ऋत्विक आणि राधा ची ही काही तशी पहिलीच भेट नव्हती, जवळजवळ ८-९ महिने झाले दोघे एकमेकांना ओळखत होते..

एका लेखनस्पर्धेच्या Workshop मध्ये दोघांची भेट झालेली.. पहिल्या भेटीमधेच काहीतरी 'click' झालं एकमेकांबद्दल..नेमकं काय ते सांगता नाही येणार..पण झालं एवढं खरं..
ती तिच्या मंत्रिणींना त्याच्याबद्दल सांगताना थकत नव्हती, न् तो त्याच्या मित्रांच्यात तिच्याबद्दल फार बोलत नसला तरी तिचा विषय निघाला की पठ्ठ्याचे गाल डोळ्यात जायचे. दोघेही तसे creative च..तिला विशेषतः कवितांची आवड, लिहिण्याची-ऐकण्याची-वाचण्याची-जगण्याची.., तर तो कथांमध्ये जास्त रमायचा. वेव्ह लेंथ छानच जमायची..उत्तम अगदी. मैत्री छान आहे, गट्टी उत्तम जमलीये, तर आहे तसेच चालूदेत, फार पुढचा विचार नको या नियमाने चालले होते सारे !!

तर हां..ऋत्विक आणि राधा ची ही काही तशी पहिलीच भेट नव्हती. कधी ग्रुपसोबत, कधी दोघेच असे चिक्कार वेळा भेटी झालेल्या. अगदी एकमेकांच्या घरी देखील एकमेकांबद्दल पूर्ण माहिती होती. अधेमधे काकूंसोबत (राधा च्या आई सोबत) देखील बोलणं व्हायचं त्याचं. बऱ्याचदा त्या होऊनच कॉल करायच्या.."अमुक अमुक विषयाबद्दल राधा ला जरा समजावून सांग रे" पासून "तिला homesick वाटतंय, तुला बोलणार नाही ती, पण जरा कंपनी दे तिला, किंवा ग्रुप औटिंग तरी करा, म्हणजे बरं वाटेल तिला जरा" इथपर्यंत सांगायला ही कॉल यायचे त्यांचे.

आधी हजारवेळा प्रॉपर डेट वाटावी अश्या भेटी झालेल्या असूनही आज त्याच्या मनावर या भेटीचं दडपण होतं. आपण राधाला जे सांगणार आहोत ते ऐकल्यावर "अय्या, माझ्या पण मनात हेच होतं रे रुत्या" असं म्हणत तीने गोड हसुन आपल्या केसातून हात फिरवावा असं त्याला राहून राहून वाटत होतं., आणि तो तसा scene एव्हाना लाख वेळेला त्याच्या डोळ्यासमोर येऊन ही गेला होता..पण जर याच्या उलट प्रतिक्रिया आली तर काय, हि शंकेची पाल नेमकी त्या स्वप्नवजा विचारांच्या ओघात चुकचुकायची, आणि क्षणभर धस्स व्हायचं काळजात..! तर आज इतके विचार, शक्यतांची पडताळणी वगैरे वगैरे चाललं होतं कारण आज तो तिला सांगणार होता की "मला तू खूप आवडतेस राधा..' लगेच लग्न-बिग्न, संसार-मुलं असं नव्हे, पण निदान त्या विचारांच्या दिशेने वाटचाल सुरु व्हावी. कमीतकमी आपल्या मनातल्या भावना तरी तिला पूर्णपणे कळाव्यात असं त्याचं प्रामाणिक मत होतं. हे काही तो तडकाफडकी सांगत नव्हता, पूर्ण विचारांती आणि घरी आई-बाबांशी बोलून मगच हे ठरवलं होतं त्याने. त्याच्या लहान बहिणीनें तर already राधा ला राधा वाहिनी पण करून टाकले होते.

भेटीची वेळ जवळ येत चालली तशी त्याची चलबिचल वाढत चालली होती. तो वेळेआधी २० मि त्या cafeवर येऊन पोहोचला सुद्धा होता. मनातल्या विचारांच्या काहूराला ब्रेक लागावा म्हणून cell वर social networking sites वर मन गुंतवावे या विचाराने त्याने खिशातून cell काढला, बघतो तर काकूंचा (राधा च्या आईचा) मिसकॉल येऊन गेलेला. "यांनी आज का बरं फोन केला असेल?" "आज राधा चा मूड ऑफ वगैरे तर नाही ना??" "श्या, म्हणजे आज काही आपण तिला आपल्या मनातलं नको सांगायला" वगैरे वगैरे विचारांच्या गर्तेत ४-५ मि. गेली, अन् क्षणार्धात भानावर येऊन काकूंना कॉल बॅक करायला हवा हे त्याला आठवले आणि म्हणून त्याने कॉल लावला..

काकू : हॅलो

ऋत्विक : हॅलो काकू, कॉल केला होता का तुम्ही? मी गाडीवर होतो, त्यामुळे मिस झाला, बोला ना.."

काकू : अरे ऋत्विक, एक गोड बातमी आहे....

(चला, म्हणजे राधा चा मूड ही छान असेल, आजच सांगता येईल मनातलं..yayy)..【मनातल्या मनात】
ऋत्विक : अरे वा, सांगा ना काय विशेष?

काकू : तुला तो अनय माहितीये ना रे? आमच्या कॉलनी मधेच राहतो बघ, चिनूला (चिनू म्हणजे राधाचं लाडोबा नाव) लहानपणापासून आवडायचा बघ तो..त्याची आई आली होती आज, त्यांनी indirectly चिनू ला मागणी घातलीये अरे..तू जरा बघ ना तिच्या मनात काय आहे ते..म्हणजे तसा लहानपणापासूनच आवडतो तो तिला, पण एकदा प्रत्यक्ष शहानिशा करून घे ना तू, मीच विषय काढला असता पण स्थळ वगैरे म्हंटल तर अंगावर येईल माझ्या, तुझ्याशी कशी, मोकळेपणाने बोलेल रे...
..
..
..
ऋत्विक...?? हॅलो, ऐकतोयस ना रे..???

ऋत्विक : हो....काकू..., ऐकलं मी...............

~~~

काकु : काय रे कुठे हरवला होतास?

ऋत्विक : नाही काकू, काही नाही..तुम्ही बोला ना, ऐकतोय मी..

काकू : अरे आणि अजून एक जमेची बाजू म्हणजे सध्या अनय पुण्यातच आहे, WIPRO मध्ये switch मारला त्याने, त्यामुळे चिनू आणि त्याची भेट पण सहजासहजी शक्य आहे ना..
तू नक्की बोल हं बाळा तिच्याशी !

ऋत्विक : हो काकू, निश्चिंत रहा तुम्ही, मी घेईन बोलून..

काकू : हो ठीक आहे..चल ठेवते मग..सांग हं मला नक्की काय बोलते ती ते..

एक दीर्घ श्वास घेत ऋत्विकने फोन ठेवला. इतक्यात राधाची नेहमीच्या style ची थाप पडली पाठीवर. याचे ढिंचाक कपडे बघून म्हणाली "क्या राजाजी, इरादा क्या है? आज एकदम टकाटक दिसतोयस, आं हां?" [ती त्याला असं 'राजाजी' म्हणायची तेव्हा त्याला प्रचंड आवडायचं, डायरेक्ट सातव्या आसमानावरच पोहोचायची स्वारी, पण आज मन खिन्न होतं, त्यामुळे आजच्या 'राजाजी' नंतर सुद्धा त्याचा चेहरा मलुलच राहिला]
ऋत्विक : अगं, actually, आपलं हे ते..आं...काही नाही म्हणजे तसं..
राधा : बापरे, प्रत्यक्ष ऋत्विक पटवर्धनांना शब्द सुचत नाहीयेत बोलायला..अरेरे..मॅटर सिरीयस दिसतोय

असं बोलून आपला लहान मुलासारखा चेहरा, चंबू सारखा करून, त्याला चिडवत ती हसत राहिली, आणि तिचं ते निरागस हसू बघून आधीचा कॉल वगैरे साऱ्याचा त्याला विसर पडला, एकटक पहात राहिला तो, अगदी पापणीही न लववता..
त्याची अशी एकटक नजर पाहून तिला जरा अवघडल्यासारखंच झालं खरं तर, पण त्याचं तसं पाहणं आवडायच तिला.....
दोघांच्या नजरा एकमेकांत गुरफटत चालल्या होत्या, इतक्यात गाडीचा हॉर्न वाजला आणि त्या दोघांची नजर एकमेकांना चोरून, एकमेकांवरून दूर गेली.

राधा : बोल ना र्रु, क्या बात है? कपडे वेगळीच स्टोरी सांगतायत, न् चेहरा आपलं वेगळंच स्वगत मांडतोय. अगदी परस्परविरोधी, सगळं ठीक आहे ना?

ऋत्विक : अगं खरंच काही नाही, सगळं एकदम मस्का आहे (मस्का म्हणजे भारी)..उसनं अवसान आणत तो बोलला.

राधा : नाही यार, एखादी कविता अर्धवट राहिलिये, पुढची ओळ सुचतीये पण लिहावीशी वाटत नाही, अश्या वेळी जसा चेहरा होतो ना एखाद्याचा, तसा दिसतोयस तू, बोला पटवर्धन, बोला..

ऋत्विक : कसल्या छान छान उपमा सुचतात ना तुला !! सध्या काही नवं लिखाण वगैरे? रूपक अलंकारावर लिहीत होतीस ना काहीतरी?

राधा : र्रु, टॉपिक नाही हं change करायचा..बोलणार आहेस की निघू मी?

ऋत्विक : ओके ओके, राग आवर भगिनी निवेदिता..
(त्यानं "भगिनी" निवेदिता म्हटलेलं तिला अज्जिबात आवडायचं नाही, त्यामुळे शांत व्हायचं सोडून ती आणखीनच चिडली..)

आणि तिच्या हाय हिल्स चा टॉक टॉक आवाज करत तिथून दूर जायला लागली, त्याने हात धरून थांबवावंस वाटत होत तिला..जसं नेहमीच, तिला मनात वाटायचं तसंच तो वागायचा, तसंच आजही झालं आणि त्याने हात धरला तिचा !
मग दोघेही कॅफे मध्ये गेले. बोलावं की न बोलावं या संभ्रमावस्थेत असतानाच त्याने अनयचा विषय काढला.

ऋत्विक : अगं, actually २-३ दिवस विचारेन म्हणतोय, तुझा बालपणीचा चड्डी-बड्डी अनय पुरोहित काय म्हणतोय? (अनय चा विषय या आधीही त्या दोघांच्यात झाल्यामुळे ऋत्विकला अनय ऐकून माहित होता)

राधा : अचानक त्याचा विषय कुठून आला मधेच?

ऋत्विक : मला माझ्या अधिकृत सूत्रांकडून असं कळलंय की 'अनयेन्द्र महाराज नाशिकवाले' पुण्यनगरीमध्ये अवतरलेत..म्हणून म्हंटलं विचारावं !

राधा : हाईल्ला, रुत्या, खरंच पुण्यात आलाय पुरु? (पुरु म्हणजे पुरोहित चा शॉर्टफॉर्म) भेटायला हवं यार मग, पण आमचा काही कॉन्टॅक्ट च उरला नाहीए रे, डायरेक्ट FB मेसेग वगैरे टाकला तर लय despo वाटेल ना....
पण by the way तुला कोण बोललं रे तो पुण्यात आल्याचं?? तुम्ही तर ओळखतही नाही एकमेकांना..

ऋत्विक : विषय आहे का, अपनी पहोंच उपर तक है मॅडम, हम सारे दुनिया की खबर रखते है..

राधा : दसटंकी पुरे कर, सांग ना र्रु, तुला कसं कळालं?
(नौटंकी च्या हि पुढची १ पायरी म्हणजे १०टंकी)

ऋत्विक : माझा १ मित्र विप्रो मध्ये आहे, त्याच्याशी सहज गप्पा मारताना नवीन रिक्रुट्स बद्दल विषय निघाला, आणि ओघाने याचं नाव आलं (ऐनवेळी आपण इतकं चपखल खोटं बोलू शकलो याचा त्याचा त्यालाच आनंद झाला..)

राधा : अच्छा..खरं सांगू का? त्याला बघायचंय यार, भेटायचंय..12th च्या सुट्टीनंतर आमच्यात काही कॉन्टॅक्टच राहिला नाहीए..उद्याच भेटू त्याला? करून टाकू का मेसेग? च्या मारी, despo तर despo, हो आहे मी despo....

अनयला भेटण्याबाबतची तिची excitement पाहून आत कुठेतरी "हातची गेली राधा" असा धक्का बसला त्याला, आणि त्या धक्याने अचानक नकळतपणे त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.. जवळजवळ ओले झालेले डोळे लपवायचं निमित्त म्हणून 'हा वेटर कुठे तडमडलाय' असं पुटपुटत तो उठला.., आणि उगाच शोधाशोधीचं नाटक करून तिच्यापासून लांब जात चटकन डोळे पुसून, आनंदी मुखवटा लावून दोन मिनिटांनी परत आला..

मग एखाद मिनिटाचा काळीज पोखरणारा पॉज घेऊन म्हणाला : कर ग मेसेग, एखादी मुलगी आपल्यासाठी despo होतीये हे पाहून मुलगा double despo होतो. विचार नको करू, करून टाक मेसेग !!

राधानेही पडत्या फळाची आज्ञा मानून मेसेंजर वर मेसेग टाकूनही दिला..आता "त्याचा रिप्लायच नको येऊदे" अशी मनोमन प्रार्थना करत, चेहऱ्यावरचं महत्प्रयासाने आणलेलं हसू टिकवत, राहता येईल तितकं शांत राहून, तो उगाच इकडे तिकडे पहात राहिला.
मिनिट, दोन मिनिटं गेली असतील इतक्यात राधाचा मोबाईल वाजला, आणि एखाद्या कॅडबरीवर लहान मुल तुटून पडावं, त्या वेगाने राधा ने मोबाईल ओढला, पाहते तर अनय चा मेसेग.
राधा : हाईल्ला रुत्या, हे बघ हा म्हणतोय की मी तुलाच मेसेग करणार होतो, पुण्यात आलोय २/३ दिवसांपूर्वीच..
मनातल्या मनात त्या अनय ला 'despo साला' म्हणत तो राधा ला फक्त "अरे वाह...." इतकंच बोलला.
त्यानंतर राधा आणि अनयचं १०-१५मिनिट चॅटिंग चाललं, आणि त्यासोबत राधाची रनिंग कंमेंटरी सुद्धा. त्या पुरोहिताचा प्रत्येक मेसेग भाल्यासारखा पटवर्धनांच्या मनात रुतत होता. Finally, लगेच 'उद्याच भेटू' असं ठरवून राधा - अनयचं चॅटिंग संपलं..आणि राधा-ऋत्विकची भेट ही .. !!

दुसऱ्या दिवशी आधी अनय-राधा ची भेट झाली की मग आपण भेटूया असं ठरवून दोघे निघाले. खरं तर ऋत्विकची इच्छा नव्हती, पण राधाच्या हट्टापुढे त्याचे काही चालले नाही, 'उद्या त्याला भेटून झालं की मी तुला भेटणारच' असं तिने त्याला निक्षून सांगितलं होतं.

पुढच्या दिवशी ९ च्या सुमारास राधाची वाट बघत ऋत्विक थांबला होता......

......ती आली, बहुधा तीच असावी, हो राधाच की.. ती आली, ती पडलेल्या चेहऱ्यानेच.. याला कळेना झाले तरी काय? (तरी तिला तसं बघून 'अनय चा पत्ता कट' असं imagine करून मनातल्या मनात नाचूनही झालं होतं त्याचं) ती म्हणाली "काय आचरट झालाय अरे अनय, it was the worst date I've ever been on.. सेन्स ऑफ ह्युमर नावाचा भाग नाहीए त्याच्यात, ना वाऱ्यावर उडणारे केस राहिलेत, ना कॉन्फिडन्स"........इतक्यात ऋत्विकचा मोबाईल वाजला आणि त्याची तंद्री मोडली..जागेपणी आपण स्वप्न पहात होतो हे त्याला जाणवलं.

कॉल राधाचा होता. प्रचंड उत्साहभऱ्या आवाजात ती म्हणाली "रुत्या, सॉरी यार, मी येऊ नाही शकणार, अनय च सोडतोय मला माझ्या फ्लॅट वर. It's the best evening of my life..खूप भारी !! मला खरंच भेटायचं होतं तुला, पण इथेच बराच वेळ होईल रे, आणि त्याला टांग पण द्यावीशी वाटत नाहीए.. I'm so so sorry dear"
अलमोस्ट रडव्या स्वरात "ठीक आहे ग, have a good time" इतकं बोलून ऋत्विकने कॉल कट केला, आणि पाण्याने डबडबलेले आपले डोळे घट्ट मिटून घेऊन आसवांना वाट मोकळी करून दिली !!...

~~~

रात्रीची वेळ..ऋत्विक घरी परतत होता .. दिवसभर पृथ्वीला सोन्यात मढवून नंतर केवळ चंद्राच्या प्रकाशात, तिला एकटीला सोडून, सूर्य निघून गेला होता. ती जिवाच्या आकांताने, जीवघेण्या वेगाने 'फिरत' होती, पण सूर्य काही तिला गवसत नव्हता. आज त्या पृथ्वीचे दुःख जाणवत होते ऋत्विक ला. गेले कित्येक महिने मैत्रीचा लळा लावून, अचानक राधा दूर गेली होती. मनातल्या मनात तो देखील जवळजवळ पृथ्वीच्याच वेगाने विचारचक्रे फिरवत होता, राधा ला कसे परत आणता येईल याचा विचार करत होता, पण धरेसारखंच त्याचंही भिरभिरणं व्यर्थ. निदान त्या पृथ्वीकडे चंद्र तरी होता, हा मात्र अगदीच एकटा..!
दुःख हसून साजरं करण्याचा प्रयत्न करत असलेला केविलवाणा चेहरा, कोरडा कटाक्ष टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे ओलसर डोळे आणि 'मी मस्त आहे' असं भासवण्यासाठी फुंकलेली बेफिकीर शीळ (जी कान देऊन ऐकली, तर त्यातली थरथर हृदय हेलावणारी) ; या साऱ्यासहित घरी आला तो.
त्याला पाहून आई आणि ऋता (त्याची बहीण) यांना चाहूल लागली काहीतरी बिनसल्याची, पण 'नंतर बोलू' असा विचार करून त्यांनी सवाल-जवाब आजच्यापुरते टाळले. तो आई आणि ऋता ला सगळं सांगायचा, तसं याबद्दलही बोलणार होता, पण थोडं सावरल्यावर...

असेच ४-५ दिवस गेले. राधासोबत अगदी जुजबी बोलत होता तो. याचं काहीतरी गंडलंय हे तिलाही जाणवायला लागलं आता. आणि एके दिवशी संध्याकाळी तो कंपनीतून घरी आला, पाहतो तो राधा च स्वागताला हजर. तिला इतक्या दिवसांनी पाहून आतून सुखावलाच होता तो खरं तर. आल्या आल्या तिने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. 'तू नीट बोलत का नाहीयेस? चिडलायस का?'.. तिचा राग पण अगदी बिनदिक्कतपणे व्यक्त केला. किचनमधून त्याची आई पण ऐकण्याचा प्रयत्न करत होती, निदान हिला तरी सांगेल काय बिनसलंय ते. पण आई - ऋता ला दिलेलं उत्तरच त्याने तिलाही चिकटवलं. 'नवीन प्रोजेक्टचं काम सुरु आहे, त्यामुळे खूप exhaust होतोय' वगैरे.. राधानंही मग फार ताणून न धरता 'ठिक्के' म्हणत 'विषय एन्ड' केला. मग नॉर्मल बोलणं, गप्पा आणि जेवण झालं, जाता जाता त्याला 'उद्या आपण बाहेर जातोय, काकूंची परमिशन मी आधीच काढलीये, काहीही कारण चालणार नाहीए, अन्याला तुला भेटायचंय, डन म्हणजे डन' एवढं सुपरफास्ट बोलून ती पसारही झाली, त्याला हो/नाही म्हणण्याचा काही चान्सही न देता.
अशक्य आहे ही मुलगी असं म्हणत ऋत्विक आपल्या रूममध्ये गेला. झोपेशी झालेला करार सध्या संपुष्टात आला होता, त्यामुळे, तो उगाच काहीतरी गुणगुणत, लिहिण्याचा प्रयत्न करत राहिला..

"रात्रीची अशी तंद्री लागलेली,
अन् चांदण्यांचा घोळक्यात-
चंद्र एकटा पडलेला..

त्याला सोबत करण्या,
धरेवरचा एक जीव-
उघड्या डोळ्यांनी पहुडलेला..." असं काहीतरी खरडून झालं..

'जागेपणीच्या रणात' होरपळत बराच वेळ 'जागरण' झालं, अखेर रात्रीलाच दया आली त्याची, आणि तिचं उबदार झोपेचं पांघरूण पांघरले तिने त्याच्यावर...

पुढचा उजडलेला दिवस बघता बघता मावळतीकडे कलला. आणखी एक दुखरी संध्याकाळ अनुभवण्याचा मनाच्या तयारीने ऋत्विक ठरलेल्या कॅफे जवळ आला. राधा त्याची वाटच बघत होती. ते दोघे आत गेले, त्याने अनयबद्दल विचारले तर 'तो होईल रे नंतर जॉईन' असं म्हणून तिने इतर गप्पा सुरु केल्या. ३-४ मिनिटातच राधाला "hi" करत एक मुलगा आत आला, हो, अनयच !! दिसायला ठीक ठाक, पण तसा 'सडू'च वाटला ऋत्विक ला..राधा ने दोघांची फॉर्मल ओळख करून दिली. नमस्कार-चमत्कार झाले. आणि मग जनरल गप्पा सुरु झाल्या, जास्त दंगा ऋत्विक-राधाचाच चालला होता...काही वेळ असाच गेला आणि राधाला एक कॉल आला, तिच्या लाडक्या काकूचा ! तिने हातवारे करून "१० मिनिटात आलेच" असं सांगितलं, आणि ती थोडी लांब जाऊन बोलत उभी राहिली. १/२ मिनिटाच्या awkward silence नंतर ऋत्विक भुवई उडवत म्हणाला "so, काय म्हणतायत राधा मॅडम?" "त्या काय म्हणणार? 'ऋत्विक सर कसे भारी आहेत !!', एवढंच सांगतायत सध्या तरी" अनय उत्तरला. "म्हणजे??" कुतूहलापोटी ऋत्विक ने विचारले. "अरे भेटलोय तेव्हापासून तुझंच पूराण ऐकतोय, i envy you yarr" ऋत्विक ला फारच हिरोईक फील आला, राधा आपल्यात इतकी गुंतलीये हे ऐकून, त्यातून विशेषतः अनय कडून ऐकून फार आनंद झाला त्याला. अनय थोडा सिरीयस होत म्हणाला "तुमच्यात 'तसं' काही नाहीए ना रे? Actually I asked राधा, ती काहीच बोलली नाही त्यावर.., मी बराच सिरीयस आहे यार राधाबद्दल. अगदी सातवी-आठवीत असल्यापासुन तिच्याशिवाय कोणाचाच विचार केला नाहीए, माझे बाबा expire झाल्यापासून सगळं बिघडत चाललं होतं, राधा भेटली ना, त्या दिवशी वाटलं, बास, हेच ते आयुष्य बदलणारं वळण.. किती 'जिवंत' आहे ती, तिच्यासमोर मी बोर आहे i know पण तरी_____" अनय बोलत राहिला.. पण ऋत्विकचं तिकडे लक्षच नव्हतं., 'ज्या मुलाला त्याचे बाबा नाहीयेत, ज्याने नकळत्या वयापासून फक्त एकाच मुलीचा विचार केलाय, ज्याला राधाच्या रुपात आयुष्य दिसतंय, त्याला सांगू तरी कसं की राधावर प्रेम आहे माझं आणि तू चालता हो.. केवढा अन्याय होईल त्याच्यावर?! पण माझ्या प्रेमाचं काय मग? मी का म्हणून तिला जाऊ द्यायचं??' अशा वेळी त्याची आई त्याला एक वाक्य नेहमी सांगायची, ते त्याला आठवलं "ज्यांच्याजवळ काहीच नसतं, अश्या कमनशिबी लोकांना आपल्यामुळे मोठा आनंद मिळत असेल, तर तो जरूर द्यावा, मग त्या आनंद देण्याच्या प्रक्रियेत आपल्याला त्रास झाला तरी चालेल. त्यातून मिळणारं समाधान फार मोठं असतं" खरं तर हे वाक्य प्रमाण मानून स्वतःचं प्रेम कुर्बान करावं, हे चुकीचंच होतं. पण त्यावेळी इतका विचार त्याच्याच्याने झाला नाही. प्लस राधा-अनयच्या आई ने घेतलेला पुढाकार त्यांच्या नात्याच्या बेस मजबूत करणारा होता. त्यामुळे त्याच्या प्रश्नावर सर्वांगीण विचार करून ऋत्विक म्हणाला "नाही रे, आमच्यात तसं काही नाहीए....मैत्रीच्या पुढचं काहीतरी आहे, पण प्रेम नसावं, म्हणजे ___". हे ऐकल्यावर अनयच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, इतक्यात राधा आली. गप्पा सुरु झाल्या, ऋत्विक आता थोडा अबोल झाला होता, आणि अनय थोडा जास्त खुलून बोलत होता, त्याच्या डोक्यात आता पुढचे प्लॅन्स सुरु झाले होते...

आता अनय आणि ऋत्विकच्या गप्पाही रेग्युलरली व्हायला लागल्या होत्या, थ्रू Whatsapp or फेसबुक.., राधा आणि त्याच्या गाठीभेटी त्यामानाने कमी झाल्या होत्या, आणि तो राधाला प्रमाणाबाहेर मिस करू लागला होता. 'अनय-राधा हे एकमेकांसाठीच बनले आहेत, & this is the time to move on' असं स्वतःला समजावत इतर गोष्टीत व्यग्र राहण्याचा त्याचा नाकाम प्रयत्न चालला होता. ऋत्विक, राधा च्या लेखक मित्र-मैत्रिणींच्या circle मध्येही आता 'राधा-अनय' हे नाव बऱ्याचवेळा एकत्र घेतले जाऊ लागले. पण राधाचा मूड बऱ्याचदा पूर्वीपेक्षा थोडा ऑफ असायचा, कदाचित जीवनाबद्दलचा अनय चा 'सिरीयस अँगल' बघून ती अंतर्मुख व्हायला लागली होती.., ऋत्विक-राधाची भेट झाल्यावर मात्र सिरीयसपणाचा मुखवटा भिरकावला जायचा, आणि ती मोकळा श्वास घ्यावा तसं आयुष्य जगायची, पुढचा मागचा फार विचार न करता. त्या दिवशीही ते भेटले, बोलता बोलता ती म्हणाली 'मी कधी विचार नव्हता केला माझ्या भावी जोडीदारबद्दल, पण तो अनय सारखा असेल, तर कदाचित आवडेल मला..पोक्त, विचारी, आयुष्य काटेकोरपणे जगणारा.., शेवटी प्रत्येकाला एका ठराविक वेळी, ठराविक वयात आयुष्याबद्दल सिरीयस व्हावेच लागते ना रे रूत्या, 'मोठे' व्हावेच लागते....."
ऋत्विक फक्त 'हं...' म्हणून विचारांत गढला.. राधावरचा आपला प्रभाव, आणि आपली मैत्री.., दोन्ही उसवत चाललंय, याची नकळत जाणीव त्याला झाली..

~~~

राधा, ऋत्विक, अनय..सगळ्यांची आयुष्यं नव्याने वळणं घेत होती. पण रडव्या चेहऱ्यावर थोडं हसू फुलवण्यासाठी एक न्युज आली.., USA ला होणाऱ्या training session साठी जवळ जवळ ८९ candidates मधून दोघांची निवड झाली होती, त्यामध्ये ऋत्विकचं selection झालं होतं. त्याला ही बातमी कळाली तेव्हा प्रचंड आनंद झाला, US ला जाणं हे त्याचं स्वप्न होतं. दिवस पूर्ण आनंदात गेला, congratulations & celebrations..
पण घरी पोहोचल्यावर विचार करता करता डोक्यात आलं 'निदान १ महिन्याचं training असणार, त्यामुळे आई-बाबा, ऋता आणि राधा यांच्यापासून दूर रहावं लागणार..' वाटतं सोपं, पण आपल्या माणसांपासून दूर राहणं, ते ही एखाद्या पर-देशी म्हणजे अवघडच तसं !!

जाण्याआधी समोरासमोर बसून ऋत्विकने ऋताला सगळी हकीकत सांगितली. नंतर फोनवर सांगण्यापेक्षा असं प्रत्यक्ष सांगणं त्याला योग्य वाटलं. आणि सगळं सांगून झाल्यावर "आपण दुसरी 'गोरी गोरी पान, आणि फुलासारखी छान' वहिनी शोधुया हं तुला रुतु.." असं स्वतःच्याच हृदयावर दगड ठेवुन, रडव्या सुरात पण हसऱ्या चेहऱ्याने सांगितलं होतं. ऋताला यावर काय बोलावे काहीच सुचत नव्हते, तिनं फक्त दादूच्या पाठीवरून हात फिरवून 'करूया रे काहीतरी' इतकाच मूक संदेश दिला.
Take off ला अजून १०-१२ दिवस होते, पण व्हिसा च्या formalities, इतर paperwork वगैरे मध्ये तो काळ कसा उडून गेला हे कळलंदेखील नाही.

शेवटी तो दिवस उजाडला, एअरपोर्ट वर निरोप देण्यासाठी जिगरी मंडळी आली होती.. आई-बाबा, ऋता तर होतेच, शिवाय राघव, भास्कर सारखे बेस्ट फ्रेंड्स आणि राधा.. सगळ्यांना २-२ वेळा मिठीत 'भरून' झालं तरी मन काही अजून 'भरलं' नव्हतं.. राधा तशी रडूबाईच, त्यामुळे आई-ऋता च्या जोडीने तिचंही मुसमुसणं चाललं होतं. त्यातही कोणालाही रडताना बघितलं की ऋत्विकचं ठरलेलं वाक्य - 'तुम्हा बायकांना देवाने २ -२ गळक्या टाक्या दिलेल्या असतात, जरासा भावनांचा flow वाढला, की गळती सुरु' आठवून तिला थोडंसं हसुही आलं. शेवटी ऋत्विक बाय करून निघाला... अगदी नजरेआड होईपर्यंत राधा त्याला बघत राहिली, आणि तो ही मागे वळून वळून आईकडे बघण्याच्या निमित्ताने तिच्याकडे पाहत राहिला...

पहिले ३-४ दिवस ऍडजस्ट होण्यात वेळ गेला, पण आता तसा ऋत्विक तिकडे settle झाला, म्हणजे routine बसलं. आठवण तर रोजच येत होती सगळ्यांची. इकडे, ऋत्विक गेल्यापासून राधाचं मात्र बिनसलं होतं. तिला आता घडीघडीला त्याची आठवण येऊ लागली होती.
राधा एक दिवस अचानक ऋता ला भेटायला आली. ऋताला तिला बघून बरं वाटलं. जनरल गप्पा गोष्टी झाल्या, पण त्यातही दोघीही प्रत्येक विषय ऋत्विकला नेऊन जोडत होत्या. एक मुलगी तिच्या दादू ला खूप मिस करत होती आणि दुसरी....? नेमकं काय नातं होतं ऋत्विक-राधाचं?... गेली २४-२५ वर्षे जिंदादिलीने जगणाऱ्या मुलीला खूप प्रश्न भेडसावू लागले होते आता. अनय सोबत आपण जगतोय, असं आयुष्य जागण्यातच खरं समाधान आहे? की बिनधास्तपणे (ऋत्विकसोबत, ऋत्विकसारखं) जगण्यात खरा आनंद? तिला फार प्रश्न पडू लागले की ती सरळ ऋता कडे जायची.. तिच्यासोबत ऋत्विकच्या आठवणीत रमण्यात तिला आनंद वाटायचा.
त्या दिवशीही ती अशीच ऋता कडे गेली.. तिचं आणि ऋत्विकचं 'skypeइंग' चाललं होतं, राधा ही जॉईन झाली मग.. बऱ्याच गप्पा झाल्यावर ऋता म्हणाली "दादू, राधाला सांगितलंस का ऑफर बद्दल?" त्याने नकारार्थी मान डोलावली. राधा म्हणाली "कसली ऑफर? अजून एक प्रमोशन घेताय की काय पटवर्धन? आं हां?" ऋत्विक - "छे गं, switch मारण्याचा विचार करतोय. इथे खूप स्कोप आहे माझ्या प्रोफाइल ला, enormous ग्रोथ आहे.. आमच्याच इथल्या associate कंपनी मध्ये vacancy पण आहे सध्या..त्यांनी दिलीये ऑफर...." हे ऐकून राधाच्या पायाखालची जमीनच सरकली.. "अरे पण इकडे येणारच नाहीस म्हणजे तू? इकडे काका-काकू आहेत, ऋता आहे, मी आहे...आपण एकमेकाला दिसणारच नाही का? भेटणारच नाही? मी कसं जगणार रुत्या तुझ्याशिवाय?.."
ऋत्विक काहीसं हसून बोलला "जम बसला तर आई-बाबा, ऋता सगळ्यांना इकडेच बोलावेन ना मी, इकडे आहेत खूप इंडियन्स.... आणि तुझं म्हणशील तर अनय आहे ना तुझा.. लहानपणापासुनचा सखा, काकूंचाही लाडका.. जगशील तू माझ्याशिवाय, rather ऑलरेडी जगतीयेस तू माझ्याशिवाय.." हे ऐकून राधा सुन्न झाली. काय बोलावे हेच सुचेना तिला.., ऋत्विकने बोलणं संपवलं...आणि राधाच्या नजरेआड गेला...बहुतेक कायमचा !!?!
थोडी सावरल्यावर तिने ऋता समोर विषय काढला, तेव्हा ऋत्विकच्या फिलींग्स, त्याचं आणि अनयच झालेलं बोलणं, ऋत्विकला अनयबद्दल वाटणारी सहानुभूती, त्याचं तिच्यात गुंतणं, आणि शेवटी या सगळ्यातून सावरण्यासाठी त्याने अब्रॉड राहण्याच्या पर्यायाचा केलेला विचार...सगळं सांगितलं....आणि आता राधा विचारात पडली...

मध्ये काही दिवस गेले. आता ऋत्विकला यायला एकच दिवस, अगदी काही तासच बाकी होते. त्याने तिकडच्या कंपनी ची ऑफर accept केली होती, फक्त एक फॉर्म भरून submit केला की झालं. सध्याच्या कंपनीचं प्रोजेक्ट हॅन्डओव्हर करून तो काही दिवसांतच US ला कायमचा रवाना होणार होता. 'राधालाही विसरता येईल, आणि करिअर पण सेट होईल' असा दोन्ही बाजूने विचार करून त्याने हा निर्णय घेतला होता. राधाला आपल्या फिलींग्स बद्दल रुताकडून कळलंय हे मात्र त्याला माहित नव्हतं..

"हो हो, निघूया लवकर, उद्या ऋत्विक येणार आहे, आणि तुला त्याला surprise visit ची तयारी करायचीय, माहित आहे मला, तू आठव्यांदा सांगितलंयस गेल्या अर्ध्या तासात मला हे" अनय थोड्या चिडक्या स्वरात म्हणाला...
"बरं बोल पटकन काय बोलायचंय तुला..? महत्वाचं ते पण? पटकन.." - राधा
"आपल्या दोघांच्याही घरी आपल्याबद्दल कल्पना आहेच, पण तरी मला confirmation हवंय तुझ्याकडून"..
राधा ने प्रश्नार्थक मुद्रेने विचारलं "कसली कल्पना आहे?"
"आपण गेले २-एक महिने भेटतोय, एकमेकांना जाणून घेतोय, & we're loving it..right? म्हणजे we feel complete with each other.." - अनय
"हे बघ अनय, मी तरी आईला स्पष्ट सांगितलंय की 'आम्ही भेटतोय अजून फक्त, असे निर्णय घाईघाईत नाही करून चालत, so तुम्ही तिकडे आपल्या कल्पनाशक्तीला ब्रेक लावा. आमचं काही फिक्स ठरलं, कि आम्ही सांगूच..'

"ठरवूनच टाकूया मग.." असं पुटपुटत अनय ने राधाचा हात हातात घेतला. आणि खिशातून अंगठी काढून, तिच्या नजरेशी आपली नजर भिडवत, थरथरत्या आवाजात प्रश्न केला "Will you marry me Radha..?"...

दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी ऋत्विकची flight लँड झाली. आई-बाबा आणि ऋता त्याला receive करायला एअरपोर्ट वर आले होते. राधा मात्र दिसली नाही.. कुठेतरी आत त्याला वाटत होतं की ती येईल पण____ असो..! कितीही वाईट वाटलं तरी चेहरा सतत हसरा ठेवण्याचं त्याचं व्रत न मोडता त्याने सगळ्यांना हसतमुखाने मिठी मारली..

~~~

पटवर्धन कुटुंबीय काही वेळात एअरपोर्ट वरून घरी पोहोचले. निदान राधा घरी तरी भेटायला येईल अशी वेडी आशा होती त्याला, पण व्यर्थ. तिचा विचार टाळण्याचा प्रयत्न जेवढा जास्त, तेवढ्या जास्त वेगाने तिची आठवण छळत होती त्याला..

तिच्या आठवणींनी फेर धरला होता त्याच्या आजूबाजूला..
आणि तिच्या आठवणींच्या फेऱ्यातला तो सण, त्याचा डोळ्यातून साजरा होत होता..,
अगदीच एकटं बसण्यापेक्षा आठवणींसोबत वेळ घालवणं त्याला बरं वाटलं, मग ती आठवण आसवांनी भरलेली का असेना..!
शेवटी न राहवून त्याने राधाला कॉल केला. तिने घाईघाईत फक्त "घरी आलीये मी, नाशिकला..नंतर कॉल करते.." इतकं बोलून ठेवला सुद्धा. मग याने राघव, भास्कर वगैरे ग्रुपमधील मित्रांना कॉल केले., त्यांच्याकडून कळाले की 'कालच अनयने राधा ला propose केले..'
एक एक गोष्टीचा खुलासा होत गेला..:
राधाने अनयला होकार दिला असणार..,
राधा घरी गेलीये कारण आता घरच्यांच्या संमतीने पुढची बोलणी वगैरे सुरु असावीत..
'आपण तर पूर्ण तोंडावर पडलोय.., इतक्यात राधा विसरली सुद्धा आपल्याला..' ऋत्विकला हे सगळं खरंच वाटत नव्हतं., आपण कुठल्या तरी खोल गर्तेत अधांतरी फेकले जातोय, असं वाटायला लागलं त्याला !!

"आठवणी शोधत फिरता फिरता,
मन विचारांच्या गर्तेत हरवून गेलं..

परतीची वाट तशी ठाऊक होती,
परतायचं मात्र राहून गेलं.." ........अशी काहीतरी अवस्था झाली होती त्याची..!

एव्हाना ऋत्विकच्या आईला देखील सारी परिस्थिती ऋता कडून कळाली होती. तिने ऋत्विकला हरप्रकारे समजावून सांगितले की "अनय unfortunate आहे हे जरी बरोबर असले, तरी स्वतःचे प्रेम कुर्बान करून त्याला सुखी करणे हा काही पर्याय नव्हे..सहानुभूती काही काळ टिकते, नाते टिकवून ठेवते, पण प्रेमाइतकी शाश्वतता त्यामध्ये नसते.." ऋत्विकला हे पटले.. राधाला भेटून गोष्टी क्लिअर करायला हव्यात हे त्याच्या लक्षात आले. पण बहुतेक आता फार उशीर झाला होता...
'मी भारतात आलोय हे राधाला माहित असूनही ती भेटायला नाही आली, साधा तिचा एखादा कॉल सुद्धा नाही यावरून काय ते समजायला हवे तुला रुत्या' असं त्याचं मन त्याला म्हणत होतं. दिवस विचारमंथनात कसा संपला कळलंही नाही, शेवटी हे सगळं "साल आपलं नशीब" या मथळ्याखाली टाकावं, आणि सरळ ताणून द्यावी असा विचार करून ९.३० च्या सुमारास ऋत्विक आडवा झाला. पण पाठ सोडतील तर ते विचार कसले??! साधारणतः १०-१०.१५ ची वेळ होती, 'हिला माझी आठवण सुद्धा येत नसावी का?' हा जुनाच विचार नव्याने त्याच्या डोक्यात थैमान घालत होता इतक्यात कोणीतरी दारवरची बेल वाजवली, एकदा वाजवून समाधान झालं नाही म्हणून वाजवतच राहिला तो माणूस. इतक्या भलत्या वेळी इतकी वेड्यासारखी बेल कोण बरं वाजवत असेल असा विचार करत आणि थोड्या घुश्श्यातच काकू दाराकडे गेल्या...."कोण आहेsss?" काकूंनी विचारलं.. "काकू, मी, राधा..." पलीकडून आवाज आला..
'राधा??? आत्ता? इथे? ही तर नाशकात होती ना..' 'की हे सगळे भास आहेत माझे' 'मला वेड तर लागलं नसेल', ऋत्विक अश्या विचारांत असतानाच राधा आत आली, क्षण-दो क्षण त्यांची नजरानजर झाली, आणि पुढच्या क्षणी तिने काका-काकू आजूबाजूला आहेत / नाहीयेत, आपल्याकडे बघतायत / न-बघतायत वगैरे सारे विचार फाट्यावर मारून ऋत्विक ला घट्ट मिठी मारली........

"तुला माझी आठवण येत नसावी,
असा मी मनाशी अंदाज बांधावा..

आणि आपली अवचित भेट होता,
तुझ्या नजरेतल्या अधीर ओलाव्याने,
माझा तो अंदाज खोटा ठरवावा..

मनाशी साठून यावा मग,
विरहातला सारा दुरावा..

आणि तत्क्षणी मला मिठीत घेऊन,
तू द्यावास,
आपल्या अमर्त्य प्रेमाचा पुरावा.."

आणि ती घट्ट मिठी आणखी घट्ट आवळत रडक्या आवाजात राधा म्हणाली "र्रु.... I love you yarrrr..I'm sorry.. I love yoouuuh" बस, ऋत्विकने हे शब्द ऐकले अन् तिच्या घट्ट मिठीचं उत्तर तितक्याच घट्ट मिठीत देत म्हणाला..... "I love you Chinu, love you tttoooo...." पण पुढच्या क्षणी, आई-बाबांच्या जाणिवेने त्याने ती मिठी अवघडुन सोडवली आणि तिचे डोळे पुसले...अन् मग स्वतःचेही...!

काही वेळाने सर्वजण शांत बसल्यावर नेमकं काय झालं याचा खुलासा राधाने केला. झालं असं होत की (फ्लॅशबॅक) :
खूप दिवसांपासून राधाच्या लक्षात येत होते की 'हे प्रेम नाहीए'.., लहानपणीच्या infatuation ला मोठेपणी प्रेमाचं नाव देऊन काहीच साध्य होणार नाही. पण अनयची एकंदरीत परिस्थिती बघता त्याला सरळ सरळ "आपलं लग्न होऊ शकत नाही" असं सांगणंही risky होतं.., त्याने स्वतःच काहीतरी बरं वाईट करून घेतलं तर??!, म्हणून राधाने थोडा वेळ घ्यायचं ठरवलं. या सर्व गोष्टी तिने आईला पण सांगितल्या., आणि 'स्थळ' म्हणून पुढे न गेलेलंच बरं याची कल्पना त्यांनीच अनयच्या आईला देखील दिली. पण नेमकं त्याच काळात अनयने राधाला propose केलं. अनयला समजावणं आता अत्यावश्यक होतं. म्हणूनच अनय-राधा नाशिकला गेले आणि दोन्ही कुटुंबांमध्ये विषय स्पष्ट करण्यात आला. त्यामुळे अनय बऱ्याच अंशी disturbed आहे, पण चालायचंच, प्रत्येकाला अश्या phase मधून जावेच लागते, त्याच्या आई ने समंजसपणे समजावून घेतलंय सगळं, आणि त्यालाही समजावते म्हणालात त्या. (याच discussion दरम्यान ऋत्विकचा कॉल गेला होता राधाला, म्हणून ती नीट बोलू नाही शकली).

हे सगळं राधाला ऋत्विकला प्रत्यक्ष भेटूनच सांगायचं होतं, कारण फोनवर बोलण्यासारखा विषय नव्हता हा. आणि ऋता कडून का होईना ऋत्विकच्या प्रेमाची खात्री तिला पटली होती, म्हणूनच घरात सगळं क्लिअर करून, ऋत्विक साठीचं approval घेऊनच ती लगेच परतीच्या गाडीला बसून रात्री उशिरा का होईना पुण्यात दाखल झाली होती.., कधी एकदा ऋत्विकला पाहते असं झालं होतं तिला.

"अनय वाईट नाहीये रे, but he's not the ONE, त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते, आणि त्या सहानुभूतीलाच "spark" समजून मी मैत्रीच्या नात्यात पुढे गेले. लक्षात येत होतं, की हे प्रेम नाहिये, पण तरीही, एखादा chance तरी देऊन बघावा, असा विचार करून मी त्या गर्तेत फसत गेले, आणि तो ही. काही दिवसांत सावरेल तो, त्याला एखादी त्याच्या 'type'ची छान मुलगी बघूया आपण सगळे मिळून. प्रेमाची वाट आमच्यासाठी नव्हती..ती वाट आपल्यासाठी आहे रुत्या..पण जसं 'हे प्रेम नव्हे' हे कळायला वेळ लागला तसंच 'हे रुत्यासोबतच प्रेमच तर होतं' हे कळायलाही" उसासा टाकत राधा म्हणाली. "आणि मला वाटले की तो माझ्यापेक्षा चांगला life partner असेल तुझ्यासाठी म्हणून____" ऋत्विक बोलत होता त्याला तोडून राधा म्हणाली "शक्य आहे का रुत्या, तुझ्यापेक्षा भारी या जगात काही नाहीये रे...मी त्याच्यासोबत असायचे तेव्हाही ९०% तुझ्याबद्दलच तर बोलायचे.. फक्त आपल्यातला स्पार्क समजायला थोडा वेळ लागला, तू लांब गेलास आणि जाणीव झाली... बुद्धू आहे ना मी.., I'm really very sorry Rutya, तुला directly, indirectly माझ्यामुळे खूप त्रास झालाय ना, मला अश्रूंची किंमत कळाली रुत्या, आणि ज्याला एकदा अश्रूंची किंमत कळाली, तो पून्हा कधी कोणाला दुखवत नाही, सो हे पहिलं आणि शेवटचं, पुन्हा कधी तुला माझ्यामुळे त्रास नाही होणार, i promise..." यावर ऋता म्हणाली "असू देत ग 'राधा वाहिनी', प्रेमात सर्वकाही माफ असतं.."

इतक्यात ऋत्विकला काहीतरी आठवलं, तडक उठून तो बेडरूम मध्ये गेला, त्याने बॅगेतून नवीन जॉबचे ऑफर लेटर काढले आणि ते फाडून राधाच्या हाती देत म्हणाला :

"तुझ्यातच माझे सारे,
वर्तमान विरघळलेले..

आणि भविष्य म्हणशील तर,
ते ही सारे, तुझ्या हाती सोपवलेले....."

~~~


©अक्षय पुजारी
#AKuvach

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.