भूतकाळाचे वर्तमानावर.....


साहिल आणि मीराचं नुकतच लग्न झालं होत.आणि त्यात प्रेमविवाह म्हटल्यावर दोघही खूप खुश होते.ते दोघंही एकाच चाळीत राहायचे....तो वर आणि ती खाली....मग त्यांचा प्रेमविवाह होणं म्हणजे काही कठीण नाही हे सांगायची गरजच नाही म्हणा....तर या मोरे दाम्पत्यांच सुरूवातीला एकत्र कुटुंब होतं....होतं म्हणजे आता नाही.... साहिलचा मोठा भाऊ गौरव आणि त्यांच कुटुंब अजूनही त्याच चाळीत राहतात....पण त्या १० बाय १० च्या खोलीत लग्नानंतर सगळ्यांचीच गैरसोय होत असल्यामुळे साहिल आणि मीराने सामंजस्याने वेगळ राहायचं ठरवलं.मग खूप मेहनत आणि कष्ट करून त्यांनी स्वत:च एक नवीन घरकुल उभं केलं....पुरेसे पैसे नसल्यामुळे बँकेतून कर्ज काढून त्यांनी एक फ्लँट घेतला...मग काय त्यांच्या सुखी संसाराला सुरूवात झाली....या प्रवासात खूप अडचणी आल्या पण त्यांनी एकमेकांची साथ कधी सोडली नाही.

आणि त्यातचं त्यांच्या प्रेमाचं प्रतिक जन्माला आलं....त्यांची पहिली मुलगी रित्वी....सगळेच खूप खुश होते....कारण "पहिली बेटी धनाची पेटी" असं म्हटलं जातं....पण खुश असण्यामागे एवढच कारण नव्हतं....एकतर त्यांच पहिलं बाळ आणि त्यात रित्वी फार सुंदर होती....गोरी गोरी पान,अंगान गुटगुटीतं,निळे निळे डोळे आणि त्यात तिचं गोड लुभावणारं हास्य...एवढी सुंदर मुलगी आपली आहे यावर विश्वास ठेवायला त्यांना थोडा वेळच लागला.... कारण ती ना साहिल सारखी दिसायची नाही मीरा सारखी...खरतरं मोरे कुटुंबात कन्यारत्न खूप पिढीनंतर झालं होतं....असं तिचे काका सर्वांना सांगत होते. तिला बघायला जाणारा प्रत्येक जण तिच्या रूपाचं कौतुक करता करता थकत नसे....

गोड हास्य ते असं

मनाला मोहवणारं

निळ्या डोळ्यांच्या जादूने

सर्वांना आकर्षित करणारं

खरचं किती नशीबवान असेल ना ती रित्वी...पण पुढे तिच्या आयुष्यात काय होणार आहे हे त्या चिमुकलीला ठाऊक नव्हतं आणि तिच्या आई बाबांनाही नाही.... म्हणूनच म्हणतात ना आयुष्याचं गणित इतक सोप नसतं...त्यात कधी कधी सुखाची बेरीज होते तर कधी कधी वजाबाकी सुध्दा...तर कधी संकटांचा गुणकार होतो तर कधी भागाकार आणि बाकी काय उरते हे त्या गणित सोडवणाऱ्यावर अवलंबून असतं...

रित्वीच्या जन्माच्या काही महिन्यानंतर तिची पत्रिका बनवण्यासाठी साहिलने स्वत:च्या गावी असलेल्या ज्योतिषबुवांकडे जायचं ठरवलं... साहिलचा बुवांवर खूप विश्वास आणि श्रध्दा होती.म्हणूनच आपल्या मुलीला त्यांचे आर्शीवाद लाभावे व तिच्या भविष्याबद्दल काही कळावे या उत्सुकतेमुळे साहिल आपल्या बायको आणि मुलीला घेऊन स्वत:च्या गावी जाण्यास निघाला.गावची वेस जिथे संपते त्या टोकावर,एकदम निरव शांततेत आणि एका पडीक मंदिराच्या समोर ज्योतिषबुवांची झोपडी होती....त्या मंदिरात कोणत्याही देवतेची मूर्ती नव्हती. तरी सुध्दा ते बुवा सकाळ-संध्याकाळ त्या मंदिरात पूजेचे साहित्य घेऊन पूजा करायला जात असत.आणि हा नेम ते कधीच चुकवत नसत.येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्यांच्या या कृतीचे फार आश्चर्य वाटत असे.पण त्या ज्योतिषींनी सांगितलेले भविष्य खरे असते हे माहीत असल्यामुळे,लोक येताना जाताना नकळतच मंदिरासमोर हात जोडत असत.तर हे झालं बुवांबद्दल.

दुसरीकडे गावी येण्यास निघालेलं मोरे कुटुंब ७.३० च्या सुमारास गावी पोचले.गाव म्हटल्यावर ७.३० ची वेळ म्हणजे त्यांच्यासाठी रात्रीचीच सुरूवात...सगळीकडे अंधार पसरलेला होता त्यामुळे या काळोखात गावच्या वेशीपर्यंत बायको आणि मुलीला घेऊन जाणं साहिलला पटलं नाही म्हणून त्याने सकाळी बुवांची भेट घेण्याचे मनात योजल आणि मग सोबत आणलेल्या सामानासह तो त्यांच्या वाड्यावर जायला निघाला...मोरे कुटुंबाचा हा फार जुना वाडा होता.साहिलचे आजोबा,पंजोबा,खापरपंजोबा यांच सगळं आयुष्य या वाड्याने पाहिलं होतं.परंतु नंतर पुढे साहिलच्या वडिलांनी कामासाठी मुंबईलाच कायमस्वरूपी राहणं पसंद केलं होतं...साहिल आणि गौरवचा जन्म सुध्दा वाड्यातच झाला होता आणि त्यानंतर ते लोक मुंबईला स्थायिक झाले होते.त्यामुळे गेली काही वर्ष वाड्यात कुणी राहायला नव्हतं.कधीतरी साहिल किंवा गौरव सुट्टीत येत जात असत... साहिल चं लग्न झाल्यानंतर काही महिन्यानंतर मीरा आणि साहिल वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करायला व गावदेवीच दर्शन घ्यायला गावी आले होते...त्यांनतर आज रित्वीला घेऊन ते बुवांना भेटायला आले होते.वाड्याची देखरेख करण्यासाठी एक माणूस ठेवला होता मनोज नावाचा.तो वाड्यातल्याच एका खोलीत राहायचा. मीरा आणि रित्वीला घेऊन साहिल वाड्यावर पोहचला.मनोजने त्यांच सामान वगैरे ठेवायला मदत केली.

गावी आल्यापासून रित्वी अचानकच खूप रडायला लागली होती त्यामुळे मीराला सतत तिला घेऊन बसाव लागत होतं. पण रित्वीचं रडणं काही केल्या थांबत नव्हतं...कशीबशी ती रात्र संपली.भल्या पहाटे साहिल आणि मीरा रित्वीला घेऊन बुवांच्या झोपडीकडे चालू लागले.मीरासुध्दा बुवांना पहिल्यांदाच भेटणार होती त्यामुळे तिच्या मनात खूप कुतूहल होतं बुवांबद्दल.आणि रित्वी अजूनही रडत असल्यामुळे मीराला तिचीही चिंता वाटत होती.म्हणूनच झपाझप पावलं टाकत अखेर मोरे कुटुंब झोपडीच्या दारात येऊन पोहचले.

"अहो ज्योतिषबुवा आत येऊ का?.....मी साहिल मोरे...शांताराम मोरेंचा छोटा नातू" असं रित्वीचे वडील म्हणाले. आतून काहीच प्रतिसाद आला नाही म्हणून साहिलने हातानेच दार लोटले व आपल्या कुटुंबासमवेत झोपडीत प्रवेश केला. झोपडीत प्रवेश केल्या केल्या रित्वीचं रडणं अचानक बंद झाल्याची जाणीव साहिल आणि मीराला झाली.या घटनेमुळे साहिलचा बुवांवरचा विश्वास अजून वाढला.रित्वी रडायचं बंद करून जिथे बुवांच आसन होत तिथे एकटक बघत होती.इतक्यात झोपडीच्या बाहेरून दार बाजूला सारत एका वृध्द पण अतिशय तेजस्वी पुरूषाने प्रवेश केला.त्यांना पाहताच साहिलने धावत जाऊन त्यांच्या पायावर डोक ठेवून आर्शीवाद घेतला.मीरानेही त्यांच्या चरणांना स्पर्श केला." तो कृष्ण कन्हैया तुमचं कल्याण करो...हरे राम हरे कृष्णा " असा आर्शीवाद बुवांनी त्या दोघांना दिला आणि ते त्यांच्या आसनावर स्थानपन्न झाले.

तेव्हाच साहिलने बोलायला सुरूवात केली...."बुवा ही माझी बायको मीरा मोरे आणि ही माझी मुलगी रित्वी मोरे. हिची पत्रिका बनवण्यासाठी आणि तुमचे आर्शीवाद लाभावे यासाठी आम्ही इथे आलो आहोत.बुवांनी रित्वीला आपल्या हाताने उचलले आणि एकटक तिच्याकडे बघतचं राहिले.रित्वी सुध्दा एकटक त्यांनाच बघत होती... अचानक काय झाले माहीत नाही.. बुवांच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले.त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे जाळे पसरलेले स्पष्ट दिसत होते.आपल्या आसनावरून ते उठले आणि म्हणाले, "साहिल आणि मीरा तुम्ही यापुढे कधीच या गावात येऊ नका आणि रित्वीलाही कधी येऊ देऊ नका." बुवांच हे बोलणं ऐकून साहिल आणि मीरा एकमेकांकडे आणि मग बुवांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.मग हिंमत करून साहिलने त्यांना विचारले की तुम्ही असं का म्हणताय बुवा?

त्यावर बुवा म्हणाले, "मी तुम्हांला जे काही सांगणार आहे ते अतिशय शांत मनाने आणि लक्षपूर्वक ऐका"....

त्यांना मध्येच थांबवत मीरा म्हणाली, काही संकट येणार आहे का आमच्यावर?....

तेव्हा साहिलने तिला शांत राहायची खूण केली व बुवांना पुढे सांगण्यास विनंती केली....

मग बुवा म्हणाले, "हे बघ साहिल,तुमच्या पोटी जन्माला आलेली मुलगी अत्यंत तेजस्वी आहे पण......."

पण काय बुवा? साहिलने विचारलं......

पण हिच्या जन्मानंतर एका नवीन चक्राने फिरायला सुरूवात केली आहे.हे असं चक्र आहे ज्यात रित्वी अडकेल आणि त्याचा त्रास तुम्हालाही होईल.बुवांच अस कोड्यातलचं पण तरीही भयानक असं काहीतरी ऐकून मीरा मटकन खालीच बसली.साहिलने तिला सावरलं व उभं केलं...

बुवा पुढे म्हणाले, भूतकाळात घडून गेलेल्या काही घटना अशा असतात की त्याचे पडसाद पुढच्या भविष्यावर पडतात.तू आणि मीरा दोघही तुमचं मन घट्ट करा आणि मी जे काही सांगणार आहे ते ऐका.... रित्वीच्या भविष्यावर अशाच काही घटनांचे म्हणजे भूतकाळात तुमच्या आधीच्या पिढीत झालेल्या काही घटनांचे सावट पडणार आहे.तिची काहीही चूक नसताना ती या सगळ्यात अडकणार...आता सुध्दा या गावात प्रवेश केल्यावर तीचं रडणं हे या कालचक्राची सुरूवात आहे.रित्वीच्या शरीरात दोन आत्मांच वास्तव्य आहे... एक तिचं स्वत:च आणि.....

आणि दुसरं कोणाचं? साहिलने विचारलं....ते मी तुम्हांला आता नाही सांगू शकत.काही प्रश्नांची उत्तर वेळेनेच दिलेली चांगली असतात.तुमच्या वाड्यात घडलेल्या काही घटना अशा आहेत की त्यांचा प्रभाव रित्वीवर होतोय त्यामुळे ती रडतेय.या गावात तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत दुसऱ्या आत्माचा प्रभाव तिच्यावर जास्त राहील म्हणूनच मी तुम्हांला सांगितल निघून जा इथून आणि पुन्हा कधी या गावात येऊ नका.हे सगळं ऐकून मीरा तर रडायलाचं लागली होती... साहिलने धीर एकवटून बुवांना विचारले, आम्ही जर या गावापासून लांब राहिलो तर आमची रित्वी सुरक्षित राहील ना? सांगा ना बुवा....ती सुरक्षित राहील ना? तेव्हा बुवा म्हणाले,......."साहिल हा निसर्ग आहे ना त्याचे नियम तो स्वतःच ठरवत असतो..... आणि आपण मानव त्याच्यासमोर अगदीच दुय्यम आहोत रे....या निसर्गानेच रित्वीला या चक्रात टाकलय आता त्याच्या इच्छेनेच ती बाहेर निघू शकते किंवा कधीच निघू शकत नाही"

बुवांच हे बोलणं ऐकून साहिलचा उरलासुरला धीर पण संपला आणि तो सुध्दा रित्वीला जवळ घेऊन रडू लागला.बुवांनी त्याला शांत केलं व म्हणाले हे बघ ही नियती संकट त्यांच्यावरच आणते ज्यांच्यात संकटाला सामोरे जाण्याची ताकद असते.आता याच नियतीने भूतकाळात अधुऱ्या राहिलेल्या काही घटनांना पूर्ण करण्याची जबाबदारी रित्वीवर टाकली आहे.पण या सगळ्यात तिच्या जीवाला धोका आहे.साहिल आणि मीरा दोघही हे सगळं ऐकून खूप घाबरले होते. साहिल बुवांना म्हणाला, "तुम्ही खूप मोठे सिध्द पुरूष आहात.माझा तुमच्या प्रत्येक शब्दावर विश्वास आहे.आमच्या रित्वीला या संकटातून वाचण्याचा मार्ग तुम्हीच आम्हांला दाखवू शकता." असं म्हणत साहिलने बुवांच्या पायावर लोटांगण घातले.... त्याला उठवत बुवा म्हणाले, साहिल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव.जसं वाईट शक्ती असतात ना तश्या चांगल्या पण असतात.रित्वीवर येणार भूतकाळाचं सावट नक्कीच खूप मोठं आहे ज्याची चाहूल तुम्हांला लवकरच लागेल. पण या नियतीने या सगळ्या सोबत लढण्यासाठी तिला काही ना काही ताकद नक्कीच दिली आहे.आता ती ताकद काय आहे हे तुम्हांला वेळ आल्यावर नक्कीच कळेल....मी सध्या तरी इतकचं सांगू शकतो की प्रेमापेक्षा या दुनियेत काहीच मोठं नाही...प्रेमात कुठल्याही संकटावर मात करण्याची शक्ती आहे....बस्स एवढचं!!! तुम्ही लवकरात लवकर या गावातून निघून जा...तो कृष्ण कन्हैया तुमचं रक्षण करो...हरे राम हरे कृष्णा. इतक बोलून बुवा उठले आणि त्यांनी एका पेटीत ठेवलेला छोटा गोलाकार आरसा बाहेर काढला आणि साहिलच्या हातात देत म्हणाले की..."हा आरसाच रित्वीला योग्य वेळी मदत करेल.जपून ठेव. आणि आता तुम्ही निघा."

मीरा आणि रित्वीला घेऊन साहिल झोपडीबाहेर आला.बाहेर आल्या आल्या रित्वीचं रडणं पुन्हा चालू झालं पण यावेळी तिला हसवायचं सोडून साहिल आणि मीराच्या डोळ्यांतही पाणी येऊ लागलं.वाड्यावर पोहचेपर्यंत त्यांना दुपारचा १ वाजला.बुवांनी सांगितल्या प्रमाणे साहिल आणि मीरानी लगेच या गावातून निघून जायचं ठरवलं.त्यांनी मनोजला बोलावून रित्वीला त्याच्याकडे देत सामानाची बांधाबांध चालू केली.मनोज रित्वीला घेऊन त्याच्या खोलीत गेला.इथे मीरा आणि साहिलची बांधाबांध झाली...तेवढ्यात मीराला जाणवलं की मागची काही १५-२० मिनिटं रित्वीच्या रडण्याचा आवाज येईनासा झाला होता.साहिलने सामान उचललं आणि तो मनोजच्या खोलीत गेला...तिथे जे काही मीरा आणि साहिलने पाहिलं ते पाहून त्यांची बोबडीच वळली.त्यांनी रित्वीला उचललं आणि वाड्याला कुलूप लावून ते गाव सोडलं....खऱ्या अर्थाने त्या चक्राची सुरूवात झाली होती.

त्या घटनेला घडून आता ९ वर्ष होऊन गेली होती.मोरे कुटुंब पुन्हा त्या गावी कधीच गेले नाहीत. पण ते काहीच विसरले नव्हते. रित्वी आता ९ वर्षांची झाली होती.अशाच एका रात्री रित्वी जोरजोरात हसायला लागली.तिचं असं भयानक हसणं ऐकून साहिल आणि मीरा धावत तिच्या खोलीत पोहचले आणि तिथली परिस्थिती बघून त्यांना ९ वर्षांपूर्वीची वाड्यावरची तिचं घटना आठवली जेव्हा ते सामान बांधून मनोजच्या खोलीत पोहचले तेव्हा त्यांनी बघितलं होत की, बेडवर रित्वी हसत हसत वरती लटकवलेल्या पंख्याकडे एकटक बघत होती ज्याला मनोजचं शरीर उलटं लटकवलेल दिसतं होतं तेही पूर्णपणे नग्न आणि त्याच्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर जखमा होत्या आणि त्यातून गळणार रक्त बेडवर असणाऱ्या रित्वीच्या तोंडात पडत होतं आणि ती हसत होती.आजही त्यांनी तसचं दृश्य पाहिलं पण यावेळी मनोजच्या जागी त्यांच्या बिल्डींगचा वाँचमन होता. साहिल आणि मीरा ते बघून हादरूनच गेले.तिथे रित्वीच्या तोंडाला रक्त होतं, हात रक्ताने बरबटलेले होते आणि दुसरीकडे वॉचमनला उलटं पंख्याला लटकवलेलं होतं आणि तेही नग्न अवस्थेत.त्याच्या शरीरावरही ही तशाच जखमा होत्या जश्या मनोजच्या शरीरावर होत्या.

साहिल आणि मीराला काय करावं काहीच सुचत नव्हतं. साहिलने धीर एकवटून वॉचमनचं प्रेत खाली बेडवर उतरवलं. मीराने रित्वीला बाथरूम मध्ये जाऊन स्वच्छ केलं आणि तिला पुन्हा बेडरूम मध्ये घेऊन आली.साहिलने मीराला सांगितल की रित्वीला आपल्या बेडरूम मध्ये ठेव आणि पुन्हा तू इथे ये. रित्वीचं हसणं आता बंद झालं होतं. आता ती पहिल्यासारखी नॉरमल वाटत होती... मीरा तिला स्वत:च्या बेडरूम मध्ये घेऊन आली.तेवढ्यात रित्वी म्हणाली "मम्मा काय झालं? तू मला तुमच्या रूम मध्ये का घेऊन आली? आणि पप्पा कुठे आहेत?" हे ऐकून मीरा जरा दचकलीच. आता काही वेळापूर्वी घडलेल्या त्या भयानक घटनेचा थोडासाही लवलेश रित्वीच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.तिच्या चेहऱ्यावर दिसत होते ते फक्त निरागस प्रश्न.तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत मीराने तिला झोपण्यास सांगितले व ती रित्वीच्या बेडरूम मध्ये आली. जिथे साहिलने वॉचमनचं प्रेत खाली उतरवलं होतं. मीरा आल्यानंतर साहिल म्हणाला, "हे काय झालं मीरा? आणि कसं झालं? इतक्या रात्री वॉचमन आपल्या घरात कसा काय? आणि खरचं रित्वीने मारलं असेल का गं त्याला? पण आता आपण काय करायचं? सगळ्यांना कळलं तर काय होईल? " एवढे सगळे प्रश्न एका श्वासात साहिलने मीराला विचारले....मीरा मात्र प्रेत बघून थरथर कापत होती.रित्वीकडून असं काही घडलं असेल याचा विचार करून तिचा थरकाप उडाला होता.

शेवटी साहिलने प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी एक पोतं शोधायचं ठरवलं.पोतं शोधण्यासाठी मीरा आणि साहिल बाजूच्या अडगळीच्या रूम मध्ये गेले. थोडी फार शोधाशोध केल्यानंतर त्यांना एक पोतं मिळालं....ते पोतं घेऊन पुन्हा ते जेव्हा रित्वीच्या बेडरूम मध्ये आले तेव्हा त्यांना एक जबरदस्त धक्का बसला. त्यांनी पाहिलं की बेडवरच वॉचमनचं प्रेत गायब झालं होतं आणि तिथे होती ती फक्त राख. त्यांनी पूर्ण घरात शोधाशोध केली पण प्रेत कुठेच नव्हतं.या प्रकारामुळे त्यांची भीती अजून वाढली होती. म्हणून ते रित्वीला बघण्यासाठी त्यांच्या बेडरूम मध्ये गेले...तर मीराला एक गोष्ट खटकली की रित्वीला रूम मध्ये झोपवल्यानंतर तिने बाहेरून दाराला कडी लावली होती.पण आता मात्र दार उघडचं होतं. ते जेव्हा आत पोहचले तेव्हा त्यांनी पाहिलं की, रित्वी शांतपणे झोपली होती.ते पाहून साहिल आणि मीरा सुटकेचा नि:श्वास टाकणारच होते इतक्यात मीराची नजर रित्वीच्या हातांकडे गेली आणि ती जोरात किंचाळलीच.साहिलला जेव्हा मीराने रित्वीच्या हातांकडे बघायला सांगितल तेव्हा साहिलचे डोळे सुध्दा पांढरेफट पडले कारण रित्वीच्या दोन्ही हातांना राख लागलेली होती.त्यामुळे साहिल आणि मीरा अजूनच घाबरले...

भीतीच्या सावटाखाली ती काळरात्र एकदाची संपली. सकाळ झाली तरी साहिल आणि मीराची भीती गेली नव्हती. तिकडे वॉचमन गायब आहे म्हणून बिल्डींग मधल्या काही लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी काही दिवस तपास केला मग मात्र काही तपास लागला नाही म्हणून फाईल बंद केली. त्या रात्रीनंतर कित्येक रात्री साहिल आणि मीराने भीतीच्या सावटाखाली काढल्या....या झालेल्या प्रकारामुळे ते गोंधळले होते.काय झालं? कसं झालं? कोणी केलं? या कुठल्याचं प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडे नव्हती. जे काही माहीत होतं ते फक्त रित्वीलाचं.पण ते दोघं तिला काहीच विचारू शकत नव्हते कारण त्या घटनेनंतर ती एकदम नॉरमल वागत होती. या प्रकारांबद्दल एकच माणूस सांगू शकत होता ते म्हणजे बुवा.पण बुवांशी संपर्क साधण्याचं कोणतचं साधन नव्हतं.शिवाय गेली काही वर्ष गावी न गेल्यामुळे बुवांबद्दल काहीच माहीती नव्हती.त्यामुळे तो पर्याय पण संपुष्टात आला.

अशीच ४ वर्ष होऊन गेली...रित्वी आता १४ वर्षांची झाली होती. या मधल्या काळात त्या रात्री सारखा प्रकार घडला नाही. पण रित्वीच्या वागण्यात खूप फरक पडलेला मीरा आणि साहिलला जाणवत होता... पण ते देवाकडे प्रार्थना करण्याशिवाय काहीच करू शकत नव्हते. रित्वीच्या एका सवयीच त्यांना आश्चर्य वाटत होतं...रित्वी जशी मोठी मोठी होत होती तेव्हा तिने आपल्या रूम मध्ये जितके आरसे होते ते काढून टाकले. ती तयार व्हायची ते सुध्दा आरशाविना...एक-दोनदा मीराने तिने काढलेले आरसे पुन्हा लावायचा प्रयत्न केला तर रित्वीला काय झालं माहीत नाही...तिने मीराचा गळा धरला आणि जोरात दाबला आणि डोळे मोठे करून मीराकडे पाहत एका वेगळ्याच भसाड्या आवाजात म्हणाली की, " मी सांगितल ना आरसा नाही लावायचा...तर तुला कळत नाही का भवाने?....माझं एेकल नाहीस तर मी काय करेन हे तुला चांगलचं माहीत आहे ना...." एवढ ती म्हणाली आणि दुसऱ्याच क्षणी नॉरमल झाली... मीरा मात्र झालेल्या प्रकारामुळे धास्तावली होती.

नेहमीसारखाच सूर्य उगवला आणि दिवसाची सुरूवात झाली.... साहिलला अॉफिसला जायचं होत तर त्याची तिकडे आवराआवर चालू होती... मीरा पण त्याच्या आणि रित्वीच्या डब्याची तयारी करत होती.... रित्वीला तिने तयार करवून नाश्त्या साठी बसवल होतं... तेवढ्यात फोनची रिंग वाजली.एवढ्या सकाळी सकाळी कोणी फोन केला असं नाराजीच्या सुरात म्हणतच मीराने फोन उचलला...समोरून आवाज आला की, "हाय मीरा...मी स्नेहा बोलतेय...अर्णवची मम्मी...." अर्णव हा रित्वीचा मित्र होता....तिचा क्लासमेट... आणि या दोघांमुळे स्नेहाची आणि मीराची सुध्दा मैत्री झाली होती...तर मीराने हसत हसत तिला विचारलं, काय गं...इतक्या सकाळी कसा फोन केलास?....त्यावर स्नेहा म्हणाली,अगं आज अर्णवचा बर्थडे आहे.त्या निमित्ताने आम्ही मोठी पार्टी ठेवली आहे आणि ती सुध्दा एका मोठ्या गार्डन मध्ये....तर तुम्हांला आमंत्रण देण्यासाठी फोन केला होता...... संध्याकाळी ५ ची वेळ दिली आहे सगळ्यांना.. आणि त्या गार्डनचा पत्ता मी तुला व्हॉट्स अँप करते असं स्नेहा म्हणाली...मीरानेही अर्णवला शुभेच्छा देत संध्याकाळी मी आणि रित्वी नक्की येऊ....साहिलला थोडे काम आहे तर तो येऊ शकणार नाही असं म्हणत तीने फोन ठेवला.... आणि तेवढ्यात तिचे बोलणं ऐकत असलेल्या रित्वीवर तिची नजर गेली आणि मीरा जरा घाबरलीच कारण रित्वीच्या डोळ्यांत काहीतरी वेगळीच चमक दिसली तेसुद्धा काही क्षणांसाठी.... आणि मग अचानक ती नॉर्मल झाली पण मीरा मात्र खुप घाबरली होती. सगळ्यांची आवराआवर झाली आणि मग साहिल रित्वीला शाळेत सोडून कामावर निघून गेला. दुसरीकडे मीराने घरची कामे आवरली आणि मग ती अशीच मासिक हातात घेऊन सकाळी रित्वीच्या डोळ्यांत तिने जी चमक पाहिली होती त्याचा ती विचार करत बसली होती. अशातच बराच वेळ निघून गेला. मीराने घड्याळात पाहिले तर रित्वीची शाळेतुन परत यायची वेळ झाली होती. तिने पटकन आवरले आणि रित्वीला घरी घेऊन आली. थोड्या वेळाने पार्टीला जाण्यासाठी दोघी तयार झाल्या.

स्नेहाने मीराला पत्ता पाठवला होता त्याप्रमाणे मीरा आणि रित्वी गार्डनमध्ये पोचल्या. बरीच लोकं पार्टीला आली होती आणि गार्डनसुद्धा इतका छान सजवला होता की अक्षरश: डोळे दिपून जातील. सगळेजण पार्टीची सजावट बघत वेलकम ड्रिंकचा आस्वाद घेत होते. तेवढ्यात बर्थडे बॉय अर्णवची एंट्री झाली. सगळ्यांनी त्याला विश केलं आणि मग केक कापला. सगळेजण पार्टी एेन्जॉय करत होते. रात्रीचे ८:०० वाजले होते मीरा आणि रित्वीने सुद्धा अर्णवला शुभेच्छा दिल्या. अर्णव आणि रित्वीचे क्लासमेट डिजेवर नाचत होते. अर्णवने रित्वीलाही बोलवलं पण मीराची रित्वीला एकटं सोडण्याची इच्छा नव्हती पण तरीही तिने तिला अर्णवसोबत पाठवलं. फक्त १० मिनिटंच झाली असतील रित्वीला जाऊन इतक्यात अचानक लाईट्स गेले. सगळीकडे पूर्णपणे अंधार झाला होता. मीरा जरा घाबरलीच. बाकीची नाचणारी मुलं लाईट गेल्यावर आपआपल्या आईला हाक मारत त्यांच्यापर्यंत गेली पण रित्वी आली नाही. मोबाईलचा टॉर्च ऑन करून मीरा रित्वीला हाक मारत शोधु लागली पण कुठूनच काहीच प्रतिसाद येत नव्हता. इथे स्नेहा जनरेटर चालू करण्यासाठी पार्टीच्या व्यवस्थापकांना सुचना देत होती. मीरा रित्वीला शोधत शोधत गार्डनच्या टोकापर्यंत पोहचली जिथे काही अशोकाची झाडं होती.तिकडून ती मागे वळणार इतक्यात तिने मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात दोन सावल्या बघितल्या. ती थोडी पुढे गेली आणि बघितलं तर तिचे डोळे अक्षरश: पांढरे झाले आणि पायाखालची जमीनच सरकली.तिने बघितलं की, रित्वी अर्णवला गरागर फिरवून जमिनीवर आपटत होती.तिचा जोर इतका होता की अर्णवच्या तोंडातून ओरडायची सुध्दा ताकद नव्हती....रित्वीचे डोळे आगीसारखे लाल दिसत होते...तिच्या दातांनी तिने अर्णवच्या शरीरावर जखमा केल्या होत्या...तो रक्तबंबाळ झाला होता....मीरा तिला थांबवायला जाणार इतक्यात रित्वीने तिला जळजळीत नजरेने पाहिले.... अचानक काय झाले कुणास ठाऊक मीराचे पाय रूतल्यासारखे झाले... तिला हलताही येत नव्हतं आणि तोंडातून आवाजही निघत नव्हता....जणू तिची चेतना आणि आवाज कोणीतरी काढून घेतला होता...रित्वी तिची हालत पाहून राक्षसी हसली आणि अर्णवचे सगळे कपडे काढले आणि त्याला एका हाताने पकडून झाडावर सरसर चढली आणि एका मजबूत फांदीला अर्णवला लटकवले आणि हाताला लागलेले रक्त चाटत झाडावरच बसली. हे सगळं मीराने आपल्या डोळ्यांनी बघितलं. तिची तर हालतच खराब झाली होती आणि ती चक्कर येऊन तिथेच कोसळली.

जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती स्वत:च्या बेडरुम मध्ये होती आणि साहिल तिच्या बाजूला होता. साहिलला बघून मीरा त्याला घट्ट मिठी मारुन थरथर कापत रडायला लागली आणि मग तिने बेडरुमच्या दारात असलेल्या रित्वीला बघितल आणि आणखीनच घाबरुन साहिलला पकडून रडू लागली. रित्वी तिच्या जवळ आली आणि म्हणाली मम्मा काय झालं तुला, तू रडते का? तिच हे बोलणं ऐकूण मीराने रित्वीला जवळ घेतल आणि मग तब्येत ठीक नाही अस सांगून तिला झोपायला पाठवल आणि मग साहिलला घडला प्रकार सांगितला ते ऐकून साहिल म्हणाला,मला जेव्हा स्नेहाचा फोन आला की तुला चक्कर आली आहे... तेव्हा मी तिथे पोहचलो तर सगळे अर्णवला शोधत होते... आणि तू एका खुर्चीवर डोकं टेकवून बसली होती आणि रित्वी तुझ्याजवळच उभी होती आणि मग कोणीतरी अर्णवला झाडावर लटकलेलं बघितलं आणि पार्टीत गोंधळचं माजला.... स्नेहा तर रडून रडून हैरान झाली होती...पोलीस वगैरे आले...मी पण जेव्हा अर्णवच्या प्रेताला बघितलं तेव्हा त्याची हालत बघून मला मनोज आणि वॉचमनची आठवण झाली... आणि माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच की हे रित्वीनं तर केल नसेल ना.... पण तू आता ते कसं घडलं हे सांगितल ते ऐकून तर मला सुध्दा कळत नाही आहे काय करायचं....हे सगळं खूप भयंकर आहे...कसं थांबणार हे सगळं मीरा?.....आपली रित्वी अशीच राहणार का गं नेहमी??.... हे बोलत बोलत तो पण रडायला लागला.

रित्वीच्या हातून झालेला हा तिसरा खून होता. त्यामुळे मीरा आणि साहिलला काय करावं हे सुचत नव्हत. बुवांनी सांगितल्या प्रमाणे ते गावी कधीच गेले नव्हते तरीसुध्दा हे भयंकर प्रकार घडत होते.हे सगळ असं का घडतयं ....कधीपर्यंत चालू राहणार....हे त्या दोघांना कळतचं नव्हतं... साहिलने गावातील एका मित्राशी संपर्क साधून बुवांबद्दल चौकशी केली पण बुवा गेलं वर्षभर या गावातच नाहीत हे ऐकून साहिलची उरलेली एकमेव आशाही संपली होती...आता कोणताच मार्ग राहिला नव्हता.जे होईल त्याला सामोर जावं लागणार होतं.साहिलला बुवांनी दिलेल्या आरशाची आठवण झाली... त्याच्या मनात आलं द्यावा का हा आरसा रित्वीला? पण तिला तर डोळ्यांसमोर नको असतो आरसा.मग बुवांनी असं का सांगितल असेल की योग्य वेळी हाच आरसा रित्वीची मदत करेल...फक्त प्रश्न उरले होते... उत्तर मात्र कुठेच सापडत नव्हतं पण साहिल आणि मीराने एक गोष्ट ठरवली होती की रित्वीला जरा पण एकटं सोडायचं नाही.सतत तिच्या सोबत कोणी ना कोणी राहायचं.हाच एक मार्ग त्यांना दिसत होता.

असेच दिवस पुढे पुढे सरकत गेले. रित्वीचं शालेय शिक्षण आणि ज्युनियर कॉलेज पूर्ण झालं होतं. तिची डॉक्टर होण्याची इच्छा असल्याने तिने मेडिकलची एंन्ट्रस परीक्षा उत्तीर्ण करून एका नामांकित मेडिकल कॉलेज मध्ये एम्.बी.बी.एस्. साठी प्रवेश घेतला.गेल्या काही वर्षांत अर्णवच्या घटनेनंतर तसं काही झालं नव्हतं.रित्वी बऱ्यापैकी नॉरमल वाटत होती पण आरश्याचं आणि तिचं अजूनही वाकडचं होतं.....तर कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी रित्वीची युग बरोबर ओळख झाली.तो तिचा एका वर्षांने सिनियर होता. रित्वी आता लहानपणीपेक्षा अजून सुंदर दिसायला लागली होती त्यामुळे साहजिकच तिच्या मागे भरपूर मुलं वेडी होती.पण ती मात्र कुणालाचं भाव देत नसे पण युगशी ओळख झाल्यावर हे चित्र हळूहळू बदलताना दिसतं होतं...त्यांच्या एका कॉमन मित्रामुळे त्या दोघांची ओळख झाली होती.युग दिसायला एकदम हँडसम होता....गोरा रंग, त्यावर शोभेल असा हनुवटीवरचा तीळ, घारे डोळे, वाऱ्यासोबत खेळणारे कुरळे केस आणि उत्तम तब्येत त्यामुळे तो चारचौघात उठून दिसायचा.रित्वीने जेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच ती त्याच्या प्रेमात पडली होती आणि युगचीही हालत तशीच होती. पण जास्त ओळख नसल्यामुळे तो इतक्यात काही बोलू शकत नव्हता.हळूहळू त्यांच एकमेकांशी बोलणं वाढलं... एकमेकांचे नंबर घेतले...चँटस् सुरू झाली... कॉलेज नसताना फोनवर बोलणं होऊ लागलं...

रित्वीची एम्.बी.बी.एस् ची पहिली दोन वर्ष संपली होती.परीक्षा संपल्यामुळे कॉलेजला सुट्टी होती आणि मीरा आणि साहिल कॉलेज व्यतिरिक्त तिला कुठेही जाऊ देत नसत त्यामुळे युग आणि तिचं भेटणं बंद झालं होतं...अशाच एका रात्री ते चँट करत होते...

रित्वी : हाय....कसा आहेस?

युग : कसा असणार तुझ्याशिवाय?

रित्वी : काय रे तू...किती मस्करी करतोस माझी...सरळ सांग ना.

युग : अगं खरच सांगतोय...तुला भेटायला मिळत नाही म्हणून उदास आहे.

रित्वी : काहीतरीचं तुझं...

युग : अगं काहीतरीचं काय...खरचं खूप इच्छा आहे तुला भेटण्याची.

रित्वी : पण का??

युग : तुला नाही माहीत का? का ते?

रित्वी : मला कसं माहीत असेल?

युग : सगळं कळून न कळल्यासारखं दाखवण्यात तुम्ही मुली ना फार हुशार असता.

रित्वी : आम्ही मुली असतोच मुळी हुशार.

युग : हो गं बाई... पण सांग ना तुला नाही वाटत का मला भेटावसं?

रित्वी : नाही......

युग : मला बरं वाटाव म्हणून तरी हा बोलायचसं .

रित्वी : मलाही वाटतं भेटावसं

युग : का??

रित्वी : तुला नाही माहीत का? का ते?

युग : माहीत आहे मला... पण तुझ्याकडून ऐकायचयं...

रित्वी : ऐकायचं तर मला आहे तुझ्याकडून...तू पण तर बोलू शकतोस ना?

युग : ओके..बस आता.. खूप दिवस झाले..मीच बोलतो आता..

रित्वी : बोल ना मग...मी ऐकतेय...

युग : रित्वी........माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे....आय लव्ह यू सो मच...विल यू मँरी मी?

रित्वी : वो आई नी

युग : काय???

रित्वी : माझं उत्तर..

युग : म्हणजे काय नक्की?

रित्वी : गुड नाईट

युग : अगं गुड नाईट काय? उत्तर तर दे..

रित्वी : मी दिलयं उत्तर.

युग : पण त्याचा अर्थ काय?

रित्वी : ते तुझं तू शोध...मी झोपतेय...गुड नाईट...

रित्वी

लास्ट सीन १.३२ am

असं युगच्या व्हॉट्स अँप वर दिसलं... रित्वीतर निघून गेली पण युगला काहीच कळत नव्हत की ही नेमकं काय बोलून गेली.... शेवटी त्याने खूप विचार केल्यानंतर गुगल वर सर्च केलं आणि त्याचा अर्थ बघून एक मोठी स्माईल युगच्या चेहऱ्यावर पसरली... आणि त्याने सुध्दा रित्वीला मेसेज केला....वो आई नी...म्हणजेच आय लव्ह यू...एका हळुवार नात्याची सुरूवात झाली होती.हळूहळू प्रेमाचे नाते असेच बहरत गेले.शेवटी ती वेळ आली जेव्हा रित्वीला तिच्या आई वडिलांना युगविषयी सांगायचं होतं.कारण आता ती एम्.बी.बी.एस् झाली होती आणि युग एका हॉस्पिटल मध्ये प्रँक्टिस करत होता.युगने त्याच्या घरी रित्वीच्या आणि त्याच्या नात्याबद्दल सांगितलं होतं आणि आज रित्वी..मीरा आणि साहिलशी बोलणार होती.

नेहमीप्रमाणे संध्याकाळी ७.३० च्या सुमारास साहिल घरी आला.मीरा रात्रीचे जेवण करण्यात व्यस्त होती.रित्वीला हीच योग्य वेळ वाटली.तिने मीराला बोलवलं आणि साहिलच्या बाजूला बसवलं आणि म्हणाली, " मम्मा पप्पा मला तुम्हांला काहीतरी सांगायचं आहे".... साहिल म्हणाला, " बोल गं बाळा... काही हवयं का तुला? " रित्वी म्हणाली...." नाही पप्पा. मला तुम्हांला हे सांगायचं होतं की , माझं एका मुलावर प्रेम आहे. युग नाव आहे त्याचं. सध्या एका हॉस्पिटल मध्ये प्रँक्टिस करतोय.माझ्याच कॉलेज मध्ये होता. तेव्हा आमची ओळख झाली. हे ऐकून मीरा पटकन म्हणाली, "अच्छा म्हणजे घरी असताना फोनवर हळू आवाजात त्याच्याशी बोलायचीस तर.... आणि मी विचारलं की सांगायचीस की मैत्रिणीचा फोन आहे... साहिल म्हणाला, "तू थांब गं मीरा. माझ्या रित्वीची निवड चांगलीच असणार. आपण त्यांच्या घरच्यांना भेटूया. हे ऐकून रित्वीने साहिलला मिठी मारली. नाही म्हणता म्हणता मीराने सुध्दा होकार दिला.

त्याचं रात्री साहिल बेडवर गहन विचारात असताना मीराने त्याला विचारलं, " मगाशी तर तू खूप खुश होतास मग आता काय झालं? " त्यावर साहिल म्हणाला, " मीरा.... रित्वीच्या आयुष्यात आतापर्यंत काय काय झालयं ते तुला माहीत आहे ना...भलेही गेली काही वर्ष तसं काही घडलं नाही पण याचा अर्थ असा नाही ना की तसं काही घडणार नाही...उद्या तिचं लग्न युगशी होईल...मग आपण त्याला अंधारात कसं ठेवू शकतो...आपल्याला त्याला सगळं सांगावच लागेल.. पण हे सगळं त्याला कळल्यावर तो आपल्या रित्वीशी लग्न करेल का?" याच विचारात ती रात्र संपली.सकाळी साहिलने रित्वीकडून युगचा नंबर घेतला व त्याला फोन करून एका कॉफीशॉप मध्ये भेटायला बोलावलं... संध्याकाळी ४ ची वेळ ठरली..सनशाईन कँफे मध्ये साहिल जरा लवकरच पोहचला...कारण त्याला खूप टेन्शन आलं होतं...इतक्यात युग आला आणि समोरच्या खुर्चीवर बसला... युगने साहिलला रित्वी सोबतच्या काही फोटोंमध्ये बघितलं होतं... म्हणूनच त्याला साहिलला ओळखण्यात जास्त वेळ लागला नाही...कॉफीची अॉर्डर दिल्यानंतर साहिलने बोलायला सुरूवात केली , "लग्नाविषयी आणि कामाविषयी बोलून झाल्यानंतर साहिलने रित्वीच्या जन्मानंतर घडलेल्या त्या भयानक घटना युगला सांगितल्या. जसं जसं साहिल पुढे बोलत होता तस तसे युगच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत होते... संपूर्ण बोलून झाल्यानंतर साहिलने युगला विचारलं , " मला माहीत आहे हे सगळं खूप भयानक आहे पण हेच सत्य आहे.मला तुला हे सांगणं खूप गरजेच होतं कारण तू रित्वीशी लग्न करणार आहेस पण मला भीतीही होती की हे सगळं ऐकल्यानंतर तू लग्न करण्याचा निर्णय मागे घेशील."

युग म्हणाला, " काका खरतरं या सगळ्यावर माझा विश्वासच बसत नाही आहे पण तुम्ही हे सगळं अनुभवलयं त्यामुळे विश्वास ठेवणं भाग आहे आणि राहिला प्रश्न लग्नाचा तर मी रित्वीशीच लग्न करणार. माझं तिच्यावर जिवापाड प्रेम आहे पण हे कायमचं थांबायला हवं... आपण काहीतरी करायला हवं.... साहिल म्हणाला त्यासाठी आपल्याला बुवांना शोधाव लागेल..मी आजूबाजच्या गावांमध्ये बघतो त्यांचा शोध लागतो का ते...कारण रित्वीला फक्त या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग बुवाच दाखवू शकतात.या भेटीनंतर लगेचचं साहिलने मुंबई सोडलं व तो एका मित्राच्या गावी गेला. त्याच्या शेजारीचं साहिलचा गाव होतं पण बुवांनी गावी पुन्हा कधी न येण्यास सांगितल्यामुळे साहिल स्वत:च्या गावी नाही गेला.आजूबाजूच्या ४-५ गावात शोध घेतल्यानंतर अखेर एका गावात त्याला बुवा सापडले.बुवांनी साहिलला भेटताच क्षणी एवढचं सांगितल की युगला बोलावून घे....आता ती वेळ जवळ आली आहे.... मृत्यूचं वादळ घोंघावतयं...

साहिलने युगला गावात बोलवलं.त्याने बुवांना युगची ओळख करून दिली. बुवा म्हणाले,"साहिल मी तुला म्हटलं होतं ना की प्रेमात खूप ताकद असते. हा युगच रित्वीची ताकद आहे पण या सगळ्यात सर्वांत जास्त धोका युगलाच आहे....."युग म्हणाला, बुवा मला काहीही झालं तरी चालेल पण माझी रित्वी या सगळ्यातून बाहेर यायला हवी.आणि हे सगळं का घडतयं हे पण कळायला हवं...त्यावर बुवांनी त्या दोघांना झोपडीत नेलं व म्हणाले,"आता ती वेळ आली आहे तुम्हाला सगळ सांगण्याची की रित्वीसोबत हे का होतय आणि रित्वीच्या शरीरातली दुसरी आत्मा कोण आहे हे सांगायची. तुम्ही दोघं माझ्यासमोर बसा मी सगळ सांगतो तुम्हाला... असं म्हणत बुवांनी हातात मूठभर राख घेऊन एक चौकोन आखला. काही मंत्रांचे पठन केले व त्या चौकोनात पाणी शिंपडले. बुवा म्हणाले " साहिल तुझ्या वडिलांचे खापर पंजोबा म्हणजे नागनाथ मोरे त्यांच्या पिढीतल्या या काही घटना आहेत. नागनाथ मोरे हा अतिशय व्यसनी माणूस होता. असं कुठलच व्यसन नव्हत जे त्याला लागलं नव्हत.अगदी मदिरा म्हणजे दारुपासून ते अगदी बाईपर्यंत. त्याचं जरी लग्न झालेलं असलं तरी बाहेरच्या अनेक बायकांबरोबर त्याचे अनैतिक संबंध होते.तुझ्या पूर्वजांबद्दल अस काही ऐकून तुला आवडणार नाही साहिल. पण हेच सत्य आहे जे माझ्या गुरूंनी मला सांगितलय जे मी आता तुम्हाला सांगतोय. तर पूर्ण दिवस हा नागनाथ व्यसनांच्या नशेत असाच गावभर फिरत असे आणि रात्र वेगवेगळ्या स्त्रियांसोबत घालवत असे. चुकूनच कधीतरी वाड्यावर जात असे. तो दारु पियत जरी असला तरी मांसाहार रोज करत असल्यामुळे तो अंगाने बऱ्यापैकी दणकट होता. एवढच काय तर रंगाने गोरा-गोमटा घारे डोळे, हनुवटीवर त्याच्या व्यक्तीमत्वाला खुलून दिसेल असा तीळ आणि कुरळे केस. तर एकंदर त्याच्या व्यक्तिमत्वामुळे स्त्रिया सुद्धा त्याला आपल सर्वस्व हसत हसत देत असत. अशातच एके दिवशी त्याची ओळख मंजुळा बाई सोबत झाली. बुवा अस म्हणत असतानाच त्यांनी आखलेल्या त्या चौकोनात काही चित्र उमटू लागली. म्हणजे जस आपण tv वर एखादा चित्रपट पाहतो तश्याच बुवा सांगत असलेल्या घटना त्या चौकोनात चित्रपटासारख्या दिसत होत्या. पुढे बुवा म्हणाले ही मंजुळा बाई सुद्धा रुपाने लाखात एक होती. गोरा रंग, निळे डोळे, सुडौल बांधा आणि ओठांवरचं हास्य तर असं की समोरचा घायाळ झालाच पाहिजे.

नागनाथने जेव्हा मंजुळाला बघितलं तो तिच्या प्रेमातच पडला.त्याने तिच्याकडे एका रात्रीची मागणी केली.मंजुळा सुध्दा उथळ स्वभावाची होती. तिलाही रोज नवीन नवीन पुरूषा सोबत रात्र घालवणं आवडत असे त्यामुळे तिने सुध्दा नागनाथच्या मागणीला होकार दिला. नागनाथ आणि मंजुळाने अशा अनेक संभोगाच्या रात्री एकत्र घालवल्या पण आजकाल ती आता सतत एका पुरूषा सोबत राहून कंटाळली होती.तिने त्याला नकार द्यायला सुरूवात केली पण नागनाथ तर तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला होता.तो आता तिच्या पासून दूर राहण्यास तयार नव्हता. तेव्हा नागनाथने तिला स्वतःच्या वाड्यावर नेलं... लग्नाची सख्खी बायको असताना सुध्दा त्याचे आणि मंजुळाचे धंदे वाड्यात व्हायला लागले. तेही त्याच्या बायको समोर.या त्रासाला कंटाळून एक दिवस नागनाथच्या बायकोने विहीरीत उडी मारून जीव दिला त्यामुळे नागनाथला रानच मोकळं झालं होतं...मोठा वाडा पाहून ती काही काळ भुलली पण नंतर नंतर पुन्हा नागनाथला नकार देऊ लागली.तिला दुसरा कुणीतरी पुरूष तिची रात्रीची तहान भागवण्यासाठी हवा होता. ते समाधान तिला नागनाथ पासून मिळेनास झालं होतं पण नागनाथ तिला वाड्यातून बाहेर सुध्दा जाऊ देत नव्हता.ती ऐकत नसल्यामुळे त्याने तिला कोंडून ठेवायला सुरूवात केली आणि मग मारायला सुध्दा. तो तिचा खूप छळ करून तिच्यावर जबरदस्ती करायचा.

अशाच एका रात्री दारूच्या नशेत नागनाथ मंजुळाच्या खोलीत आला. त्या रात्री तो खूप प्यायला होता आणि आता त्याला शरीरसुख हव होतं म्हणून तो पुन्हा मंजुळा सोबत जबरदस्ती करू लागला.... मंजुळा त्याचा खूप प्रतिकार करत होती पण तिचा काही निभाव लागत नव्हता.... नागनाथने तिला खाटीवर ढकललं आणि तिच्या अंगावर आडवा झाला..तिने सुध्दा त्याला धक्का मारला आणि तो खाली पडला...हीच ती रात्र होती साहिल जेव्हा आता घडत असलेल्या घटनांची सुरूवात झाली. तिने त्याला ढकलल्यामुळे त्याला राग आला आणि त्याने तिचे सर्व वस्त्र काढून तिला पंख्याला लटकवून खूप मारले..तिच्या सगळ्या शरीरावर जखमा झाल्या होत्या पण तरीही त्याचे चाळे चालूच होते...मग पुन्हा एकदा संभोग घेण्यासाठी त्याने तिला खाली उतरवलं आणि पुन्हा तिच्या अंगावर गेला इतक्यात उरलेल्या शक्तीनिशी ती त्याला चावली मग मात्र त्याच्या मस्तकात एक तिडीकच गेली आणि मग त्याने समोर असलेला आरसा तोडून त्याच्या तुटलेल्या एका काचेने तिचा गळा कापला आणि ती तडफडत खाली कोसळली...तरी सुध्दा तो तिच्यावर काचेने वार करतच राहिला... तेव्हा ती त्याला म्हणाली , " आज माझा मृत्यू अटळ हाय... पण मी सोडणार नाही तुला....म्या परत येईन...परत येईन..." असं म्हणत म्हणत तिने प्राण सोडला...मरताना तिच्या समोर दोनच गोष्टी होत्या....एक तर नागनाथचा चेहरा ज्याने तिचा खून केला होता... आणि दुसरं म्हणजे आरसा....ज्याच्या काचेमुळे तिचे प्राण गेले होते...

नागनाथने तिचे नग्न प्रेत उचलून आपल्या गावातील मंदिराच्या बाहेर पुरले. नंतर काही दिवसांनी नागनाथचा दारूच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला. तिची त्याला मारण्याची इच्छा अधुरी राहिली होती त्यामुळे तिच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नव्हती पण तिला तिचा बदला घ्यायचा होता... पण माझ्या गुरूंच्या झोपडीतल्या म्हणजे याच झोपडीतल्या वास्तव्यामुळे आणि ते त्या पडीक मंदिरात जाऊन तप करत असल्यामुळे तिला मोरे कुटुंबाच्या कुठल्याही स्त्री च्या गर्भात प्रवेश करता आला नाही त्यात नंतर सर्व मुंबईला स्थायिक झाल्यामुळे तिची आत्मा तळमळत राहिली पण जेव्हा लग्नानंतर साहिल तू आणि मीरा या गावात आलात तेव्हा मी त्या गावी नव्हतो आणि वटपौर्णिमेच्या दिवशी मंदिराजवळच्या वडाला पूजा करायला आलेलं असताना त्या मंजुळाच्या आत्माने मीराच्या गर्भात प्रवेश केला. म्हणजेच रित्वीच्या शरीरातली दुसरी आत्मा मंजुळा बाईची आहे.हेच ते भूतकाळाचं सावट आहे जे रित्वीच्या वर्तमानावर आणि भविष्यावर पडलं आहे. तिला नागनाथला मारता तर नाही आल पण ती आता रित्वीच्या शरीराचा वापर करुन नागनाथ सारख्या दिसणाऱ्या लोकांना मारतेय म्हणजे कुरळे केस, गोरा रंग, घारे डोळे आणि हनुवटीवर असलेला तीळ. या गोष्टी तिला एकाच माणसात दिसल्या तर ती तो नागनाथ समजूनच त्याला मारते. आता पर्यंत मनोज, वॉचमन आणि अर्णव हे असेच दिसायचे म्हणून तिने त्यांना तसच मारल. तश्याच जखमा दिल्या व नग्न करून उलटं लटकवलं जस नागनाथने मंजुळा सोबत केलं होतं आणि तिची पुढची शिकार तू आहेस युग....कारण तू सुध्दा तसाच दिसतोस आणि तिचा अंत आरश्याच्या काचेमुळे झाल्यामुळे ती आरश्याला घाबरते. इतक बोलून बुवा थांबले....

साहिल आणि युग बुवांच बोलण ऐकत त्या चौकोनात त्या भयानक घटना पाहत होते. दोघांच्याही चेहऱ्यावर विलक्षण भीती होती.... युग बुवांना म्हणाला , "बुवा हे सगळं खरचं खूप भयानक आहे. रित्वीकडून त्या मंजुळाने आधीच ३ खून करवून घेतले आहेत... पण तिला आता थांबवायचं कसं? त्या बुवा म्हणाले, " हे बघ युग...तूच तिची ताकद आहेस..या सगळ्यातून तिला बाहेर काढायची जबाबदारी नियतीने तुझ्यावर सोपवली आहे... पण हे करताना तुझ्या जीवाला धोका आहे....बुवा तुम्ही फक्त उपाय सांगा जेणेकरून रित्वीच्या शरीरातून ती आत्मा निघून जाईल आणि या थरारक घटना थांबतील असं युग म्हणाला...हे ऐकत असलेला साहिल बोलला, बुवा आम्ही काहीही करायला तयार आहोत पण रित्वीवरचं हे भूतकाळाचं सावट दूर करा...त्यावर बुवा म्हणाले, साहिल तुला मी दिलेला तो आरसा तू जपून ठेवला आहेस ना? कारण तोच आरसा रित्वीला योग्य वेळी मदत करील....तो दिव्य आरसा माझ्या गुरूंनी मला दिला आहे...त्यांच्या कठोर तपाचे फळ आहे तो आरसा...त्या मंदिरात माझ्या गुरूंची पवित्र आत्मा अजूनही आहे... म्हणूनच मी तिथे पूजा करायला जातो...बुवा पुढे म्हणाले, " त्या सगळ्या भयंकर घटनांची सुरूवात वाड्यात झाली तर आता त्याच्या शेवटाची सुरूवात त्या वाड्यातच होईल... त्यासाठी रित्वीला वाड्यात आणायला हवं पण वाड्यात आल्यावर मंजुळाच्या आत्म्याची शक्ती वाढणार आणि आपल्याला त्या शक्तीशी लढणं अजून कठीण होणार पण आपल्याकडे कोणताच मार्ग नाही."

साहिल तू मीरा आणि रित्वीला गावी बोलवून घे.उद्या एकतर या गोष्टींचा अंत होईल किंवा युग किंवा रित्वीच्या प्राणांचा.आणि हो मीराला सांग येताना तो आरसा रित्वीच्या नकळत घेऊन ये आणि तुम्ही दोघं सुध्दा भरपूर आरसे विकत घ्या आणि वाड्यातल्या एका खोलीत आणून ठेवा... बुवांनी सांगितल्या प्रमाणे युगने भरपूर छोटे-मोठे आरसे विकत घेतले आणि मग मोरेंच्या वाड्यात आणून ठेवले.दुसरीकडे साहिलने मीराला फोन करून सर्व हकीकत सांगितली आणि त्या दोघींना गावी येण्यास सांगितले.बुवा त्यांच्या मंदिरासमोरील झोपडीत आले. साहिल आणि युग उद्या नक्की काय करायचं हे जाणून घेण्यासाठी बुवांच्या झोपडीत आले.त्यावेळी बुवा ध्यानस्थ बसले होते.बुवांनी डोळे उघडले आणि म्हणाले,उद्याची रात्र एक भयानक रात्र असणार आहे.उद्या वाड्यात आल्यानंतर मंजुळाची आत्मा पूर्णपणे रित्वीच्या शरीराचा ताबा घेईल आणि एक युद्ध चालू होईल दोन आत्म्यांमध्ये ज्यात आपल्याला आपल्या रित्वीला जिंकवायचं आहे. उद्या कोणी कोणी काय काय करायचं हे मी सांगतो ते नीट ऐका.जरा जरी चूक झाली तर कोणाच्याही जीवावर बेतू शकतं.हे बघ युग,तुझ्यात नागनाथ सारख्या दिसणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत.उद्या तुला पूर्णपणे नागनाथ जसा दिसायचा तसंच तयार व्हावं लागेल.गुडघ्यापर्यंत असलेलं धोतर,वरती पांढरा झब्बा,हातात एक चांदीच कडं आणि हातात एक काठी ज्याला दोन घुंगरू असतील.

मंजुळाची आत्मा जेव्हा तुला बघेल तेव्हा तिला तू नागनाथ सारखा नाही तर नागनाथचं वाटला पाहिजेस.तुला बघून ती कशी वागेल हे तर विचार करण्यापलीकडचं आहे.मीरा आल्यानंतर तिच्याकडचा आरसा तू तुझ्याकडे घे आणि एक गोष्ट लक्षात ठेव की तुला काहीही करून रित्वीला मंदिरापर्यंत आणायचं आहे. आता हे कसं ते तू ठरव.बाकी गोष्टी कश्या घडतील हे मी निश्चित नाही सांगू शकत पण एक गोष्ट युग लक्षात ठेव की त्या आत्म्याच्या ताकदीपेक्षा तुझ्या प्रेमाची ताकद मोठी आहे.हे सगळं चालू असताना मी माझ्या झोपडीत जप करीत असेन आणि योग्य वेळी तुमची मदत करेन....तो कृष्ण कन्हैया तुमचं रक्षण करो.... हरे राम हरे कृष्णा.

त्या रात्री साहिल आणि युग बुवांच्या झोपडीतच थांबले.पहाटे मीरा आणि रित्वी मुंबईहून गावी आल्या.त्याआधीच युग वाड्यावर गेला.दुसरीकडे रित्वीच्या नकळत तो गोलाकार आरसा मीराने साहिलला दिला.गावात आल्यापासूनच रित्वीच्या वागण्यात झालेला बदल सगळयांनाच समजत होता.दुसरीकडे युगने वाड्यावर एका खोलीत विकत आणलेले आरसे चारी भिंतीवर लावले.साहिलने मीराला बुवांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या.रित्वी मात्र खूप शांत दिसत होती,जणू ती एका वादळापूर्वीची शांतता होती.शेवटी ती वेळ आलीच.संध्याकाळचे सात वाजले होते.बुवा झोपडीतच थांबले. बुवांचा निरोप घेऊन मोरे कुटुंब वाड्यावर आले जिथे युग आधीपासूनच एका खोलीत होता. बुवांनी सांगितल्या प्रमाणे तो नागनाथ सारखा तयार झाला होता आणि तो गोलाकार आरसा झब्ब्यात ठेवला..वाड्यात पाऊल टाकल्या टाकल्या रित्वी राक्षसी हसली.मीरा आणि साहिल घाबरले होते. तिच्या हसण्याचा आवाज इतका मोठा होता की युगला सुध्दा ऐकू आला. रित्वी सरळ वाड्याच्या त्याच खोलीत गेली जिथे नागनाथ मंजुळाला कोंडून ठेवायचा आणि जिथेच त्याने तिला मारलं होतं.ती काहीही न बोलता खोलीत गेली व दरवाजा बंद केला.मीरा आणि साहिलला रित्वीच्या या कृती मागचं कारण समजत नव्हतं.

इतक्यात विजा चमकायला लागल्या आणि मुसळधार पाऊस विजांच्या कडकडाटासह सुरु झाला.वातावरण अजूनच भयानक झालं होतं.युग खोलीतून बाहेर आला.काहीतरी २० मिनिटे होऊन गेली होती.घड्याळाने ०७:३० चा टोल दिला आणि रित्वीने दार उघडलं.तिने जसं पहिलं पाऊल खोलीच्या बाहेर टाकलं तशी लाईट गेली.संपूर्ण वाड्यात काळोख पसरला.दिवाणखान्यात भिंतीवर असलेल्या कंदीलाचा मंद प्रकाश काळोखाला आव्हान देत होता.इतक्यात एक मोठी वीज चमकली आणि त्या प़्रकाशात साहिल,मीरा आणि युगने पाहिलं की,रित्वी मंजुळाच्या वेशात दिसत होती.गडद रंगाची साडी,मोकळे केस,कपाळावर चंद्रकोर,पायात पैंजण आणि चेहऱ्यावर धगधगणारा राग. त्या प्रकाशात मंजुळाच्या आत्म्याने पाहिलं की समोर नागनाथ उभा आहे म्हणजेच युग. त्याला पाहून ती जोरात ओरडली.... नागनाथ......तुला सोडणार नाही मी.... नाही सोडणार.... तिच्या या आवाजासमोर विजेच्या कडकडटाचा आवाज सुध्दा फिका पडला होता.ती धावत युगला मारण्यासाठी पुढे सरसावली.मीरा तिला थांबवायला मध्ये गेली तर मंजुळाने मीराला ढकललं आणि मीरा डोकं आपटल्याने बेशुध्द पडली.साहिलने मीराला उचललं व खोलीत घेऊन गेला.इथे चवताळलेली मंजुळा युगच्या एकदम समोर उभी होती... मंजुळा आग ओकणाऱ्या डोळ्यांनी युगला पाहत होती...ती त्याच्यावर हल्ला करणार इतक्यात युग वरच्या दिशेला पळाला ते पाहून मंजुळा त्याच्या मागून वरती गेली आणि तिने एका हाताने युगला पकडलं.

युगला काहीही करून तिला मंदिराकडे घेऊन जायचं होतं. त्याने शरीरातल्या सर्व शक्तीनिशी तिच्यापासून सुटका केली आणि तो धावत आरसे लावलेल्या खोलीत गेला...त्याच्या मागून मंजुळा त्या खोली पर्यंत पोचली आणि दारातचं अडखळली... खोलीत लावलेल्या आरशांमुळे ती घाबरून मागे झाली आणि दारातचं गुरगुरत राहिली...युगला आता काहीही करून तिला मंदिराकडे न्यायचं होतं पण ती मात्र दारातचं उभी होती त्यामुळे त्याला काय करावं सुचेना.जे होईल ते बघता येईल असा विचार करून तो धावत मंजुळाला ढकलत झरझर पायऱ्या उतरत खाली आला...अचानकच झालेल्या या कृती मुळे मंजुळा गोंधळली पण दुसऱ्याच क्षणी ती सुध्दा त्याच्या मागे आली...आता युग वाड्याच्या बाहेर आला होता आणि मंजुळा सुध्दा त्याचा पाठलाग करत बाहेर आली... तिच्या वेगासमोर युगचा वेग कमी पडत होता.... युग मंदिराच्या दिशेने धावत होता त्याच्या मागून मंजुळा...मुसळधार पावसात आणि गडद अंधारात ते धावत होते... युगच्या मागे जणू मृत्यूच धावत येत होता...काही अंतर झालं असेल मंजुळाने युगला पकडलं आणि आपल्या नखांनी त्याच्या शरीरावर,तोंडावर वार केले...ते इतके तीक्ष्ण वार होते की युग जोरात कळवळला...त्याला त्याचा मृत्यू जवळ आलेला दिसत होता तेवढ्यात दूरवरून कोणीतरी मंत्र पठण केल्याचा जोरजोरात आवाज आला...तो बुवांचा आवाज होता...ते मंत्र ऐकून मंजुळा मागे झाली आणि गुरगुरायला लागली.. तिने तिचे कान बंद केले. पण तरीही काहीच उपयोग नव्हता...तिची हालत पाण्याविना तडफडणाऱ्या माश्यासारखी झाली होती.या संधीचा फायदा घेऊन युगने तिथून पळ काढला... पुन्हा एकदा त्याने मंदिराच्या दिशेने धावायला सुरूवात केली....मंत्रांचे आवाज आता बंद झाले होते मग मंजुळा सुध्दा त्याच्या मागे धावत मंदिरापर्यंत पोचली...

बुवा झोपडीतून बाहेर आले व मंदिरात गेले.युग सुध्दा मंदिरात गेला.पण मंजुळा त्या पवित्र मंदिरात प्रवेश करू शकत नव्हती....ती तिथेच उभी राहून ओरडायला लागली, " नागनाथ किती वेळ लपून राहशील? बाहेर ये साल्या......तुला तर आज जिताच सोडत न्हाय बगं मी... बाहेर ये जनावरा ".... बुवांनी युगला सांगितल हे बघ युग मंदिराच्या मागच्या बाजूला नागनाथने मंजुळाचं प्रेत पुरल होतं. ते प्रेत अजूनही तसच आहे जसं तेव्हा होतं.... आपण जोपर्यंत रित्वीच्या शरीरातली मंजुळाच्या आत्म्याला तिच्या स्वत:च्या शरीरात टाकून अग्नी देत नाही तोपर्यंत मंजुळाला मुक्ती मिळणार नाही.मी आधीच खड्डा खणून तिचं प्रेत बाहेर काढलयं जे मंदिराच्या मागेच आहे...आता तुला बाहेर जाऊन तुमच्या प्रेमाच्या ताकदीने रित्वीला हाक मारायची आहे.... आणि काहीही करून त्या आत्म्याला बाहेर काढायचं आहे...

इतक्यात बाहेरून पुन्हा मंजुळाचा आवाज आला की नागनाथ बाहेर ये...युग बाहेर आला... बुवा तिथेच मंदिरात बसले.. युगला पाहून मंजुळा त्याच्यावर धावत येणार इतक्यात युग जोरात ओरडला... रित्वी....मी तुझा युग आहे...भानावर ये...ही आत्मा आपल्याला दूर नाही करू शकत.... रित्वी तू ऐकतेयस ना मी काय बोलतोय....एक १० सेंकदासाठी युगचा आवाज ऐकून रित्वी म्हणाली, युग हे काय चालू आहे? तू इथे कसा? तेही अश्या कपड्यांत?.....पण दुसऱ्याच क्षणी पुन्हा मंजुळाने तिच्या शरीराचा ताबा घेतला...मंजुळा म्हणाली, " म्हणजे तू नागनाथ नाहीस तर....मला फसवताय व्हयं तुमी...आता मी कोणालाच सोडणार नाही....या शरीराला सुध्दा आणि तुला सुध्दा "...हे ऐकून युग मंदिराच्या मागे गेला जिथे मंजुळाचं प्रेत होतं....मग मंजुळा सुध्दा आली...युगने पुन्हा रित्वीला साद घालायचा प्रयत्न केला पण त्याला यश येत नव्हतं.. इतक्यात बुवा तिथे आले... बुवांनी त्याला गोलाकार आरसा काढायला सांगितला...आरसा काढण्यासाठी युगने झब्ब्यात हात घातला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याच्याकडून आरसा कुठेतरी पडला आहे...त्याच्या हावभावा वरून बुवांनाही कळून चुकलं होतं की युग कडे आरसा नाही... तेव्हा बुवा मंजुळाला म्हणाले बऱ्या बोलाने रित्वीचं शरीर सोड आणि तुझ्या शरीरात जा...यावर मंजुळा राक्षसी हसून म्हणाली, ते शक्य नाही.....

युगने पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न म्हणून रित्वीला हाक मारली व त्यांच प्रेम कसं झालं,त्यांनी एकत्र घालवलेले प्रेमाचे क्षण यांची आठवण करून देऊ लागला... शेवटी प्रेमाची ताकद आत्म्याला नमवण्यात सफल झाली... रित्वी भानावर आली... मंजुळाची आत्मा रित्वीच्या शरीरातून बाहेर पडली...एक पांढरी आकृती रित्वीच्या शरीरातून बाहेर आली... इतक्यात साहिल तिथे धावत धावत आला आणि त्याने तो गोलाकार आरसा युगच्या दिशेने भिरकावला.... तेवढ्यात मंदिराच्या मागच्या बाजूला जी छोटी खिडकी होती त्या खिडकीतून तेजस्वी किरणे बाहेर पडून युगच्या हातातल्या आरशावर पडली....बुवांच्या गुरूंच्या आत्म्याने त्यांना ही मदत केली होती... आणि त्यानंतर त्याने तो आरसा आत्म्याच्या दिशेने धरला... आरसा समोर धरल्याने ती पांढरी आकृती तडफडली आणि मग त्या आरश्यात त्या आत्म्याला कैद करून तो आरसा त्याने प्रेतासमोर धरला आणि त्या क्षणीच मंजुळाच्या आत्म्याने तिच्या शरीरात प्रवेश केला... नंतर मग आजूबाजची लाकडं गोळा करून त्यांनी तिच्या प्रेताला अग्नी दिला आणि कायमची तिची आत्मा मुक्त झाली.... इतक्या वेळ चालू असलेला मृत्यूचा थरार संपला होता... प्रेम विजयी झालं होतं... मोरे कुटुंबाच्या नशीबावरचं भूतकाळाचं सावट दूर झालं होतं... सगळ्यांच्याचं चेहऱ्यावर सुखद हास्य दिसत होत...बुवा, साहिल,युग आणि रित्वी वाड्यावर आले....मीरालाही आता शुद्ध आली होती... बुवांनी त्या दोघींना झालेला प्रकार सांगितला...युगचं आपल्यावरील प्रेम बघून रित्वीने त्याला मिठी मारली... भूतकाळाचं सावट कायमचं दूर झालं होतं आणि सुरूवात झाली होती प्रेमाच्या एका नवीन पर्वाची....


- रसिका शेखर लोके


marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.