"मळभ....पावसाचं असो कि विचारांचं अवघं भावविश्व झाकोळून टाकतं.....!"....
रेडिओ जाॅकी कुठल्याशा गाण्याची प्रस्तावना करीत होता. रेवाचं लक्ष रेडिओकडे गेलं. आतापर्यंत तिचं लक्ष कुठे होतं म्हणा रेडिओकडे! आपल्याच विचारांचा गुंता सोडवत बसली होती. गुंता तर होणारच होता! समज-गैरसमजाचे धागे, एकत्र व्यतीत केलेल्या गुलाबी क्षणांचे धागे, छोट्यामोठ्या कुरबुरींचे धागे......अन् या सगळ्या धाग्यांची गाठ.....तिचे अन् आदिचे हळुवार नाते...

आदित्य...एक मनस्वी जिंदादिल मुलगा...आयुष्याचे सारे रस चाखण्याची विलक्षण आवड असणारा...मित्रांमधून हिंडायला, नवनवीन जागा पहायला, नव्या माणसांना भेटायला त्याला फार म्हणजे फार आवडायचे. त्यात त्याला फेसबुक नावाचं "चेहेर्यांचं भांडार" मिळाले. पर्यटन, मराठी कविता, प्रेमकथा, भटकंती अशी अनेक पेजेस त्याच्या "लाईक्ड" लिस्टमध्ये येऊन बसली. असेच एक दिवस सर्फिंग करताना एक फोटो त्याच्या नजरेस पडला. एक विचारमग्न मुलगी....काजळाच्या सीमेत बद्ध डोळे, कपाळावर भुरभुरत आलेली एक चुकार बट, नाजूक हातावर विसावलेली जिवणी, धारदार नाक, नाजूकसा मोती असणारे कानातले...आदिची स्थिरावलेली नजर हटायचं नावच घेईना! "काय विलक्षण बोलके डोळे आहेत हिचे....!" फ्रेंड रिक्वेस्ट गेलीपण! मध्ये काही दिवस गेले...नाॅर्मलच! पण मधूनच त्याला ते अनोळखी डोळे आठवायचे. रिक्वेस्टचा स्टेटस बदललेला नसायचा. मग पुन्हा तो कामात गुंतायचा.
तो दिवस फारच धावपळीचा गेला. आदिने एक मोठी बिझनेस डील साईन केली. क्लायंट मीटिंग, ब्रिफींग......फारच गुंतला होता. जेवणानंतर थकून बेडवर अंग टाकून त्याने फेसबुक उघडाले अन् नोटिफिकेशनमध्ये "Rewa Deodhar accepted your invitation" असा मेसेज पाहिला. त्याच्या थकल्या मनात वेगळाच उत्साह आला.
"रेवा नाव आहे तर..." गालात हसत आदि बोलला.
मेसेंजरला "thanks for accepting invitation" असा मेसेज टाकून तो खुशीतच झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी उठून पाहतो तर रेवाचा रिप्लाय! आता गप्पांचा सिलसिला सुरू झाला.
ओळख वाढत गेली तसे त्यांना कळले कि ते दोघे एकाच काॅलेजला होते. फक्त डिसिप्लीन वेगळी. आदि बिझनेसअॅप्लीकेशनला अन् रेवा सायन्सला. दोघेही आपापल्या क्षेत्रात पोस्टग्रॅजुएटेड!!
"अय्या आपण सेमच काॅलेजला होतो. पण भेटलो नाही कधी..." ...रेवाचा मेसेज.
"मग आता भेटायचं का? तेवढी आपली फ्रेंडशिप झालीये ना?"....आदिचा रिप्लाय!!
"पण आपण एकमेकाला ओळखायचं कसं? फक्त मेसेंजरवरच बोललोय..."...रेवाची शंका!
या शंकेवर उपाय म्हणून मोबाईल नंबर "एक्सचेंज" झाले! रिफ्रेश काॅफी शाॅप....संध्याकाळी पाचची वेळ...ठरल्याप्रमाणे आदि फिक्कट निळा शर्ट घालून कॅफेच्या दारात उभा राहिला. "ग्रे ज्युपिटर"ची वाट पाहत! ती रेवाची परवलीची खूण होती. क्षणाक्षणाला त्याची अस्वस्थता वाढत होती. तो अस्वस्थ येरझार्या घालत होता तेवढ्यात एक ग्रे ज्युपिटर कॅफेच्या पार्किंगमध्ये आली. पण हेल्मेटमुळं चेहराच दिसला नाही. गाडी जाईल तशी आदिची नजर जात होती...गाडीमागून! गाडी थांबली. पल्लेदारपणे स्टँड लागले. छानसा गुलाबी लांब टाॅप, पांढरी लेगिन अन् खांद्यावर रूळणारी रेशमी पांढरी ओढणी...आदिची नजर प्रत्येक हालचाल टिपत होती. हेल्मेट निघाले...मानेला हलकाच मोहक झटका देऊन रेवाने स्टेप्ड केस व्यवस्थित केले! होय रेवाच....बोलक्या डोळ्यांची! तिची नजर "निळा शर्ट" शोधू लागली. दिसला.....कॅफेच्या दारापाशी...सहा फूट उंची, चेहऱ्यावर आत्मविश्वास अन् मंद हसू....
"आदि...आदित्य देशमुख"...त्याने हस्तांदोलनासठी हात पुढे केला.
"हलो...रेवा देवधर...!" मोहक हसत रेवा म्हणाली. फोटोपेक्षा प्रत्यक्षात खुपच सुंदर होते तिचे डोळे.
"ते बस..." आदि जेंटलमनपणे खुर्ची देत म्हणला. काॅफीसोबत काॅलेजच्या आठवणींच्या लडी सुटत होत्या. रेवा भरभरून बोलत होती अन् आदि ते कानात साठवत होता. जायच्यावेळी अगदी ती दिसेनाशी होऊपर्यंत पहात उभा होता!! आदि अन् रेवाची पहिली प्रत्यक्ष भेट! तेव्हाही असंच मळभ दाटलं होतं. लग्नानंतर पंधरा वर्षांनी आज पुन्हा या भेटीच्या सगळ्या आठवणी रेवाच्या मनात अगदी टवटवीत झाल्या होत्या. अन् बाहेर मळभही दाटलं होतं! आठवणींचं मळभ वर्तमान विसरायला लावतं अन् भूतकाळ जास्त स्पष्टपणे दाखवतं! मनात आवडत्या माणसाच्या आठवणीची उर्मी पावसाळी ढगांप्रमाणे दाटते. त्याला प्रेमभावनेचा थंड वारा लागण्याचा अवकाश.....वळवाच्या पावसासारख्या त्या आठवणी आडव्या तिडव्या कशाही बरसतात!! अगदी तसंच झालं होतं रेवाला. आधी आदिची आठवण, त्यांचं छोटसं भांडण, त्यामुळे दाटलेला अबोला.....ताच गुंत्यात अडकली होती ती. अजूनही ती तितकीच बेचैन व्हायची आदिसाठी! त्यांचा मुलगा ट्रीपला गेल्यामुळे ती एकटीच होती. अन् आदि दोन दिवसापूर्वीच मिटींगसाठी मुंबईला गेलेला. आज तिचा वाढदिवस होता तरी आदि गेला म्हणून तिने गट्टी फू केलेली. आजतागायत ते दोघे नेहमी एकमेकांच्या वाढदिवसाला त्याच कॅफेमध्ये एकमेकांना ट्रीट द्यायचे. पण यावेळी नेमकी मिटींग उपटली. आदिला जावं लागलं.
"यावेळी नेम मोडणार ट्रीटचा!!"रेवा फारच खाट्टू झाली. सकाळपासून त्याचा फोनही आला नव्हता वाढदिवसाचा! रेवाला रडू फुटू लागलं होतं. मन रिझवण्यासाठी ती गॅलरीत जाऊन उभी राहिली. तर आभाळ फारच काळवंडलं होतं. विजाही सुरू झाल्या. टपटप आवाज करत पावासाचे मोठाले थेंब बरसू लागले. तेवढ्यात फक्ककन लाईटस् गेले. पाठोपाठ इन्वर्टर पण फेल झाला. आदिने मागे एकदा तिला दिलेल्या सेंटेड मेणबत्या तिने लावल्या व मोबाईल पाहू लागली. एवढ्यात टक् टक् दार वाजले. रेवा दार उघडते तर समोर छानसा लाल गुलाबाचा बुके अन् रिलॅक्स कॅफेच्या कोल्ड काॅफीचे पार्सल घेऊन पावसाने चिंब भिजलेला आदि!! तिला काय करावं कळेना. आनंदाने गुलाबासालाखी खुलली ती!!
"हॅपी बर्थदे माऊ....." तिला बुके देऊन आदि म्हणाला. तशी रेवा त्याला बिलगली. तिच्या मनावरचे मळभ अन् बाहेर वातावरणावरचे मळभ एकदमच विरले होते अन् प्रेमाचा पाऊस दोधारेने बरसत होता!!!

अश्विनी अमित कुलकर्णी

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.