एकटी !

परवा सकाळपासून मी डॉक्टर कडे गेलेच नाही बघा ! त्यामुळे किती शांत वाटतंय म्हणून सांगू !! अगदी निश्चिन्त आणि निवांत !! कसलाही त्रास नाही, गडबड नाही आणि आवाज नाही ! किती बरं वाटतंय आता !! सध्याच्या माझ्या ६५ व्या वर्षी असाच आराम पाहिजे आता ! खरं तर त्या डॉक्टर कडे उगाच पाठवतात मला ! आता वाटतं, हेच आधी का नाही केलं मी ? म्हणजे आता मी काय केलं सांगू ? काल आतून घराचा दरवाजा बंद केला आणि ठरवून टाकलं, की मी आता एकटी राहणार. कुणालाही ओ देणार नाही, आणि कुणाचाही त्रास सहन करून घेणार नाही ! कुणी कितीही आवाज देऊ दे बाहेरून, आपण उत्तर द्यायचं नाही. दोन तीन दिवस तरी मस्त शांतपणे पडून राहायचं. विशेषतः औषधांशिवाय आणि त्या डॉक्टर च्या उपचारांशिवाय ! नाही तर रोज सकाळी उठले की रात्री झोपेपर्यंत किती कटकट !! दूधवाला येणार, भाजीवाला येणार, मग तो सोसायटीचा वात्रट सेक्रेटरी शेट्टी उगाच 'क्या चल रहा अम्मा ?' म्हणून रोखून बघणार, ती शेजारची स्नेहल 'काय काकू औषध घेतलंय का ? म्हणून विनाकारण सलगी करायचा प्रयत्न करणार, शेजारची लहान पोरं दारावर थाप देऊन पळून जाणार. मला फार राग येतो सगळ्यांचा ! वात्रट मेले !! आणि मग दुपारी जावं लागणार त्या जीवघेण्या डॉक्टर कडे !! हो त्याला जीवघेणाच म्हणते मी.... अहो त्याची ट्रीटमेंट म्हणजे नुसता थरकाप उडतो माझा.... गुडघेदुखीचा त्रास आहे मला, सोबत नेहमीचे डायबिटीस, बीपी वगैरे आहेतच ...पण तो म्हणतो की मुख्य आजार वेगळाच आहे...काहीतरी लांबचलांब नाव सांगतो तो. मला काही कळत नाही. काहीतरी पीपीडी आहे असं म्हणतो. अवीला विचारलं मी बऱ्याचदा. अवी म्हणजे माझा मुलगा !. अमेरिकेत असतो तो. बायका मुलांसह तिकडेच स्थायिक झाला तो. इकडे येतो वर्षातून एकदा. त्याची फार आठवण येते हो. पण आता काय करणार ? सुनेला मी नाही आवडत बहुतेक. ती काही फार बोलत नाही माझ्याशी कधी. अवी मात्र फोन करतो. दर सोमवार आणि गुरुवार. त्यानेच दिवस ठरवून सांगितले मला. म्हटला असं केली की आठवड्यातून बरोबर दोनदा बोलणं होईल. मला नाही जमत त्याच्या तिकडच्या नंबरवर फोन करायला. म्हणून तोच करतो मग.


हां, तर मी काय सांगत होते....असं होतं बघा...मधेच विसरून जाते मी. मग लोक म्हणतात वेंधळी आहे, वेडी आहे !! मला काय धाड भरलीय वेड लागायला ? सगळे मुद्दाम म्हणतात बरं का !! एकदा वेडं ठरवलं की हे माझं घर गिळायला मोकळे सगळे. पण मी पुरून उरेन सगळ्यांना. आम्ही दोघांनी पै पै एकत्र करून घेतलेलं घर आहे हे वीस वर्षांपूर्वी. माझे दागिने, ह्यांचा सगळा प्रोविडेंट फंड खर्ची घातला तेव्हा कुठे हे घर मिळालं !. अशीच बंगलीवजा घरांची छोटी सोसायटी आहे ही. पण आता मन रमत नाही बघा इथे. नाही तर आधी किती छान दिवस गेले ह्याच घरात. इथे स्वतःच्या घरात राहायला आलो तेव्हा अवी नववीत होता. ह्यांची चांगली नोकरी होती. ह्या दोघांचं वेळापत्रक सांभाळताना धावपळ व्हायची, पण आनंद वाटायचा. समाधान वाटायचं त्या धावपळीत. अवीला अभ्यासा करीता वेळेवर उठवणं, त्याच्या आवडीचं करून खाऊ घालणं, ह्यांचा डबा, ऑफिस ची तयारी ह्या सगळ्या गडबडीत काही वर्षे कशी गेलीत कळलं सुद्धा नाही. अवी मग बारावी होऊन अमेरिकेत गेला इंजिनीरिंग करायला. तेव्हा फार रडली मी. हे समजावयाचे मला, अगं त्याच्याच भल्यासाठी आहे. इतका हुशार मुलगा आपला. बारावीत मेरीट आलाय तो. त्याच भविष्य बघ पुढचं. मनाला पटायचं हे बोलणं, पण हृदयात पार घालमेल झाली तो गेला तेव्हा. तेव्हाच एकटं वाटायला लागलं इथे. आणि नंतर अचानक दोन वर्षात हे असे अर्ध्यावर सोडून गेले. अगदी अचानक. अवी थर्ड इयर ला होता तेव्हा. ह्यांच्या सारखं पोटात दुखतं म्हणून तपासून घेतलं तर कॅन्सर निघाला. तेव्हा मी धास्तावून मनानं पार कोलमडून पडले. सगळी धावपळ केली मी. किती टेस्ट, केमो अजून काय काय. पण डॉक्टर म्हणाले जास्तीत जास्त एक वर्ष ! किती भीषण वाटतं हे असं ऐकायला ? ज्याच्यासोबत इतकी वर्ष सुखदुःखाचा संसार केला तो आता असा एका वर्षात सोडून निघून जाणार हे ऐकणंच किती भयावह आहे. मी केली सगळी धावपळ तेव्हा, पण आतून पार थकून गेले त्या वेळी. जाताना ते बोलू पण शकले नाहीत हो. नाका तोंडावर नळ्या/मास्क होता. डोळ्यात पाणी आणून त्यांनी फक्त हात हाती घेतला. माझ्या तर अखंड अश्रुधाराच सुरु होत्या. पण मनानं मला कळलं त्यांना काय सांगायचं आहे ते. अवीची आणि घराची चिंता असणार त्यांना. त्यांना मी रडवेल्या आवाजात सांगितलं, तुम्ही काही काळजी करू नका, मी सांभाळेन सर्व. पुढच्या क्षणी संपलं सगळं. अवी बिचारा मध्ये एक दोनदा आला होता ह्यांना भेटायला. आणि मग हे गेल्यावर अंतिम सोपस्कारांना. तेव्हापासून मी अगदी एकटी आहे बघा. म्हणजे तसा माझा भाऊ राहतो याच शहरात. येतो कधी कधी भेटायला. त्याने पण साठी ओलांडली आता. मी नाही जात त्याच्याकडे फारशी. त्याच्या बायकोचं आणि आमचं कधी फार जमलंच नाही. पण भाऊ संबंध कायम ठेवून आहे मात्र. पण ह्या घरात मी राहते एकटीच. तशी अजूनही ६५ व्या वर्षी आतून खचले असले तरी मनानं पक्की आहे मी. पण शरीर साथ नाही हो देत आता. आजारपणानं थकले मी. आजारापेक्षाही त्या डॉक्टरच्या औषधांनी थकले म्हणाना !! अहो किती सुया टोचतो तो ....एक दोन दिवसांआड इंजेकशन घ्यावे लागतात मला. गुडघे दुखीचा उपचार करतो तेव्हा अगदी जीव जातो. असह्य वेदना होतात. डोळ्यातून पाणी पडतं बघा. मी कंटाळले खरंच या औषधोपचारांना. असं वाटतं देवा सुटका कर आता यातून. टाळते मी कधीकधी डॉक्टर कडे जायला. पण दोन दिवस नाही गेले की लगेच डॉक्टरचा फोन येतो. नाहीतर अविने त्या सेक्रेटरी ला आणि शेजारच्या स्नेहल ला सांगून ठेवलंच आहे. ते येतात लगेच विचारायला.


मी पडदा हलकासा सरकवून खिडकीबाहेर पाहते. आता संध्याकाळ होत आली आहे. शेजारची लहान मुलं बाहेर पटांगणात खेळताहेत. बायका तिथे बसून गप्पा मारताहेत/खिदळताहेत. स्नेहल पण दिसते तिथेच. मी काही फारशी खाली जात नाही त्यांच्यात. काल दुपारी स्नेहलने आवाज दिला होता. पण मी उत्तरच दिलं नाही तिला. अहो, तिला आवाज दिला की ती घरी येउन बसते आणि सारखी भीरभीर घरभर पाहते. मला सारखा संशय येतो तिचा. काहीतरी चोरून नेईल की काय घरातून. आधी तर काही काही खायला करून आणायची माझ्यासाठी. पण मी म्हणायची, नंतर खाते म्हणून, आणि सगळं तसंच ठेवून द्यायची. हो, कुणाचा काय भरवसा, खाण्यातूनच काही दिलं तर ? पेपरात वाचत नाही का आपण, असे एकटे असणाऱ्या लोकांचा कसा जीव घेतात प्रॉपर्टी साठी ? मग तिच्या लक्षात आला असावं, मी खायचं टाळते म्हणून. नंतर बंद केलं तिनं. पण एक दोन दिवसाआड आवाज देते ती मला. मी तेव्हढ्यास तेव्हढं बोलते. अवी सारखा फोनवर सांगतो मला, अगं ती स्नेहल चांगली आहे, तिच्याकडून काही मदत लागली तर घे. पण माझा नाही भरवसा. आणि मुलगाच जिथे फारशी मदत करू शकत नाही तिथे ही स्नेहल काय मदत करणार हो मला ? अवी, तुला कसं कळणार बाळा हे ....?


मी परत खिडकीबाहेर पाहते. सोसायटीचा सेक्रेटरी शेट्टी पटांगणात चकरा मारत असतो. तो असाच रोज सकाळी आणि संध्याकाळी चकरा मारतो आणि कधीकधी मधूनच माझ्या खिडकीतून वाकून पाहतो. मला बिलकुल आवडत नाही हे. खरा संशय मला त्याच्यावरच आहे. दोन चारदा त्यानं कसले कागद वॉचमन सोबत माझ्याकडे पाठवले होते सह्या घ्यायला. मी साफ नकार दिला. काय भरवसा ? घेईल घर त्याच्या नावावर करून ! तो म्हटला, अम्मा ये सिर्फ सोसायटी बिल के कागज है. पण मी साफ नाही म्हटलं. तेव्हापासून सगळी बिलं अविच भरतो. आताही शेट्टी बाहेर चकरा मारतो आहे. मी पडद्याआड लपून बाहेर बघते. काल पण त्याने वाकून खिडकीतून आत बघितलं होतं. पण तेव्हा मी पडद्याआड होते ना. त्याला कुठं दिसणार ?. आज सकाळी तर तो चक्क वॉचमन ला घेऊन दारावर थापा मारत होता. पण मी ठरवून टाकलंच आहे. बिलकुल कुणाला उत्तर द्यायचं नाही. जोपर्यंत मला पूर्णपणे आराम वाटत नाही, तोपर्यंत मी एकटी राहणार !! दोन चारदा दारावर थापा मारून आणि काहीतरी बडबडून गेला मग परत तो.


काल पासून मी डॉक्टर कडे गेले नाही बघा !! आणि खरं सांगू, त्यामुळेच बरं वाटतंय. रोजच्या गोळ्या, औषधं, इंजेकशन्स यापेक्षा खरे तर हा आराम आवश्यक होता. अवीला मी कितीदा तरी सांगितलं, काही गरज नाही या औषधांची. पण तो म्हणतो, अगं आई औषधांशिवाय कुठला आजार बरा होतो का ? आता सोमवारी त्याचा फोन आला की सांगेन त्याला किती बरं वाटतंय औषधांशिवाय म्हणून. नाहीतर रोज त्या डॉक्टर कडे जायचा किती त्रास ! गुडघ्यामुळे चालायला खूप त्रास होतो मला. पण मी जाते हळूहळू. आपली सगळी औषधांची कागदपत्र एका पिशवीत घेऊन. कोपऱ्यावरच्या चौकापर्यंत जावेच लागते ना पायी पायी. तिथून मग ऑटोरीक्षा करते. आता ऑटोवाले पण ओळखीचे झालेत सगळे. पण मी नाही फार गप्पा करत त्यांच्याशी. विचारतात ते, 'कशा आहात ताई ?'. मी आपली मानेनंच बरं म्हणून उत्तर देते.


खरं सांगू, ह्या सर्व दिनक्रमात अवीची आणि त्याच्या वडिलांची फार आठवण येते मला. सायंकाळी जास्तच येते. सुर्याबिंब कलायला लागलं की जी कातरवेळ होते ना, त्या वेळी हे दोघे फार आठवतात. अवीची तर जास्तच आठवण येते. बाकी कुणावर नसेल पण, त्याच्यावर भरवसा आहे मला ह्या जगात. आता त्याच्याशिवाय कोण आहे मला जवळचं ? लोक म्हणतात तुम्ही एकट्या का राहता ? मुलाकडे का राहत नाही ? पण लोकांना काय सांगणार आता ? अवीला स्वतःचा संसार आहे. मी कुठे मधेच कडमडू त्याच्या संसारात ? इंजिनीरिंग झाल्यावर त्याला तिकडेच चांगली नोकरी मिळाली. त्याच कंपनीतल्या एका पंजाबी मुलीशी त्यानं लग्न केलं. म्हणजे मला सांगून केलं. इकडे येऊन छोटंसं रीसेपशन पण केलं . त्यानंतर दोघे इकडे येऊन गेली दोन तीनदा. पण आता फारसे नाही येत.

अवी येतो अधेमधे. हे गेल्यावर माझी तब्येत थोडी ढासळायला लागली, तेव्हा मला म्हटला तो, 'आई, तू चल माझाकडे. हे घर विकून टाकू आपण आणि माझ्याकडेच रहा '.

मी म्हटलं 'नाही रे बाळा, सगळं आयुष्य काढलं इथे, सुखदुःखाचे उन्हाळे-पावसाळे बघितले इथे. त्या आठवणी कुठे विकून टाकू ?'. खूप आग्रह केला तेव्हा मी महिन्याभराकरिता म्हणून गेले होते त्याच्याकडे. पाच वर्ष झालीत त्याला आता. पण मन रमलं नाही बघा तिथे. म्हणजे सुनबाई तशी चांगली आहे माझी. माझा खाण्यापिण्याच्या वेळा सगळं सांभाळायची. कधी वाद नाही झाला माझा. पण मनाचा ओलावा स्पर्शून नाही गेला कधी तिच्याशी बोलताना. मी आपली गप्प बसून राहायचे मग. तेव्हा हे जाऊन एक वर्ष पण झालं नव्हतं. मन लागत नव्हतं कशात. तिला मी घरात उदासवाणी म्हणून वाटायची. एक दोनदा तिच्या मैत्रिणी आल्या तेव्हा तिनं मला आतल्या खोलीत बसवलं. मग मी महिना पूर्ण व्हायची वाट पाहत बसले. अवीची ह्या सगळ्यात कसरत होत असेल. तिथून निघताना त्यानं एक दोनदा म्हटलं, 'थांब अजून आई !'. पण हृदयातून नव्हते आले शब्द. महिना संपल्यावर निघून आले मी. पंख फुटले की मुलं पण कुठे पूर्णपणे आपली राहतात ? त्यांची पण तर दुनिया असते ना ? त्याची अडचण मी समजू शकते हो. तसा तिथे राहून पण तो माझी किती काळजी घेतो. दर सोमवारी आणि गुरुवारी फोन करतो. औषधं घेतली का विचारतो. डॉक्टरांना वेगळा फोन करतो. त्या शेट्टी आणि स्नेहल ला मध्ये मध्ये माझाकडे लक्ष द्यायला सांगतो. दर महिन्याला मला पैसे पाठवतो. फक्त फारशी भेट होत नाही त्याची. मग मी मावळत्या सूर्याकडे एकटीच बघत त्याची आठवण काढत राहते.


आता रात्र झाली आहे. बाहेर खेळणारी मुलं, बाया गेल्या आपापल्या घरांमध्ये. मी पण आता जेवून झोप काढेल. पण खरं सांगू का, भूक आणि झोप फारशी लागलीच नाही कालपासून, पण तरीही किती बरं वाटलं म्हणून सांगू. म्हणून तशीच न जेवता झोपी जाते आता ! पण लगेच झोप येत नाही बघा !! असंच डोळे सताड उघडे ठेवून पाठीमागची सगळी वर्ष उगाळत राहते. एखाद्या चलचित्रपटासारखं सगळं जीवन नजरेसमोर तरळत राहतं ! सकाळ होईपर्यंत काही वेळ झोप, काही वेळ वर छताकडे डोळे उघडे ठेवून बघणं यात रात्र निघून जाते बघा. आता थोड्या वेळात उजाडलं की दरवाजा उघडेन मी आणि सांगेन सगळ्यांना, बघा किती बरे झाले मी !! औषधांशिवाय !!


पण हे काय ?.... बाहेर कसला गलका येतो आहे ? दरवाजावर कुणीतरी जोरजोरात ठोकतो असा आवाज येतोय. ह्या शेट्टीचा काही भरवसा नाही बघा. देईल मला काढून घराबाहेर एखादे दिवशी. मी पडदा हलकासा सरकवून बघते. बापरे....बाहेर बरीच गर्दी आहे, माझ्या दाराशी. दारावरचं ठोकणं जोरजोरात होतंय आता. मी लपूनच बसतेय बघा त्या कपाटाआड. नाहीतर नेतील मला हे त्या डॉक्टरकडे ओढून परत इंजेकशन्स घ्यायला. मला खरंच नाही जायचं हो त्याच्याकडे आता. पण हे काय, किती जोरात दरवाजा ठोकताहेत ….दरवाजा तोडतात की काय हे माझा ? आता हे फारच झाला बघा....चक्क दरवाजा उचकवटुन सगळे आत आलेत हे ! अरेच्चा ...यात अवी कसा काय ? आणि हा असा रडतो का आहे ? बाळा इकडे बघ, मी कपाटामागे आहे !! आणि हे सगळे त्या पलंगाकडे का चाललीत ? कोण झोपलंय त्यावर ? आणि अवी त्या पलंगावरच्या शरीराराला कवटाळून असा ढसाढसा का रडतोय ? आणि हा शेट्टी काय बडबडतोय बघा ....." शायद डेथ दो दिन पाहिले ही हो गयी. मैने एक दो बार दरवाजा खटखटाया, आखिर सोचा उनके लडके को बुला लू. पीडीपी से बिमार थी बेचारी. बॉडी जल्दी निकालनी चाहिये अब " !! ....कुणाची डेथ ? ...कुणाची बॉडी ? काय बोलतोय हा शेट्टी...मला काही कळत नाही बघा. मी अवीला आवाज देते "अवी बेटा, तू तर बघ इकडे. बघ इथेच आहे मी. बोल माझ्याशी !! " पण माझे शब्द नाही हो पोचत त्याच्यापर्यंत. तो 'आई.... आई' म्हणत तसाच रडतोय त्या पलंगाजवळ बसून !!


अगदी एकटं वाटतंय बघा मला आता. सर्वार्थाने एकटी झालेय मी !!


marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.