करूण रस

"का रे संतोष, सुभान्या का येत नाही शाळेत. घरी पण निरोप ठेवला , कुणी भेटायलाही येत नाही."

"काय माहित बाई.त्यो दिसतच नाही. घराला बी कुलूप ह्या."

"असा होय. बर तुला दिसला तर सांगा बाईने बोलावले म्हणून. "

"व्हय जी सांगतो. "म्हणत तो पळाला.

इकडे सावित्री विचारात पडली .काय झाले असेल.दोन महिने झाले अजून कुणी भेटायला आले नाही ,न सुभान्या शाळेत आला.

"काय गं सावित्री ,एवढ्या कसल्या गहन विचारात हरवली आहेस.किती वेळा पासून तुला आवाज देत आहे. लक्ष नाही तुझे."

"काही नाही गं माझ्या वर्गातल्या सुभान्या बद्दल विचार करत होतं. "

"का? काय झालं त्याला? "

"त्याला काय झालें माहित नाही. दोन महिन्यापासून तो शाळेत येत नाही. हुशार आहे गं मुलगा म्हणून वाटते वर्ष वाया जायला नको."

"हो गं ,पण आपण निरोप पाठवण्या शिवाय काय करू शकतो.? हं भेटला तर समजावून सांगू शकतो. ह्या पेक्षा जास्त काय करू शकतो. जास्त विचार करु नकोस." असे म्हणत जया, सावित्रीची सहकारी आपल्या वर्गावर तास घेण्यासाठी गेली.

सावित्रीनेही विचार झटकून कामावर लक्ष केंद्रित केले. तो दिवस संपला. कामाच्या गडबडीत ती पण विसरून गेली.असेच काही दिवस गेले पण सुभान्या शाळेत आलाच नाही. आता सावित्री ने मनोमन ठरवलं काही झाले तरी सुभान्याच्या घरी जायचे.गाव छोटे असल्याने प्रत्येक जण सगळ्यांना व्यक्तीशः ओळखत होते,त्यामुळे घर शोधून काढणे तसे अवघड नव्हते.

दुपारच्या सुट्टीत ती आपल्या सहकारी मैत्रिणीला सांगून निघाली सुभान्याच्या घरी.

"कुणी आहे का घरात? "बाहेरून तिने आवाज दिला.

सुदैवाने गिरीजाच आली बाहेर.सावित्री कडे लक्ष जाताच," अग बयाँ,बाई तुम्ही ! आरं सुभान्या सतरंजी आण बरं.तुह्या बाई आल्यात." म्हणत तिने स्वागत केले.

आठ दहा वर्षाचे चुणचुणीत सुभान्या , सतरंजी घेऊन आला.ती त्याने ती अंथरली व काही म्हणायच्या आधीच लाजत खेळायला पळाला.

सावित्री घराचे निरिक्षण करतच खाली बसली.घर छोटे होते पण टापटीप होते.शेणाने सारवलेली जमीन होती.एका कोप-यात टेबल. त्यावर रेडिओ. एक फॅमिली फोटो व्यवस्थित ठेवला होता. कोनाड्यात पुस्तके. घरावर नजर फिरवलीकीच प्रसन्न वाटत होते.

"गिरीजा किती निरोप पाठवलॆ.सुभान्यालाही शाळेत पाठवले नाहिस अन् तूही आली नाहिस."

"व्हय जी निरोप मिळाला परं..." गिरीजाने वाक्ये अर्धवट सोडून दिले.

"का गं काही अडचण आहे का? "सावित्री ने विचारले.

"तस नाही परं.." परत गिरीजा ने वाक्य अर्धवट सोडले.

"अग सुभान्या हुशार आहे. उगाच वर्ष वाया जायला नको. "सावित्री म्हणाली.

"व्हय जी पर.... "परत ती अडखळत बोलली.

सावित्री तिच्या जवळ गेली. तिच्या पाठीवर मायेने हात फिरवला म्हणाली," मी काही मदत करू शकतॆ का ?"

गिरीजा गहिवरली, "तुम्ही काय मदत करू शकता! म्हव नशीब फुटकं हाय. दोन गोजिरवाणे लेकरं हायती पदरात पर सुभान्याचा बाप..."

"का काय झाले. "

"काय सांगु बाई, मवं नशीबच फुटकं".म्हणत डोळ्याला पदर वाढवला.

"अग पण झाले काय? "

"अव शेती हाय, प्रेमळ सासुसासरे हायती.मला काय सुदीक म्हणनात.लई लाड करतात.पोरी वणीच ठेवतात. म्हया पाठीशी उभे राहतात.पर ह्या." परत वाक्य अर्धवट सोडून रडायला लागली.

सावित्री ला समजेनाच तिला काय म्हणायचे ते. "काय केले सांगशील का? न रहावुन विचारलेच.

"अवदसा आठवली" गिरीजा रागाने पुटपुटली.

म्हणजे? सावित्री चा भाबडा प्रश्न

"शॆण खाऊन आला".गिरीजा फुत्कारली

" मला समजेल अशा भाषेत सांग बाई."सावित्री म्हणाली.

"दुसरी बायको करून बसलाय. काही विचारायला गेलो तर काय बी बोलत नाय. गाडीवर जातो तेव्हा चार चार महिने येत नाही तेव्हा मीच ह्याच्या मायबापाला सांभाळते, शेतीचे पहाते.मरमर मरते त्याचे काही बी नाय . "

"अग हो पण असे अचानक कसे काय झाले." सावित्रीने विचारले.

"अचानक नाय काही मला आता पत्ता लागला. " गिरीजा म्हणाली.

"म्हणजे?" सावित्री ने प्रश्न विचारला.

"पहिले तीन चार महिने झाले की घरी यायचा.पोरांना खाऊ, खेळ घेऊन यायचा.माझ्या माग॔ मागं फिरायचा.लई प्रेम करायचा.पर गेल्या वर्षी पासून आला तरी गप्प गुमान असतो.पोरांना जवळ घेत नाई न मला विचारतो न शेताकडे जातो. म्हणून शान मी लई खानपटीला बसले तेव्हा हे सांगितले. तिने रडत सांगीतले.

"बरं मग".सावित्री ने उत्सुकतेने विचारले.

" तो गाडीवर जायचा.एक दोन दिवसाआड मालकाच्या गावात मुक्कामाल यायचा. तिथं ह्याने खोली घेतली होती.तिथंच ही गावली. सुरवातीला ह्या भीक घालत नव्हता पर लागलाच तिच्या गाळाला.बाई मी समद करंन. कामाला ना नाही माझी परं कुंकूवात वाटेकरी खपवून घेणार नाही. त्याला जायचे तर जा म्हणावं तिच्या कडे .पर महे सासुसासरे त्याच्या बरोबर जायला तयार नाही. समदी जमीन मह्या नावावर करायला तयार हाय ,पर घर सोडून जावू नगं म्हणतात. तुम्ही सांगा बाई ,नवरा नसन जवळ तर काय करायचा जमीनजुमल. मला कुंकूवात वाटे करी नको अन् मी बी कुणाच्या कुंकूवाची वाटेकरी होणारा नाय.कुठं बी मोल मजूरी केली तर पोटाला तुकडा मिळतोच.पर ह्या पोरांना त्यांचा बाप का व कुठं गेला म्हणून सांगू." गिरीजा ने अगतिक पणे विचारले.

सावित्री जवळ तिच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर नव्हते. फक्त तिच्या बद्दल मनात कनक भरली होती.चुपचाप सावित्री विचारात उठली व शाळेत वापस आली.

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.