(संधी ह्या कथेत रौद्र, करुण आणि बीभत्स ह्या रसांचा वापर केलेला आहे.)

सूर्य मावळतीला झुकलेला, त्याचीच किरणं घरात कवडस्यासारखी पसरलेली, मंद वाऱ्याची झुळूक घरात शिरकाव करत होती. पाखर घरट्यात विसावत होती. वातावरण शांत आणि प्रफ्फुलीत होत; तरी घरातली उदासीनता त्यात जास्तच जाणवत होती. प्रियाला आपण अंधारातच राहिलेलं बरं असं वाटत होतं. मिनू ताईकडे केविलवाण्या नजरेनं आणि काळजीने बघत होती. दोघी बहिणी मूकपणे मनात बोलत अस्वस्थपणे दाराकडे बघत होत्या. माई रात्रीच्या जेवणासाठी तांदूळ निवडत ओसरीवर बसलेली; खरं पण तिचं पण चित्त थाऱ्यावर नव्हतं. सारखं आकाशाकडे बघत देवाला विनवत होती. इतक्यात बाबा घरी आले. तशी झटक्यात माई सूप घेऊन आत गेली आणि पाणी घेऊन आली. बाबा खाटेवर बसलेला, माईने दिलेलं पाणी प्यायला कि लगेच माईने विचारलं,

" काय ओ ! काय झालं ? काय म्हटले पाव्हणं ?"

सगळ्यांची नजर बा कड गेली. बा काहीच बोलला नाही. घरातली शांतता अधिकच भीषण झाली. माईनं घाबरूनच पदर मुठीत घेऊन पुन्हा विचारलं ,

" अव! सांगा कि काय म्हटलीत पाव्हणं ?"

तसा बा हरलेल्या आवेशात म्हटलं," काय म्हणार आहेत ?... मोडलं लग्न त्यांनी ... म्हटलं लांबची माणसं हाईत काय कळायच्या आत उरकावं...पण आपल्याच भावकीतल्यानी काडी लावली. आपलीच माणसं सुखासुखी जगू देणार नाहीत." असं म्हणत एका गुडघ्यावर डोकं टेकवून बा शांत बसला. हे ऐकून माई गपकन भुईवर बसून कपाळ बडवत रागानं आणि दुःखानं," देवा! पांडुरंगा! काय रं दिस दाखवलंस ? गेल्या जनमी काय पाप केलंत, ते ह्या जनमी भोगाया लावलं. हि अवदसा तवाच मेली असती तर .. बरं झालं असतं ."

"आई! काय बोलतेस तू? ह्यात ताईचा काय दोष? तिला धीर द्यायचा सोडून..."

सप्प सनदीशी माई ने मिनुच्या कानाखाली लगावली. मिनुला बाजूला करत इतकावेळ शून्यात बसलेली प्रिया पुढे आली.

" मिनुला नको... मला मारा मला! मीच गुन्हेगार आहे ना तुम्हा सगळ्यांची. माझ्यामुळेच तुम्हाला सहन करावी लागते... हि बेअब्रू. आज माझं लग्न होत नाही म्हणून स्वतःच्या कर्माला दोष देत मी तेव्हाच मेले असते तर बार झालं असत, असं माझ्या आई बाबाना वाटत. ज्याच्यावर जीवापाड प्रेम करायचे,"तुझ्यासाठी कायपण !" म्हणारा आवि आज म्हणतोय," मला माझी फॅमिली आहे; प्लिज विसर मला. माफ कर मला." माझ्या जवळच्या माणसांना मी नकोशी आहे, तर इतरांकडून काय अपेक्षा करावी? तुम्ही तरी किती सहन कराल? मीच जबाबदार आहे ह्या साऱ्याला. मीच गेले होते ना त्या नराधमांच्या तावडीत सापडायला. नाही! माझ्यासाठी तो एक अपघात होता; हो! अपघातच होता तो, शरीरावर अन मनावर झालेला अपघात. राक्षसांनी केलेल्या जखमा फक्त शरीरावर होत्या, त्या आज ना उद्या मिटतीलही; पण, आपल्याच माणसांनी मनावर केलेल्या जखमा मिटतील का? सांगा ना, मिटतील का? पापी नराधम त्यांच्या कर्माची शिक्षा भोगतीलही किंवा जामिनावर सुटतील हि, परत ताठ मानेने जगायला. आणि मी? मी तर न केलेल्या कर्माची शिक्षा भोगतेय.”

“समाज, पद, प्रतिष्ठा महत्त्वाची; समाजातील माणुसकी? ती नाही का महत्त्वाची ? माझ्यासारख्याच पण मरण पावलेल्या निर्भयासाठी करोडोने मोर्चे काढता, मेणबत्त्या पेटवता ,' SHAME! SHAME!!' म्हणून निषेध करता . काय उपयोग होतो ह्या साऱ्याचा ? काय वाटत तुम्हाला ? असं केल्याने तिच्या आत्म्याला शांती मिळते ? नाही!! अरे ! जी निर्भया आज जिवंत आहे. जी खचली आहे. तिला जगण्याची उमेद द्या. आधार द्या. लग्न हा एकच उपाय नाही ह्यावर. तिला स्वतःला सिद्ध करू द्या. समाजात ताठ मानेने जगू द्या. त्यासाठी तिला केवळ तुमच्या प्रेमाची, आपुलकीची, आधाराची गरज आहे. तुम्ही दिलेल्या एकाच संधीच सोनं ती नक्की करेल. द्याल ना, आई बाबा ... मला एक संधी? द्याल ना?"

असं म्हणत प्रिया रडू लागली . तोच आई बा ने सावरलं तिला, तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी दिलेल्या संधीच सोन प्रियाने केलंच.

" ए! ताई! अगं हे बघ !! गुडन्युज आहे. आई-बाबा! लवकर या ."

"काय गं ! काय झालं ओरडायला?"

"अगं आई ! ताई एम पी एस सी परीक्षेत पहिली आली."

"काय! खरचं .."

" हो गं .. हे बघ ."

" नाव कमवलंस पोरी.. तू "

असं म्हणत बानं डोळे पुसले.

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.