# मानसिक हिंसा # ‘फिअर फॅक्टर’

तो अगदी हताश होऊन कठड्यावर बसून होता. हातात मोबाईल. त्यात उघडलेलं फेसबुक. फेसबुकच्या वॉलवरच्या जहाल प्रतिक्रिया... तो खूप नाराज झाला. नाही वाचायच्या ठरवून ही, त्याचे डोळे त्या कमेंटवर जात होते. तळहाताला घाम सुटला. जीभ आत ओढल्यासारखी वाटत होती. तो डावा हात कठड्याला टेकून उठला. आणि समोरच्या फास्ट फूड सेंटरमधून त्याने पाण्याची बाटली मागवली. “थंडा या नॉर्मल?” दुकानातल्या पोऱ्याने विचारलं. तो जरासं स्वत:ला सावरून पुटपुटला,“खून थंडा पड गया है तो, नॉर्मल ही देना...” दुकानातल्या पोराला काहीच कळलं नाही, त्यानं बिसलेरीच्या बॉक्स मधून बॉटल काढून त्याच्या हातात दिली. त्या मुलाला न कळता ही आपल्याला नॉर्मल टेम्परेचरची पाण्याची बॉटल मिळाली, याची त्याला गंमत वाटली. असंच न सांगता, न कळताही आपल्याला काय हवंय ते जर लोकांना कळलं तर किती बरं होईल? असा विचार त्याच्या मनात आला. पुन्हा त्याचंही त्याला हसायला आलं. ‘इतकी समज कुठे आहे लोकांत? काय हवंय मला?... मुझे चाहीये अमन...’

तो तिथून निघाला आणि चालत चालत मोहमदअली रोडवर आला. ‘ओळखीचे चेहरे, ओळखीचा इलाका... कसं बरं वाटतंय... सुरक्षित? बेखौफ?... माहीत नाही... पण बरं वाटतंय!...’ तो मनाशी म्हणाला. “अस्सलामु आलेकुम, क्यूँ आज लेट हुये... रहेमान?” पांढरा शुभ्र कुडता, पांढरी दाढी आणि हसऱ्या चेहऱ्याच्या अहमदचाचाने विचारलं. “आलेकुम सलाम, चाचा, हाँ, थोडा लेटही हुआ!... सब खैरीयत?” आणि तो हसून त्याच्या दुकानापाशी आला. मोहमद अली रोडवर वडिलोपार्जित आलेलं, त्याचं कपड्याचं दुकान होतं. उस्मानने त्याला पाण्याचा ग्लास भरून दिला. आणि काही बिलं त्याच्या समोर ठेवली. रहेमानने ती चेक केली. काही पार्ट्यांना फोन केले, ऑर्डर दिल्या. दुपारचे तीन वाजत आले होते. त्याचा मोबाईल वाजला. त्याने स्क्रीनवर पाहिलं. तरन्नुम कॉलिंग दिसलं. तरन्नुम त्याची बायको. त्याने फोन रिसीव्ह केला. “हॅलो, बोलो, तरन्नुम...” पलीकडून ती म्हणाली,“ सुनो, आज ना शगुफ्ताके स्कूलमें हॉकी के लिये सिलेक्शन है, तो उसे आपने पार्टीसिपेट होने के लिये परमिशन दे दी है?” “तूम क्या चाहती है?” त्याने गंभीर आवाजात विचारलं. “मुझे लगता है, नको!... अभी वो नववी मै है, छोटी नही रही!...आप ना, मना करो!” तरन्नुम पलीकडून म्हणाली. “शगुफ्ता क्या चाहती है?” रहेमानने विचारले. “उसको क्या पूछना? नादान है वो!” तरन्नुम रागाने म्हणाली. “तुम उसको फोन दो!” रहेमान म्हणाला. पलीकडे फोनवर शगुफ्ता आली. काही विचारायच्या आतच ती म्हणाली,“मै खेलना चाहती हूं अब्बू!... प्लीज...” तिचा तो खेळकर आवाज रहेमानच्या कानाला सुखावून गेला. “ठीक है, ठीक है... तुम जाओ, अम्मीको मै समझाता हूँ...” तो आंनदाने म्हणाला. “थँक्यू अब्बू, आय लव्ह यू...” ती हसत म्हणाली. रहेमानने फोन कट केला. मग तो कापडाच्या जरीकडे, पोतकडे पाहत आपल्याच विचारात गेला. ‘शगुफ्ता खेळताना कशी दिसेल? आपण तरन्नुमला बुरखा वापरू नको सांगितला, तेव्हा ते मोठंच पाऊल होतं. कोकणी मुस्लीम कट्टर असतातच. पण आपण स्टान्स घेतला. आणि तरन्नुमला त्या बुरखा सिस्टीम पासून बाजूला ठेवली. केवढा विरोध झाला! त्यात ती तरुणपणी तर आणखीच सुंदर... घोटीव शरीर, लालसर गोरी... पण आपण म्हटलं, नाही... बुरखा नाही! आता तिचीच शगुफ्ता निगेटीव्ह कॉपी. पण बंधनातून यांना बाहेर आणायचं...’ असा ठाम निर्णय झाल्यावर तो जरा निश्चिंत झाला. दुकानातलं दुसरं काम करू लागला. काही वेळाने त्याचा मोबाईल वाजला. चहा पिता पिता त्याने कॉल रिसीव्ह केला. पलीकडून आवाज आला, “हॅलो, रहेमान अन्सारी बात कर रहे है!” रहेमान “जी” म्हणाला. “मै वक्फ कमिटीका पूर्वाध्यक्ष रसूल खान बोल रहा हूँ, आपने जो फेसबुकपर पोस्ट डाली है, उसे तुरन्त हटा दो!... नही तो अन्जाम बुरा होगा!” पलीकडून त्याला दम भरण्यात आला. “जो मुझे लगा, वो मैने लिखा, मुस्लीम औरंते प्रोपर्टीकी समान हकदार होनी चाहिये...” त्याला मध्येच तोडून पलीकडचा आवाज म्हणाला,“नापाक इरादें रखकर क्यूँ औरतोंको भडका रहे हो... वो पोस्ट हटा दो, मै कुछ सुनना नही चाहता!...” आणि फोन कट झाला. त्याने खिशातून मोबाईल काढला. फेसबुकचे अकाउंट उघडले, आणि त्याला धक्काच बसला. पुरुषांनी भयानक विचित्र, आणि रागाने प्रतिक्रिया दिल्या होत्या. काहींनी कौमचा वास्ता देऊन धमक्या दिल्या होत्या. तर काही स्त्रियांनी ‘गुड थॉट’, ‘...पर वो अधिकार मिलता नही!’, ‘तलाक के लिये संघर्ष जारी है, ये मांग भी होनी चाहिये’ वगैरे कमेंट टाकलेल्या होत्या. पण या स्त्रियांच्या कमेंट कमी होत्या, आणि पुरुषांच्या वर्चस्वाच्या कमेंटमध्ये दबून गेल्या होत्या. संध्याकाळी साडेपाचला त्याला शगुफ्ताचा फोन आला, आणि शाळेच्या हॉकी टीममध्ये तिचं सिलेक्शन झाल्याचे, खूप आनंदाने तिने रहेमानला सांगितलं. रहेमान मनातून खूप खूष झाला. त्याने जाताना अब्बास आणि जफरला ही आनंदाची गोष्ट सांगितली. जफर तोंडदेखलं हसला. आणि अब्बासने काहीच रीअॅक्शन दिली नाही. रहेमानने जाताना सानिया मिर्जाचे एक मोठं पोस्टर खरेदी केलं. त्याची नीट सुरळी करून त्याने त्याच्या पिशवीत टाकलं. आणि मग मस्जिद बंदर स्टेशनवर गेला. गर्दी वेगळीच वाटत होती. थोडी कावरी-बावरी आणि एकमेकांकडे संशयाने पाहणारी. पोलीस स्टेशनवर होते. तेवढ्यात ट्रेन आली. रहेमान ट्रेनमध्ये घुसला. सीएसटी वरून सुटलेली गाडी असल्याने, त्याला फोर्थ सीटवर बसायला मिळालं. ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडला. तिसऱ्या सीटवरच्या माणसाने मोबाईलमधे डोकं घातलं होतं. रहेमानने हळूच विचारलं, “कुछ हुआ है क्या भाई?” त्याने त्याच्याकडे मान वळवून म्हटलं, “अरे, किसीने, मुंबईमें किसी मंदीरमें गोमांस फेका है! अब हम चूप बैठेंगे क्या? बोलो?” रहेमान आश्चर्यचकीत होत म्हणाला,“कब हुआ ये?” “अभी चार-साडेचार बजे!... अब तो लांडोंको छोडेंगे नही यार! स्सालोकों बहोत चरबी चढी है!... क्या चल क्या रहा है!... इनको पाकिस्तानमें ही भेज देना चाहिये!...” तो अतिशय त्वेषाने बोलत होता. त्याने असं बोलल्यावर आणखी तीन-चार लोकांनी काय झालं पासून, काय काय करायला पाहिजे इथपर्यंत खूप त्वेषाने बोलणे सुरु केले. बोलता बोलता धर्म, इतिहास, शिव्या, रूढी सगळ्यावर विषय जायला लागले. रहेमानला कोणतरी आपल्या छाताडावर बसून आपलाच गळा दाबतोय असं वाटायला लागलं. डब्यातलं वातावरण अचानक उन्मादक झालं... ‘मुसलमान सगळ्यात मोठे शत्रू आहेत, तेच देशद्रोही आहेत...’ अशीही विधानं यायला लागली. अजमल कसाब, अफजल गुरु, याकुब मेमन, मुस्लीम संघटनांची नावं तोंडी लावून ते उन्मादक वातावरण आणखी चटकदार, आवेशपूर्ण व्हायला लागलं. दादर स्टेशन गेल्यावर रहेमान हळूच आपल्या सीटवरून उठला. आणि दरवाजाच्या दिशेने सरकणाऱ्या गर्दीचा एक भाग झाला. शरीर भीतीने थंडगार पडलं होतं. ‘सकाळी टाकलेली पोस्ट, त्यावर आलेल्या कमेंटमधल्या धमक्या, आणि आत्ताचे चिथावणीखोर लोक यात कोण आपलं आणि कोण दुसरं?’ तो मनातून हादरला. कसाबसा वाट काढत दरवाज्याजवळ आला. लोक चढत होते, लोक उतरत होते. रहेमानला कधी कुर्ला येतं, नि आपण या गाडीतून उतरतो असं झालं होतं... त्याने उभ्या उभ्याच डोळे मिटले. आणि त्याला आठवलं, मुंबईतल्या १९९२ च्या दंगली. जिवंत जळणारी माणसं, धुराचे लोट, किंकाळ्या, जळालेल्या वस्त्या!!... बैलबाजार, गोवंडी, मोहमदअली रोडवर लोकांना शोधून शोधून टार्गेट केलेलं... बरं झालं, त्याचवेळी आपण दाढी काढून टाकली. नाहीतर आज, आत्ता काय खैर नव्हती!... गर्दीत त्याने कसाबसा खिशात हात घातला. आणि मोबाईल काढला. तरन्नुमला फोन करु या म्हणून त्याने मोबाईलवर तिचा नंबर टाकला. समोरची बेल वाजत होती. तेवढ्यात त्याला लक्षात आलं, ‘आपल्या बोलण्यावरून, उच्चारावरून सहज समजेल, आपण मुस्लीम आहोत!... नको नकोच करायला फोन!!’ पलीकडून तरन्नुमने उचलला तसा रहेमानने कट केला, आणि फोन खिशात ठेवला, आणि अगदी हळूच त्यानं घाबरून इकडे-तिकडे पाहिलं. मागचा माणूस प्रेशरच्या फोर्सने त्याच्या अंगावर रेलत होता. आणि बाजूच्या उजवीकडच्या माणसाचं त्याच्या चेहऱ्याकडेच लक्ष होतं. रहेमानने पटकन मान फिरवली, नि तो समोरच्या सायन स्टेशनच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मकडे बघत राहिला. नवी चढलेली गर्दी सेट झाली. काही माणसं मागे सरकली, काही तिथंच उभी राहिली. ट्रेन थोडीशी हिंदकळली आणि पुढे सरकली.

एकदाचं कुर्ला स्टेशन आलं, ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्मला लागली आणि थांबली. गर्दीच्या रेट्यात रहेमान खाली उतरला. त्याने सुटकेचा श्वास घेतला. माणसं किती लवकर भडकतात!... असं स्वत:शी म्हणत त्याने रिक्षा पकडली. आणि घरी गेला. साडेसात वाजत आले होते. तरन्नुमने चिकन शिजायला ठेवलं होतं. आरिफ क्लासला गेला होता. रहेमानने हात-पाय धुऊन टीव्ही लावला. आणि इकडे तिकडे पाहत म्हटलं, “शगुफ्ता कहाँ है? अभीतक आयी नही?” तरन्नुम सहजगत्या आवाजात म्हणाली,“ कभी की आई है, वो हीनाके घर गयी है!... क्यूँ क्या हुआ? अक्सर जाती है!...” “टीव्ही क्यूँ नही लगाया? आरिफ कब आयेगा? शगुफ्ताको फोन कर और उसे बोलो, फौरन घरपे अब्बुने बुलाया है!...” रहेमान एका दमात म्हणाला. त्याने टीव्ही चालू केला. पण केबल चॅनल चालत नव्हती. तो खूप अस्वस्थ झाला. रिमोट हातावर मारून तो टीव्हीच्या निळ्या स्क्रीनकडे नुसताच पाहत राहिला. तरन्नुम त्याच्या जवळ आली. तिने त्याच्या खांद्यावर अलगद हात ठेवला. तसा शॉक लागावा तसा तो दचकला. “अल्ला!... क्या हुआ? ऐसे डरे हुये क्यूँ है!...” तरन्नुम आश्चर्याने म्हणाली. “नही! कुछ नही!... मैने क्या कहाँ तुझे? बच्चोंको घर बुलाओ!...” ती त्याच्यापासून मागे सरकली. तिने शगुफ्ताला फोन लावला. आणि ताबडतोब घरी बोलावून घेतलं. आरीफच्या क्लासमध्ये फोन करून तो निघालाय याची तिने खात्री केली. आणि ती रहेमानकडे बघत राहिली. काहीवेळाने केबल कनेक्शन चालू झालं. त्याने न्यूज चॅनेल बघितले. कुठेच ती गाडीत चर्चा झालेली बातमी नव्हती. तो पुन्हा-पुन्हा चॅनल बदलत राहिला. सगळीकडे रोजच्याच घोटाळ्यांच्या, कर्जाच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या, भ्रष्टाचाराच्या बातम्या होत्या. वातावरणातला ताण-तणाव असा कुठेच नव्हता. पण अजूनही रहेमानच्या पोटातली भीती गेली नव्हती. तरन्नुम थोड्या वेळाने त्यच्या बाजूला बसली. आणि तिने पुन्हा त्याला विचारलं, “कुछ प्रॉब्लेम है क्या? आप कुछ बोलेंगे, तो मै जान जाऊँ!” आरिफ आला. त्याच्या चेहऱ्यावर कसलाच भाव नव्हता. रहेमानने त्याच्याकडे डोळे भरून पाहिलं. काहीवेळाने शगुफ्ता आली. पर्स बेडवर टाकून ती रहेमानच्या मागून गळ्यात हात घालून म्हणाली, “अब्बू, आपकी दुवा काम कर गयी! मेरा सिलेक्शन हो गया!...” त्याने तिचे हात अलगद सोडवले, आणि तिला आणि आरीफला त्याने त्याच्यासमोर उभं राहायला सांगितलं. आणि म्हणाला,“ देखो, कभी किसीसे झगडा नही करना!... रस्तेपे, स्कूलमें, बसमें... किसीके झगडे में भी नही पडना. अपना कितना सच है, वो कोई सुनता नही... मुसलमान होने की वजह ही, सिर्फ उनको काफी होती है!... समझ रहे हो तुम!...शगुफ्ता, तुम खेलना चाहती हो तो खेलो, लेकीन अपने स्कूल के लिये, अपने राज्य के लिये, अपने देश के लिये खेलो!... नही तो तुम्हारी एक खेल में हुयी गलती भी, तुम्हे गलत साबित कर सकती है, क्यूँ की तुम मुसलमान हो!...” चिकनच्या शिजण्याचा वास घरभर पसरला होता. त्याला ट्रेनमधली चर्चा आठवली. जेवताना त्याला ते चिकन खायची इच्छाच झाली नाही. पोरं मन लावून खात असलेली पाहून, त्याला बरं वाटलं, पण जमावाचे ते धमक्यांचे, उन्मादाचे शब्द आठवून त्याला घास गळ्यात अडकल्यासारखं झालं. त्याने कसेबसे दोन फुलके पोटात ढकलून, तांब्याभर पाणी पिऊन ढेकर दिला. आणि तो ताटावरून उठला. आज काहीतरी चांगलंच बिनसलंय, हे तरन्नुमने ओळखलं. रहेमानचं आजचं वागणं काही वेगळंच आहे, तिला समजलं. सगळ्यांची जेवणं झाल्यावर त्याने शगुफ्ताला बोलावलं, आणि तिचं फेसबुकचं अकाऊंट उघडायला सांगितलं. तिने उघडलं. त्याने तिचा मोबाईल घेतला. तिच्या अकाऊंटवर नाव पाहिलं, ते शगुफ्ता अन्सारी असं होतं. त्याने फोन तिच्या हातात देऊन म्हटलं, “ये नाम बदल दे!... वो नाम - कोई हिंदू रख!”... “नही, नही अब्बू! क्यूँ? मुझे मेरा नाम बहोत पसंद है!... मै वो क्यूँ बदलूँ?” तरन्नुम आता आणखी गोंधळली. “शगुफ्ता, क्या चल रहा है तेरा, कोई, लडकेका तो चक्कर नही नं?अब्बू क्या कह रहे है?...” ती चिडून शगुफ्ताला म्हणाली. “नही, नही अम्मी!” शगुफ्ता बारीक तोंड करून म्हणाली. “बेटा, मुस्लीम नाम नही रखना, तुम जो भी पोस्ट शेअर करोगी, जो भी वहाँ लिखोगी उसे लोग, एक मुसलमानकी पोस्ट, ये नजरियासेही देखेंगे! भले वो कितना भी सही हो, या सच हो!... यहाँ धरमके हिसाबसे सही या गलत, ठहराया जाता है!... इसलिये नाम बदलो!...” रहेमान हताशपणे म्हणाला. तरन्नुम खूप गंभीर झाली. मग रहेमानने त्यांना ट्रेनमधला किस्सा सांगितला. कुर्ला स्टेशनला उतरेपर्यंतची तीस-पस्तीस मिनिटं, त्याला कशी तीस वर्षासारखी वाटली, आणि तो का अस्वस्थ आहे, हे सारं त्याने त्यांना सांगितलं. आठ वर्षाच्या आरिफला त्यातलं तितकसं कळलं नाही, तो तिथेच ऐकता ऐकता सोफ्यावर झोपून गेला. शगुफ्ता जांभया देत अभ्यास करत राहिली. पण तरन्नुम हे ऐकून, रहेमान इतकीच चिंतेत पडली. झोपण्याआधी शगुफ्ताने हॉकीच्या स्टिकवरून अलगद हात फिरवला, आणि स्पोर्टस् मध्ये नाव कमवायचं हे स्वप्नं घेऊन शांत झोपली. तरन्नुमने बिछाने घातले. आरिफला खाली झोपायला सांगितलं, तो झोपेतच उठला, आणि झोप मोडल्यामुळे चीडचीड करत अस्ताव्यस्त झोपला. तरन्नुमने गादीला पाठ लावली. पण रहेमान खुर्चीतच बसून होता. त्याने फेसबुक अकाउंट उघडलं. त्याच्या सकाळच्या मुस्लीम स्त्रियांच्या बाबतीतल्या पोस्टवर सहाशे पेक्षा जास्त लाईकस् झाले होते. पण आता त्याला त्या लाईकचं काहीच वाटलं नाही. ट्रेनमधल्या माणसांच्या शब्दांचे आवाज रहेमानच्या कानात वाढत गेले. भीतीची एक शिरशिरी त्याच्या सर्वांगावर पसरली. त्याने थरथरत्या हाताने आज टाकलेली पोस्ट डीलीट केली. पिशवीतलं येताना घेतलेलं, सानिया मिर्झाचं मोठं पोस्टर पिशवीतच चुरगळलं होतं. बऱ्याचवेळ तो खुर्चीवर बसून होता. अंग आंबले होते. डोकं जड झालं होतं. कधीतरी थकून त्याला झोप लागली.

सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने त्याला जाग आली. चार-पाच तास त्याच खुर्चीवर बसून झोपल्याने त्याचं अंग चांगलंच आखडलं होतं. त्याने खाली झोपलेल्या तरन्नुम, आरिफ आणि शगुफ्ताकडं पाहिलं. शगुफ्ताचे पाय चादरीतून बाहेर आले होते. तरन्नुमच्या कपाळावर एकच बट आल्याने ती आणखी सुंदर दिसत होती. आणि आरिफ लोळत रहेमानच्या उशीवर गेला होता. रहेमान हसला. तो सावकाश उठला. त्याने दार उघडून बाहेरचा न्यूजपेपर काढून घेतला. पहिलं पान चाळताना त्याला डाव्या कोपऱ्यात एक छोटीशी बातमी दिसली, त्यात लिहिलं होतं की, अमक्या-तमक्या देवळात सापडलेल्या काळ्या प्लास्टिक पिशवीचा अर्थ काही मूर्ख, अतिरेकी माणसांकडून, त्या पिशवीत मासांचे तुकडे आहेत असा लावला गेला. आणि त्या देवळाच्या परिसरात गोंधळ उडाला. धार्मिक तेढ पसरवण्याच्या मुद्द्यावरून, त्या देवळाच्या परिसराचे वातावरण काहीवेळ तंग झाले. सोशल मिडीयावरून या संदर्भात बऱ्याच अफवा पसरविण्यात आल्या. मुळात त्या गाठ मारलेल्या काळ्या प्लास्टीकच्या पिशवीत ताडगोळे असून, कोणत्याही मासाचे तुकडे नाहीत, असा पोलिसांनी खुलासा केलेला आहे. उगीचच अशा आततायी, आणि दुसऱ्या धर्माला टार्गेट करणाऱ्या, अशा समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, आणि मग काही तासांनी त्याना सोडून देण्यात आले आहे. पण रहेमानला ते कालचं येतानाचे गाडीतले सर्व संभाषण, तो उन्माद तसाच्या तसा आठवला.

त्याला वाटलं, जणू पूर्ण पेपरातल्या सगळ्याच बातम्यांची शाई वाहून जावी तशा त्या धूसर झाल्या आहेत... त्या पेपरवर फक्त ही एकच बातमी ठळक, गडद, मोठी-मोठी होत, अगदी पूर्ण पानभर पसरत चालली आहे... आणि तो तिच्याकडे फक्त पाहत राहिला आहे...

-उर्मी


marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.