प्रारंभ : भाग 1

congrats विक्या, शेवटी सुट्टी मिळालीच तुला ! स्क्रिनवर योगेश चा मेसेज आल्याचे नोटिफिकेशन आल्याचे मोबाईल ने दाखवले. "डॉक्टर आपली नेक्स्ट व्हिजिट केंव्हा आता ?" समोरच्या पेशंट ने विचारताच, माझं लक्ष त्याच्याकडे गेले. "मि. देसाई तुम्ही एक महिन्यांनी व्हिजिट करा." देसाई गेल्यानंतर मी अधिरतेनेच मेसेज वाचायला घेतला, मोबाईल चे लॉक उघडेपर्यंत सुद्धा मला दम नव्हता.
congrats विक्या, शेवटी सुट्टी मिळालीच तुला ! सुट्टीचे 30 अर्ज आलेले, सर जाम वैतागलेले कारण इतके जण सुट्टीवर गेले तर RMO एकटा किती पेशंट्स बघणार, आधीच त्याला IPD नीट सांभाळता नाही येत, पण तू लकी आहेस बाबा, तुझी ड्युटी डॉ. साहिल करायला तयार झाला, पण तो फक्त नाईट करणार आणि डे ड्युटी डॉ. रुचा करेल. येताना मला काकूंच्या हातचा खाऊ आण. काकूंनी एक कादंबरी मागितली होती मागच्या वेळेस ती ठेवलीय तुझ्या रूम मध्ये ते ने जाताना. आणि हो तुझं लेटर घेऊन जा जाताना सही करून.

थँक गॉड, असे नकळत उद्गार मनातल्या मनात निघाले. चक्क सरांनी (म्हणजे आमच्या हॉस्पिटल चे डीन डॉ. द्रविड) माझा 15 दिवस सुट्टीचा अर्ज मंजूर केलेला ! तरी आई म्हणलेलीच, तू सगळं त्या बाप्पावर सोपव आणि बिंधास्त राहा तो बघेल तुझ्या सुट्टीचं काय ते. आणि खरच त्याप्रमाणे सुट्टी मिळाली सुद्धा ! मनातल्या मनात एकदा आईला आणि बाप्पाला प्रणाम सुद्धा केला ! घड्याळात पाहिलं, 3:45 झालेले, 3 ला माझी ड्युटी खर तर संपली होती पण त्या देसाईंनी खूपच वेळ घेतला, एक तर आले आयत्या वेळी आणि विनंती वर विनंती करून आत घुसलेले आणि जणू काही गप्पा मारायला आल्याप्रमाणे तासभर बसले चांगलच.
आता बाहेर पडायला हवं, अस म्हणून उठलो आणि केबिन मधून बाहेर आलो. बाहेर बघितलं तर रिसेप्शन काऊंटरवर काहीतरी गोंधळ सुरू होता, एक मुलगी तिथल्या स्टाफ सोबत भांडत होती. ह्यांच हे नेहमीचच म्हणून मी तिथून जायला निघालो; तर सुरेश (वॉर्ड बॉय) तिथून पळत येताना दिसला, त्याला विचारलं "अरे काय झालंय रे तिकडं, कसला गोंधळ आहे एवढा ?" "काय नाही ओ डॉक्टर, कुठच्या बी बायका एकत्र आल्या की असच भांडत्यात ! त्या पोरीला आपल्या डॉन चा (द्रविड सरांचा) इंटरव्ह्यू पाहिजेल होता, तर सुलेखा म्हणाली तुम्ही उद्या या सर घरी गेलेत, तिला कायतर आजचं परत जायचं होतं म्हणून ती सारख माग लागलेली कायतर ऍडजस्ट करा, निदान फोन वर तरी घेते तुम्ही मला फोन लावून द्या नाहीतर नंबर द्या मीच लावते फोन. पण तुम्हाला माहितीय ना सुलेखा न फोन लावला असता तर आपल्या डॉन न कसला झापला असता तिला, म्हणून ती तिला घालवत होती, मग दोघी बी तापल्या आणि हे सुरू झालं बघा."

सुरेश हेडलाईन्स बरोबर सविस्तर बातमी सांगून मोकळा झाला. मी फक्त "अच्छा, अस होय" इतकंच म्हणून तिथून सटकलो. एकतर मला उशीर झालेला त्यात आणि उशीर केला असता तर ऑफिस बंद होऊन लेटर अडकून पडलं असत मग मी घरी कुठचा जातोय. पण लेटर मिळालं, आज बहुतेक सगळं चांगलंच घडणार अस लिहलेल असावं. लेटर देताना तिथला incharge सांगत होता, आज तुम्ही वेळ झाल्यावर सुद्धा नाही गेलात आपले एथिक्स पाळून पेशंट ला प्राधान्य दिलंत त्याबद्दल सरांनी फक्त तुमचीच सुट्टी मंजूर केली आहे !
बाप रे ! बरं झालं मी लवकर नाही गेलो, मनातल्या मनात देसाई चे आभार मानले.
मनातल्या मनात तस आज खूप गोष्टी सुरू होत्या ! सुट्टी मिळेल की नाही याचं टेन्शन, अपॉइंटमेंट्स चुकीच्या घेतल्यामुळे रिसेप्शन बद्दल राग, सुट्टी नाही मिळाली तर घरी मदतीला कोण याबद्दल काळजी, योगेश (माझा फ्लॅट मेट) ला रिसर्च युनिट मध्ये मिळालेले प्रमोशन त्यामुळे त्याच्याबद्दल वाटणारा मत्सर !


या सर्व मनोविकारांसकट मी पार्किंग कडे जाऊन गाडीत बसलो, आणि लगबगीने फ्लॅट वर निघालो, सुट्टीचं काहीच निश्चित नसल्यामुळं कसलीच तयारी केली नव्हती, कपडे भरण्यापासून नव्हे तर शोधण्यापासून तयारी होती ! शेवटी सगळं आवरून निघायला 5:30 वाजले. गाडी असल्यामुळं तसं प्रवासाचं काय टेन्शन नव्हतं, नाहीतर आधी बुकिंग असल तर ठीक नाहीतर 5 च्या बस ला बसायचं तर 4 पासूनच स्टँड वर जायला लागायचं, मग ती बस प्लॅटफॉर्म ला जायच्या आधी शोधायची आणि कस तर करून जागा मिळवायची, यात जर काय चुकलं तर मग आरामात बसून होणारा 8 - 9 तासांचा प्रवास निदान 4 - 5 तास तरी उभारून करावा लागे मग कुणाला तरी दया येऊन जागा तरी देईल, किंवा कोणतरी उतरेल तरी. पण 2 वर्षांपूर्वी हॉस्पिटल मध्ये जॉब मिळाल्यापासून थोडीफार आर्थिक सुबत्ता आल्यानं विलासी वृत्ती सहजच वाढली, घेतली मग गाडी !
घरी निघता निघता आई ला फोन करून सांगितलं की घरी येतोय, तुम्ही जेऊन घ्या मी येताना जेऊनच येईन. पण एका वाक्यात बोलून फोन ठेवेल ती आई कसली ! "सावकाश ये रे, नक्की जेव कुठे तर, स्पीड 60 - 70 च असू दे, गाडीत झोपशील बघ, पेट्रोल वगैरे बघ गाडीत आहे की नाही...." तिची यादी काय संपेनाच, शेवटी मीच वैतागून हो ग, ठेव आता गाडी चालवतोय, अस म्हणून फोन ठेवला. या आयांना इतकं सुचत तरी कुठून हे एक न सुटलेलं कोडंच आहे माझ्यासाठी, आई म्हणलेली एकदा मला की त्यासाठी आईच व्हावं लागतं, मग तुझी सगळी कोडी सुटतील. अर्थात ते या जन्मी तरी शक्य नव्हतं.


पण आईच्या एका सुचनेकडे तरी मला लक्ष देणे भाग पडलं ते म्हणजे गाडीत पुरेस पेट्रोल आहे की नाही हे बघितलेच नव्हतं मी. गडबडीत निघलेलो त्यामुळं राहील, पटकन लक्ष फ्युएल इंडिकेटर वर गेलं अर्ध्या पेक्षा खाली दिसत होतं. गाडीत आणि पोटात दोन्हीतही इंधन कमीच होत, म्हणून मग पेट्रोल टाकून कुठं तरी मस्तपैकी रेस्टॉरंट मध्ये जाऊया असा प्लॅन झाला, पण अचानक मला पेट्रोल च्या नवीन किमती आठवल्या, मग चलन - वलनाच्या प्रश्नामुळे पेट्रोल हायवे ला टाकूया असा विचार झाला, त्यातल्या त्यात 5 रु स्वस्त पडेल, आणि कुठच्यातरी धाब्यावर थांबून क्षुधा पण शांत करून घेऊ अस ठरवून गाडी सरळ हायवे ला घेतली. एके ठिकाणी थांबून पेट्रोल भरलं, आणि आसपास कुठलं चांगल हॉटेल आहे का हे गुगल मॅप्स वर बघितलं, "हॉटेल विसावा" - 500 मिटर असं दाखवत होत. आधीच मला ते काय मीटर किलोमीटर नेमकं किती लांब वगैरे लक्षात येत नाही. मग गुगल मॅप सांगेल सांगेल त्याप्रमाणे गाडीला फक्त दिशा देण्याचे काम सुरू काम सुरू होतं. थोडेसे विषयांतर होईल पण एक गोष्ट नमूद करावीशी वाटते या गुगल मॅप्स वर माझा तर शंभर टक्के विश्वास नाही कारण एकदा आम्हाला जायचं होतं एक मेडिकल हेल्थ कॅम्प घेण्यासाठी ते ठिकाण ग्रामीण भागात होतं अर्थातच आम्हाला त्या विषयी काहीही माहित नव्हतं, हातातल्या आणि खिशात मावणाऱ्या टेकनॉलॉजि वर विश्वास ठेवून आम्ही बाहेर पडलेलो, बाहेर पडताना एकदा त्या टेक्नॉलॉजी च चार्जिंग किती आहे हे पाहण्यास विसरलो नाही. नाहीतर काय व्हायचं वाटेत कुठेतरी आम्ही पोहोचणार एके ठिकाणी आणि टेक्नोलॉजीच गुल व्हायची कुठेतरी. आमचा प्रवास टेक्नॉलॉजीच्या भरोशावर सुरू होता आणि माझे इतर सहकारी सुद्धा तू चल रे बिनधास्त गूगल मॅप्स कधी चुकत नाही पण शेवटी लक्षात आले आम्हाला ज्या गावाला जायचं होतं त्याच्या बरोबर शेजारच्या गावात आम्ही येऊन पोहोचलेलो मग काय दोन्ही ठिकाणी कॅम्प घ्यावा लागला. म्हणून आत्तासुद्धा मी निघण्यापूर्वी पेट्रोल टाकणाऱ्या माणसाला एकदा विचारून कन्फर्म करुन घेतलं की विसावा नक्की दाखवते त्याच जागेवर आहे की नाही तोसुद्धा म्हणाला असेच स्ट्रेट गेलात की डाव्या हाताला थोडा आत मध्ये आहे सर्विस रोड वरून जावा. शेवटी विसाव्या मध्ये पोहोचलो एकदाचा विसावा घेण्यासाठी ! विसावा !!!! नाव खूपच आकर्षक होतं, साजेल अस. शिनवणाऱ्या या प्रवासात, क्षणभर का होईना थोडातरी विसावा लागतोच. अगदी जीवनाच्या प्रवासात सुद्धा !
विसावा घेण्यासाठी अगदी योग्य जागा वाटत होती; बाहेर सगळीकडे असते त्याप्रमाणे गाड्या पार्किंग करण्यासाठी असणारी थोडीशी जागा, प्रवेश करताना पाहताक्षणी डोळ्यांना शीतलता आणि मनाला शांतता/प्रसन्नता प्रदान करणारी रंगीत फुलझाडे ! आतमध्ये गेल्यावर दोन रस्ते - एक डावीकडे जाणारा जिथे गार्डन सिटिंग व्यवस्था होती, गवताच्या मऊ गालिच्यावर आकर्षक पद्धतीची टेबल मांडणी केली होती. मध्यभागी कारंजे आपले फवारण्याचे काम करून उगाच मनाच्या प्रसन्नतेत भर टाकण्याचा प्रयत्न करत होते. उजवीकडे जाणाऱ्या भागाकडे इतर हॉटेल्स मध्ये असते त्याप्रमाणे टेबल व्यवस्था होती.
गार्डन सिटिंग जरी खुणावत असलं तरीसुद्धा मी टेबल सिटिंग करिता उजवीकडे गेलो, एकंदरीत प्रत्येक टेबल साठी 1 वेटर, 10 मिनिटात मिळणारी सर्व्हिस, मंद संगीत, एयर फ्रेशनर मुळे काहीस सुगंधी झालेलं वातावरण अशा काही गोष्टींमुळे मी नकळत तिकडेच वळलो.

माझी ऑर्डर देऊन मी ते येईपर्यंत वॉट्स ऍप वर काही मेसेजेस आलेत का हे पाहायला मोबाईल बाहेर काढला. मोबाईल चे लॉक काढताक्षणीच 20 New Emails, 350 Messages from 15 Chats, Your Account Is Debited for xxxx ₹ Thank You For Using On Fuel Station ! अशा प्रकारचे नोटिफिकेशन्स मोबाईल ने स्क्रीन वर अधिरतेनेच दाखवले जणू काही मी नंतर मोबाईल उघडेन की नाही अशी शंकाच असावी त्याला !!
फक्त कामापूरते असणारे नोटिफिकेशन्स बघायचं अस मी ठरवलं, वॉट्स ऍप वर अर्थातच फालतूगिरी सुरू होती 3 - 4 ग्रुप्समद्धेच बरेचशे मेसेजेस होते, अर्थात ते न बघता इतर बघितले. मेल्स तसे विशेष कधी बघत नाही पण एक महत्वाचा मेल यायचा होता म्हणून बघितलं तर तोही नव्हता. मग बघण्यासारखं काहीच उरलं नव्हतं म्हणून मोबाईल ठेऊन हॉटेल च निरीक्षण करायला लागलो. तिथे असणारे वेटर खूपच तत्परपणे आलेल्या ग्राहकांची सेवा करत होते. मॅनेजर फिरून सर्वांवर लक्ष ठेवत होता, कुणाला काय हव, कोण नाराज तर नाही ना, सगळ्यांना व्यवस्थित सर्व्हिस मिळते की नाही हे पाहत होता. इतक्यात माझ्या टेबल च्या इथला वेटर माझी ऑर्डर घेऊन येताना दिसला, म्हणून मी हात धुवून घेण्यासाठी वॉश बेसिन चा बोर्ड बघत होतो. एका कोपऱ्यात मला तो दिसला तिकडे गेल्यावर अजून एक गंम्मत बघायला मिळाली, तिकडे एका बाजूला वॉशरूम्स होते आणि हात धुण्यासाठी तिथूनच एक वाट होती चिंचोळी बाहेर जाण्यासाठी थोडं बाहेर गेल्यावर तिथे डाव्या बाजूला एक सुंभासारखी असणारी जाड दोरी लटकत होती, त्याच्या शेवटी एक छान गोंडा होता, त्यामागच्या भिंतीवर लिहले होते - Pull For 3 Times For Clean Your Hands ! त्या दोरीखाली एक बांबूचा आडवा कापून केलेला अर्धा तुकडा होता, त्या खाली व आजूबाजूला बरीच छान फुलझाडे दिसत हकती, थोडं फिरून बघितल्यावर लक्षात आलं की गार्डन सिटिंग अरेंजमेंट जिथं होती त्याचाच हा एक कोपरा होता. मी थोड्याशा उत्सुकतेनेच ती दोरी 3 वेळा ओढली तर त्या बांबूतून मंद झुळू झुळू पाणी वाहू लागले. माझे हात धुतले जातील इतकंच पाणी आलं आणि बंद झालं. खाली त्याच वाहून जाणारे पाणी छोटा पाट करून त्या झाडांच्या मुळाशी सोडलेलं होतं. मला ही हात धुण्याची ही कल्पना भयानक आवडली. असं काही आपल्या घरी करता येईल का असा मी मनाशी विचार केला. जाताना या हॉटेल च्या मालकाशी नक्की बोलायचे असे ठरवले.


आत आलो तर हॉटेल एकदम भरून गेले होते. कुठची तर बस इथे जेवणासाठी थांबली असावी असा मी मनाशी निकष काढला, नशीब माझ्या टेबलाशी असणाऱ्या वेटरने माझ्या टेबलावर कोणास बसू दिले नव्हते. मी येताच तो ऑर्डर घेऊन आला, गरमागरम स्नॅक्स बघून पोटातली भूक परत उफाळून आली, खायला सुरवात करणार तोच "ओ हॅलो, आम्ही इथे बसलेलो, तुम्ही असे कसे काय बसू शकता ?" असा एक ओळखीचा आवाज कानावर पडला. पण वर बघितलं तर चेहरा एका सुंदर अनोळखी मुलीचा होता. सोबत एक आजी सुद्धा होती. मी काही बोलणार इतक्यात तो फेऱ्या मारणारा मॅनेजर आला व मध्येच तोंड घालत, "माफ करा मॅम, आपली काही मदत करू शकतो का ? असा शक्य तितक्या नम्र आणि सौम्य आवाजात विचारलं. अर्थातच मॅम वगैरे म्हणल्यावर ती मुलगी शेफारून गेली, " हे बघा, हे मिस्टर आमच्या जागेवर बसलेत. मुली दिसल्या की आले लगेच...." असं वर आगाऊपणे म्हणाली. मला तिचा रागच आला, कोण कुठली येऊन डायरेक्ट माझ्या चारित्र्यावर वरच घाला घालू पाहत होती. बहुतेक येणाऱ्या विचारांसोबत माझा राग चेहऱ्यावर दिसत असावा, म्हणून मॅनेजर मी काही बोलायच्या आत म्हणाला, "मॅम हे सर तुम्ही येण्या आधीपासून इथे बसलेत, तुम्ही आलात तेंव्हा ते जस्ट वॉश बेसिन कडे गेले होते, तेंव्हा मी आपली व्यवस्था दुसरीकडे करू का ?" ती फटकळ तोंडाची मुलगी काहीतरी विचित्र तोंड करून मला सॉरी देखील न म्हणता तेथून गेली, पाठोपाठ ती आजीपण.

"extremly sorry sir" अस म्हणून तो मॅनेजर तेथून गेला. मी सुद्धा झालं ते जाऊदे म्हणून भुकेपोटी सगळं सोडून पहिला खाऊन घेतलं. तेवढ्यात वेटर एका भल्या मोठ्या मगातून कॉफी घेऊन आला, त्या कॉफीबरोबर 2 शुगर क्यूब्स आणि 6 कसलीशी मखमली दिसणारी बिस्किटे होती. बाजूला एक छोट्या ट्रे मध्ये "कॉम्प्लिमेंट फ्रॉम विसावा" असा एक छोटा कागद होता. व दुसऱ्या एका ट्रे मध्ये बिल होते. अर्थात अपेक्षेपेक्षा कमीच होते. कॉफी प्यायला आता घेऊया म्हणून मी ते शुगर क्यूब्स मगात टाकणार इतक्यात, "hey excuse me, आम्ही इथे बसलं तर चालेल का ?" तो माघाचाच आवाज कानावर पडला, ती उद्धट मुलगी आता सौम्य भाषेत विनंती करत होती. "दुसरीकडे जागा नाहीय, आमची बस सुटेल, प्लिज आम्ही इथे बसू शकतो का ?" त्या आजीकडे पाहून मी बसा म्हणालो, किती वैतागल्यासारखी वाटत होती ती बिचारी ! "मघाशी तुम्हाला तस बोलल्याबद्दल I'm sorry." ती मुलगी माझ्या समोर बसत मला म्हणाली.


मी सुद्धा its ok ! इतकंच म्हणून कॉफी प्यायला सुरवात केली, कारण मला सुद्धा पुढे घरी जायचं होतं. माझं बिल घेऊन मी तिथून उठलो, आणि बिल भरायला काऊंटर कडे गेलो.

तुम्ही विसावा खूपच छान पद्धतीने डोकोरेट केलयं, आणि Food - servis खूपच सुंदर होती, तुम्ही तुमच्या हॉटेल ची जाहिरात फार कमी केलीत वाटत, कारण मी या रूट ने नेहमी येणारा जाणारा आहे तरी मला माहित नव्हतं !"

"Thank You very much sir, आपल्या प्रतिक्रियेबद्दल ! अजून devlopment सुरूच आहे, जाहिरात सुद्धा करतोय आम्ही, नवीनच उघडलय 2 महिने झाले. त्यामुळे अजून काही लोकांना इतकं माहीत नाही, लवकरच बोर्ड लावू हायवे ला. पुन्हा या सर !" मॅनेजर खुश होऊन म्हणाला.
तिथून बाहेर येताना एक माणूस मला धडकला, तोच खाली पडला, धडपडला. शिव्या घालणारच होतो पण पडला म्हटल्यावर त्याला उठायला मदत केली, तोच तो तडक आत निघून गेला, thank you न म्हणता !" अरे, काय चाललंय, कोण सॉरी नाही म्हणत, कोण thank you नाही. तस अजून बरच काही म्हणायला हवं काही जणांनी ते तर ते बोलतच नाहीत कधी असो !

फुलांची प्रिंट असणारा स्काय ब्लु हाफ टी - शर्ट आणि dark चॉकलेटी थ्री फोर्थ घातलेला त्याने. फारच गडबडीत दिसत होता तो. बाहेर आलो पार्किंग कडे. गाडीत बसलो, गाडी सुरू केल्यावर डायल वर 7:45 pm अशी वेळ दर्शवली त्याने. आजूबाजूला फार गाड्या दिसत नव्हत्या, आणि ती बस पण नाही !! मला वाटलं मॅनेजर शी बोलताना ती बस गेली असेल. निघण्यापूर्वी आई ला फोन केला, 3 - 4 तासात पोहचेन तुम्ही जेवून घ्या अस कळवलं, पण आतासुद्धा सूचनांचा भडिमार करूनच आई ने फोन ठेवला. अचानक घड्याळाकडे लक्ष गेलं, 8:15 pm बापरे ! आई न खूपच वेळ काढला बोलण्यात.


गाडी सुरू करून रीवर्स गियर टाकून मागे घेतली, तोच मघाचा धडकलेला माणूस एकदम पळत आला आणि माझ्या इथल्या काचेवर टक टक करू लागला, मघाशी तो पाठमोरा गेल्यामुळे त्याचा चेहरा बघायचा राहून गेलेला. सावळा परंतु गोरेपणाकडे झुकणारा सिल्की केस त्याचा एक बाजूला पाडलेला भांग, रेखीव नाक, किंचित उभट आणि गोल चेहरा, ट्रिम केलेली दाढी मिशी त्यात आणि ती कोरलेली. आणि चक्क निळे डोळे ! मी पहिल्यांदाच बघितले आयुष्यात ! लेन्स घातली असेल असं वाटलं मला. तसा एकंदरीत सभ्य वाटला. तर हा माणूस सांगू लागला की "प्लिज मला तुम्ही शहरात सोडाल का ? आता बस नाहीय, शेवटची मघाशी निघून गेली, आता डायरेक्ट उद्या सकाळी आणि जवळपास राहण्यास पण सोय नाही." त्याच बोलणं संपतो ना संपतो तोच ती उद्धट मुलगी आणि ती आजी मागून पळत आले. तीसुद्धा प्लिज सोडलं का आम्हालापण ? आमची बस चुकली, ती सुद्धा तुमच्यामुळेच, बसला असता दुसरीकडं काय फरक पडला असता काय ? तसंही तुम्ही गाडीतूनच जाणार होता ना, आम्ही बस ने जाणार होतो. तरी नशीब सगळं समान घेऊनच उतरलो खाली, नाहीतर काय खरं नव्हतं. फार बडबडत होती. शेवटी मी सुद्धा तिकडेच जात असल्याने त्यांना बसा म्हणलं. ते सगळे thank you म्हणून गाडीत बसले. त्या मुलगीने पुढं बसत असलेल्या त्या काकांना मागे बसायला लावलं का तर म्हणे तिला रस्ता बघायला आवडतो म्हणून ! ते बिचारे काका बसले मागे आज्जीबरोबर. मी फर्स्ट मध्ये घेऊन गाडी पुढं घेतली. आणि हळू हळू हायवेला घेतली. इतका वेळ ती गप्प असणारी आज्जी बोलली, "बाळ, काय करतोस तू ? कुठं असतोस ?" ह्या वयस्कर लोकांना कशाला पाहिजे असतात चांभार चौकशा कुणास ठाऊक. तरीसुद्धा वयाचा मान राखत त्यांना सांगितलं, "आज्जी मी डॉक्टर आहे, सध्या एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये Sr. Physician आहे. "अच्छा अच्छा !" काय कळालं त्या आज्जीला कुणास ठाऊक ! तुम्ही जिकडे जात आहेत त्या शहरात माझं मूळ घर आहे, सध्या सुट्टीनिमित्त घरी चाललोय. तुम्ही कुठे असता आज्जी ?"
"मी सुद्धा तिकडेच राहते बाळा, माझ्या पुतणीच्या लग्नाला आले होते इकडे."
मी त्या मुलीकडे पाहत विचारलं - "आणि ही कोण ? तुमची नात ?"
त्या सरशी ती आज्जी जोरात "ह्या" म्हणाली इतक्या जोरात की ते काका आणि मी सुद्धा दचकलो ! अरे ही स्टँड वर भेटली मला, माझा चष्मा घरी विसरला रे, त्यामुळे कुठली बस वगैरे काय समजतच नव्हतं, मग ह्या मुलीने मला मदत केली, चांगली आहे पोर !" त्या so called "चांगल्या" मुलीकडे एक कटाक्ष टाकला आणि समोर बघायला लागलो. मी तस बघितल्यावर ती म्हणाली, "तू खरचं डॉक्टर आहेस ? वाटत नाहीस"

आत्ता या क्षणाला गाडी थांबवून, दोन कानाखाली लावूया तिच्या अस मनात खूप येत होतं, पण सभ्यतेचे थोडे निकष पाळूया असा विचार झाला.
"नाही ते स्टिकर असंच मजा म्हणून लावलय मी !" तिच्यासमोर असणाऱ्या काचेवर लावलेल्या डॉक्टर sign कडे मी बोट करत म्हणलो.
तसं ती पण खळखळून हसायला लागली. (तिचं तसं खळखळून हसणं माझ्यासाठी काळजाचा ठोका चुकवणार वाटत होतं, रोमँटिक वगैरे काही नाही हो, आधीच हायवेला अंधार त्यात मागे बसलेली दोघ अगदी मख्खपणे बसलेली, अशात ही अस हसतेय तुम्हीच विचार करा कस वाटेल)

मी सुद्धा जरासं कसनुसा हसलो. थोडा वेळ असाच शांततेत गेला, मागे ते दोघे झोपलेले चक्क. ती मुलगी समोर रस्त्याकडे बघत प्रवासाचा आनंद लुटत होती. मी त्यांचा नोकर असल्याप्रमाणे गाडी चालवत होतो ! मी तिला विचारलं, "तुम्ही काय करता ?"
स्वतःविषयी असं कायतर बोलणं आल्यामुळे ती जरा खुललीच, आणि एक्साईटमेंट मध्ये सांगू लागली, "मी एक पत्रकार आहे, एका न्युज चॅनेल ला जॉब करते. तसं मी L.L.B. केलंय पण पत्रकारिता हाच माझा पेशा आहे. त्याचा पण कोर्स केला इंग्लंड मध्ये. माझा एक ब्लॉग सुद्धा आहे, त्यावर मी माझी मतं बिनधास्त मांडत असते. शिवाय माझी काही पुस्तक पण पब्लिश झाले आहेत !"
" आईचा घो !" तोंडात जिभेवर आलेले शब्द मी तसेच गिळले आणि एकदम अवाक झालो ! "व्वा, खूपच छान !" तिला उत्तर देताना मी म्हणालो.

"तर डॉक्टर साहेब तुम्ही कंटाळत नाही रोज रोज पेशंट तपासून ?" माझ्याकडे बघत तिने मला विचारल, "काय पण म्हणा, तुम्हाला समाजात फार मान असतो, काही काही जण तर त्यावर इतक्या मिजाशीन राहतात की बघायलाच नको, आणि ट्रीटमेंट च्या नावाखाली प्रचंड लुबाडणूक !" हळू हळू आपले पत्रकाराचे रंग ती दाखवायला लागली होती !
मला मात्र तिच्या त्या विचारांचं हसूच आलं. मी तिला इतकंच म्हणालो, "डॉक्टरांना समाजात मान आहे वगैरे त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण हीच मान आता सांभाळायची वेळ आलीय आमच्यावर कोण कुठल्या निमित्तानं येऊन ती कापेल सांगता येत नाही सध्या. हां, काही लोक आहेत अशी की ज्यांच्याकडे भरपूर ज्ञान आहे आणि त्या जोरावर ते मिजास करतात - ज्याचा त्यांनी लोकांच्या सेवेसाठी उपयोग करायला हवा. मी सुद्धा अशा लोकांच्या विरोधातच आहे.
माझं म्हणाल तर मला अजिबात कंटाळा येत नाही पेशंट्स बघायला हाच आमचा धर्म आहे आणि येणार प्रत्येक पेशंट हा काही ना काही शिकवून जातोच, आम्ही पण तयार असतो नव्या नव्या challenges साठी. त्यात आमचे सर, सर कसले मित्राप्रमाणे वागणारे आमच्या हॉस्पिटल चे डीन डॉ. द्रविड सर हे तर खूपच हसत खेळत वागवतात आम्हा सगळ्यांना. त्यामुळे अजिबात कंटाळा नाही येत."
द्रविड सरांचं नाव ऐकल्याबरोबर काहीशी चमकलीच ती, आणि अधीरतेने तिने मला विचारलं, " तुम्ही ओळखता द्रविड सरांना ?"
"हो, अगदी खास आहे मी त्यांचा !" मी जरा भाव खाऊन म्हणालो.

"प्लिज माझं एक काम कराल ?"

आता आणि काय नवीन ? माझ्या मनात धडकीच भरली, आता ही द्रविड सरांपर्यंत जातेय म्हणून.

"बोला" मी उत्तरलो.

"मला त्यांची एक मुलाखत घ्यायचीय, आमच्या न्युज चॅनेल साठी, प्लिज तुम्ही भेट घडवून द्याल का आमची ? हे खूप महत्वाचे आहे माझ्यासाठी. तुम्ही काय म्हणाल ते करायला तयार आहे मी" ती मुलगी एकदम सगळं बोलून मग थांबली.

"अहो हो, दम खा जरा. बघतो मी कस काय जमत ते." मी म्हणालो.

"अच्छा ठीक आहे तर मग, हे माझं कार्ड ठेवा माझा नंबर आहे यावर मला कळवा काय ते" ति कार्ड माझ्याकडे देत म्हणाली.

शेवटी एकदाचे पोहोचलो आम्ही शहरात. झगमगत्या लाईट्स, सुरेख प्रवेशद्वार आणि मस्त रोड.. मी गाडी रिंग रोड ला घेतली आणि त्या आज्जीना विचारले कुठे जाणार, तर त्या माझ्या घराजवळच्या कॉलनीत उतरणार होत्या, ती मुलगी शिवाजी पेठेत उतरते म्हणाली, आणि ते काका स्टँड वर सोड म्हणाले.
मला तर डॉक्टर नसून खासगी वाहतूक करणारच वाटलो ! (वडापवाला!)

काका पहिल्यांदा उतरले, मग ती मुलगी आणि सगळ्यात शेवटी ती आज्जी.

शेवटी पोहोचलो एकदाचा घरी !
जवळपास 7 - 8 महिन्यांनी येत होतो घरी. घरी आल्यावर आई ने विचारपूस करून गरमागरम कॉफी दिली, कस काय कळत तिला बरोबर काय माहीत ? कॉफी घेताना आई न एक धक्का दिला, तुझ्या लग्नच बघतोय आम्ही, एक स्थळ सुद्धा बघितलंय, उद्या आपण तिकडेच जातोय म्हणून तुला अस बोलावून घेतलं !"
"काय ग आई, आल्या आल्या बाँब टाकतेस
उद्या सांग काय ते सविस्तर..."
खूप दमल्यामुळे झोप लागली लगेच. सकाळी उठल्यावर गाडीत राहिलेली बॅग आणायला गेलो, तर तिथे मागच्या सीट वर त्या काकांच पाकीट पडलेलं दिसलं.
सहज कुतूहल म्हणून उघडून बघितलं तर आतमध्ये एका छोट्या मुलीचा फोटो, 5 - 6 व्हीजीटिंग कार्ड्स, 2 क्रेडिट कार्ड्स, 1 डेबिट कार्ड, लायसन्स आणि 4000 ₹ होते. अरे बापरे, हे सगळं महत्वाचं दिसतंय, त्यांना लवकरात लवकर परत करायला हवं. अस म्हणून त्यात कुठे त्यांचा नंबर आहे का हे बघितलं, नशिबाने होता. लायसन्स वर सतीश जोशी अस नाव होतं, आणि पत्ता सुद्धा होता. फोन केला तर कोणी उचलत सुद्धा नव्हतं. म्हणून मग शेवटी मीच त्यांच्या घरी जायचं अस ठरवलं. त्याप्रमाणं सगळं आवरून बाहेर पडलो, घर बरच लांब होतं म्हणून 4 व्हिलर च घेतली. साधारण 40 मिनिटात पोहोचलो त्या पत्त्यावर. मुख्य रस्त्यापासून आत कॉलनीत त्यांचं घर होतं. तीन मजल्याचा प्रशस्त बंगला होता. गेट वर पोहोचताच तिथल्या वॉचमन ने विचारपूस केली, कोण काय पाहिजे वगैरे वगैरे...

त्याला सांगितलं, बाबा तुझ्या मालकाला भेटायचंय, त्यांना हे पाकीट परत द्यायचंय. तो म्हणाला, अहो साहेब नाहीत, तुम्ही जावा. घालवतच होता मला तो, हे पाकीट त्यांचं नाही. पण मी त्याला पटवून देत होतो की काल रात्री ते स्वतः माझ्या गाडीतून आले त्यांना मी स्टँड वर सोडलं काल. जस जस मी त्याला पटवून सांगू लागलो त्या बरोबर त्याच्या चेहऱ्याचा रंग उडत चाललेला, हे कसं शक्य आहे.. अशी त्याची बडबड सुरू होती. अचानक तो आत गेला आणि एका माणसाचा फोटो घेऊन आला, हेच होते का ? फोटो बघितला तर त्यातला माणूस तरुण होता आणि काल ज्याला मी बघितलं तो जरा वयस्कर वाटत होता. अचानक माझं त्याच्या डोळ्यांकडे लक्ष गेलं, काळेभोर दिसत होते फोटोत पण काल ज्याला मी बघितलं त्याचे डोळे तर निळे होते. मग मी म्हटलं हा दिसताना तरी बऱ्यापैकी त्यांच्या सारखाच दिसतोय पण थोडा फरक वाटतोय. हे ऐकल्यावर तर तो लाटलाट कापायलाच लागला. तो म्हणाला अहो हे कसं शक्य आहे, आमचे साहेब तर जाऊन (आकाशाकडे बोट दाखवत) 5 वर्ष झाली. हे ऐकून तर मी चक्कर यायचाच बाकी होतो. हे काय बोलताय तुम्ही, अहो हा माणूस माझ्याबरोबर आला काल गाडीतून, बोलला माझ्याशी."

हे ऐकून तर तो वॉचमन तर घाबरून आत निघून गेला, आणि त्याने गेट लावले. एकदा बंगल्याकडे नजर टाकून मी गाडीकडे जायला निघालो. गाडीत बसताना मला एक मुलगी दिसली, त्या रस्त्यावरून ती भर भर जात होती, काहीशी ओळखीची वाटली ती. काल ज्या आज्जीला बघितलं तिच्यासारखीच दिसत होती. माझ्या गाडीला बघितल्यावर जर थबकली, आत मला बघितल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, मी इथं काय करतोय असे काहीसे होते. मग तिने चालण्याचा वेग वाढवला इतका की ती पळायलाच लागली आणि चटकन तिथल्या बाजूच्याच गल्लीत नाहीशी झाली. मला तर काय समजतच नव्हतं हे काय चाललंय ते. सरळ घरी आलो, पाय वगैरे धुवून जरा सोफ्यावर बसलो, "आई जरा पाणी दे ग" अस मोठयाने ओरडलो पण आई चा काही आवाज नाही, शेवटी मीच उठून घ्यायचं म्हणून आत गेलो. पाणी ग्लास मध्ये घेऊन पिताना अचानक माझं लक्ष खिडकीकडे गेलं, तिथं मला कालची ती उद्धट मुलगी दिसली. मी "ए हॅलो, शुक शुक" अस म्हणून मी तिला बोलावत होतो पण ग्लास ठेऊन बाहेर जाईपर्यंत बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं. काय चाललंय आज मला काहीच समजत नव्हतं.

तसाच जरा सोफ्यावर पडून राहिलो. थोडयावेळाने आई आली भाजीच्या पिशव्या घेऊन. "अरे तू कधी आलास ? येताना सांगशील की नै, मी पण आले असते ना, आपल्या आई ला अस उन्हातून यायला लावतोस होय रे ?" आई नेहमीप्रमाणे माझी खेचत होती.
"आई जा ग तू आत, नको पिडूस उगाच, आधीच काय कमी त्रास नाहीत" मी पण जरा वैतागतच उत्तर दिलं.
"राहील माझं काय" असं म्हणून ती पण गेली आत.
थोड्या वेळाने ती प्लेट मध्ये माझ्या आवडीच्या मिठाई घेऊन आली, मी समजून चुकलो हे भारी हत्यार काढलाय आई न, म्हणजे बाब नाककोच नाजूक दिसतेय. लग्नाचीच असणार.
" आई तुला ओळखतो मी चांगलाच, उगाच त्या मिठाई देऊन गोड बनण्याचा प्रयत्न नको करुस, मला आत्ताच नाही करायचंय लग्न" मी आई ला म्हणालो
"अरे पण ऐक तर..." आई च वाक्य अर्धवट तोडत मी म्हणालो "आई बास, आता अजून चर्चा नको यावर"
माझा मूड बघून आई सुद्धा कलत घ्यायचं ठरवलं. जाता जाता हळूच एक शेवटचं अस्त्र सोडायच म्हणून, आणलेला फोटो मुद्दाम सोफ्यावर पाडवून गेली. मी पण आई आत गेल्यावर सहज म्हणून बघितला फोटो, न जाणे लॉटरी लागायची म्हणून तर खरच आजचा दिवस धक्का खाण्याचाच होता माझा हे कळून चुकलं. तो फोटो त्या उद्धट मुलीचाच होता. "आई ही कुठं मिळाली तुम्हाला ?" मी नकळत ओरडलो.


आई ला वाटलं आपली मात्रा लागू पडली, म्हणून ती बाहेर आली, "अगोबाई, तुला पण आवडली का ती" अस म्हणून पसंती साठी माझ्याकडं बघत राहिली.
"आई, तस नाहीय ग काही" मी गप्प राहिलो. न जाणो आणि काय बोललो असतो तर पराचा कावळा व्हायला काही कमी करणार नाही आई. पण माझी शांतता पण भलताच गैरसमज करून गेली. आई ला वाटत होतं की मी लाजतोय म्हणून, इथं मला आज काय काय झेलावं लागणार याचा मी विचार करत होतो आणि आई च काहीतरी भलतंच. बाबांना सध्या मी लग्नास तयार नाही, वर्कलोड खूप आहे असं कळवलं. ते ठीक आहे म्हणाले, त्यांचं एक बरं होतं, मतांचा आदर करायचे आणि आवश्यक असेल तिथे मार्गदर्शन.
काहीही न करता मी सरळ माझ्या खोलीत जाऊन झोपलो, अचानक मला कोणीतरी आल्यासारखं वाटलं म्हणून डोळे किलकिले करून बघितलं तर कोणीच नव्हत. एकदम पडलेल्या ताणामुळे झोप लागली पटकन. थोडयावेळाने डास चावल्याप्रमाणे वाटलं, पण नंतर झोप खूप छान लागली.


गाडी घेऊन मी बाहेर पडलो, दिवस खूप मस्त होता, सुट्टीचा पुरेपूर उपयोग करत आज खूप फिरून घ्यायचं अस ठरवलं. गाडीचा वेग वाढवत मी फुल्ल एन्जॉय करत होतो, सोबत गाण्याचा आवाज मोठ्ठा. अचानक मला आरशात मागे सीट वर बसलेले काका दिसले, आणि "हेल्प मी" म्हणून त्यांनी त्यांचा हात पुढे केला, भीतीची एक लहर शरीरभर पसरून, मी गारच पडलो, गाडीवरचा कंट्रोल सुटला माझा, भीतीत आणि हार्ट बिट्स मध्ये कमालीची वाढ झाली, गाडी पलटी होऊन समोरून येणाऱ्या ट्रक ला थडकली, तसं मी किंचाळलो, आणि अचानक जाग आली. स्वतःला चाचपडून बघितल तर जिवंत होतो आणि बेडवरच होतो. तेवढ्यात अचानक डोक्यावर फिरणारा फॅन अचानक बंद झाला आणि काही कळायच्या आत तो धाडकन माझ्या डोक्यावर आदळला. पुन्हा मी नकळत किंचाळलो, उठून बघितलं तर बेड वर होतो आणि शाबूत होतो. आता काय स्वप्न, काय सत्य काहीच समजेनास झालं.

कोण ते कुठले लोकं माझ्या आयुष्यात अचानक काय येतात आणि शांत पाण्याला ढवळून त्याला गढूळ बनवतात, त्याप्रमाणे अस्थिरता काय माजवतात.
तेवढ्यात योगेशचा फोन आला, "अरे तुला कालपासून फोन करतोय तू उचलतच नाहींयस, अरे तुला एक शॉकिंग न्यूज द्यायची होती, द्रविड सरांना काल अटॅक आला, फार सिरीयस नाहींयत पण आपण रिस्क नको म्हणून मॉनिटर वर ठेवलंय 48 तासांसाठी, त्यांनी तुला बोलवायला सांगितलंय, तुला काहीतरी सांगणार आहेत म्हणाले, आणि लवकर बोलावलंय तुला.

मी तर मटकन खालीच बसलो, आयुष्यात असे एकामागून एक धक्के बसतील अस वाटलं नव्हतं कधी. अचानक द्रविड सर समोर दारातून आत येताना दिसले, ते सुद्धा हात पुढे करून हेल्प मी अस म्हणत होते.
मला दरदरून घाम फुटायला लागला, काय झालं नाही माहिती पण अचानक जाग आली आणि मी परत बेडवर होतो.

काय होतंय काहीच समजेना. योगेशचा आला फोन खरच आलेला का हे बघण्यासाठी मी फोन हातात घेऊन बघायला लागलो तर त्यावर तसं काहीच नव्हतं. मला अजून पण समजत नव्हतं की पुन्हा हे स्वप्न / भास आहे की सत्य ?
जे काही असेल ते असेल, मी स्वप्नात का होईना पण सत्य पडताळण्याचा निश्चय केला.
सर्वप्रथम माझ्या हातात काय काय माहिती आहे ती संगतवार मी एका कागदावर लिहून काढली, ज्या ज्या वस्तू संबंधित होत्या त्या एकत्र केल्या, आणि विचार करून संगती लावण्याचा प्रयत्न करू लागलो.
अचानक माझं लक्ष त्यातल्या एका व्हीजीटिंग कार्ड वर गेलं आणि थोडाफार गुंता लक्षात यायला लागला !!

ती मुलगी कोण होती ?
ती आज्जी कोण होती ?
ते काका कोण होते ?
त्या सर्वांचा माझ्याशी आणि द्रविड सरांशी काय संबंध होता ?
त्यांच्या आयुष्यात अस काय घडलं असावं ज्यामुळं ते माझ्या आयुष्याशी जोडले गेले ?

अशा काही प्रश्नांची उत्तरं मला आता शोधायची होती.

(क्रमशः)


कथेचा वास्तवाशी कुणाशीही संबंध नाही, आणि आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

-©डॉ. प्रथमेश कोटगी

(या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून, सदर कथा वा त्यातील कोणताही भाग पुनः प्रकशित करण्यास किंवा त्यावर चित्रीकरण करण्यास लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.)

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.