प्रिय (पूर्वी होतीस म्हणून) अमुता,

हे पत्र लिहू की नको अशा द्विधा मन:स्थितीत होतो. पण इतकी वर्षे मनात कोंडून ठेवलेलं ओकण्याची हीच एकमेव संधी आहे, हे लक्षात घेऊन पत्र लिहायला बसलो आहे. हे पत्र वाचून तुझ्या डोळ्यांतून   पश्चातापाच्या अश्रूचा एक थेंब जरी पडला, या पुढच्या जीवनाला सामोरं जातांना तुझ्या वागण्यात थोडा जरी फरक पडला तरी हे पत्र लिहिल्याचं सार्थक होईल. घाबरू नको तुला फारसं काही सुनावणार नाही. मागच्या पाढ्याची थोडीशी उजळणी करतोय, आणि ती करता करता तुझ्या चुका तुझ्या लक्षात आणून देतोय इतकंच!  

अंधाऱ्या रस्त्यावरुन चालतांना प्रकाशझोताने अंधाराला चिरत एखादं वाहन यावं, तशीच तू आली होतीस, आणि त्याच वेगाने निघूनही गेलीस, मागे अजून दाट काळोख ठेऊन... ! तू नव्हतीस तेव्हाही सारं छानच चाललं होतं. एकटा होतो, पण मस्त बेफिकिरीने आयुष्य जगत होतो.

 

तू आलीस आणि सारं आयुष्यच बदलून गेलं. सकाळी सकाळी तुझा फोन आला की, दिवसाची गोड सुरवात व्हायची, तुझ्या दुपारच्या फोनने सारी सुस्ती उडून जायची, आणि  संध्याकाळी तू भेटायचीस तेव्हा दिवस सार्थी लागल्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहायचं. माझ्या बारीक सारीक गोष्टींचा तपशील तू बरोबर लक्षात ठेवायचीस. मी कोणत्या प्रसंगीं कोणता शर्ट घातला होता, मला काय शोभून दिसतं, मला गरमागरम भजी आवडते हे सगळं कसं तू अचूक लक्षात ठेवत होतीस. माझ्याही बाबतीत अगदी तसंच होतं. तूझ्या रंगीबेरंगी बांगड्या, तुझे एकाच पायातले पैंजण, अमेरिकन डायमंडवाली कानातली… तुला सारंच शोभून दिसायचं. मी मनापासून तुझी स्तुती करायचो. मी तुझ्या आवडी निवडी जपू लागलो, आणि माझ्या तू! तुझी सोबत, तुझं मधाळ बोलणं, मनसोक्त हसणं याची सवय जडली, किंवा नशा म्हण हवं तर! तुझ्या प्रेमात अगदी वेडापिसा झालो. तुही तशी झाली होतीस. 

 

पण मग अचानक तुला काय झालं? रोज रोजचं भेटणं, तेच तेच बोलणं मग तुला अळणी वाटायला लागलं. हळू हळू तुझ्या बोलण्यातली चीड चीड मला जाणवायला लागली. मी जितका तुझ्या कलाने घ्यायचा प्रयत्न करायचो, तितकाच तो प्रयत्न केविलवाणा ठरू लागला. माझं काही चुकतं का म्हणून मी आत्मपरिक्षणही केलं. पण तसं काही एक नव्हतं. तूच बदलली होतीस…..तुझ्या आयुष्यात मनोज आला होता. माझ्याही ते लक्षात येऊ लागलं होतं. खरं प्रेम पुढ्यात असतांना तू मृगजळाच्या पाठी धावत राहिली. माझं तुझ्यावर निस्सीम प्रेम होतं. मी मनोजला आधीपासूनच ओळखत होतो. त्याची पैशाची घमेंड मला माहीत होती. पण तू त्याच्या पैशाला, प्रॉपर्टीला भुलली होतीस. मी तुला खूप समजावयाचा प्रयत्न केला. खोट्यावर पांघरूण घालायला कुणी अजून खोटे बोलते, तेव्हा किती उबग येते. मुळात विश्वास गमावलेल्या माणसाला आपण क्षमा केलेली असते, तरी तो स्पष्टीकरण देऊन आपल्याला खोटे पडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या माणसाची विश्वासाहर्ता पूर्णपणे धुळीस मिळते. तुझ्या बाबतीतही तसेच झाले होते. तुझी त्याच्यावरची पकड घट्ट बसत नव्हती, तो पर्यंत तू मलाही खेळवत ठेवलं होतं. तो खेळ माझ्यासाठी किती जीवघेणा होता, याची कल्पना तुला नाही येणार! जसं जसं धुकं बाजूला सरत होतं, तस तसा मी  कोलमडत होतो...आणि एक दिवस किती सहज म्हणालीस, "मला बंधनात राहायला नाही आवडत!" म्हणून! मी उन्मळून पडलो. त्याचवेळी मला गुंतणे आणि गुरफ़टणे यातला फरक कळला. मी तुझ्यात गुंतता गुंतता गुरफटून गेलो होतो. माझ्या मनाचा तू पूर्णपणे ताबा घेतला होतास. मला माझ्या दुभंगलेल्या मनाला सावरता नाही आलं. तू आता माझी राहिली नाहीस, हा धक्का मी सहन करू शकलो नाही. मरीन ड्राईव्हच्या खडकांवर आपण जिथे एकत्र बसून भेळ खायचो, तो निर्भेळ आनंद मी कसा विसरणार होतो? ज्या hanging गार्डन मध्ये तासंतास गळ्यात गळे घालून बसायचो, त्या बागेत बहरलेली आपली प्रीत कशी विसरू शकत होतो. मरीन ड्राईव्हच्या खडकांवर, hanging गार्डनमध्ये मी एकटाच भ्रमिष्टासारखा फिरायला लागलो. दाढीची वाढलेली खुटे कमी करण्याची इच्छा किँवा शुध्दच नसायची. समुद्रात दगड मारता मारता कधी कधी आजूबाजूला असणाऱ्या लोकांनाही दगड मारू लागलो. क्रियेला प्रतिक्रिया असतेच. लोकं मला दगड मारू लागले. मी वेडा ठरलो. तुझं त्याच्याबरोबर लग्न झाल्याचंही मध्ये कधीतरी कळलं. मी इतका उध्वस्त झालो होतो, की तुझी हालहवाल जाणून घ्यायची माझी मन:स्थितीच नव्हती. तशातच रस्ता ओलांडतांना एका टॅक्सीने उडवलं, पाय फ्रॅक्चर झाले. एका ट्रस्टने माझा खर्च उचलला. पाच-सहा महिन्यांनी मी बरा झालो, चालू लागलो. पण त्या एका अपघातामुळे मी या ट्रस्ट च्या संपर्कात आलो, आणि पुन्हा उभा राहिलो. ट्रस्टच्या प्रेमळ माणसांमुळे मी पुन्हा माणसात आलो. मी ट्रस्ट मधेच हिशेबनीसाचं काम पाहू लागलो. एक दोन वर्षात मी ट्रस्टचा व्यवस्थापक बनलो. ट्रस्ट मधेच काम करणाऱ्या मेघना नावाच्या एका मुलीचा स्वभाव आवडला. या घडामोडीत मेघनाने माझी खूप काळजी घेतली होती. तिलाही मी आवडलो. आम्ही लग्न केलं. मला एक श्रद्धा नावाची एक गोंडस मुलगी आहे. आमचा त्रिकोणी संसार खूप सुखाचा चाललाय. मेघनाने मला भरभरून प्रेम दिलंय. तरी अधेमधे मी तुझ्या आठवणींनी बेजार होतो. मेघना समोर आली की तिचं निष्पाप प्रेम माझ्या जखमांवर फुंकर घालतं. 
 

माझ्या आयुष्यात तू फक्त आठवणीं पुरताच उरली होतीस...आणि काल अचानक, तुझ्यावरच्या ट्रीटमेंटचा प्रस्ताव ट्रष्टकडे आला. अर्जावरचं तुझं नाव आणि फोटो पाहिला. काळजात धस्स झालं. त्यातच वैवाहिक माहितीमध्ये घटस्फोटित म्हणून तुझा उल्लेख वाचला आणि तुझी दया आली. ज्या पैशासाठी तू माझ्यापासून दूर झाली होतीस तोच पैसा तुला माझ्या पायाशी घेऊन आला होता. तू अर्ज घेऊन आली होतीस, तेव्हा मी काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो, हे एका अर्थी बरं झल. कारण तू माझा वीक पॉईंट आहे, हे माझ्या मनावर ठळकपणे कोरलं गेलं आहे. माझी प्रतिक्रिया काय असली असती याचाही मी अंदाज बांधू शकत नाही. एका पंधरा-वीस हजाराच्या ऑपरेशन साठी तुझा ट्रस्टकडे अर्ज यावा इतकी बिकट परिस्थिती तुझी यावी हा नियतीने तुला शिकवलेला धडा तर नसेल! पैशासाठी तू मनोजशी लग्न केलंस. पण त्याने तुला घटस्फोट दिल्यावर तूझ्यावर अशी वेळ यावी यातून तुझ्या मनाने काही बोध घ्यावा. अजूनही तू तशीच सुंदर दिसतेस हे फोटोवरून कळतंय. पण चेहऱ्यावरचं तेज लयाला गेलंय. 

 

पत्र लिहिता लिहिता थांबलो होतो मधेच. माझी छकुली येउन मांडीवर बसली होती. थोडावेळ खेळून आता किचन मध्ये गेली आहे. मेघना किचन मध्ये आहे. मी पुन्हा लिहायला बसलो आहे.शेवटच्या काही  ओळी बाकी आहेत.  

 

तुझा अर्ज मंजूर करून ठेवला आहे. ट्रस्टच्या हॉस्पिटलने पुढच्या आठवड्याची ऑपरेशनची तारीख दिली आहे. ऑपरेशन सुखरूप पार पडून तुझे आयुष्य निरोगी व सुखाचे जावो. पण माझ्या सुखी वैवाहिक जीवनावर तुझी सावलीही नकोय म्हणून मी पंधरा दिवसांच्या सुटटीवर जात आहे. हे पत्र मंजुरी पत्रा बरोबर सील बंद करून देत आहे. आम्ही सुट्टीवरून परत आल्यावरही मला कधी भेटायचा प्रयत्न करू नकोस.

गुडबाय ! 


तुझा (आता कुणी नसलेला),


अजय.


 

marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.