पैसा झाला खोटा

"अहो ऐकलत का?"

मीनाक्षी स्वयंपाक घरातून सुधीरला हाक मारत होती. रोज सकाळ-संध्याकाळ, दिवस-रात्र मीनाक्षीची बडबड सुरू असायची. एकदिवस असा गेला नव्हता की तिचं थोबाड बंद असायचं. अहो हे करा, अहो ते करा.

"साखर संपलीय घरातली, कधी घेऊन येणार? वाण्याची उधारी पण वाढलीय. देवा! का म्हणून माझं लग्न याच्याशी लावून दिलास? नशीब माझं फुटकं की असला नवरा पदरात पडलाय. काडीचाही उपयोग नाही मेल्याचा. ऐकू येतंय काय मी काय म्हणतेय ते? की कान फुटलेत तुमचे?"

सुधीर त्याच्या कामात मग्न होता, त्याला मीनाक्षी काय बडबड करतीय त्याच भान पण नव्हतं. त्याला भांडी आदळण्याचा आवाज येतो.

मीनाक्षी स्वयंपाक घरातून भांडी आपटत बाहेर येते. सुधीर एकदम दचकून,

"अ आ अगं मीनाक्षी, काय झालं भांडी आपटायला? एवढी का वैतागली आहेस?"

मीनाक्षी सुधीरच बोलणं न ऐकत, त्याचं बोलणं अर्धवट थांबवत...

"मी मगाचपासून काय ताशेरे वाजवतेय काय?", मीनाक्षी रागातच म्हणाली.

"काय झालंय तरी काय? का एवढं स्वतःला त्रास करून घेत आहेस?", सुधीर शांत राहतच विचारतो.

"तुम्ही गप्प बसा, मला तुमचं काही एक ऐकायचं नाही. तुम्ही बसा चित्र रंगवत. स्वतःला काय तुम्ही चित्रकार समजताय काय? चार चित्रं रंगवली म्हणजे कोण तुम्हाला पैसा देणार नाही की पुरस्कार देणार नाही. त्यापेक्षा घरची काम करा. आई गं! माझा हात", मीनाक्षी एकदम किंचाळते.


"काय झालं तुझ्या हाताला?", सुधीर मन दुखावलेल्या भावनेत मीनाक्षीला विचारतो.

तेवढ्यात फोनची रिंग वाजते. ट्रिंग..ट्रिंग..ट्रिंग

"आता कोण मेलं फोन करतंय? मुडदा बसवला त्याचा", मीनाक्षीला राग अनावर झाला होता. रागाच्या भरात ती काय करेल याची तिची तिला कल्पना नव्हती. रागा-रागानेच तिने फोन उचलला.

"हॅलो, कोण तडपडालय की फोन केलाय? कोण पाहिजे? का फोन केलाय?"

फोनवर कोण असेल याची पर्वा न करता ती रागात बोलत होती...

तिकडून फोनवर बोलणं सुरू झालं.

"सुधीर कलाकार यांच्या घरी फोन लागलाय का? मी सयाजीराव सुभेदार नगरपालिका शाळा क्रमांक- ०५ मधून आपल्या पाल्याचा वर्गशिक्षक मारुती पाटील बोलतोय"
सुधीर चित्रे रंगावतो म्हणून त्याच आडनावपण छंदाप्रमाणेच कलाकार होत वाटत.

मीनाक्षी स्वतःला सावरत, "माफ करा मास्तर, मी कोण बोलतंय हे न ऐकताच भरपूर काही वाकडं बोलून गेले."

मारुती पाटील बोलले, "अहो ते जाऊद्या मी काय बोलतोय ते ऐका. तुमचा मुलगा सूर्य,

मीनाक्षी मास्तरांचं बोलणं मध्येच थांबवत...

"सूर्य, काय सूर्याचं काय आमच्या?"

मास्तर, "तुमच्या सूर्याचा अपघात झालाय, त्याला सरकारी इस्पितळात दाखल केलंय."

हे शब्द कानावर पडताच आभाळ कोसळावं तसं मीनाक्षी धप्पकरून खाली पडते. तिच्या हातातला फोन बाजूला पडतो आणि ती घया घया रडायला सुरुवात करते. मीनाक्षी खाली कोसळलेली बघून सुधीर भानावर येत फोन घेतो. मास्तरांशी बोलतो आणि याचंही मन चलबिचल व्हायला लागतं पण स्वतःला सावरत तो फोन ठेवतो.

सूर्य हा सुधीर आणि मीनाक्षी चा एकुलता एक मुलगा होता. लग्नानंतर तब्बल सहा वर्षांनी जन्मलेला त्यांचा कान्हा होता.

सोमवारचा दिवस होता, वडगावाचा बाजार होता. बाजार म्हंटल तर सगळंच आलं. कुणी भाजीपाला विकत घेत होते, तर कुणी फळं, अंडी, अशा बऱ्याच वस्तू विकत घेत होते. सुधीरच घर तसं बाजारातच होतं. सुधीरच्या घरापर्यंत शेळ्या-मेंढ्यांची रीघ लागावी तशी माणसांची रीघ लागली होती. सगळीकडं किल-किल सुरू होती.


"मावशी, कांदं घ्या की ५ रुपया किलो हाय"

"हे लसूण आला १५ रुपया किलो"

"हे घ्या घ्या घ्या घ्या ५ रुपया किलो, १५ रुपये किलो"

नुसता लोकांचा दंगा ऐकू येत होता. तिकडं सुधीरच्या घरातपण किल-किल सुरू होती. तब्बल सहावर्षांतर कलाकार यांच्या घरी पाळणा हलणार होता. मीनाक्षीला बाळंतपणाच्या कळा मारायला सुरुवात झली होती. सूर्यास्थाची वेळ होती. मीनाक्षीला कळा सहन होत नव्हत्या. इस्पितळात घेऊन जायचं म्हंटल तरी जवळपास कुठेच इस्पितळ नव्हतं. पूर्वी बाळंतपण घरीच व्हायची. सुधीरची सावत्र आई होती जी गावची बाळंतपण करायची. स्वतःच्या लेकरांची बाळंतपण तिने केली नव्हती पण तिला चार पावसळ्यापेक्षा जास्तीच अनुभव बाळंतपण करण्याचा होता. मीनाक्षीला जोरात कळा मारायला सुरू झाल्या. ती अस्वस्थ होत चालली होती. शेवटी सावत्र सासूबाई ने तीच बाळंतपण यशस्वी होण्यासाठी अफाट कष्ट घेतले आणि गोंडस, निरागस मूल जन्माला आलं. त्याच रडणं आणि मीनाक्षीचा आनंद यांचा मिलाफ झाला होता. सुधीर बाप झाला आणि मीनाक्षी आई.
सुधीरला हा आनंद गगनात मावेनासा झाला त्याने सौरावैरा धावत सगळ्या बाजारात दवंडी पिटवली,
"मी बाप झालो, मी बाप झालो."

खरंच त्याच्या चेहऱ्यावरचे स्मित पाहण्यासारखे होते. सूर्यास्थावेळी त्यांचं बाळ जन्माला आलं होतं म्हणून त्यांनी त्याच नाव पण सूर्य असं ठेवलं होतं. का तर ती त्यांना देवाने दिलेली एकप्रकारची देणगी होती. सुर्यासारखी तेजोमय नजर त्या बाळाची होती. काळ बदलत गेला तशी परिस्थितीही बदलली गेली. सूर्य आता मोठा झाला होता.

"ये मीनाक्षी, उठ.", रडत रडतच तो तिला उठवायला लागतो. आपल्या काळजाच्या तुकड्याचा अपघात झाला हे ऐकून तिला जणू धक्काच बसला होता. तीही हंबरडा फोडतच सुधीरच्या कुशीत येऊन स्वतःला सावरायचा प्रयत्न करू लागली. लगेचच त्यांनी सरकारी इस्पितळात धाव घेतली तिथं मारुती पाटील मास्तर आपले दोन्ही हात जोडून देवाला प्रार्थना करत बसले होते. सूर्याचं अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दोघही पळत पळत अतिदक्षता विभागात जाण्याचा प्रयत्न करतात, पण डॉक्टर त्यांना धीर देत, "उपचार सुरू आहेत तुम्ही आत्ताच नाही भेटू शकत." असे म्हणतात.

दोघही डॉक्टरांना विनवण्या करू लागले,
"आम्हाला आमच्या पोराला बघू द्या. कसं असेल आमचं लेकरु."

तरीही डॉक्टरांनी नकारार्थी मान हलवत उपचारात अडथळा आणू नका म्हणाले आणि निघून गेले.

तिकडे पाटील मास्तर देवाला, "हे देवा, शंभू-महादेवा वाचावं रे या लेकराचा जीव."

सुधीर-मीनाक्षी, मास्तरांजवळ येतात आणि काय झालं, कसं झालं म्हणून रडायला सुरुवात करतात.

पाटील मास्तर घडलेली सगळी घटना सांगायला लागतात.
"शारीरिक शिक्षणाचा तास होता, सगळ्या मुलांना वर्गाबाहेर आणलं होतं. मैदानात सगळी मुलं खेळत होती. थोडी खो-खो खेळत होती तर थोडी कब्बडी आणि बाकीचे वेगवेगळा खेळ खेळत होती. तुम्हाला तर माहितीय की अशा तासाची मुले किती आवर्जून वाट पाहत असतात. आपण कितीजरी त्यांना एकत्र खेळ खेळा असं म्हंटल तरी ते ऐकत नसतात. स्वतःच्या मनाचे राजे असतात लेकरं. थोड्यावेळाने अचानक मास्तर सूर्य, मास्तर सूर्य असा आवाज कानावर पडला. मी बघतो तर काय तुमचा सूर्य शाळेतल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरून खाली पडला होता. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. काय झालं कसं झालं हे विचारण्यात क्षणाचाही विलंब न करता सूर्याला इस्पितळ मध्ये दाखल केलय."
तुम्ही यायच्या आधी शाळेतली पोरं इथं येऊन म्हणाली की, "मास्तर सुर्याचा तोल जाऊन हा अपघात झालाय."

मी विचारलो, "काय? पण कसं?"

तर पोरं रडत रडत उत्तरली,

"नळाला पाणी येत नव्हतं म्हणून आम्ही पाणी आहे की नाही हे पाहण्यासाठी टाकीवर चढलो होतो. पण काय माहिती की हे सगळं असं होऊन बसेल. आम्ही वरती चढलो होतो पण अचानक सूर्याचा तोल गेला आणि तो धप्पदिशी खाली कोसळला. आकाशातून विमान जसं खाली कोसळावं तसं सूर्य टाकीवरून खाली पडला होता. डोक्यातून रक्तस्राव होत होता तो थांबता थांबत नव्हता. त्यावेळीच आम्ही तुम्हाला हाक मारली."

हे बोलून पोरं रडत रडत निघून गेली.

मास्तर डोक्याला हात लावून खेद व्यक्त करू लागले...

आणि परत परमेश्वराला बोलू लागले,

"काय केलं त्या निष्पाप लेकरानं की त्याला हा त्रास भोगायला लावतोयस? मुलं ही देवाघरची फुलं असतात मग त्याच मुलांवर काळाचा घाला का? का त्या निष्पाप मुलाची परीक्षा घेतोयस? नऊ महिने आपल्या उदरात वाढवून जन्म दिलेल्या आईचा तरी विचार कर देवा."

मास्तरांबरोबर सुधीर आणि मीनाक्षी यांची सत्वपरिक्षा सुरू होती. कारण सुधीर-मीनाक्षीचा पोटचा गोळा अन मास्तरांचा तो लाडका विद्यार्थी होता.

अतिदक्षता विभागातून डॉक्टर बाहेर येतात, त्यांचा चेहरा उतरलेला असतो.

उतरलेल्या चेहऱ्यात डॉक्टर म्हणतात,
"डोक्यावर पडल्यामुळे त्यामध्ये बारीक दगड गेलेत, रक्तस्राव पण खूप झाला आहे आणि आता परिस्तिथी खूप नाजूक होत चालली आहे. त्याचंऑपरेशन करावं लागेल."

सुधीर दचकलेल्या अवस्थेत,
"काय? ऑपरेशन करावं लागेल? डॉक्टर, किती खर्च येईल?"

"साधारण ३ ते ४ लाख रुपये", डॉक्टर उत्तरले.
सुधीर-मीनाक्षीचा चेहरा एवढे पैसे लागतील हे ऐकून रडकुंडीला आला. अगोदरच खायचे वांदे असणाऱ्या कलाकार कुटुंबाला लाखो रुपये उपचारासाठी लागणार म्हंटल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली.

"कुठून आणणार इतका पैसा? कोणाकडे हात पसरणार आता?"

मास्तर पण एवढे पैसे म्हणून दचकले होते. मास्तरांना न राहवून ते कलाकार कुटूंबाला आपल्या हातून थोडीका होईना मदत म्हणून लाख-दीड लाख रुपये घेण्यासाठी विचारले.
कलाकार कुटुंबाला सध्यस्थीतीला पैशाची अत्यंत गरज होती. पण ते मास्तरांकडून कसे घेणार हा विचार करू लागले.

तेवढ्यात मास्तर म्हणाले,
"तुमचा सूर्य हा माझ्यापण लेकरसारखा आहे, माझा विद्यार्थी, अभ्यासात हुशार, माझा लाडका आहे. त्याच्यासाठी मी इतकं तरी करू शकतो."

कलाकारांना मदत नाकारून चालणार नव्हती म्हणून त्यांनी आशेचा किरण म्हणून पाटील मास्तरांकडून मदत घेण्यास तयार झाले. पण त्यांच्या मनात एकीकडे अपघातग्रस्त आपलं मूल आणि दुसरीकडे उरलेल्या पैशाची जुळणी कशी करायची या विचाराने त्यांच्या मनाची छिन्नविच्छिन्न तुकडे झाली होती, मन एकदम त्रस्त झालं होतं.

त्यांनी डॉक्टरांना उपचार सुरू ठेवण्यास सांगितले खरे पण उरलेला पैसा कसा जमा करायचा हा विचार त्यांच्या मनाला सतावत होता. इस्पितळात दूरचित्रवाहिनी सुरू होती, तेवढ्यात दूरदर्शनवर एका बातमीचे प्रसारण झाले. राष्ट्रीय स्थळावर एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

स्पर्धा होती,
प्रतिष्टित राष्ट्रीय कला पुरस्कार-१९९० अंतर्गत रंगरेखा (चित्रकलेसाठी). जो कोणी ही स्पर्धा जिंकेल त्याला राज्य सरकार कडून ५ लाख रुपये रोख प्रथम क्रमांकाचे बक्षीस होते. ती बातमी ऐकून कलाकार पती-पत्नीच्या जीवात जीव आला.

मीनाक्षीच्यापण मनात, ध्यानीमणी नसताना सकाळी बडबड केलेले शब्द आठवले...

"तुम्ही बसा चित्र रंगवत. स्वतःला काय तुम्ही चित्रकार समजताय काय? चार चित्रं रंगवली म्हणजे कोण तुम्हाला पैसा देणार नाही की पुरस्कार देणार नाही."

तिने सुधीरकडे बघून रडायलाच सुरुवात केली.
"माझं चुकलं मला माफ करा, मी तुम्हाला नको नको ते बड बड बडबडत गेले तरी तुम्ही ते शांतपणे ऐकतच होता. मला आत्ता कळतीय एखाद्याची किंमत काय असते. ज्यावेळी आपण स्वतः अडचणीत सापडतो त्याच वेळी आपल्याला प्रत्येक गोष्टीची खरी किंमत कळत असते. तिकडे माझं लेकरू आज मृत्यूशी झुंज देतंय आणि इकडे पैसा नाही म्हणून आपण विचार करत बसलो, तेवढ्यात ही बातमी कानी पडली. खरचं माझे आज डोळे उघडलेत, देवा तू आहेस याची जाणीव होतीय मला. तुझे कसे आभार मानू हेच मला समजेनासे झालंय."

हे ऐकून आजूबाजूच्या सगळ्यांचेच डोळे पाणावले.
मास्तरांनी सुधीरला जवळ घेत,

"हे बघा कलाकार, तुम्ही काळजी करू नका. तुमचा सूर्य लवकरच ठीक होईल. देवाची लीला असते, सगळं काही त्याच्या मर्जीने घडत असते. कदाचित तो तुमची परीक्षा घेत असेल. तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण होणार असा विश्वास मी व्यक्त करतो."

तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात आणि सांगतात,
"तुमचा मुलगा उपचाराला प्रतिसाद देत आहे, फक्त काळजी एकच आहे की तो प्रतिसाद ऑपरेशन होऊपर्यंत कायम राहायला पाहिजे. आम्ही त्याच्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत आणि त्याला नक्कीच यश येईल ही आशा आहे."

हे ऐकून कलाकार कुटुंबाला थोडा धीर येतो.
"मनामध्ये आशा धरून स्पर्धेसाठी तयारी करू आणि आपल्या लेकरासाठी ती जिंकूच", असं सुधीर म्हणतो.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रीतसर अर्ज गावचावडीमध्ये भरावा लागणार होता, पण सायंकाळचे ६:०० वाजले होते. सूर्यास्त पण झालेला असतो यावेळी अर्ज पण भरणं शक्य नसतं.

सुधीर मीनाक्षीला,
"तू घरी जा, इथली काळजी नको करू. आपला सुधीर आता बरा होणार, नको रडू डोळे पूस. उद्याच मी चावडीत जातो आणि अर्ज भरून येतो."

मीनाक्षी स्मितहास्याने, "हो नक्की."

अपघाताची वार्ता ऐकून कोमजलेला दोघांचा चेहरा आता संकटकाळी धावून आलेली स्पर्धा आणि बक्षिसाची रक्कम ऐकून खुलला होता.

मास्तरही दोघांना,
"मी आता निघतो, उद्या परत येईन. काही गरज वाटल्यास रात्री-अपरात्री कधीही आवाज द्या मी हजर राहीन."

मास्तर दोघांची रजा घेतात, मीनाक्षीही घरी जाते...

सुधीर तिथे असलेल्या बाकड्यावर बसून विचार करू लागतो. स्पर्धेबद्दल तर्कवितर्क लावू लागतो.
कशी असेल स्पर्धा? किती स्पर्धक असतील? आपल्याला आपल्या मुलासाठी का होईना बक्षीस मिळेल का? अशा अनेक प्रश्नाचे तो उत्तर शोधत असतानाच त्याला डुलकी कधी लागते हे कळत देखील नाही.

तिकडे मीनाक्षी घरी जाऊन पोराच्या विचारतच स्वयंपाक करू लागते. स्वयंपाक करण्यात आणि घरातील सगळं आवरण्यात वेळ कशी निघून गेली हे कळलंच नाही. रात्रीचे ९:०० वाजता ती परत डबा घेऊन इस्पितळात जाते. तिथे सुधीर बाकड्यावर आडवा झोपी गेलेला असतो. मीनाक्षी सुधीरला उठवते. तो उठतो पण त्याचे डोळे उघडता उघडत नव्हते. ती त्याला पाणी पिण्यास देऊन जेवणासाठी विचारते. पण सुधीर भूक नाही म्हणतो तू जेवून घे.

"अहो तुम्ही जर असं न जेवता राहिला तर कसं होईल, आपल्या पोराखातीर तरी दोन घास खाऊन घ्या.", मीनाक्षी बोलली.

नको नको म्हणत दोघांनीही थोडं थोडं खाऊन घेतलं. परत त्याच त्याच विचारांत दोघही तळमळत होते. वरून जरी थोडा आधार आहे असं वाटत असलं तरी आतून त्यांना या विचारांनी ग्रासलं होतं. विचार करता करता दोघही कधी झोपी गेले याचा अंदाजदेखील नाही आला. त्यानंतर सकाळी जेव्हा सूर्याची किरणे त्यांच्या चेहऱ्यावर पडली तेव्हाच त्यांना जाग आली.

काही तासांनी, साधारण १०:००च्या आसपास सुधीर एक नवी उमेद घेऊन अर्ज भरण्यासाठी गावचावडीच्या दिशेने निघणार तितक्यात मागून त्याला कोणीतरी हाक मारत आहे असं वाटलं, त्याने मागे वळून पाहिलं पण मागे कोणीच नव्हतं. मनातल्या मनात कदाचित भास झाला असेल म्हणाला आणि गावचावडीच्या दिशेने चालू लागला. अकरा-सव्वाअकराच्या आसपास तो चावडीत पोहचला. त्याने स्पर्धेबद्दल सेवकाकडे विचारपूस केली. सेवकाने सांगितले की, दोनच दिवसात ती स्पर्धा आयोजित केलेल्या वेळेत होईल.

सुधीर आतुरता दाखवत, "स्पर्धा नक्की कुठे होणार आहे?"
"स्पर्धा कोल्हापुरात होणार आहे", सेवक उत्तरला.

कोल्हापूर म्हणजे आपल्याच जिल्ह्यात, म्हणजे लांबपण कुठे जावं नाही लागणार. सुधीर देवाचे आभार मानू लागला की सगळं कसं एकदम धावून आलय मदतीसाठी...

"मला या स्पर्धेत माझ्या पोरासाठी सहभागी व्हायचं आहे, त्याचा काल अपघात झालाय, ऑपरेशन आहे त्यासाठी पैसे नाहीत. पण काल जेव्हा दुरचित्रवाहिनीवर स्पर्धेबद्दल समजलं तर थोडं जीवात जीव आलाय", सुधीर बारीक तोंड करून सांगू लागला.

"तुमचं नाव काय?", सेवकाने विचारलं.

सुधीर सेवकांच्या प्रश्नाला उत्तर देत, "माझं नाव सुधीर... सुधीर कलाकार."

"हे बघा कलाकार या स्पर्धेत तुम्ही सहभागी व्हा, मी तुमच्या पोरासाठी प्रार्थना करेन की तुम्हालाच पहिल्या क्रमांकाच बक्षीस मिळुदे म्हणून. शेवटी पोराचा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तुमच्यासारखा बाप पैसा नसताना ऑपरेशन करायचं म्हणून एवढी धडपड करतोय हे बघून मला तुमचा अभिमान वाटतोय. नाहितर आज कालची आई-बाप क्रूरकर्मा असलेली मी बघितल्यात. पैसा नाही म्हणून किती तरी पोरांना उकिरड्यात सोडून दिलेली माणसं मी या जगात पाहिल्याती. अहो एक वेळचं का होईना पोटभर देता येणारी पण क्रूरकर्मी पाहिल्याती. तुमचं पोर खरच खूप नशीबवान आहे की त्याला तुमच्यासारखा बाप भेटला.", सेवक बोलतच राहिला.

सुधीरलापण काहीच नसण्यापेक्षा आपण काहीतरी असल्याचा अभिमान वाटू लागला.

सेवकानं कालच आलेल्या अर्जांपैकी एक अर्ज कपाटातून काढून सुधीरला दिला आणि तो भरून द्या म्हणाला.
त्या अर्जाबरोवर एक माहितीपत्रक होतं ज्यात स्पर्धा नक्की कुठे, कधी होणार, बक्षिसांची रक्कम आणि पाहुणे कोण-कोण येणार ही समदी माहिती त्यात होती. चित्र कोणत्या विषयावर काढायचं हे मात्र स्पर्धेच्या वेळीच सांगण्यात येणार होत. सुधीरनं अर्ज भरून सेवकाकडं जमा केला आणि माहितीपत्रक आपल्याकडे ठेवून सेवकाची रजा घेऊन इस्पितळाचा रस्ता धरला. इस्पितळात पोहोचल्यानंतर त्याने सूर्याची विचारपुस केली.

डॉक्टरांना भेटून त्याने विचारले, "सूर्य बरा होईल ना?, त्याच्या उपचारात काही कमी करू नका, मी पैशाची जुळणा करत आहे."

येत्या दोन-चार दिवसातच ऑपरेशन करायचं होतं आणि स्पर्धा पण दोनच दिवसांनी होती.

"कलाकार तुम्ही काळजी करू नका, फक्त ऑपरेशन साठी येणारा खर्च लवकरात लवकर जमा करा", डॉक्टर सुधीरला सांगू लागले.

सुधीर इस्पितळाच्या बागेत जाऊन बसला आणि परत स्पर्धेच्या विचारात गुंतून गेला. जस जसं वेळ निघून जात होती तस तसं सुधीरला चिंता वाटू लागली होती. आजचा दिवस गेला, उद्याचाही दिवस गेला. शेवटी आतुरता असलेल्या स्पर्धेचा दिवस उजाडला. गेली दोन दिवस काळजीने व्याकुळ झालेल्या कलाकार कुटुंबासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. काहीही झालं तरी ही स्पर्धा त्यांना जिंकायचीच होती, जर ही स्पर्धा जिंकली नाही तर त्यांच्या सूर्याचं ऑपरेशन होणार नाही हे त्यांना माहीत होतं. मास्तरांनी देऊ केलेल्या लाख-दिडलाखत पण त्याच्यावर उपचार होणं कठीण होत. सकाळी लवकर उठून सुधीर स्पर्धेसाठी तयार होतो. रोज ओरडणारी, चिडचिड करणारी मीनाक्षी आज अत्यंत मनमिळावू असल्यासारखी वागत होती. जणू सूर्यच्या अपघातामुळे त्यांच्या जीवनाचा कायपालटच झाल्यासारखं. आज तिने सुधीरसाठी लवकर उठून स्वयंपाक केला होता. चपाती भाजी का होईना तिने त्याच्यासाठी केलं होतं.

"मीनाक्षी आवर मला जायला उशीर होतोय", सुधीर गडबड करत.

मीनाक्षी सुधीरला उत्सुकतेने,
"अहो जरा सावकाश, सगळं घेतलाय ना? रंग, ब्रश, पेन्सिल सगळं घेतलंय ना? काही विसरला तर नाही ना?"

"नाही नाही मी काही विसरलो नाहीय, जर तू अशीच प्रश्न विचारत बसलीस तर मी एक विसरेन आज स्पर्धा आहे ते. अगं मला उशीर होईल आवर ना पटकन", मीनाक्षी ने दिलेला चहा फुकत फुकत पीत सुधीर उत्तरतो.

सकाळी लवकर उठून केलेला डबा ती त्याला देते आणि सुधीर स्पर्धेसाठी सज्ज होत कोल्हापूरला जायला निघतो. वाटेतच इस्पितळ लागतं म्हणून मीनाक्षी पण सुधीरबरोबर बाहेर पडते. आज दोघांचा चेहरा वरून जरी हसरा दिसत असला तरी त्यांचा मन आतून खूप निराशाजनक होत. दोघांनाही पोराची काळजी वाटत होती. वाटेत दोघही वेगळी होतात. मीनाक्षी इस्पितळात जाते तर सुधीर मिळालेल्या बसने कोल्हापूर गाठतो. गाडीतून उतरल्या उतरल्या इकडं तिकडं नजर टाकतो तर काय, त्याला सगळीकडं स्पर्धेची भली मोठ्याली पोस्टर लावलेली दिसतात.

खुद्द मुख्यमंत्री ना. प्रकाशरावजी जावळेसाहेब यांना राष्ट्रीय स्पर्धेच्या पोस्टरवर बघून सुधीरची मान आणखीनच उंच होते. मुख्यमंत्री साहेब मूळचे कोल्हापूरचे असल्याकारणाने तो एकटक त्या पोस्टर्सवर नजर फिरवत होता पण वेळेचं भान ठेवत तो नजर हटवत स्थानकाच्या बाहेरच्या बाजूला जातो आणि वडाप/बस येण्याची वाट बघतो.

थोड्यावेळानं वडापवाला येतो.
"साहेब कुठं सोडायचं तुमास्नी?" वडापवाला विचारतो.

"केशवराव भोसले नाट्यगृहात जायचं आहे, सोडाल का मला तुम्ही तिकडं?", सुधीर वडापवाल्याला उत्तर देऊन परत प्रश्न करतो.

"व्हय सोडतो की बसा गाडीत", वडापवाला गिऱ्हाईक मिळालं या आनंदानं बोलतो.

गाडीत आधीपासून ४-५ गिऱ्हाईकं तशी होती, पण सकाळपासून वडापवाल्याचा मोजकाच धंदा झालेला आणि आता गिऱ्हाईक मिळाल्यामुळं त्याला आनंद झाला होता.
वडापवाल्याची एक अतिशय घाणेरडी सवय होती, ती म्हणजे चांबार चौकश्या करण्याची...

सुधीर गाडीत बसतो न बसतो वडापवाल्याची चांबार चौकशी सुरू झाली,

"ते नव्ह साहेब, तुम्ही नाट्यगृहात कश्यापाई जाताय?"

सुधीर एकदम हळू आवाजात,
"आज नाट्यगृहात स्पर्धा आहे, प्रतिष्टीत राष्ट्रीय कला स्पर्धा-१९९० अंतर्गत रंगरेखा. या स्पर्धेत मी माझ्या मुलासाठी सहभागी झालोय त्यासाठीच जातोय."

"मुलासाठी?", वडापवाला न समाजल्यासारखं.

"माझ्या मुलाचा अपघात झालाय आणि त्याच्या उपचारासाठी पुरेसे पैसे नाहीत, मी एक चित्रकार आहे आणि ही स्पर्धा चित्रकारांसाठी राज्यसरकारनं ठेवलीय. ही स्पर्धा मी जर जिंकलो तर माझ्या मुलाचं ऑपरेशन मी करू शकेन, नाहीतर मुलं गमवावं लागेल इतकी गंभीर स्थिती आहे त्याची.", सुधीर दबक्या आवाजात त्याला सांगतो.

वडापवाल्याला गहिवरून येतं आणि म्हणतो,
"साहेब तुम्ही कायबी काळजी नका करू, त्यो आहे वरती बसलेला त्यो करील समद नीट. तुमास्नीच बक्षीच मिळूनदे अशी मी प्रार्थना करतो त्याच्यापाशी."

त्यानंतर त्यांचं काहीच संभाषण नाही होत, सगळी एकदम शांत बसलेली असतात, तेवढ्यात नाट्यगृह येत.

"साहेब, हे घ्या आलं बघा स्पर्धेचं ठिकाण, आपल्या कोल्हापूरची शान केशवराव भोसले नाट्यगृह.", वडापवाला सुधीरला सांगतो.

सुधीर गाडीतून उतरत वडापवाल्याला प्रवासाचे पैसे देत असतो तेवढ्यात,

वडापवाला सुधीरला,
"नको साहेब तुमच्या प्रवासाचे भाडे मला नको, तुम्हीच आज वाईट स्थितीत आहात अशावेळी तुम्हाला पैशाची गरज आहे, ते पैसे ठेवा तुमच्यापाशी तुम्हाला उपयोगी येतील. थेंबे थेंबे तळे साचे, तसे थेंबे थेंबे पैसा साचे, म्हणून तुम्ही ठेवा. हा एक पैसा तुमच्या पोराच्या उपचारासाठी अतिमोलाचा आहे."

सुधीरला जणू वडापवाल्याकडून पोरासाठी आशीर्वादच मिळाल्यासारखं वाटलं. त्याने वडापवाल्याचे हात जोडून आभार मानले आणि रजा घेत नाट्यगृहाच्या बाहेरील बाजूस जाऊन थांबला. थोडा वेळ निघून गेल्यानंतर त्याने आत जाता जाता स्वतःला खाली झोकून नाट्यगृहाचे दर्शन घेतले आणि देवाकडे स्पर्धेसाठी आशीर्वाद मागितले.

सुधीरने नाट्यगृहात प्रवेश केला, बघतो तर काय...

नाट्यगृहात तोबा गर्दी झाली होती. इकडं बघावं तर गर्दी, तिकडं बघावं तर गर्दी. सगळीकडं गर्दीच गर्दी होती. जणू लग्नसमारंभ किंवा कोणतीतरी सभाच असावी. गर्दी बघून सुधीरला काही सुचेनासे झाले. मनातल्या मनात तो विचार करू लागला, इतकी गर्दी म्हणजे इतक्यांनी या स्पर्धेत भाग घेतलाय की ही स्पर्धा बघण्यासाठी गर्दी जमली असावी. त्याच्या मनात शंका-कुशंका येतच होत्या, त्याच विचाराने तो पुढे जात तेथे त्याला स्वयंसेवक दिसला.

"अहो इथे एवढी कशी काय गर्दी? एवढ्या सगळ्यांनी सहभाग नोंदवला आहे का स्पर्धेत?", सुधीर निराशाजनक होत स्वयंसेवकास विचारतो.

स्वयंसेवक, "छे! छे! अहो ही गर्दी म्हणजे स्पर्धा बघायला आलेली मंडळी आहेत. या स्पर्धेत मोजक्यांनीच सहभाग नोंदवला आहे."

स्वयंसेवकाचे हे उत्तर ऐकून सुधीरच्या जीवात जीव आला. सुधीर तसा परिस्थितीला एकाचे दोन हात करून, संघर्ष करून येणाऱ्या अडचणींचा सामना करणारा माणूस होता. पण पोराच्या अपघातानं त्याला असे नको ते विचार येत होते.

स्वयंसेवक, "बर माऊली, तुम्ही कोण म्हणायचं?"

"मी सुधीर कलाकार", सुधीर क्षणाचाही विलंब न करता उत्तरतो.

स्वयंसेवक सुधीरचा पेहराव बघत त्याला म्हणतो,
"माऊली, तुम्ही या स्पर्धेत भाग घेतलेलं दिसतायसा. कोणच्या गावचं आपण?"

"होय, मी स्पर्धक आहे आणि वडगावहून आलोय आत्ताच."

स्वयंसेवकाला कोणीतरी हाक देतं म्हणून ते सुधीरची रजा घेऊन तिकडे जातात. तेवढ्यात ध्वनीग्राहक यंत्रावरून स्पर्धेसाठी घोषणा होते. सगळ्या स्पर्धकांना एका बाजूला यायला लावतात आणि त्यांना रीतसर नोंदणीपत्रक जवळ बाळगण्यास सांगतात. थोड्याच वेळात स्पर्धा सुरू होणार होती. प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते त्याच उदघाटन करणार होते. फक्त पाहुणे मंडळी येण्याची वाट सगळीजण पाहत उभी होती. पाचच मिनिटांत पाहुणे मंडळी आली. त्यात होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. प्रकाशरावजी जावळे साहेब, त्यांच्याबरोबर मंत्रीमंडळातील इतर नेते मंडळी म्हणजेच महसूलमंत्री मा. ना. त्यात्यासाहेब टोपे साहेब, कला व क्रीडामंत्री मा. ना. शिवाजीराव खामकर साहेब, कोल्हापूरच्या महापौर मा. सौ. प्रियांका कांबळे आणि बरचश्या पाहुण्यांनी उपस्तिथी लावली होती. नाट्यग्रहामध्ये सगळ्यांच वाजत गाजत आगमन होत. सगळी मंडळी मंचावर स्थानापन्न होतात. सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने स्पर्धेच्या सभेला सुरुवात होते. नेतेमंडळींची भाषणे आटोपल्यावर शेवटी मुख्यमंत्री साहेबांबरोबर सगळेचजण स्पर्धकांना शुभेच्छा देतात आणि उत्तम रंगचित्रे काढावयास सांगतात.

सगळं कसं एकदम ठरलेल्या वेळेत होत होतं. स्पर्धकांच एक-एक करून मंचावर स्वागत होतं. सुधीर हे एवढं सगळं बघून भारावून गेलेला असतो. त्याच्या मनात आशा असते ती फक्त स्पर्धा जिंकायची. एकूण स्पर्धक पाहायला गेले तर जेमतेम १५ होते. पण त्यातूनही फक्त तीनच क्रमांक काढणार होते तीच दुगदुग सुधीरला सतावत होती. समोर तोबा गर्दी आणि मंचावर फक्त १५ स्पर्धक. असं वाटत होतं की एखाद्या राणीचं स्वयंवर आहे आणि हे १५ वर-स्पर्धक मंचावर, बाकी गावकरी समोर स्वयंवर पाहण्यासाठी बसली आहेत.

सर्वांना स्पर्धेचा विषय आणि नियम व अटी सांगून स्पर्धेला सुरुवात होते.

विषय असतो,

'ऐतिहासिक कोल्हापूर'.

आधीपासूनच मंचावर चित्र काढण्यासाठी लागणारे साहित्य ठेवलेले असते. एकंदरीत सर्व सुविधांयुक्त मंच तयार केला होता. सर्व स्पर्धक चित्रे काढायला सुरवात करतात. सुधीर पोराला नजरेसमोर ठेवून चित्र काढायला सुरुवात करतो.

विषय पण तसा कोल्हापूरीच असल्यानं सुधीरला चित्र काढायला त्रास नाही जाणवला. 'मी कोल्हापूरचा, कोल्हापूर आपलं' हा विचार तो करू लागला. कोल्हापूर म्हंटल तर पहिला आठवतं ते करवीर निवासिनी आंबाबई. अंबाबाई मंदिर हे एक ऐतिहासिक वैभव कोल्हापूरला लाभलं आहे. त्यानंतर आठवतो तो रंकाळा, शालिनी पॅलेस, न्यू पॅलेस अरेरे आपण आपल्या पंचगंगेला विसरलोच की अस मनात गुनगुनू लागला.

त्याने चित्र काढायला सुरुवात केली. बघता बघता त्याच चित्र पूर्ण व्हायला पण आलं. अतिशय सुरेख पद्धतीने सर्वच स्पर्धक चित्रं काढत होती. प्रेक्षकवर्ग पण आतुरलेला असतो, की कोणाला मिळेल बक्षीस, कोणाला मिळेल हा पुरस्कार. सुधीर आपला मग्न होऊन चित्र पूर्ण करायला लागतो. थोड्यावेळाने काही क्षण शिल्लक राहिल्याची घोषणा होते.
सुधीर दुसऱ्या स्पर्धकांच्याकडे कटाक्षाने बघतो, तेव्हा त्याच्या लक्षात येत की आपण चांगलं चित्र काढलय आपल्यालाच मिळणार बक्षीस, आपल्यालाच मिळणार पैसा माझ्या पोरासाठी. सुधीरनं कोल्हापूरचा वारसा ध्यानात घेत सर्वकाही आपल्या चित्रामध्ये दाखवलं होत. अंबाबाई मंदिराच्या तळापासून ते कळसापर्यंत, रंकाळ्याच्या पाण्यापासून ते पंचगंगेच्या पाण्यापर्यंत, कोल्हापूरात आल्या-आल्या ताराराणी पुतळ्यापासून ते पन्हाळा-जोतिबाच्या टोकापर्यंतच समद चित्रामध्ये दाखवलं होत. सुधीरने काढलेलं चित्र एकटक पाहावं असच वाटत होतं. जणू त्यालाच ते बक्षीस मिळणार या भावनेने आ वासून धरला होता. सुधीर आपण काढलेल्या चित्रावर शेवटचा रंगाचा हात फिरवत होता. तेवढ्यात वेळ संपली अशी घोषणा झाली. सर्व स्पर्धकांनी नियमांचे पालन करत जसे आहे तसे, आहे त्या स्थितीमध्ये चित्रे रंगवायची थांबवली. काहींची चित्रं पूर्ण तर काहींची अर्धवट पण राहिली होती. अर्धवट जरी राहिली असली तरी सगळ्यांची चित्रे पाहण्यासारखी होती. या चित्रकारांनी आपला जीव मुठीत ठेवून एकापेक्षा एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात सुधीरचा कटाक्ष फक्त पोरगं होत. त्यासाठीच तो ही स्पर्धा जीव की प्राण असल्यासारखं दिला होता. आयोजकांनी स्पर्धकांना खाली जाऊन बसण्यास सांगितलं. खाली जाता जाता त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. स्पर्धेचा निकाल लगेचच लावणार होते. परीक्षकांना मंचावर आमंत्रित करून त्यांची ओळख करून दिली. थोडावेळ परीक्षकांनी पण स्पर्धेचं महत्व सांगितलं.

"ही एक स्पर्धा आहे यामध्ये कोणी जिंकतं तर कोणाची हार होते. जे जिंकतील त्यांच्यासाठी एक उमेद असेल की भविष्यात यापेक्षाही प्रतिष्टीत स्पर्धा जिंकण्याची. पण ज्यांना ही स्पर्धा जिंकता नाही आली त्यांच्यासाठी एक अनुभव असेल ही स्पर्धा. जीवनामध्ये अपयश हे येतच राहतात फक्त त्या अपयशांना तुम्ही न खचता सामोरे जा. अपयशांशी दोन हात करून लढा, भविष्यात तुम्हीच जिंकाल हे नक्की."

परीक्षकांच बोलणं झाल्यानंतर ढगांचा जसा गडगडाट होतो तश्या टाळ्या त्यांच्यासाठी वाजल्या.

परीक्षक सर्व चित्रांचे निरीक्षण करतात. चर्चा करून खूप वेळानंतर एकमताने तीन क्रमांक काढून आयोजकांना देतात. इकडं सुधीरचे हृदयाचे ठोके वाढलेले असतात. त्याला फक्त आणि फक्त पोराचा चेहरा डोळ्यासमोर येत असतो. मान्यवरांना मंचावर आमंत्रित करण्यात येत. यावेळी महाराष्ट्राचे कला व क्रीडामंत्री स्पर्धेच्या निकालाला संबोधून चार-पाच वाक्य बोलतात आणि निकाल जाहीर करण्यास सांगतात.

सर्वांचं लक्ष निकालाकडे, सगळीकडे शांतता पसरते.
आयोजक निकाल जाहीर करू लागतात.

सुधीर देवाला हात जोडून प्रार्थना करू लागतो. सगळेच स्पर्धक निकालाच्या प्रतीक्षेत,

तर प्रतिष्टित राष्ट्रीय कला पुरस्कार-१९९० अंतर्गत रंगरेखा या स्पर्धेचं तृतीय क्रमांक जात आहे,

श्री. पांडुरंग सदाशिव गोडबोले यांना.

सूत्रसंचालक-
"मी आपल्या राज्याचे महसूल मंत्री मा. ना. तात्यासाहेब टोपे यांना विनंती करतो की, त्यांनी पांडुरंग गोडबोले यांना बक्षीसाचे ४ लाख रुपये रोख आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा."

टोपे साहेब बक्षीस देऊन गोडबोलेंचा सत्कार करतात, सगळीकडे टाळ्यांचा गजर वाजतो.

परत द्वितीय क्रमांकासाठी घोषणा होते, सभागृहात शांतता पसरते. कोण असेल दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी असा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. सगळे जण आतुरलेले असतात, तेवढ्यात दुसऱ्या क्रमांकाचे नाव पुकारत,

द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जात आहे,

श्री. सुधाकर शशिकांत रानभरे यांना.

सूत्रसंचालक-
"मी आपल्या राज्याचे कला व क्रीडामंत्री मा. ना. शिवाजीराव खामकर साहेब यांना विनंती करतो की, त्यांनी सुधाकर रानभरे यांना बक्षीसाचे ४ लाख, पन्नास हजार रुपये रोख आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा."

रानभरे यांच्यासाठी सभागृहातून जोरात टाळ्या वाजल्या. खामकर साहेबांनी रानभरे यांचा सत्कार केला. प्रथम क्रमांकाचे बक्षीस कोणाला जाणार याची सगळ्यांना उत्सुकता वाटू लागली.

वादळापूर्वी जशी शांतता पसरते तशी शांतता समद्या सभागृहात पसरली. सुधीर डोळे झाकून देवाला प्रार्थना करत होता. मलाच मिळुदे हे बक्षीस, त्याचे शरीर पूर्णपणे थरथर कापत होत, मन चलबिचल झाल्यासारखं वाटत होतं, बक्षिसाची ही एकच आशा त्याच्यासाठी अतिमोलाची होती.

सूत्रसंचालक-
"मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. प्रकाशरावजी जावळे साहेब यांना विनंती करतो की, त्यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस कोणाला मिळालं हे सांगून त्यांचा सत्कार करावा."

सगळ्यांच लक्ष साहेबांच्या बोलण्याकडे जात. तर अटीतटीच्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे,

श्री. सुधीर सुधाकर सुधारे यांनी.

"मी सुधारे यांना पाच लाख रुपये रोख बक्षीस आणि हा प्रतिष्टीत पुरस्कार घेण्यासाठी मंचावर आमंत्रित करतो."

मुख्यमंत्री साहेबांचं हे शब्द सुधीर कलाकाराच्या कानावर पडताच तो खाली ढासळतो आणि आता आपलं आयुष्यच संपलं म्हणून घया घया रडू लागतो. आपल्या पोराचं आता ऑपरेशन होणार नाही, मी बाप म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही असं तो स्वतःला समजू लागतो. त्याच्याकडे कोणाचं लक्ष पण नसतं. सगळे टाळ्या वाजवण्यात मंत्रमुग्ध झालेले असतात. मुख्यमंत्री साहेब सुधारे यांना बक्षीस व पुरस्कार देऊन सन्मानित करतात आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देतात. सुधीर सुधारेंवर सभागृहात बसलेल्या प्रेक्षकवर्गाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. तेवढ्यात मुख्यमंत्री साहेब एक महत्वाची टिप्पणी करतात.

मुख्यमंत्री जावळेसाहेब, "आज जरी आपण तीन जणांना बक्षिसे दिली असली तरी अजूनही दोन जणांना बक्षीसे देणं बाकी आहेत."

सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि एकमेकांमध्ये कुजबुजायला सुरुवात करतात.

आपल्या सुधीरचे डोळे पाणावलेले असतात ते पुसत पुसत तो साहेबांच्या बोलण्याकडे लक्ष देतो.

उपस्थित प्रेक्षकवर्गामध्ये संभ्रमवस्था पाहून प्रकाशरावजी जावळे साहेब,
"होय! अजून दोघांना मी मुख्यमंत्री फंडातून कलेला वाव देण्यासाठी बक्षिसे देणार आहे."

हे शब्द ऐकून परत सुधीरची आशा वाढते, तो साहेब पुढे काय बोलतात हे ऐकू लागतो. बाकीचेपण साहेबांचे हे ऐकून टाळ्या वाजवायला सुरुवात करतात, मधूनच शिट्या पण वाजवतात.

"जे भाग्यवान असतील त्यांनाच हे बक्षीस मिळेल कारण ही दोन्ही बक्षिसे आपण सोडत पद्धतीने काढणार आहोत. जे भाग्यवान चित्रकार असतील त्यांचा प्रत्येकी तीन लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करणार आहोत."

सुधीर मनातल्या मनात अचंबित होऊन,

"काय तीन लाख रुपये? म्हणजे जर मी भाग्यवान निघालो तर मला तीन लाख रुपये मिळणार? माझ्या पोराचं ऑपरेशन होणार? पण नाही, आपलं नशीब फुटकं आहे, आपल्याला नाही मिळणार हे तीन लाख रुपये, आपण काहीतरी कोणत्यातरी जन्मी पाप केलोय म्हणून आज अशी आपल्यावर वेळ आलीय असं तो विचार करू लागला. आपल्या लेकरावर उपचार होतील असं काही वाटत नाही, तो आपला काही दिवसांचाच सोबती राहील, आपल्या नशिबी पैसाच नाही, जन्म झाला तो गरीब घराण्यात, आता पण अजून गरीबच. आपल्यासाठी पैसा धार्जन नाही, मी तर म्हणतो आपल्यासाठी पैसाच खोटा हाय, बिनापैशाच आपल्या गरिबांसाठी काहीच नाही. म्हणूनच जे राबून मिळतंय ते फकस्त पोट भरण्यासाठी जातं. साठवून ठेवण्यासारखी कमाईच मिळत नाही, गरजेच्यावेळी पैसा नसल्यामुळं अशी ओढाताण करावी लागते. सगळ्यांसमोर हात-पाय पसरावं लागतं. देवा आमच्या नशिबी दिला आहेस अशी गरिबी, मी तुझ्या हात जोडून पाया पडतो तू असली गरिबी कोणालाच देऊ नकोस आणि दिलास तर रोजचं पोट भरून गरजेसाठी पैसा साठवलेला असावा असं भाग्य दे."
सुधीर आपल्या नशिबाला दोष देत स्वतःशीच बडबडत होता.
आयोजक उरलेल्या १२ स्पर्धकांना त्यांच्या जवळ असणाऱ्या नोंदणी पत्रकाची मागणी करतात. एक एक करून सगळ्यांची नोंदणी पत्रके गोळा करतात आणि मंचावर असणाऱ्या एका पुठ्याच्या पेटीत ठेवतात.

मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सोडतीला प्रारंभ होतो. व्यासपीठावरील पाहुण्यांच्या हस्ते एक नोंदणीपत्र (चिट्ठी) काढलं जातं, सगळ्यांच लक्ष चिट्ठीत कोणाचं नाव असेल याकडे जात. कोण असेल पहिला वहिला भाग्यवान आजच्या सोडतीचा? कोणाला मिळतील ३ लाख रुपये? अशी कुजबुज प्रेक्षक वर्गात सुरू असते.

सुधीर, "आता तरी माझं नाव असुदे" अशी प्रार्थना देवाकडे करत असतो तेवढ्यात,

मुख्यमंत्री साहेबांनी कलेला वाव देण्यासाठी दोन भाग्यवान चित्रकारांसाठी सोडत पद्धतीने काढलेला पहिला भाग्यवान विजेता आहे,

सगळे जण आतुरलेले असतात...

श्री. दामोदर सखाराम कुडीत्रे

सूत्रसंचालक-
"मी आपल्या कोल्हापूरच्या महापौर सौ. प्रियांका कांबळे यांना विनंती करतो की, त्यांनी दामोदर कुडीत्रेे यांना बक्षीसाचे ३ लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा."

महापौर बक्षीस देऊन कुडीत्रेंचा सत्कार करतात, फटाके वाजावीत तसे टाळ्या वाजतात.

सुधीर सभागृहातून बाहेरचा रस्ता धरतो, कारण त्याला कळून चुकलेलं असतं की आपलं नशीब आपल्याला साथ नाही देणार, देवाला पण आपल्यावर दया नाहीय असं गुनगुनत तो बाहेर जायला लागतो. तो दुसरा भाग्यवान कोणता चित्रकार आहे हे न ऐकताच पुढे जाऊ लागतो.
तेवढ्यात त्या पेटीतून दुसरी चिट्ठी काढली जाते आणि नाव निघतं,

श्री. सुधीर शशिकांत कलाकार याचं.

हे नाव कानी पडताच बाहेर जात असलेला सुधीर पाठीमागे वळतो. त्याला आश्चर्य वाटतं की त्याच नाव कसं काय आलं म्हणून. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात.

मनात म्हणतो,
"आज जर माझं नाव आलच नसतं तर माझा पोरगा आम्हला सोडून देवाघरी निघून गेला असता."

त्याच नाव आलं म्हणून त्यानं देवाचं आभार मानलं. सगळीकडे टाळ्यांचा एकसारखा आवाज गुनगुनू लागला. सुधीरला आयुष्यात त्याच्यासाठी इतका मोठा सन्मान कधीच मिळाला नव्हता.

सूत्रसंचालक-
"मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. प्रकाशरावजी जावळे साहेब यांना विनंती करतो की, त्यांनी सुधीर शशिकांत कलाकार यांना बक्षीसाचे ३ लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा."

सुधीरला व्यासपीठावर आमंत्रित केलं जात. मुख्यमंत्री साहेब सन्मानित करणार तेवढ्यात सुधीर साहेबांशी, मी हे बक्षीस स्वीकारण्याआधी मला थोडं बोलायचं आहे म्हणून परवानगी मागतो. साहेब हरकत नाही अशी मान हालवून परवानगी देतात.

(वाचकहो, सुधीर सगळ्यांसमोर काय सांगणार याचा अंदाज आपल्याला आलाच असेल)


सुधीर बोलायला सुरुवात करतो,

"मंडळी, आज मी इथे आपल्यासमोर उभा आहे त्याच कारण म्हणजे नियतीने आमच्यावर आणलेला आमच्या आयुष्यातील अत्यंत खडतर प्रसंग. ४-५ दिवसांपूर्वी, संध्याकाळची वेळ होती. त्यावेळी आमच्या पोराच्या मास्तरांचा फोन आला की आमच्या लेकराचा अपघात झालाय. शाळेच्या पाण्याच्या टाकीवरून त्याचा तोल जाऊन खाली पडला आणि डोक्याला मुक्का मार लागला होता. आम्ही इस्पितळात धाव घेतली तर माझा पोरगा सूर्य याचे उपचार सुरू होते. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की, ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी ३ लाख रुपये तरी लागतील. तुम्हाला तर माहितीय की या जगात पैशाशिवाय काहीच चालत नाही. आमची परिस्थिती एकदम गरीब आहे. दोन वेळचं साधं अन्न आम्हला मिळणं कठीण आहे. माझं पोर सहा वर्षानं आम्हाला झालं होतं. परिस्थिती गरीब असूनपण आम्ही त्याला कधी कशाचीबी कमी केली नाही. पण ३ लाख रुपये आमच्यासाठी खूपच आहेत. ते पैसे कसे जमा करायचे हा विचार आम्ही करतच होतो तोवर सुर्यच्या मास्तरांनी आम्हाला लाख-दीडलाखाची मदत करतो म्हणाले. त्यांचे उपकार कसे फेडायचे हेच मला कळत नाही. पण उरलेल्या पैशांचं काय? कोठून आणणार आम्ही हा पैसा? या विचारांनी आम्हा सर्वांना ग्रासलं होत तेव्हाच आमचं नशीब आमच्यासाठी चालून आलं. दुरचित्रवाहिणीवर या स्पर्धेची बातमी आम्हाला समजली. मी एक चित्रकार आहे, कधी इतक्या मोठ्या स्पर्धेत म्हणण्यापेक्षा मी कधीच कोणत्याच स्पर्धेत सहभागी झालो नव्हतो. ही स्पर्धा माझ्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न होता. जर मी आज ही स्पर्धा जिंकलो नसतो तर माझ्या लेकराचं आज ऑपरेशन झालं नसतं. मी खूप आशेने आलो होतो, पण पहिल्यापासून असं वाटू लागलं की आपलं नशीब नाही. आपल्याला नाही मिळणार सोडतीचपणं बक्षीस, म्हणून मी आता जातच होतो पण शेवटी मला नशिबाने साथ दिलीच. आता मी या पैशातून माझ्या सूर्याचं ऑपरेशन करू शकेन. नाहीतर आजपर्यंत माझ्यासाठी पैसा खोटाच होता. माझ्याकडे यायचा पण तो कधी राहायचा नाही. गरिबीमुळे तो कधी संपून जायचा याचा ठावठिकाणा पण लागायचा नाही. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे, तुमचे आशीर्वाद आम्हाला द्या", असं म्हणता म्हणता त्याला अश्रू अनावर होत नाहीत आणि तो व्यसपीठावरच रडू लागतो.

मुख्यमंत्री साहेब सुधीरला सावरण्याचा प्रयत्न करतात. सभागृहात सगळीकडे शांतता पसरलेली असते. सगळ्यांच्याच डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. टाचणी पडल्यावर तिचापण आवाज ऐकू येईल इतकी शांतता पसरलेली असते.

सुधीर स्वतःला सावरत आपलं बोलणं थांबवतो. त्यानंतर मुख्यमंत्री साहेबसुद्धा सुधीरला बक्षीसाचे तीन लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करतात. परत एकदा सुधीरसाठी आणि त्याच्या या त्यागासाठी जोर-जोरात टाळ्या वाजवतात. तोही सगळं आनंदाने स्वीकारतो. स्वतः मुख्यमंत्री साहेब सूर्यला कोणत्या इस्पितळात ठेवलंय विचारून मी भेटून जाईन म्हणतात.

अशारीतीने सुधीरला बक्षीसाचे सोडत पद्धतीनेे का होईना ३ लाख रुपये सूर्यच्या उपचारासाठी मिळतात.

स्पर्धा झाल्यानंतर, सुधीर आपली पिशवी घेऊन परतीच्या वाटेला लागतो. त्या पिशवीत तो त्याला मिळालेले बक्षिसी रक्कम ठेवलेला असतो. बसस्थानकावर पोहोचल्यावर त्याला सकाळचा वडापवाला दिसतो, तो त्याच्याजवळ बक्षीस मिळाले म्हणून सांगायला व हक्काने सकाळचे भाडे देण्यासाठी जात असतो तेवढ्यात त्याला पाठीमागून कोणीतरी हाक मारतं.

"सुधीर ये सुधीर", असा आवाज त्याला ऐकू येतो. सुधीर पाठीमागे वळून पाहतो तर त्याला कोण हाक मारतय हे कळत नाही म्हणून तो परत इकडे तिकडे कोण हाक मारली पाहतो तर त्याची बहीण सुगंधा त्याला दिसते. तिनेच त्याला हाक मारलेली असते, सूर्याचा अपघात झाला ही वार्ता तिच्यापर्यंत पोहोचली होती म्हणून त्याला पाहायला आज वडगावला जात होती. सुधीरजवळ सुगंधा येते आणि काय झालं? कसं झालं? याची डोळ्यात पाणी आणून विचारपूस करू लागते.

सुधीर तिला रडू नको, आधी डोळे पूस म्हणतो. ती तोंडाला पदर लावून हुंदक्या देत तोच पदर डोळ्यांजवळ नेऊन डोळे पुसते.

सुधीर, "मी तुला सगळं काही सांगतो, फक्त दोनच मिनिटे मला दे. सकाळी भेटलेल्या वडापवाल्याला त्याचे भाडे देऊन येतो तू इथेच थांब."

पैसे द्यायच्या हेतूने तो मघाशी वडापवाला उभा असलेल्या दिशेने जातो, पण बघतो तर काय? वडापवाला आपले प्रवासी घेऊन कधीचा निघून गेलेला असतो. त्याला मनात दुगदुग लागते की तो समोर येऊन पण आपण माणुसकीच्या नात्यानं मदत केलेल्या महामानवाला जाता जाता भेटू पण शकलो नाही आणि त्याचे प्रवासाचे भाडे पण देऊ शकलो नाही. खरंच खूप उपकार झाले त्याचे म्हणून सुधीर तिथेच उभा राहून त्याच्यासाठी हात जोडून प्रार्थना करतो, नमस्कार करतो.

तीच दुगदुग मनात ठेवत परत तो आपली बहीण उभी असलेल्या ठिकाणी जातो व तिच्याशी बोलू लागतो.

"चल, आपल्याला गावी निघायला हवं नाहीतर गाडी चुकेल", सुधीर उशीर होईल या शब्दांत सुगंधाला बोलतो.

सुगंधा, "अरे हो पण झालं तरी काय? तू सांगशील का मला?"

सुधीर, "सांगतो सगळं काही सविस्तर सांगतो पण आधी आपण गाडी पकडू, नाहीतर उशीर व्हायचा, गाडी पण मिळायची नाही. माझं पोर कसं असेल याची भीती वाटतेय मला, तू चल लवकर"

सुधीर-सुगंधा बसस्थानकात जातात. ते गाडी थांबते तिथे जाऊन उभे राहतात. तिकडे ध्वनिग्राहकावरून पुकारण्यात येतं की, बस क्रमांक ९२३७ कोल्हापूर-हातकणंगले जाणारी बस प्लॉट क्रमांक ३ वर थांबली आहे. ही बस वाठार-वडगाव-आळते मार्गे जाते. धन्यवाद!

दोघही हे ऐकून ९२३७ क्रमांकाच्या गाडीत बसतात. गाडीत बसल्यानंतर दुसरी एक सूचना ध्वनिग्राहकावरून पुकारण्यात येते ती अशी,

प्रवाशांना सूचना,
बसस्थानकावर कोणतीही बेवारस वस्तू दिसून आल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क करा. आपले दागिने, पर्स, मोबाईल फोन्स सुरक्षित ठेवा, चोरांपासून गर्दीमध्ये सावधानता बाळगा. अशी सूचना ऐकल्यानंतर सुधीर आपली पिशवी ज्यामध्ये बक्षीसाचे तीन लाख रुपये ठेवलेले असतात ते चापचतो आणि पिशवी घट्ट धरून बसतो. दोघं बहिण-भाऊ परत बोलू लागतात, तेवढ्यात गाडीही सुटते.

सुगंधा, "अरे घाईगडबडीत तुला विचारायच राहून गेलं. मी तुला इथे भेटले खरे पण तू कोल्हापूर मध्ये काय करतोयस बायको-पोराला तिकडं एकटं सोडून?"

सुधीरला तहान लागलेली असते म्हणून त्याच्याजवळ असणाऱ्या पिशवीमधील पाण्याची बाटली काढतो व बाटलीतील पाण्याचा घोट पितच बोलू लागतो,

"अगं त्याच काय झालं, आपल्या सूर्याचा अपघात झाला तेव्हा शाळेच्या मास्तरांचा फोन आला, ते म्हणाले की त्याला इस्पितळात नेण्यात आलंय तुम्ही लवकर या. आम्ही लागलीच इस्पितळात धाव घेतली. मास्तरांनी सांगितलं की सूर्यचा, शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरून तोल जाऊन अपघात झालाय आणि त्याच्या डोक्याला जबरी मार बसलाय. डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन करावं लागेल त्यासाठी ३ -४ लाख रुपये लागतील. तुला तर माहीत आहेच आपली परिस्थिती, कोठून आणणार इतके पैसे म्हणून डोक्याला हातच लावायची वेळ आली होती. मास्तरांनी धीर देत लाख-दीडलाखाची मदत करतो बोलले. पण ताई उरलेल्या पैशाच काय? याविचारतच होतो तर देवानं आपल्याला तारलं बघ. नाहीतर आज आपल्यापासून सूर्य कधीचा दूर गेला असता. दुरचित्रवाहिणीवर एका स्पर्धेचं प्रसारण करण्यात आलं होतं. त्या स्पर्धेत मी सहभागी झालो होतो. त्यासाठीच मी कोल्हापूरला आलो होतो."

सुगंधा आतुरता दाखवत,
"मिळाले तुला बक्षीस? काय झालं स्पर्धेत? कोणती स्पर्धा होती ती?"

"पहिल्या तीन मधलं बक्षीस तर मला मिळालं नाही पण बक्षीस मिळालं हे नक्की, आणि त्या बक्षिसाच्या पैशातून सुर्यच ऑपरेशन होईल आता", सुधीर तिला सगळी हकीगत सांगत असतो वेळ कसा निघून जातो हे त्यांना कळत नाही, तेवढ्यात वडगावपण येत.

दोघेही बसमधून उतरतात, सुधीर पिशवीला पकडून धरतो व चालायला लागतो. संध्याकाळ झाली होती अन पोराचीपण काळजी त्याला खूप वाटत होती म्हणून बहीण-भाऊ घरी न जाता सरळ इस्पितळात जातात. तिथे मीनाक्षी बाहेरच, सुधीर कधी येईल आता येईल की नंतर, बक्षीस मिळालं असेल ना? ऑपरेशन होईल ना हा विचार करतच ती बसलेली असते. सुधीर आणि नणंद दोघांना एकत्र येत्यालं बघून मीनाक्षी उठून उभारते.

सुधीर जवळ आल्यावर मीनाक्षी सुधीरला,
"अहो काय झालं स्पर्धेचं? मिळालं का तुम्हाला बक्षीस? होईल ना आता ऑपरेशन? काळजी करण्यासारखं काही नाही ना?"

असे अनेक प्रश्न ती सुधीरला विचारत होती.

"अगं हो हो हो, किती प्रश्न विचारशील? जरा धीर धर, सावकाश विचार काय विचारायचं आहे ते.", सुधीर निम्न आवाजात मीनाक्षीशी बोलू लागतो.

"बरं! सांगा की काय झालं आज?", मीनाक्षीला न रहावत ती परत प्रश्न करते.

सुधीरही तिने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत घडलेली सगळी घटना सांगतो. सुधीर जे सांगत होता त्याकडे मीनाक्षी टक लावून ऐकत होती. कधी मधूनच डोळ्यातून पाणी आणत होती तर कधी गालातल्या गालात हसत होती. सगळं सांगून झाल्यानंतर मीनाक्षी उड्याच मारू लागली, जसं की सुधीरला लॉटरीच लागली होती. त्यातल्या त्यात ती आणि सुगंधा म्हणजे नणंद-भावजय डोळ्यातून पाणी काढत एकमेकांच्या गळ्यात गळा घालून सांत्वन करत होत्या.

मीनाक्षी सुधीरला,
"अहो आपण डॉक्टरांना भेटूया का? मला सूर्याची काळजी वाटत आहे. उशीर नको व्हायला ऑपरेशनला मला आपलं लेकरू प्रिय आहे."

"अगं मी त्यासाठीच घरी न जाता ताईला घेऊन सरळ इथे आलोय. वेळ न घालवता डॉक्टरांना भेटून ऑपरेशन कधी करायचं हे विचारायला हवं", सुधीर पोराच्या कळकळीने मीनाक्षीला बोलतो.

"मला सुर्यला बघायचं आहे, तो कसा आहे आता पाहायचं आहे. मी त्याच्याजवळ बसते तुम्ही डॉक्टरांना भेटून या.", सुगंधा भाच्याबद्दल दोघांकडे विचारणा करते.

सुधीर-मीनाक्षी डॉक्टरांना भेटायला जातात आणि सुगंधा भाच्याजवळ जाते.

सुधीर डॉक्टरांना ऑपरेशनबद्दल विचारणा करतो.
"डॉक्टर साहेब, आम्ही पैशाची जुळणा केली आहे. आमच्या पोराचं लवकरात लवकर ऑपरेशन करा."

"ठीक आहे, आम्ही तयारीला लागतो. उद्याच त्याचं ऑपरेशन करायला घेऊया. तुम्ही आता सगळी रक्कम न भरता निम्मी रक्कम जमा करा, थोडे पैसे मी माझ्या पगारातून भरतो. बाकीचे ऑपरेशन नंतर दिलात तरी चालेल. तेच पैसे तुम्हाला सध्या बाकी गोष्टीसाठी उपयोगी पडतील. माणुसकीच्या नात्यानं एवढं तरी मी मदत म्हणून करू शकतो.", डॉक्टर सुधीरला पैसे भरण्यास पाठवतात.

त्याची पिशवी त्याच्या खांद्यालाच असते, पण बिचाऱ्याला हे माहीत नसतं की त्यात त्याला मिळालेले बक्षीसाचे तीन लाख रुपयांचं पाकीट नसतं.

तो व मीनाक्षी पैसे भरण्यासाठी जातात, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ऑपरेशनचे निम्मे पैसे जमा करण्यासाठी खांद्याला असलेल्या पिशवीतून पैशाचं पाकीट काढू लागतो तर त्याला कळतं की त्या पिशवीत मिळालेले पैसेच नाहीत. तो हे मीनाक्षीला सांगतो. ती डोक्याला हात लावते अन विचारते,

"अहो कुठे ठेवलंय तुम्ही ते पाकिट? जरा नीट बघा, असेल त्यातच."

"अगं खरंच मिळलेले पैसे नाहीत पिशवीत, कुठे गेले खरं पैसे? एवढा उपद्यव्याप करून मिळालेले ते पैसे. आता काय करायचं? कसं भरायचं पैसे? कसं करायचं सूर्याचं ऑपरेशन?", सुधीर रडकुंडीला येत मिनाक्षीशी बोलू लागतो.

दोघही विचारात पडतात की कुठे गेले पैसे? कोणी चोरलं तर नसेल ना? पण चोरीला कसे जातील? सुधीरने तर ती पिशवी पूर्ण प्रवासात स्वतःजवळच ठेवली होती. मग ते गेले तरी कुठे?

तो सगळीकडे पैशाचा शोध घेतो. पण पैसा काही मिळत नाही. बक्षीस मिळाल्यापासून आतापर्यंत काय काय घडले हे सगळं आठवायचा प्रयत्न करतो पण त्याला कळत नाही की नेमकं पैसे कसे-कुठे गेले. तो पळत पळत त्याच्या बहिनीजवळ जातो, मीनाक्षीही त्याच्या मागे मागे रडत जाते. दोघांचाही जीव भांड्यात पडलेला, काय करावे काहीच सुचत नव्हते.

सुधीर,"अगं ताई मला मिळालेले बक्षीसाचेे तीन लाख रुपयांचे पाकीट पिशवीत नाहीय, कुठे गेले काही कळेना, कसं होणार आता ऑपरेशन?"

सुधीर रडत रडतच सुगंधाशी बोलत असतो.

"काय? काय? पैसे हरवले? अरे कसे हरवले? तू आठवायचा प्रयत्न कर रे. अगोदरच तुला इतकी हालअपेष्टा सहन करून ते पैसे मिळालेत.", सुगंधापण घाबरलेल्या शब्दात सुधीरला सांगते.

सुधीर सुगंधाला सूर्य वर लक्ष ठेवायला सांगतो व तो आणि मीनाक्षी बसस्थानकाच्या दिशेने पैसे कुठे पडले का पाहायला जातात. दोघही खूप अस्थावस्थ झालेले, त्यांच नशिब त्यांना साथ देत नव्हतं. देवाने पण कदाचित त्यांची अग्निपरीक्षा घेण्याचेच ठरवलेले वाटत होते. संपूर्ण बसस्थानक पिंझुन काढतात पण त्यांना काही ते पैशाचे पाकीट सापडत नाही. तीन लाख रुपयांचं पाकीट जरी कोणाला मिळालं असेल तरी कोण परत देणार याची शाश्वती नव्हती. दुपारी तो ज्या गाडी ने आला होता त्या गाडीचा बसक्रमांक त्याला आठवत होता. तो त्या बसबद्दल विचारणा करतो तर ती बस एक फेरी करून परत आली होती आणि प्लॉट क्रमांक ६ वर उभी होती असं कळतं. मीनाक्षी आणि सुधीर दोघेही प्लॉट क्रमांक ६ च्या दिशेने बस उभी आहे का बघतात. बस उभी असलेलं बघून ते आतमध्ये जात, तो आणि सुगंधा बसलेल्या आसनावर बघतात की पैशाचं पाकीट तिथे पडले आहे का ते. तिथे मिळाले नाही म्हणून पूर्ण बस पालती घालतात पण तरीही त्यांचं शोधकार्य साथ देत नाही.

वाहक-चालक दोघांनाही त्या पाकिटाबद्दल विचारतात पण त्याचाही काही उपयोग होत नाही. पैसे सापडत नाहीत म्हणून तो साधं पोलिसात पण जाण्यासाठी धजावत नाही. कसं धजावणार इतक्या साऱ्या गडबड गोंधळात काही सुचेल का? मन स्थिर असेल तर लक्षात येईल ना की पोलिसांत तक्रार नोंदवायला पाहिजे ते. त्याच्या डोक्यात खूप काही सुरू होत. पोराचं ऑपरेशन, हरवलेले पैसे असं बऱ्याच भानगडी डोक्यात खूळ घालून बसल्या होत्या. त्यापासून कधी सुटका होईल असं सुधीरला वाटत होतं. हे एवढं रहाट-गाडगं समोर मांडलेलं असताना त्यांच्या डोक्यात काय सुचलं देव जाणे.

कोणती दुर्बुद्धी शिरली काय माहीत की तो मीनाक्षीला काहीच न बोलता घराच्या दिशेनं जाऊ लागला.

मीनाक्षी पाठीमागून, "अहो, कुठे जात आहात?, काही तरी बोला."

ती रडत रडत सुधीरच्या पाठीमागे जात होती. कलाकार कुटुंबाच्या आयुष्यातील हा सर्वात वाईट दिवस होता. यमदूत रेड्यावर बसून सुधीरच्या गळ्याला फास आवळण्याची वाटच बघून राहिला होता, इतकी वाईट वेळ सुरू होती.

तो धावत-पळत हुंदके देतच घराजवळ आला, मीनाक्षीही त्याच्या पाठी आपली साडी सांभाळत, रडतच आली. तोपर्यंत तो घरात जाऊन आतून कडी लावलेला असतो.

ती स्वतःचा जीव मुठीत धरून, दम भरला तरी त्याच्या मागे धावत आली होती व मीनाक्षी धापा टाकतच सुधीरला,

"अहो, काय करताय तुम्ही? सांगा की, दार उघडा."

मीनाक्षीला काय करायचं काहीच सुचत नव्हतं. ती दार जोर जोरात बडवत होती, दार उघडा, दार उघडा असं ठो ठो बोंबलत होती. पण सुधीर आतून काहीच प्रतिसाद देत नव्हता. तोपर्यंत सगळी शेजारी पाजारी जमा झाली होती. शेजाऱ्यांना माहीत होतं की, सूर्य इस्पितळात आहे. पण सुधीरचं असं अचानक येऊन आतमधून दरवाजा बंद करून घेणं हे न समजण्या पलीकडे होते.

तिकडं सुधीर आतमध्ये स्वतःवर रॉकेल ओतून घेत होता. तो आत्मदहन करून घेणार इतक्यात बाहेरून दरवाजा तोडून मीनाक्षी आणि शेजारी त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात. पण सुधीर त्यातूनही सुटत काडी ओढणार तेवढ्यात शेजाऱ्यातील एकटा सुधीरच्या कानशिल्यात लगावत हातातील काडीपेटी काढून घेतो आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो.

सुधीर रडत रडत हात-पाय जोडून,
"मला मरू द्या. मला नाही जगायचं. एवढं करूनपण माझा जीवनात काहीच उपयोग नाही."

सुधीर जोर जोरात हुंदके देत होता, सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होत.

"आता मी काय करू? कसं करू? मी आता कोणासाठी जगू? जे होतं नव्हतं ते सगळं गेलं. माझ्या जीवनाचा नुसता भडका उडालाय भडका. माझं पोर तिथं मरणाच्या दारात आहे, त्याच्यावर उपचारासाठी पैसा लागणार म्हणून मी स्पर्धेत भाग घेतला, मुख्यमंत्री साहेबांकडून बक्षिसपण मिळालं. तोच पैसा ऑपरेशनसाठी भरणार तर पिशवीत पाहतो तर स्पर्धेत मिळालेलं बक्षिसाच्या पैशाचं पाकिटच नव्हतं. मी आणि मीनाक्षीण समद बसस्थानक पालतं घातलं पण काही उपयोग झाला नाही."

सुधीरला स्वतःला सावरता येत नव्हतं, दबक्या आवाजातच तो हे सगळं रडगाणं सांगत होता.

सुधीर स्वतःवर रॉकेल ओतून घेतोय ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली, सगळी माणसं सुधीरच्या घराकडं यायला लागली. कोण कुणास ठाऊक, ही बातमी पोलिसांना दिली होती म्हणून पोलिस पण त्याच्या घराकडे पळत आले आणि पाप बिचाऱ्या सुधीरवरच हात उगरायला सुरू केले.

मीनाक्षी पोलिसांना,
"अहो त्यांना मारू नका, त्यांचा यात काहीच दोष नाही. सगळं आमच्या नशिबाचा खेळ आहे. आमचंच नशीब फुटकं की अशी आमच्यावर वेळ आली आहे."

मीनाक्षी पोलिसांना, सुधीरला मारू नका अशी गयावया करू लागली. गावकऱ्यांनी पण मारू नका म्हंटल्यावर पोलीस थांबतात व समज द्यायला लागतात.

"सुधीर असा का वागला? आत्महत्या करण्याइतपत काय झालय? कारण काय?" हे सारं ते विचारू लागले.

सुधीर डोळे पुसत, घडलेली सगळी घटना पोलिसांना सांगतो.

पोलीस पण एवढे हाल झाले हे ऐकून डोक्याला हातच लावले.

पण सुधीरला समज देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल न करायचे ठरवतात. आम्ही पैशाचा शोध घेऊ, यातून मार्ग निघेल तू काळजी करू नकोस असे आश्वासन देतात व निघून जातात.

सगळी शेजारी पण त्याला समज देऊन निघून जातात.

का कुणास ठाऊक की, ती रात्र कलाकार कुटुंबासाठी काळी रात्र ठरली. त्या रात्री सुर्यची तब्येत खूपच ढासळली. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करणं भागच होत. नाहीतर तो त्याच्या जीवनाच्या शेवटच्या घटका मोजत होता. जरी ती काळरात्र ठरली असली तरी उद्याच्या दिवसाचं काय? त्यांच्यासाठी ही वेळ खूप म्हणजे खूपच वाईट होती. त्यांच्या सूर्याचं ऑपरेशन होणार होत. पण पैसा कसा येणार? कुठुन येणार? हे त्यांना काहीच कळत नव्हतं.

रात्र सरली, सकाळ झाली. कोंबड्याच्या ओरडण्याची बांग ऐकू येत होती. कलाकार कुटुंब पण झोपलेलं होते, सूर्याची ताजी ताजी किरणे डोळ्यावर पडताच सुधीरला जाग आली आणि झोपेतच तो मीनाक्षी आणि सुगंधाला उठवू लागला. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू होता, ऑपरेशनसाठी आता पैसा कुठून आणायचा?

मीनाक्षी आणि सुगंधा आळस देतच उठल्या. कालच्या घडलेल्या क्षणांचे चित्र त्यांच्या डोळ्यासमोर येत होते. आजचा दिवस कसा असेल, पोराचं जर ऑपरेशन नाही झालं तर सगळंच उध्वस्त होईल याची भीती मीनाक्षीला वाटत होती. त्याच भीतीपोटीे ती उठते व आवरायला लागते.

मीनाक्षी मधूनच कसं होणार माझ्या लेकराचं म्हणून रडू लागते, तिची नणंद तिला समजावण्याचा-सावरण्याचा प्रयत्न करते, धीर देते.

"खरं सांगायचं झालं तर गरीबाच्या वाटणीलाच असं का येत? का एक झालं की एक भयंकर संकट वाट्याला येतं? का दुःखाच्या खाईत ओढून घेतलं जात? दिवसभर पोटासाठी राब-राब राबायचं, चार पैसे कमवायची, पण नंतर तेच पैसे अशा प्रसंगी एका क्षणात सपाट करून द्यायचे? हेच का आयुष्य? एखाद्याचा हेवा वाटावा इतकी वाईट स्थिती असावी? वाटतं की गरिबाला पण, आज इकडे तर उद्या तिकडे श्रीमंतांसारखं फिरायला जावं. बाहेरचं जग पहावं. पोरांसाठी पैसा जपून ठेवावा, त्यांना चांगलं शिक्षण मिळाव, मोठी होऊन साहेब व्हावीत हे वाटतच की. वाईट मार्गाने पैसा कमवून भल्या मोठ्या इमारती बांधणारी आहेत आणि सरळ मार्गाने पैसा कमवून झोपडपट्टीत राहणारी पण आहेत. का म्हणून आपल्यासारख्याचे हाल होतात?"

आपल्या कुटुंबाची दयनीय अवस्था पाहून सुगंधा डोळ्यात धारा येतील या भाषेत खूप काही बोलून गेली.

साधारण १०:००-१०:३० वाजलेले असतात तेव्हा शाळेच्या मास्तरांचा सुधीरच्या घरी फोन येतो.

"अहो कलाकार, मी आपल्या सुर्यचा मास्तर बोलत आहे. माफ करा शाळेच्या कामासाठी मी परगावी गेलो होतो त्यामुळे त्याला बघायला येऊ शकलो नाही. माझ्या कानावर आलं की त्याची प्रकृती चिंताजनक आहे, म्हणून मी ते काम सोडून आजच यायला निघालोय. त्याच ऑपरेशन कधी करणार आहेत? डॉक्टरांशी काही बोलणं झालं का?", मास्तर सुधीरला आपुलकीच्या शब्दात विचारत होते.

सुधीर,
"काल डॉक्टरांशी बोलणं झालं. ते म्हणाले की आज ऑपरेशन करणार आहेत, पण..."

"पण काय कलाकार?", मास्तर विचारतात.

"पण... पण पैसाची भीती आहे, बिना पैशाचं ऑपरेशन कसं होणार? मला जे बक्षीसाचे पैसे मिळाले होते ते काल कुठे पडले काहीच माहित नाही. सगळीकडे त्याचा शोध घेतला पण काही उमजेना झालय की कुठे गेले", सुधीर दबक्या आवाजातच मास्तरांना सांगतो.

मास्तर सुधीरला धीर देत,
"तुम्ही नका काळजी करू, सगळं ठीक होईल. पैशाची काळजी तुम्ही सोडून द्या. मी थोड्याच वेळात इस्पितळात येतो आणि ऑपरेशनचे पैसे भरतो."

"मास्तर तुमचे उपकार कसे फेडू हेच मला कळेना झालंय. तुम्ही जर नसता तर आज आमच्यावर जी वेळ आली आहे त्यासाठी सामोरे जाणं पण आमच्यासाठी कठीण झालं असतं."

मास्तरांशी बोलता बोलता नकळत सुधीरच्या नयनातून अश्रू ओघळतात. थोड्यावेळाने इस्पितळातून सुधीरला फोन येतो व ओरडायलाच सुरुवात करतात.

"अहो कलाकार, कुठे आहात तुम्ही? तुमच्या पोराची काय काळजी आहे की नाही तुम्हाला? इथं त्याच्याजवळ कोणीच नाही तुमचं. अहो त्याची स्थिती गंभीर होत चालली आहे. ऑपरेशन करायला लागणार आहे आताच्या आता. लवकर या तुम्ही."

"हो आलो...आलो आलोच लगेच", सुधीर घाबरतच उत्तरतो.

"काय लोकं असतात या जगात, साधं रुग्णाजवळ कोणीच नाही. जशी की त्याची काळजीच नाही या लोकांना. देवा पोराकडं बघून तरी त्याला प्रतिकात्मक शक्ती दे. बघतोयस ना तू किती ढासळल्या त्याची प्रकृती."

फोन ठेवता ठेवता इस्पितळामधून ही बडबड सुधीरला ऐकू येत होती.

सुधीर गरज भासेल म्हणून पटकन घरात होते नव्हते तेवढे सगळे पैसे घेतो व मीनाक्षी-सुगंधला घेऊन इस्पितळात पोहचतो. कलाकार कुटुंब सूर्याला ठेवलेल्या विभागात जातात पण त्यांना तो तिथे दिसतच नाही. आजूबाजूला विचारतात तर त्यांना पण काही माहीत नसतं. सूर्य कुठे गेला म्हणून मीनाक्षी हंबरडाच फोडते. तिचं रडणं हृदय हेलावून टाकणारं होत. सगळे आजूबाजूला त्याचा शोध घेऊ लागतात. पण सूर्य काही केल्या सापडत नव्हता. शेवटी ऑपरेशन विभागाजवळ शोध घेत असताना, त्या विभागातून डॉक्टर येतात. डॉक्टरांना पाहून सुधीर रडत रडतच,

" डॉक्टर आमचा सूर्य... आमचा सूर्य तिथे नाहीय. आम्ही त्याचा सगळीकडे शोध घेतला पण तो कुठेच सापडत नाहीय."

डॉक्टर स्मितहास्य करत,

"अहो कलाकार, तुमच्या सुर्यच ऑपरेशन यशस्वी झालं. त्याला आता कोणताच धोका नाही."

"काय? ऑपरेशन? कुठे आहे तो? डॉक्टर आम्हाला आमच्या सूर्यला बघायचं आहे. तो कसा आहे पाहायचं आहे, कृपाकरून आम्हाला त्याला भेटू द्या." सुधीर सूर्याला भेटण्यासाठी डॉक्टरांना गयावया करू लागला.

डॉक्टर,
"माफ करा कलाकार, पण तुम्ही आत्ताच त्याला भेटू शकत नाही अजून त्याला शुद्ध आलेली नाहीय. थोड्यावेळाने शुद्धीवर आला की तुम्ही त्याला भेटू शकता."

"डॉक्टर तुमच्या हात जोडतो, पाया पडतो. आम्हाला भेटू द्या त्याला. कधी बघेन असं झालंय त्याला. डॉक्टर कृपा करून भेटू द्या त्याला.", सुधीर खाली वाकून डॉक्टरांचे पाय धरून सूर्याला भेटण्यासाठी विनवण्या करू लागतो.

डॉक्टर, "ठीक आहे, तुम्ही एवढं विनवण्या करताय म्हणून परवानगी देतो. पण तुम्ही त्याला बाहेरूनच बघू शकता. आत मध्ये जाण्याची परवानगी मी तुम्हाला आताच नाही देणार."

कलाकार कुटूंब खुश होत, डोळे पुसत ऑपरेशन विभागाच्या दरवाजाला असलेल्या काचेतून पाहू लागतात. त्याला पाहून सगळ्यांच मन शांत होत. ऑपरेशन झालं आणि तो धोक्याच्या बाहेर आहे हे कळाल्यावर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तोपर्यंत मास्तरही तिथे येतात व सूर्याची विचारपूस करतात. ऑपरेशन झालं हे शब्द कानी पडताच मास्तर देवाचे आणि डॉक्टरांचे आभार मानू लागतात.


कलाकार कुटुंबपण डॉक्टर आणि मास्तरांचे आभार मानू लागतात.

मास्तर सुधीरला,
"अहो कलाकार, तुम्ही ऑपरेशनचे पैसे कुठून भरला? तुमच्याकडे तर पैसे नव्हते ना?"

सुधीरला हे शब्द ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो.

"काय? पैसे? मी नाही भरलो. तुम्ही भरला ना पैसे?", सुधीर मास्तरांना प्रश्न करतो.

"छे, छे! अहो मी तर आता आलोय इस्पितळामध्ये आणि हे काय पैसे माझ्या हातातच आहेत.", मास्तर आश्चर्याने उत्तर देतात.

"मग डॉक्टर तुम्ही भरला ना पैसे आमच्या सुर्यसाठी?", सुधीर डॉक्टरांकडे बघत त्यांना विचारतो.

डॉक्टर, "नाही तर, मी नाही भरलो पैसे. उलट मी इस्पितळात आलो आणि मला निरोप दिला गेला की सूर्य कलाकार याच्या ऑपरेशनचे पैसे भरलेत आणि त्वरीत ऑपरेशन करा. म्हणून मी लगेच ऑपरेशनच्या तयारीला लागलो आणि ते करूनच आता बाहेर आलो."

"काय? आम्हाला वाटलं तुम्ही दोघांनीच पैसे भरला आहात म्हणून सूर्याचं ऑपरेशन झालं. मी पैसे भरलो नाही, मास्तर तुम्हीही पैसे भरला नाही, डॉक्टर तुम्हीपण पैसे भरला नाही. मग भरलं कोण पैसे? कोण आलं धावून की पैसे भरले आणि आमच्या लेकराचा जीव वाचवला?", सुधीर कोण भरले असतील पैसे यावर तर्क-वितर्क लावू लागला.

सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला की कोण भरलं असेल पैसे?

तेवढ्यात डॉक्टर म्हणतात,
"चला आपण रिसेप्शनिस्टला विचारुया. कदाचित त्यांना माहीत असेल कोणी भरले असतील पैसे."

सगळेचजण धावत पळत रिसेप्शनिस्टजवळ जातात व विचारतात की कलाकार यांच्या सूर्याच्या ऑपरेशनचे पैसे कोण भरलंय.

रिसेप्शनिस्ट, "एक मिनिट हा, मी बघून सांगते."

रिसेप्शनिस्ट थोडा वेळ घेत रजिस्टर मध्ये बघते आणि सांगते, "पैसे तर भरलेत पण त्याचं नाव नाही माहीत."

सगळ्यांच्या तोंडातून एकदमच शब्द फुटतो, "काय?"

"तुम्ही आठवून सांगाल, की नक्की कोण आलं होतं? स्त्री होती की पुरुष? त्यांचा पेहराव? त्यांचं काहीही वर्णन जे तुम्हाला आठवतंय ते?", सुधीर आपल्या उपकारकर्त्याला शोधण्यासाठी धडपड करत विचारु लागला.

खरंच त्या व्यक्तीचं उपकार झालेत आमच्यावर, नाहीतर आज हा चांगला दिवस आमच्या वाट्याला आलाच नसता.

रिसेप्शनिस्ट डोक्याला ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न करते आणि काही क्षणातच त्या व्यक्तीचं वर्णन करू लागते,

"ज्या व्यक्तीने तुमच्या मुलाच्या ऑपरेशनसाठी तीन लाख रुपये जमा केले ते थकलेले, पाटीकडून वाकलेले, अंगात जीव नसलेले असे वयस्कर होते, ते चालताना काठीचा आधार घेऊन चालत होते. काठी पण अशी झाडाच्या फांदीपासून बनवलेली असावी. त्यांच्या अंगावर असा फाटका सदरा होता, धोतर होती ती पण पूर्णपणे फाटलेली होती. कपडे इतके मळकटलेले होते की त्यांच्याकडे पाहवत सुद्धा नव्हतं. केस वाढलेले होते, अक्राळविक्राळ केस होते त्यांचे. तेलपण लावलेलं नसेल त्यांनी केसांना. त्यांच्या अंगातून इतका उग्र वास येत होता की ते ज्यावेळी पैसे भरत होते त्यावेळी इथली सगळी माणसे तोंडाला रुमाल धरली होती. मीही तोंडाला रुमाल धरूनच त्यांना पैसे भरायला पाठवून दिले होते. काय माहिती त्यांनी शेवटची अंघोळ कधी केली होती. त्यांच्या अंगाला ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्यामुळे पूर्ण अंगभर माश्या घुई-घुई करत होत्या. खांद्यावर एक फाटकी पिशवी होती, तीपण एकदम मळकटलेली. हा त्यांनी जे तीन लाख रुपये जमा केले ते एका पाकिटात होते. सूर्य सुधीर कलाकार याच्या ऑपरेशन साठी पैसे जमा करायचे आहेत असं ते म्हणाले होते. ते पाकीट त्यांनी दिले आणि पैसे मोजून घ्या असं म्हणून ऑपरेशन लवकर करून त्याला बरा करा असं म्हणून ते निघून गेले. झालं एवढंच मला आठवतंय बाकी ते कोठून आले, कोण होते हे नाही माहीत."

"ते पैशाचं पाकीट तुम्ही दाखवाल का?", सुधीर रिसेप्शनिस्टला पाकीट दाखवण्यासाठी विनंती करतो.

रिसेप्शनिस्ट ते पाकीट घेऊन येते जे त्या वयस्कर व्यक्तीने पैसे जमा करताना दिले होते.

ते पाकीट बघून सुधीर खालीच ढासळतो, त्याला धक्काच बसतो, कारण ते पाकीट त्याला मिळालेले बक्षीस होतं. तो डोक्याला हात लावून विचार करू लागतो. नकळत त्याच्या डोळ्यातून पाणी ओघळायला लागतं.

"कोण असेल ती वयस्कर व्यक्ती? कोण असतील ते, जे एवढी मोठी रक्कम मिळालेली असताना त्यांनी इथे येऊन माझ्या पोरासाठी भरले? त्यांना कसं मिळालं हे पाकीट? त्यांना कसं कळालं हे माझेच पैसे आहेत? त्या तीन लाखाचे त्यांनी स्वतःसाठी उपयोग केला असता पण त्यांनी असे का म्हणून केले नाही? त्यांना लोभ नाही वाटला?", सुधीर अश्रू ढाळतचं सगळ्यांसमोर बोलत होता.

तो एकदम उठतो व इस्पितळच्या बाहेर त्यांचा शोध घ्यायला लागतो. डॉक्टरांबरोबर बाकीचे पण सुधीरच्या मागे पळतात आणि रिसेप्शनिस्टने वर्णन केल्याप्रमाणे त्या व्यक्तीचा शोध घेऊ लागतात.

त्या व्यक्तीचा शोध घेत-घेत ज्यावेळी सुधीर इस्पितळाच्या गेटकडे जातो तेव्हा त्याला कोणीतरी हाक मारत आहे असं वाटतं. पण भास झाला असेल असं समजून तो सरळ पुढे जातो. पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात येते की रिसेप्शनिस्टने ज्या व्यक्तीचं वर्णन केलं होतं त्या व्यक्तीसारखी एक व्यक्ती त्याने मागे पाहिल्यासारखं वाटतं. त्या व्यक्तीसमोरूनच आपण पुढे आलो हे त्याच्या लक्षात येत व तो पाठीमागे वळून बघतो तर काय?

वर्णन केलेल्या व्यक्तीसारखी हुभेहुब वर्णन असलेली एक व्यक्ती इस्पितळात असणाऱ्या मंदिराच्या कठड्यावर प्रार्थना करत बसली होती. सुधीर क्षणाचाही विलंब न करता तो सरळ पळत जाऊन त्या वयस्कर व्यक्तीला साष्टांग दंडवत घालतो व पाय धरून त्यांचे आभार मानू लागतो.

"बाबा, आज तुम्ही जर ते पैशाचं पाकीट घेऊन आला नसता तर आज आमचा सूर्य आम्हाला सोडून कधीचा गेला असता. तुम्ही कोण कोणाचं पण आमचं इतकं मोठं संकट तुम्ही क्षणधार्त घालवला आहात. तुम्हाला कसं मिळालं हे पाकीट? तुम्हाला कसं कळालं की हे माझंच पाकीट आहे?", सुधीरला अश्रू आवरता येत नव्हतं.

त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते, तरीही तो त्या व्यक्तीला प्रश्न करत होता. ते पाहून कलाकार कुटुंब आणि बाकीच्यांना पण रडू येत होतं.


"सायेब, म्या तुमचं पाकीट द्यायसाठी तुमास्नी कुठं कुठं नाय शोधलं बघा. काल पास्न तुमास्नी शोधुतुया पण तुमचा कायबी पत्ता नाय. ह्य पैकाचं पाकीट मला काल यष्टी मंधी सापडलया. तुम्ही अन (सुगंधाकड बोट दाखवत) या बाई ज्या यष्टीनं इकडं कोल्हापूरऊन येत व्हता त्याच यष्टीमधनं म्या बी येत व्हतो. तुम्ही जिथं बसला व्हता त्याच्या मागं म्या बसलो व्हतो. तुम्ही ज्या काय या बाईला सांगत हुतासा त्या समद म्या ऐकलं व्हतो. तुमच्या पोराचं आपरेशन, तुमच्याकडं पैका नाय, ते डाक्टर, मास्तर, कुणी कुणी मदत केलीया समद ज्या काय तुम्ही सांगत व्हतासा त्या समद म्या ऐकलं व्हत. तुम्ही कुणच्यातरी स्पर्धेत जातायसा, तिथं काय ते बक्षीस काय फिकशीस, काय म्हणत्याती त्याला ठाव नाय पण ते मिळत नाय म्हणून उठून जात असतासा मग मंत्री सायेबाकडून ते फिकशीस मिळणं हे समदं म्या ऐकलंया. त्याचा पैका तुमच्या पिशवीत व्हता हे तुम्ही यासनी सांगत व्हता हे समदं समदं मला आठवतया. तुम्ही वडगाव आलं म्हणुनी यष्टीतनं उतरत व्हता तेव्हा म्यापण उतरत व्हतो तर मला एक पाकीट सापडला व्हत. ते पाकीट म्या उघडून बघतूया तर त्यात पैका व्हता. पैका म्हणजे म्या इतका कधी बगायला पण नवता. मग मला आठवलं, तुम्ही या बाईला ज्या काय सांगत व्हता त्याच्या सारखच त्या पैकाच पाकीट व्हत. म्हणून म्या तुमास्नी हाकबी मारली व्हती पण काय करणार, म्हातारपणामुळं माझा आवाज मोठा नाय. त्यो तुमच्यापर्यन्त नाय पोचला. तुमच्या माघ्न यावं म्हणालो तर त्या बी नाय जमलं. तुम्ही तरणी मानसं भरभर चालताय म्या कसं चालणार तुमच्यागत. म्या ही काठी टेकत टेकत यष्टीतन उतरलो तर बघतू तर काय तुम्हि कधीचा गायब झाला व्हता. म्या सगळीकडं तुमास्नी बघितल्यो पण त्याचा कायबी उपयोग नाय झाला. सायेब तुम्ही त्या पाकीट विसरला खर माझ्या मनाला शांती नवती. लै ठिकाणं बघितली तरीबी तुमि नाय सापडला. तुमचा पैका माझ्याकडं व्हता माझ्या जीवाला जीव नवता. तुमास्नी कधी येकदा परत देणार म्या असं झालं व्हत बघा. कायबी करून तुम्हाला हुडकायच अन हा पैका तुमास्नी द्यायचा अस ठरवलं व्हतो. रातरं भी निघून गेली. समदी रातरं तुमचाच विचार करत बसल्येलो. आज सकाळी म्या मंदिरात जेवा भीक मागायला बसल्योलो तवा कुणीतरी अमास्नी कागदामंदी देवाचा प्रसाद दिला व्हता. प्रसाद खाऊन म्या त्यो कागद टाकून देणार त्येवडयात त्या भल्या माणसाच्या हातामंधी दुसरा एक मोठा कागुद व्हता त्यात तुमचा फोटू पहिला. म्या त्यासनी पाया पडून त्यो कागुद मागून घेतला. तुमच्या फोटू बरोबर काय काय लिहल बी व्हत. पण सायेब म्या अडाणी माणूस. भीक मागून खाणारा. मला शाळा नाशिबिच नवती. म्हणून म्या आमाला पैका टाकत्यात्ती त्यांना विचारत व्हतु तर कुणीबी भिकारी हाय याला काय करायचं ते ऐकून अस म्हणून जात व्हती. मी लई जनासनी इचारुन बघितलं पण कुणिबी नाय सांगितलं. मग म्या शेवटी एका शिकल्या सवरल्या माणसाच्या हाता पाया धरून इचारु लागलो की यात काय लिहलया ते मला वाचून दावा. त्यो बी नाय म्हणत हुता. त्या सायेबाचं पाय धरलू त्यामुळं त्यानं मला वाचून दावलं. त्यो वाचून दावत हुता खरं मला ऐकूउन माझ्या अंगावरती काटं येत व्हत. अन काय वो सायेब, तुम्हि शिकल्या सवरलेलं नव्ह? मग ते अंगावरती रॉकेल वतून घेऊन सवताला संपवन हा कुणचा मार्ग? गरीब जरी असला तुम्हि तरी म्या बी तुमच्या पेकशा गरीब हाय. पण जगतुया नव्ह म्या बी. भरतुया नव्ह म्या माझं पोट? अव्ह सवताला संपऊन कायबी व्हत नाय. उलट पाठीमागच्याना त्याचा तरास व्हतो. अन यक सांगायच म्हंजी, तुम्हि त्या आत्महत्या करण्याच्या परयत्न केलेलं त्या प्यापरात आलं आज अन त्योच कागद मला मिळला. देवाची लीला हाय म्हणून ह्य घडलं नायतर आज मी तुमास्नी हुडकत बसलु असतो. अन इकडं तुमचं पॉर इना आपरेशनच गेलं असत.", ते बाबा एवढं काही सांगून गेले की सगळे जण एकटक ऐकत होती. सगळ्यांच्याच डोळ्यातून ही गाथा ऐकून डोळ्यातून पाण्याचे लोट वाहत होते. खरंच खूप मोठी शिकवण त्या बाबांनी सगळ्यांना दिली होती.

सुधीरला ते पैशांचं पाकीट कधी कुठे पडले हे आठवतं, ज्यावेळी तो पाणी पिण्यासाठी आपल्या पिशवीतून पाण्याची बाटली काढलेला असतो त्याचवेळी कदाचित ते पैशाच पाकीट नकळत खाली पडलेलं असत. पण नशीब बलवत्तर म्हणून ते पाकीट एका चांगल्या व्यक्तीच्या हाती लागलं होतं आणि आज त्याला ते परत पण मिळालं.

सुधीर उठत, त्या बाबांना हात जोडत शेवटी एकच म्हणतो,
"बाबा, तुम्ही जर तो कागद बघून त्यात काय लिहिले आहे ते बघण्यासाठी त्या माणसाचे पाय धरला नसता, तर आज तुमच्यासारख्या महान व्यक्तीचे पाय धरून दंडवत घालण्याची चांगली वेळच माझ्यावर आली नसती आणि आमचा सूर्य या जगात राहिलाच नसता, खरचं या जगात तुमच्यासारखी चांगली माणसं आहेत हे आज कळतंय. माणुसकी अजून मेलेली नाही हे जाणवतंय. पैसा हा सर्वस्व नसून माणुसकी महत्वाची आहे हे आज समजतंय. आश्वासन देणारी भरपूर पाहिलो मी या जगात. पण शेवटी गरीबानेच गरिबाला तारलं. पैसा खोटा होऊन हरला असला तरी माणुसकी खऱ्या अर्थाने आज जिंकलेली आहे."

बाबा तुमचे खूप खूप आभार!

समाप्त!

✍अनिकेत अनिल तापोळे

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.