यावेळी शांत होता अन आताही..तरीही सुहास तोंडसुख घेत होता..बाप निमुटपणे ऐकत होता..

एकेदिवशी अचानक सुहास लवकर घरी आला..त्याने पाहिले संकेत आजोबांच्या खाद्यावर बसून मस्त खेळत होता..आणि ते सुद्धा अगदी प्रस्सन मनाने संकेत बरोबर खेळत होते..हे दृश्य पाहून क्षणभर सुहास त्याच्या बालपणात गेला..असच आपल्या बापाने आपल्याला लहानपणी खांद्यावर मिरवलं होतं..ह्याची आठवण झाली..पण फक्त क्षणभर..बापाला अस आनंदी पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली..मत्सराने तो पेटून उठला..व त्याने बापाकडून संकेतला अक्षरशः हिसकावून घेतले..त्याच आवेशात बापाला ताकीद दिली खबरदार माझ्या मुलाला हात लावाल तर..जा आपल्या खुर्चीत बसा मुकाट..दोन वेळ जेवायला मिळतेय ते मुकाट गीळा.. सुहासच्या बायकोने मधे पडत सुहासची कशीबशी समजूत काढली अन सुहास शांत झाला..पण बाप मात्र पुरता कोलमडला व हाय खाऊन काही दिवसात जग सोडून गेला..अन खुर्चीऐवजी भिंतीवर पत्नीच्या बाजूला फोटोत जाउन बसला..

सुहासचा मुलगा संकेत आता शाळेत जावू लागला..आजोबांच्या पश्चात आईच्या कोडकौतुकात वाढू लागला..

सुहास त्याच्या प्रगतीचा आलेख घरी आल्यावर वेळोवेळी पाहू लागला..खांद्यावर मुलास मिरवणारा सुहास हळूहळू लोप पावू लागला..अन जगा झाला एक नवीन बाप..

पहिली ते सातवी पर्यंत सुहासही संकेतच्या बाबतीत तसाच मवाळ होता..जसा त्याचा बाप त्याच्या वेळी होता..

आठवी ते दहावी सुहास जातीने संकेतच्या अभ्यासात लक्ष घालू लागला..अन एके दिवशी सुहास संकेतचा अभ्यास घेत असता.. एका प्रश्नाचे उत्तर संकेतला देता आले नाही...नकळत सुहासचा हात छडीकडे गेला..तीच ती छडी कधी सुहासच्या  बापाच्या हातात होती आज अकस्मात सुहासच्या हातात आली होती..त्याने ती चिडून संकेतवर उगारली मात्र..अचानक सुहास अक्साबोक्षी रडू लागला..हातातील छडी गळून पडली..संकेत आणि सुहासची पत्नी विस्मयीत अवस्थेत सुहासकडे पाहू लागली..घडणाऱ्या घटनेचा उलघडा त्यांना होत नव्हता..मात्र सुहासला साक्षात्कार झाला होता..भिंतीवरच्या फोटोतला बाप प्रसन्न हसत होता..अंतर्मनातला आवाज पुन्हा पुन्हा बुलंद होत होता..
 

" ह्या बापाला अद्दल घडवायला पाहिजे "

" ह्या बापाला अद्दल घडवायला पाहिजे "

============================================================================================================

(समाप्त)

marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.