हेलकावणाऱ्या चांदणराती ...   


समोर अथांग पसरलेला समुद्र आज शांतता प्राशुन मनसोक्त गुंगला होता . रात्रीचे काळेकुट्ट आकाश आज फारच शीतल भासत होते . आकाशाचे अंधारगर्भ त्यागून चांदणे पाण्यात उतरले होते . पहिलटकरीण टाकते तशी नाजुक पावले टाकत लाटा किनार्यावर येत होत्या. चंद्राचे बिम्ब देखील जणू मदिरा प्राशुन लाटांवर झिंगत होते ..पाण्यावर जिथे तिथे चांदणचुरा विखुरलेला होता ..गारठलेल्या काळपट खडकावर बसून तो तिची वाट बघत होता . ऊरात भेटीच्या ओढीने थैमान घातले होते .
तिला रात्री आवरायला जरा उशीरच झाला होता. तरीही ती आवर्जून येणार याचे संकेत तिने दिले होते . किनाऱ्यापासून दूर समुद्रात पाण्यात पहाटेच्या वेळी तिला असे भेटणे त्याला प्रचंड आवडायचे . तिची आठवण यायला लागली कि हा कासावीस व्हायचा. तिची ओढ त्याला स्वस्थ बसू देईना . पाण्यात खड़े मारून झाले ..आपण मागच्या वेळी काय काय बोललो ते सारे आठवून झाले . वेळ घालवण्याचे सगळे प्रयास करून झाले . त्याची तगमग त्याला श्वास घेऊ देईना .
तिला आठवत असताना थोडासा गार वारा सुटला तसा याच्या अंगावर जणू प्राजक्ताचा सडा पडला . तो शहारून मंद हसला .
माडाच्या झावळ्या सळसळल्या . त्यांच्या भयाण सावल्यांची, अंधारात एकट्याने तासभर बसण्याची भीती त्याला कधीच वाटली नव्हती . त्या झावळ्यांच्या वेड्यावाकड्या सावल्यांतून डोकावत राहणारे आकाश मात्र त्याला तिच्या कांती इतकेच लोभस वाटायचे .
तिथे एक निशब्द शांतता होती . समुद्र, लाटा , वारे याशिवाय तिथे त्याला सोबत करायला कुणीही नव्हते . तिच्या भेटीसाठी आतुर मन खुळ्यागत या पाण्यात पांगले होते .. किनार्यावर कधीकाळी मासेमारीसाठी जाणाऱ्या जीर्ण होड्या आजही दिमाखात उभ्या होत्या. पानांची सळसळ वाढली. अंगावर काटा आणणारा पहाटवारा सुटला होता. तिची यायची वेळ झाली होती.
खडकावरून उठत त्याने अंग झटकले . कसलेल्या पिळदार शरीराची हाडे इकडून तिकडून मोडली . धप्पदीशी रेतीत उडी मारत तो माडाच्या दिशेने गेला. झावळ्यांनी झाकलेली त्याची छोटी नाव त्याने बलदंड बाहूंनी खेचत बाहेर काढली. आतल्या फळीखाली असलेल पालाचं जाड कापड बाहेर काढून झटकलं . नावेच्या सांगाड्यावर ते नीट अंथरुन त्याची टोके घट्ट बांधली . हातात मूठभर रेती घेत त्याने कंदीलाची काच पूसली . बाटलीतील रॉकेल ओतून वात सरळ केली . खिशातुन दिवसभरात न ओढलेली बीड़ी फेकून माचीस तेवढी बघितली . आत बऱ्याच काड्या शिल्लक होत्या. तिच्या बसण्याची जागा स्वच्छ पुसत त्याने त्याखाली रात्री उमललेल्या आणि तिच्यासाठी वेचलेल्या रातरानीच्या फुलांचा सडा टाकला . पहाटेचे चार वाजत होते . त्याच्या झोप न झालेल्या शीणल्या डोळ्यांतली नजर माडात फक्त तिलाच शोधत होती . बऱ्याच दिवसांनी त्याची प्रेयसी त्याला प्रत्यक्ष भेटणार होती .
तिच्या येण्याची खात्री त्याला होतीच , फक्त वेळ सरता सरत नव्हती . त्या गार वाऱ्यावर स्वार तिच्या गप्पा , गोष्टी त्याच्या कानात रुंजी घालत होत्या . तिचा उबदार स्पर्श झाल्यासारखा भास त्याला झाला आणि त्याच्या सावळ्या राकट अंगावर सरसरून काटा आला. त्याने वळून पाहिले ..
तिने धावत मागून येत त्याच्या छातीला घट्ट कवटाळत एक दिर्घ उसासा सोडला होता . अकस्मात झालेल्या तिच्या त्या जादुई स्पर्शाने तो बेधुंद झाला होता. त्याने डोळे बंद करत अखेर तिची प्रतीक्षा सम्प्ली याची आकाशाला पावती दिली . तिच्या मागून आलेल्या दोन्ही हातांवर हात ठेवत तो तिला हुंगु लागला . तिचा गंध श्वासात भरू लागला . तिच्या लाम्बसड़क सुळसुळीत केसांचा अंबाडा सुटला आणि वाऱ्यावर भीरभीरणारे केस त्याला स्पर्श करू लागले .
त्याची अन् तिची धडधड वाढली . त्यांची गति एक झाली तिच्या संथ लयीत ती दोघे क्षणभर हरवली ..
भानावर येत तिने हात मागे ओढण्याचा प्रयत्न केला तसं त्याने तिला आणखी जवळ ओढले. तिच्याकडे वळून बघितले , तिची लाजेने खाली गेलेली मान त्याला खूप सुंदर भासली. तिची खळीदार तुकतुकीत हनुवटी त्याच्या हाताने वर करत त्याने तिचा चेहरा बघत एक दीर्घ श्वास सोडला .
" किती सुंदर दिसावं माणसाने दिवसेंदिवस ? तुला अनेक युगाने बघतोय असं वाटतंय रेवू ! "
" छे ! तुझं आपलं काहीतरीच." ती ओशाळली .
तिला आपल्या बाहूंत ओढत तो आवेगाने म्हणाला .
"तू ..आता काहीही बोलु नकोस .."
ती हसली , त्याला बिलगली अन त्याच्या भारदस्त छातीवर रेंगाळत राहिली . आजुबाजुचा कानोसा घेत त्याने सगळीकडे नजर फिरवली . अंधार , हालत्या माडाच्या झावळ्या, वारा, आणि चांदण या खेरीज तिथे काहीही नव्हते . त्याने तिला दोन्ही हातांनी उचलून घेत नावेत बसवले .
आपली सर्व ताकद लावत त्याने नाव पाण्यात ढकलून दिली. मागोमाग तोही चढला . नावेचा पाण्यात शिरण्यापर्यंत प्रवास अवघड होता. आपल्या दोन्ही बळकट भुजांनी तो वल्ह्रे मारत होता. कधी त्याच्या पीळदार शरीराला तर कधी त्यासाठी लागणाऱ्या बाहुबलाला ती कौतुकाने न्याहाळीत होती . मध्येच अस्फुट हसत होती . तिच्या हसण्याला तो धुंद पण वेधक नजरेने उत्तर देत वल्हे मारत होता . सपासप पाणी कापत नाव किनाऱ्यापासून बरीचशी आत आली .
इथे फक्त गार वारा आणि लाटांवर हिंदकळणारी नाव होती. कसलाही आवाज नव्हता . कुठलाही प्रकाश नव्हता . नाव पाण्यावर तरंगत ठेवत तो टोकापासून तम्बूत आला . त्याने माचीस काढत कंदील पेटवला . त्या कंदिलाचा पिवळा प्रकाश पालीच्या तम्बूत पसरला . त्तीया पिवळ्या प्रकाशात ती उजळून निघाली होती . फळीवर बसून रातरानी हुंगत होती तशी याने खाली बैठक मारली. दोन्ही हात तिच्या कमरेभोवती नेत तिच्या कुशीत डोके ठेवले . तशी तिची बोटे त्याच्या केसांतून हळुवार फिरू लागली .
याने तिच्या कमरेभोवती त्याची पकड़ आणखी घट्ट केली .
"अरे हो हो कुठे पळून नाही जात आहे मी ."
" कित्ती दिवसांनी भेटलीस रेवू ..तूला मी मुळीच सोडणार नाही "
" तूच जात असतोस मासे आणायला बोटीवर ...महीना उलटतो तरी येत नाहीस .."
तो तिच्या डोळ्यांतला लटका राग न्याहळीत असतो.
" तूला काय ठाऊक तुझी किती काळजी वाटत राहते मला ..डोळ्यांत प्राण आणून रोज आपली वाट बघत रहायची .."
" कशाला करतेस काळजी ..मी चांगला आहे एकदम "
" तुझ्या शिवाय माझं आपलं असं कोण आहे रे , जीव लागतो नुसता ..."
" आता काहीही बोलू नकोस . मला ही शांतता आणि तुझं जवळ असणं इतकंच हवंयं. "
" आज घरी काय सांगून आलास ? " तिने विचारले .
" बोटीवर काम आहे ..." तो उत्तरला .
काही काळ निशब्द शांतता होती ..त्याने आवाज घोगरा करत विचारले
" तो रानगट होता का आज घरी ?"
" ह्मम... म्हणूनच तर यायला उशीर झालाय . नेहमीसारखा फुल्ल पिऊन झोपलाय तो तरराट ! "
आता मात्र वासुच्या डोळ्यांत त्वेश झळकला. तिच्या नाजुक कांतीला प्रेमाने बघत त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला . तिच्या हातांवर माराच्या खुणा पाहून त्याच्या मस्तकाची शीर तडकली . त्याने तिच्या डोळ्यांत बघताच तिला रडायला आले . मुसमुसत ती त्याच्या कुशीत शिरली .
" सोन्यासारख अंग तुझं ..फुलासारखं मन ..
कस गं कसं सहन करते तू ?
मी अजूनही तयार आहे रेवू ...चल माझ्यासोबत . ऐक माझं ,मी तूला इथून खूप दूर घेऊन जातो . ह्या भीतीत किती दिवस वावरायचं? "
" इतकं सहज नाहीये रे माझ्यासाठी . मी मजबूर ..
तिचे डोळे भरून आले .
" तुझं इतकं मजबूर असणं आणि त्या रेड्याचं तुझ्यासोबत राहणं आता सहन होत नाही ग मला !"
तो कळवळून म्हणाला .
" ज्याला आजतागायत तुला घालून पाडून बोलण्यात , शिवीगाळ आणि मारझोड करण्यात जोर येत राहिला . त्या मूर्ख माणसासाठी तुझं आयुष्य बर्बाद करू नकोस रेवू !"
ती रडू लागली तशी त्याने तिला मिठीत घेतले . प्रेमाने तो तिचे केस सावरू लागला . नंतर बराच काळ तो तिच्यावर हळुवार स्पर्शाचा ..निखळ प्रेमाचा वर्षाव करत राहिला. नाव समुद्रात हिंदकळत होती कितीतरी फूट खोली वर जमीन आणि आकाशाच्या मध्यभागी दोन जीव प्रेमात न्हाऊन निघत होते . थकलेला तो तिच्या कुशीत झोपी गेला . काही काळ सरला तोच पहाटे मासेमारीहून आलेल्या बोटींचे भोंगे वाजले . त्याने डोळे उघडले .निरोपाची वेळ झाली होती . तिने एका बेसावध क्षणी त्याच्या मिठीतून वेगळे होत पाण्यात उडी मारली .
बोटी वरच्या लोकांनी त्या उडीचा आवाज ऐकला . त्या लोकांनी बोटीला तिथे नेत वासुच्या नावेला पून्हा किनाऱ्यावर आणून झावळ्यांनी झाकून ठेवले .
बोटीवरचे हे लोक बारा वर्षापूर्वीच्या त्या भयाण पहाटेचे साक्षीदार होते
जेव्हा रेवतीच्या नवऱ्याने वासुला अन् रेवतीला नावेत एकत्र पकडले . रेवतीच्या नवऱ्याचा क्रोध अनावर झाला अन् त्याने वासुला ठार केले . आपल्या प्रियकराचा आपल्या डोळ्यांदेखत म्रुत्यू बघून तिने तिथूनच पाण्यात उडी घेतली होती.
त्या दिवसापासून त्यांची नाव अधेमधे लोकांना पाण्यात दिसायची . तिला पाण्यात बुडविले ..तिचे तुकडे तुकडे केले ..दूर नेऊन सोडले तरीही ती पून्हा तशीच पाण्यात तरंगत सापडत राहिली . रेवतीचा नवरा ठार वेडा झाला.
शेवटी त्यांची ती भेट अखेरची असली तरी चिरंतन ठरली . कोकणात कुठल्याशा किनारी आजही ते तितक्याच आवेगाने भेटतात . आणि त्याच नावेतून समुद्रात जातात, पहाट होई पर्यंत .

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.