नभ उतरू आलं...

"काय रे, का बोलावलंस या वेळी? बघ... आभाळ किती भरून आलंय! केव्हाही कोसळेल..", राधा शेतातून वाट काढत आली.

"म्हणून तर बोलावलं..", माधव तिच्या जवळ जात म्हणाला.

"म्हणजे?"

"रिमझिम गिरे सावन.. सुलग सुलग जाये मन...", तो गाणे गुणगुणू लागला.

"चल.. पुरे झाला चावटपणा..", ती दूर जात बोलली.

"पुरे झालं? अजून तर सुरवातच नाही केली..", त्याने तिला डोळा मारला.

"बस.. बस.. अजून लग्न नाही झालं आपलं..."

"पण जुळलं तर आहे नं.."

"अजून तीन महिने जायचेय माधव...", राधा चिंतेने बोलली.

"कम ऑन राधा.. किती चिंता करतेस.. एकदा ठरलंय नं लग्न मग होईलच की.."

"पण.."

"बस.. आता पण नाही अन परंतु नाही ... प्लिज मूड ऑफ करू नकोस नं.. किती मस्त धुंद वातावरण आहे.. गार गार वारा.. वा...दिल गार्डन गार्डन हो रहा है..", तो अजून जवळ आला तशी ती शहारली.

"अरे! आपण शेतात उभे आहोत, याचे तरी भान ठेव.."

"आहे.. भान आहे.. चल.. ", तो तिचा हात धरून म्हणाला.

"कुठे?", ती घाबरली.

"वहीं.. जहाँ कोई आता नहीं..", त्याने पुन्हा गाण्याची लकेर गायली.

"नाही.. मी नाही येणार...", ती हात सोडवत म्हणाली.

"मग...जानकीला नेऊ?"

"जा जा...जानकीला घेऊन जा.. गीताला घेऊन जा.. अजून कुणाला घेऊन जा.. मी जाते..", ती लटक्या रागाने म्हणाली.

"ओय होय ..गुस्सा! ..इसीने तो जान ले ली हमारी..", तो तिला जवळ म्हणाला.

"पुरे रे...", ती लाजून उत्तरली.. "कुणी पाहिल.."

"बरं.. तू म्हणतेस तर...", तो हताशपणे उद्गारला..

"फक्त हे तीन महिने...", ती त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन म्हणाली. .."प्लिज.."

"फक्त? मला एकेक क्षण जड जातोय तुझ्याशिवाय.. केव्हा एकदा लग्न होतंय आणि तू घरी येतेस, असं झालंय.."

"कल्पना आहे रे मला..मी पण दिवस मोजतेय..”

“मी सकाळी शेतावर येईन.. दुपारी तू डबा घेऊन शेतावर यायचं.. मग आपण दोघे मिळून डबा खाऊ.."

"काय देईन डब्यात तुला..? झुणका, भाकरी सोबत लसणाचा ठेचा... चालेल?"

"धावेल.. तू दिलेलं विषसुद्धा हसत हसत घेईन मी..", माधव अभिनय करत म्हणाला.

"बस माधव... गंमतीतही असं बोलू नकोस...", राधा त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली.

"बघ... आलीस नं तू स्वतःहून जवळ..", तो हसत बोलला.

"चूप.. इथे जीव जातो माझा..", तिच्या डोळ्यात पाणी आलं.

"राधा...", त्याने तिच्या डोळ्यातील पाणी पुसलं. एक क्षण शांतता पसरली.

"ते बघ... ते बघ...", तो अचानक तिच्यामागे पहात ओरडला.

"काय?", तिने मागे वळून पाहिले.

"तू यांना अभ्यासाला बसवून नाही आलीस?

"अरे कोण? कोणाला? कोणाबद्दल बोलतो आहेस तू?", ती इकडे तिकडे पाहू लागली.

"फारच उनाड आहेत.. अगदी आईवर गेलीत.."

"अरे पण कोण?"

"ती गं ..आपली मुलं.."

"चल ... चहाटळ..", राधा लाजून चूर झाली.

"अच्छा! मी चहाटळ आणि तू? चांगलं म्हटलं होतं, दोन पुरे तर नाही.. म्हणाली, नको..अर्धा डझन तरी हवेत... घे आता... सांभाळ!"

"माधव...", राधाने ओरडायला आणि पावसाचे टपोरे थेम्ब पडायला एकच गाठ पडली.

"काय पण दम भरतेस! मी आणि आभाळ दोघेही घाबरलो!", तो घाबरण्याचं अभिनय करत बोलला.

"पुरे रे.. मी निघते आता.. पाऊस वाढायच्या आत जायला हवं.."

"अभी ना जाओ छोडके...", त्याने तिचा हात धरला.

"बराच वेळ झाला.. घरी शोधायला निघतील आता.."

"बरं चल.. निघायला हवं आता.. पण हे बघ.."

"काय?"

"आपलं शेत... किती सुंदर दिसतंय अंकुरलेलं .. जसा हिरवाकंच शालू नेसलाय काळ्या आईने.. राधा, तीन महिन्यांत या रोपांना सोनं लागेल.. आणि आपल्या डोक्यावर अक्षता पडतील.."

"आणि या तीन महिन्यात काही अघटित घडलं तर...?"

"नसत्या कुशंका घेऊ नकोस राधा.."

"भीती वाटते रे घरच्यांची.. मोठ्या मुश्किलीने तयार झाले ते..", राधा माधवला बिलगली.

"अरे! इथे नको गं...थोडं आडोशाला तरी चल..", माधव मिश्कीलपणे बोलला.

"चूप.. चहाटळ..", ती दूर होत म्हणाली.

"बरं... चल जा तू.. उशीर होतोय.. आणि हे बघ.. काळजी करू नको... आनंदी रहा.. लग्नाच्या तयारीला लाग.. स्वप्न बघ आपल्या हनीमूनचे!", तो डोळे मिचकावत म्हणाला.

"हं", राधा आपल्याच विचारात गुंग होती.

"हं नाही.. हस बघू एकदा.."

राधा कशीबशी हसली.

"अंहं...असं नाही.. खळखळून हस...जसं तू कॉलेजमध्ये हसायचीस... तसं हस..", त्याने तिला चिडवले.

"माधव..", ती त्याला मारायला धावली.. तसा तो पळाला.

"बरं आता खरंच चल.. उशीर झालाय आता.. घरापर्यंत सोडतो तुला.."

"घरापर्यंत? नको नको.."

"बरं! थोडं दूरपर्यंत सोडतो.."

राधाला थोडं सुरक्षित सोडल्यानंतर माधव शेतावर आला. अंकुरलेले ते बीज पाहून त्याने समाधानाचा सुस्कारा सोडला. पण त्याने समाधान बहुदा लवकरच व्यक्त केलं होतं. राधाची शंका खरी ठरली होती. ढग नियमित आले होते परंतु शेवटच्या क्षणी पावसाने हुलकावणी दिल्याने येऊ घातलेले पीक जळून गेलं होतं.

"राधाचं लगीन माधोसंग व्हनार नाय..", राधाचे वडील अप्पा गरागरा डोळे फिरवत नानांना म्हणजे माधवच्या वडिलांना सांगत होते.

"आरं अप्पा, येक पीक ग्येलं मंजी काय भीकेला लागलो नाय आमी.. माधो शिकलेला हाय..बाहेर कुटं बी नोकरी मिळन त्यायले.. अन ह्यो घर बी काय येका पिकावर टिकलं नाय बाबा.."

"त्यो मले काय बी सांगू नगं.. ह्यो पीक ग्येलं..लगीन मोडलं.."

"असं काय रे अप्पा.. लंगोटी यार नं आपन.. अन पोरांचं बी पिरम हाय एकमेकांवर.. काऊन त्यांले दुखावतोस बाबा.."

"नाना.. माही लेक या फाटक्या झोपड्यात नांदायची नाय.. कुटं आमी अन कुटं तुमी! आरं, लक्ष्मी पानी भरते आमच्या घरात.. या खोपट्यात धाडून तिले लंकेची पार्वती नाय करायची मले.. ह्यो लगीन मोडलं.. बास!"

अप्पा आले तसे तरातरा निघून गेले. बाहेर माधव सुन्नपणे उभा होता. नानाने कितीही म्हटले तरी घरची परिस्थिती फार चांगली नव्हतीच. कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाने पीक पिकत नव्हतं. त्यात लग्नाच्या दोन बहिणी! माधव तेव्हा कॉलेजला शिकत होता. आपल्या मुलाने शिकून शेतात काहीतरी उत्क्रांती करावी, असे नानाला वाटत असे. तसेही नाना पुरोगामी विचारांचे होते. घरातील अडचणींचा बाऊ न करता दिवसरात्र काबाडकष्ट करून मुलींना पदवीपर्यंत शिक्षण दिलं होतं पण माधवच्या वेळेस मात्र परिस्थिती फारच बिघडली आणि माधवला शिक्षण अर्धवट सोडून नोकरी धरावी लागली. नोकरीच्या पगारात आणि उरल्यासुरल्या बचतीच्या दोन्ही बहिणींचे लग्न उरकले. नानांची प्रकृती ठीक रहात नसल्याने त्याला गावी परतावं लागलं होतं.

राधा त्याच गावातील पोर. राधाचे वडील गावातील बडे प्रस्थ होते. ते आणि नाना बालमित्र होते तसे राधा आणि माधव देखील बालमित्रमैत्रिण! राधा माधवपेक्षा दोन वर्षाने लहान होती. परंतु श्रीमंती तिच्या अंगात मुरली होती. शाळा संपली तसं घरी तिच्या विवाहाच्या गोष्टी होऊ लागल्या. पण राधाला शहरात शिकायचे होते. तिला वरदेखील शहरातीलच हवा होता...पेक्षाही शेतकरी नवरा अजिबातच नको होता. अप्पांना तिच्या या विचारांचा अभिमान होता. त्यामुळेच निश्चित होऊन त्यांनी राधाला माधवच्या कॉलेजमध्ये टाकले होते. परंतु नेहमीच्या गाठीभेटी, माधवाचा मनमोकळा स्वभाव, बुद्धिमत्ता, यावर राधा मोहित झाली. तिची श्रीमंती, शेतकरी नवरा नको, हे ब्रीद गळून पडले होते. माधवच्या घरची परिस्थिती तिला ठाऊक होती. तरी ती त्याला भावी सोबतीचा रूपात पाहू लागली होती. माधव मात्र स्वतःची पायरी ओळखून होता. राधाने अगदी साधं राहायला सुरवात केली. परिस्थितीने माधवला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं परंतु तो त्याच शहरात नोकरी करत होता म्हणून राधाने नेटाने तिचे शिक्षण पूर्ण केले होते आणि प्रेमाने माधवला बदलायला भाग पडले!

घरी तिच्या लग्नाबद्दल बोलणे सुरु झाले तेव्हा तिने माधवशी लग्न करणार असल्याचे जाहीर केले. पोरीच्या हट्टापुढे अप्पांनी नमते घेतले होते पण त्या पावसाळ्यातील पीक माधव काढू शकला तरच ते लग्न लाऊन देणार होते. निसर्गाच्या लहरीवर लादलेली ही अट राधाला मान्य नव्हती पण माधवने समजूत घातल्यामुळे ती गप्प होती. आज माधवचं सगळं पीक जळल्याने अप्पा खुश होते. राधासाठी वर संशोधन करायला ते मोकळे होते. जवळच्या शहरातील एका सुशिक्षित तरुणाकडे शब्द टाकल्याचे राधाने ऐकले आणि ती तडक निघाली.

आभाळ गच्च भरलं होतं. माधवच्या शेतातील त्याच वडाच्या झाडाखाली ती उभी होती, माधवची वाट पहात..

"का बोलावलंस यावेळी? केव्हाही कोसळेल आता..", तो शुष्कपणे बोलला.

"उद्या शहरातून पाहुणे येणार आहेत लग्न ठरवायला."

"अभिनंदन!", तो तिची नजर चुकवत बोलला.

"अभिनंदन? माधव.. माझं लग्न ठरतंय..तुला काहीच वाटत नाही?"

"आपलं लग्न होऊ शकत नाही राधा.. तुझ्या वडिलांना तसाही मी पसंत नव्हतो.. आता तर त्यांची अटही पूर्ण नाही केली. कोणत्या तोंडाने तुझा हात मागू त्यांच्याकडे?"

"हात मागायची गरज काय?"

"म्हणजे?"

"सरळ हात धरायचा आणि घरी घेऊन जायचं ! हे घे... ", तिने त्याच्यासमोर मूठ उघडली!

"हे... हे कुंकू आहे.."

"हो.. भर माझ्या भांगेत.."

"अगं पण तुझे वडील.."

"लग्न त्यांना नाही.. मला करायचयं..ते ही तुझ्याशीच!"

"पण हे जळलेलं शेत..."

"हे काही कायम जळलं राहणार नाही माधव. आपण दोघेही सुशिक्षित आहोत. करू नं काही उपाय.. यानंतर आपले शेत पाण्याअभावी जळणार नाही, निश्चित!"

माधव काही क्षण तिच्याकडे पहताच राहिला.

"घे.. उशीर करू नकोस.. एकदा कपाळाला कुंकू लागलं की अप्पा काहीच करू शकणार नाहीत. माझ्यावर खूप जीव आहे त्यांचा आणि तसंही जगेन तर तुझ्यासोबत आणि..." पुढचं काही बोलायच्या आत माधवने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि दुसऱ्या हाताने तिच्या भांगेत कुंकू भरले.

"माधव..", ती माधवला बिलगली.

"अगं.. थोडं तर आडोशाला चल..", तो डोळा मारून बोलला.

"माधव..", ती ओरडली तसे पावसाचे काही टपोरे थेंब त्यांच्या अंगावर पडले. दोघेही हसले...पावसाने जणू त्यांना अनुमोदन दिले!

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.