बंदिनी


काव्या नुकतीच कॉलेज मधून येऊन घरी बसली होती.तितक्यात तिची शेजारची मैत्रीण रिमा तिच्या घरी आली.रिमा जवळपास तीन महिन्यांनी मुंबईहून पुण्याला आली होती.रिमा मुंबईला मॉडेलिंगचं प्रशिक्षण घेत होती.खुप दिवसांनी काव्या व रिमा भेटत होत्या.रिमाला पाहताच काव्या म्हणाली - 'कशी आहेस रिमा ? मी काहीतरी नाश्ता घेऊन येते तुझ्यासाठी.सोबत तुझ्या आवडीची कॉफीही आणते.' काव्या कॉफी व नाश्ता घेऊन आली व रिमाला म्हणाली - 'रिमा हा घे तुझ्या आवडीचा उपमा व सोबत मस्त कॉफी. मी टी.व्ही.लावते.आपण टी.व्ही. वरील कार्यक्रम बघूया.' 'हो;चालेल. आणि हो काव्या;उपमा अगदी फर्स्ट क्लास बनवला आहेस व कॉफीही.' - रिमा म्हणाली.लगेचच काव्या व रिमा एकत्र बसून टी.व्ही.. वरील कार्यक्रम बघू लागल्या.तो आजच्या युगातील स्त्रियांच्या जीवनावर आधारित चर्चात्मक कार्यक्रम होता.आजच्या स्त्रिया,त्यांचं समाजातील स्थान व त्यांच्यापुढील आव्हानं या विषयांवर त्या कार्यक्रमात प्रकाश टाकला होता.थोडयाच वेळात तो कार्यक्रम संपला.काव्यांनी टी.व्ही.बंद केला.

रिमा म्हणाली - 'आजची स्त्री ही मुक्त नाहीए.ती 'बंदिनी' आहे'. काव्याने रिमाला प्रश्न विचारला - 'बंदिनी म्हणजे काय गं ?' तेव्हा रिमा म्हणाली - 'बंदिनी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे तो म्हणजे तुरुंगात असणारी स्त्री.पण या शब्दाचा नेमका अर्थ आहे बंधनात अडकलेली स्त्री.या शब्दावरून मला 'बंदिनी' या मालिकेची आठवण होते. शांताराम नांदगावकर यांनी त्या मालिकेचं शीर्षकगीत लिहिलं होतं तर अनुराधा पौडवाल यांनी सुरेल आवाजात ते गायलं होतं.त्या गाण्याचे बोल होते -

'बंदिनी...स्त्री ही...बंदिनी.

हृदयी पान्हा;नयनी पाणी.

जन्मोजन्मीची कहाणी'

' समजलं मला' - काव्या म्हणाली.पुढे काव्याने रिमाला प्रश्न विचारला - 'पण आजची स्त्री बंदिनी कशी काय असू शकते ?' रिमा म्हणाली - 'आजची स्त्री सुद्धा बंदिनी आहे.पण त्यापूर्वी आपण पूर्वीचा विचार करुया.पूर्वी स्त्रिया शिक्षण घेत नव्हत्या.बालविवाह व्ह्यायचे.सतीची परंपरा होती.विधवा स्त्रियांना केशवपन करावे लागायचे.आताप्रमाणे तेव्हा स्त्रिया कामासाठी बाहेर पडत नव्हत्या.तेव्हा पुरूषप्रधान संस्कृती होती.स्त्रिया जेवायला सुद्धा पुरुषांनंतर बसत.हळूहळू काळ बदलला.पण हुंडयासाठी स्त्रियांचा छळ होतच होता.' 'हो खरं आहे,मला पण माहित आहे.' - काव्या म्हणाली.

पुढे रिमा बोलू लागली - 'आता मी तुला आजची स्त्री बंदिनी कशी आहे ? ते सांगते.आजच्या काळातील प्रमुख समस्या आहे - स्त्री भ्रूण हत्या.किती तरी मुलींना जन्माआधीच मारले जाते.मुलीचा जन्म झाल्यावर कित्येकजणांना आजही वाईट वाटते. कित्येक घरात मुलगा व मुलगी यांच्यात भेद केला जातो.ग्रामीण भागात हा फरक दिसून येतो.आजही कित्येक गावांमध्ये मुलींना शाळेत पाठवले जात नाही.मुलांच्या व मुलींच्या कामात भेदभाव केला जातो.मुलींना वेगळी कामे दिली जातात व मुलांना वेगळी.घरातील कामे फक्त स्त्रियांचीच असतात असा बहुतेक पुरुषांचा समज असतो.स्त्रीची प्रत्येक रुपे म्हणजे बहिण,मुलगी,आई,सासू व अन्य रुपे कोणत्या न कोणत्या बंधनात अडकलेलीच दिसतात.'हो;पटलं मला ' - काव्या म्हणाली.

रिमा म्हणाली - 'एवढंच नाही.घराबाहेरही स्त्री सुरक्षित नाहीए कितीतरी अत्याचारांना त्यांना सामोरे जावे लागते.कित्येक उच्चशिक्षित स्त्रियांना लग्नानंतर घर सांभाळ‌ण्यासाठी आपलं करिअर सोडावं लागतं.मग ती कितीही हुशार,कर्तुत्ववान का असेना ? जरी स्त्री नोकरी करत असेल तरी तिला घर व ऑफिस दोन्ही सांभाळावं लागतं.हि दोन्ही कर्तव्य पार पाडताना स्त्रियांना खुप मेहनत करावी लागते.मुलांचा सांभाळही जास्तीत जास्त स्त्रियाच करतात.लग्नानंतर स्त्रियांचचं नाव बदललं जातं व मंगळसुत्रासारखा अलंकारही त्यांनाच घालावा लागतो.कधी - कधी पत्नीला पतीपेक्षा जास्त पगार असल्यास पतीच्या स्वाभिमानास ठेच पोहचते.कित्येक स्त्रिया आजही आपल्या पतीचचं म्हणणं ऐकतात.विधवा स्त्रियांना पतीच्या मृत्यूनंतर आपल्या आभूषणांचा त्याग करावा लागतो व एका वेगळ्या आयुष्याला समोरं जावं लागतं'.'बरोबर बोललीस तू रिमा' - काव्या म्हणाली.

काव्याने रिमाला प्रश्न विचारला - 'हे सगळं चित्र बदलण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ?' रिमा म्हणाली - 'हे सगळं बदलणं स्त्रियांच्याचं हातात आहे.प्रत्येक मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे.शिक्षण घेतल्यावर स्त्रियांना त्यांच्या अधिकारांची व हक्कांची जाणीव होते.प्रत्येक स्त्रीने आपल्या मनाप्रमाणे वागले पाहिजे.जे हवं ते केलं पाहिजे.स्वतः चे निर्णय स्त्रीनी स्वतः घेतले पाहिजेत.ज्या गोष्टी पटत नसतील;त्या ठामपणे बोलल्या पाहिजेत.शिक्षित स्त्रियांनी अशिक्षित व निराधार स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन दयायला पाहिजे.स्त्रीनी स्वतः ला दुय्यम नाही मानले पहिजे.कोणत्याही अन्यायाला न घाबरता वाचा फोडायला स्त्रियांनी शिकलं पाहिजे.प्रत्येक स्त्रीनी स्व: संरक्षणाचे उपाय शोधले पाहिजेत.'

पुढे रिमा म्हणाली -'आणि तुझ्याबाबतीत सुद्धा तसंच तर झालं आहे. तु ही तर बंदिनीच तर आहेस.'ते कसं काय ?' - काव्याने रिमाला प्रश्न विचारला.तेव्हा रिमा म्हणाली - 'तुला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं होतं,पण तुझ्या वडिलांच्या इच्छेमुळे तुला वैद्यकीय शिक्षण घ्यावे लागत आहे'. काव्या म्हणाली - 'हो खरं आहे.मला मॉडेलिंगची आवड होती.मला त्यातच करिअर करायचं होतं.पण माझ्या पप्पांच्या इच्छेमुळे मला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला.मला तेव्हा खुपच वाईट वाटले.कारण मॉडेलिंग हे माझं स्वप्न होतं;ते मी अगदी लहानपणापासून बघितलं होतं.लहानपणी दूरचित्रवाणीवर जाहिराती बघताना मला वाटायचं की मी ही मोठेपणी अशीच जाहिरातीतील एक मॉडेल होणार.कित्येक जाहिरातींची नक्कल मी आरशात बघून करायचे.मॉडेलिंग क्षेत्राचं मला खुप आकर्षण होतं. मलाही वाटायचं की त्यांच्याप्रमाणे सुंदर दिसावं,मेकअप करावा.सर्व लोकांनी आपल्याला ओळखावं पण काय करणार ....? '

रिमानी काव्याला प्रश्न विचारला - 'तु तुझ्या पप्पांना सांगण्याचा प्रयत्न नाही केलास का ?' काव्या म्हणाली - 'हो,खुप सांगायचा प्रयत्न केला.तेव्हा आमच्यात रोज भांडणं व्हायची,खुप वाद व्हायचे माझ्या करिअर निवडीबद्दल.कित्येकदा मी एकटी रडली सुद्धा आहे.जेव्हा मी माझं स्वप्न नष्ट होताना बघत होती; तेव्हा मला खुप वाईट वाटत होते.तेव्हा नंतर मीच माझं मन घट्ट केलं व मी माझ्या स्वप्नांची आहुती दयायला तयार झाले.मी काय करणार होते.माझ्या पप्पांच्या मते,मॉडेलिंग करणं खुप वाईट असतं.ते असं म्हणतात - " चांगल्या घरातील मुली मॉडेलिंग करत नाहीत.ते आपल्या घराण्याला शोभत नाही.तु अभ्यासात एवढी हुशार आहेस.तेव्हा त्याचा योग्य उपयोग करायला हवास." म्हणून मी माझा विचार बदलला व वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला'.

काव्याची कहाणी ऐकून रिमाला वाईट वाटले ; ती म्हणाली - 'खरंच या बाबतीत मी नशीबवान आहे.कारण आपण दोघींनी बारावीपर्यंत एकत्रच शिक्षण घेतलं.आपल्या दोघींनाही मॉडेलिंग करायचं होतं.पण मला माझ्या आई - वडिलांनी समजून घेतलं.खरं तर आपल्याला योग्य आधाराची गरज असते.आपल्याला जे हवं ते करायला मिळण्यासाठी आपल्या भोवतालच्या व्यक्तीही अवलंबून असतात.माझ्याकडे त्या व्यक्ती आहेत;तर तुझ्याकडे त्या व्यक्ती नाहीत.प्रत्येक स्त्रीला अशा आधाराची गरज असते;ज्यामुळे ती मोकळया आकाशात उत्तुंग भरारी घेऊ शकते'. 'खरं आहे तुझं म्हणणं,प्रत्येक गोष्टी या परिस्थितीवर व आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींवर अवलंबून असतात.आता आहे त्या वस्तुस्थितीत मी समाधानी आहे.तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी बंदिनी आहे.व माझ्याप्रमाणे अनेक बंदिनी या समाजात आज वावरत आहेत.स्त्रियांची ही परिस्थिती कधी बदलेल हे येणारा काळचं ठरवेल.' - काव्या म्हणाली.

समाप्त...!

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.