भाग २


सार्थकने दुसऱ्या दिवशी आल्या आल्या जेडीला काय करता येईल म्हणून विचारू लागला. त्याच्या तशा वागण्याने जेडी म्हणू लागला "अबब एवढा उतावळेपणा. ऐक मग. नाव तुला माहीतच आहे, शिक्षण एम. बी. ए इन एचआर, राहणार गोकुळधाम. दोन बहिणीमध्ये मोठी. मराठी अडखळत बोलते. फॅमिली मध्यम वर्गीय आणि पक्की ढोकळा पार्टी म्हणजे शुद्ध शाकाहारी." जेडी ने तिचा बायोडाटा पटापट बोलून दाखविला.

"यु आर जिनिअस (you are genius). तुला कसे कळले, एवढे सगळे" आश्चर्यचकित होत सार्थक त्याच्याकडे पाहत बोलला.


"तू राहू दे ना बे. पिक्चर अभी बाकी है, शनिवारी म्हणजेच उद्या आपल्या कंपनीतर्फे एक सीएसआर (CSR) इव्हेंट आहे नॅशनल पार्क मध्ये, वृक्षारोपण आणि साफ सफाईसाठी. सर्वाना निमंत्रण आहे. बरेच जण येतील. मिस सोनल पण असणार आहे. एचआरनेच ठेवला आहे कार्यक्रम. ई-मेल कर त्यांना आता लगेच, की तू येणार आहे म्हणून." जेडी ने बरीच माहिती जमवली होती आणि "हो लगेच करतो." म्हणत सार्थक इमेल टाईप करू लागला.

"उद्या लवकर उठून जा आणि करून घे ओळख वहिनीची. माझे काम झाले. चला... इकडे तिकडे चोहीकडे, नीट झाडे लावा, उद्या तुम्ही चोहीकडे." जेडी गाण्याची पॅरोडी करत आपल्या मॉनिटरकडे वळू लागला.

"तू पण चल ना माझ्याबरोबर. तेवढीच सोबत होईल मला." सार्थक त्याला थांबवत विनवणी करू लागला.

"मी काय करू तिकडे येऊन...साफसफाई. बरे आहे बुआ. पोरगी तुला पटवायची की मला." जेडी ने ना चा पाढा सुरू केला. सार्थकचा पडलेला चेहरा पाहून "चल ठीक है यार, तेरे लिये ये भी सही. उद्या जाऊ या. तू बघशील गुजराती कुडी आणि मी भरेल मातीने कुंडी." म्हणत यायला तयार झाला.


"पण यार...परत एकदा नीट विचार कर. प्रेमात पडणे आणि प्रेमात पडणे, वाक्य एकच आहे पण फरक जमीन अस्मानाचा आहे. तुला झेपणार आहे का सगळे. एवढे वर्षे तुला ओळखतो आहे, कधी असे पाहिले नाही तुला. एका भेटीत एवढा सिरीयस झालास. मला तुझा दिलजले नाही बघायचा. काय आहे, आजवर मी लोचे जास्त पाहिलेत, लवपेक्षा. तू आपला खास म्हणून सांगतोय." जेडी परत समजावू लागला.

"माझे मन सांगतय, मला ती आवडली आहे, चुका होतात माणसांकडून. कदाचित मी ही चुकत असेल. पण मला ही चूक करायची आहे. पुन्हा आयुष्यात हे वाटायला नको की, एकदा विचारायला तरी हवे होते. बस...एकदा तिला विचारू दे, नंतर बघू नंतरचे. एवढा विचार नाही करायचा या वेळेला. नाहीतरी म्हणतातच, प्रेम आंधळे असते."

"वाह रे मजनू...ऑल द बेस्ट." जेडी त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाला.सार्थक आज नॅशनल पार्क मध्ये जायचे म्हणून लवकर उठून बसला आणि तयारीला लागला. सुट्टी असताना स्वारी कुठे असे ताईंनी विचारले असता, वृक्षारोपण करायला चाललो आहे म्हणत बाहेर निघाला. ठरल्या वेळेवर तो पार्कच्या गेटवर बसने पोचला. जेडीसुद्धा आपल्या बाईकने नुकताच तिथे आला होता. इतर ऑफिस स्टाफ सुद्धा पोचला होता. ज्यांना कंपनीचे टी-शर्टस मिळाले नव्हते त्यांना ते सोनल वाटत होती आणि सगळे एकाच रंगात रंगून गेले होते. टी-शर्टच्या निमिताने दोघांनी तिच्याशी हाय-हेलो केले आणि सगळे आत पार्कमध्ये जाऊ लागले. पाच पाच जणांचे ग्रुप करण्यात आले होते आणि आधीच ठरवलेली कामे वाटण्यात आली होती. जेडी आणि सार्थक तिच्या मागोमागच चालत होते. असेच चालता चालता, एका चढण असलेल्या ठिकाणी, सोनलचा पाय घसरला आणि खाली पडणार तेवढ्यात मागेच असलेल्या सार्थकने तिला अलगद पकडले. ती स्वतःला सावरत नीट उभी राहिली. “थॅंक्स सार्थक” म्हणत सगळे पुढे चालू लागले. जेडीने सार्थकला डोळा मारत हळूच “क्या बात...क्या बात. नाम याद है.” म्हणत त्याची तारीफ केली. सर्वांनी मेहनत करत साफसफाई आणि वृक्षारोपण केले. दुपारी जेवणाच्या वेळी, गप्पा मारता मारता एकमेकांच्या ओळखी करत सगळा कार्यक्रम पार पडला. सगळे निघण्याची तयारी करू लागले. जेडीने सार्थकला अक्षरश ढकलत “जा बोल तिच्याबरोबर” म्हणाला. सार्थकने सुद्धा हीच काय ती शेवटची संधी म्हणत तिच्यासमोर गेला आणि बोलण्याचा प्रयत्न करून लागला.


“थॅंक्स सोनल, आम्हाला येण्याचे निमंत्रण दिल्याबद्दल” काहीतरी बोलायचे म्हणून तो तिच्याजवळ जात बोलला.

“आय शुड से थॅंक्स टू यु अन युअर फ्रेंड फोर मेकिंग इट सक्सेसफुल (I should say thanks to you and your friend for making it successful)” सोनल तत्परतेने म्हणाली.

“थॅंक्स टू यु टू फोर लास्ट मिनिट इन्क्लुजन ऑफ अवर नेम्स (Thanks to you too, for last minute inclusion of our names). बाय द वे (By the way) घरी कशी जाणार आहेस. आय मीन हाऊ आर यु प्लानिंग टू गो होम (I mean how are you planning to go home)” हिम्मत करून त्याने तिला विचारले.

“बाय बस (By bus)” आपल्या मान तिरकी करत बस स्थानकाकडे बोट दाखवत ती म्हणाली.


“इफ यु डोन्ट माइंड, हुं तमने घरे छोडू छु? (If you don’t mind, I will drop you home)” काल इंटरनेटवरून ऑफिसमध्ये प्रिंट काढून, रात्री पाठ केलेल्या काही वाक्यापैकी, मोडक्या तोडक्या गुजरातीत सार्थक बोलला.

“शुं तमे गुजराती बोली शको छो ? (Do you speak gujarati?)” तिने आश्चर्यचकित होत त्याच्या डोळ्यात पाहत विचारले.

“थोडू घनु (Yes...a little)” आपले डोळे मिचकावीत तो म्हणाला.

“नाईस (Nice). मी पण मराठी बोलू शकते…पण हळू हळू. मी जाईल घरी बसने.” तिने म्हंटल्याप्रमाणे हळू हळू बोलली. तिला दोन मिनिटे थांब म्हणत सार्थक जेडीकडे गेला, काहीतरी बोलला आणि लगेच वापस आला. “मी तुला बाईकने सोडेन. चल ना.” तो तिला आग्रह करू लागला.

“वान्धो नथी...पण तुला विनाकारण एवढ्या लांब यावे लागेल.” म्हणत ती त्याच्याबरोबर चालू लागली.


“मी पण तुझ्याच रस्त्याकडे जाणार आहे. सो इट्स ओके (So It’s Okay)” गाडीला किक मारत तिला बसायला सांगितले. ती ही बिनधास्त बसली. त्या दोघांना दूर एकत्र जाताना पाहत, जेडी मात्र आपल्या कमरेवर हात ठेवत आणि मान हलवत, वैतागून “देखी तेरी यारी, देखा तेरा प्यार, कितना इमोशनल अत्याचार” असे काहीतरी बडबडत आजूबाजूला बघत होता. कारण त्याची बाईक सार्थक घेऊन गेला होता आणि त्यामुळे आज त्याला बसने घरी जावे लागणार होते.“अरे बोल ना...कुठे कुठे तिला घेऊन गेला होता दोन दिवस” सोमवारी आपल्या डेस्कवर बसलेल्या सार्थकच्या पाठीवर जेडीने थाप मारत विचारले.

“अरे कुठे नाही...त्या दिवशी तिच्या घराजवळ सोडले, मग मी घरी माझ्या. बस...एवढेच.” त्याच्याकडे बघत तो बोलला.

“धत तेरी की लेका...अरे घेऊन जायचे ना फिरायला चांगल्या हॉटेलमध्ये, गार्डनमध्ये” जेडी कपाळाला हात लावत म्हणाला.

“अरे यार..मी विचारले पण तिला घरी जायची घाई होती. तिचा फोन नंबर मात्र घेतला. दोन दिवसांपासून एसएमएस-एसएमएस खेळतोय तिच्याबरोबर. आज तिला जेवायला आपल्या कँटीनमध्ये बोलावले आहे" सार्थक लाजत बोलला.

"प्रगती...प्रगती...कर लो दुनिया मुठ्ठी में...वाह. मेरे बापू का सपनाने दोन दिवसात बरीच मदत केली तर" जेडी सार्थकच्या केसातून हात फिरवत म्हणाला.

"तुलापण निमंत्रण आहे. काहीतरी स्पेशल घेऊन येणार आहे डब्यात आपल्यासाठी" सार्थक त्याची उत्सुकता चाळवू लागला.

"क्या बात. वहिनी सुगरण आहे वाटते. बघू या दुपारी. पण मी नक्की येऊ ना, दोघात तिसरा." रोज कँटीनमधले जेवणारा जेडी आज काहीतरी चांगले आणि घरचे खायला मिळणार म्हणून खुश झाला.

"हो रे, आपण एकत्रच जाऊ, तिचा फोन आल्यावर". सार्थकने आपला होकार दिला.


दुपारी ठरल्याप्रमाणे तिघे जेवायला भेटले. तिने स्वतः बनवलेले जेवण सर्वांनी खाण्यास सुरुवात केली. सोनल दोघांना वाढण्यात रस घेत होती. "यु मस्ट ट्राय दिस ( you must try this)" म्हणत दोघांच्या ताटात भाजी चपाती, इतर पदार्थ टाकत होती. मात्र गोड वरण भात खाताना जेडीचा पडलेला चेहरा बरेच काही सांगत होता. सार्थक त्याला इशाऱ्यानेच चेहऱ्यावर हसू ठेवत जेवण संपव असे सांगत होता. सार्थकचा डबा मात्र ती स्वतः खात होती. घाटावरच्या सार्थकच्या भाजीचा झटका तिच्या चेहरयावर घामाच्या रूपाने बाहेर पडत होता. प्रत्येक घासानंतर घोटभर पाणी घशात टाकत होती. तिखट लागल्याने स्वीट डिश म्हणून आणलेली जिलेबी सुद्धा तीच खात होती. जेवायला बोलावले म्हणून जेडीने दोघांचे आभार मानले आणि तिघे आपापल्या डेस्कवर निघाले.


"लग्नानंतर मला घरी जेवायला बोलवू नकोस तू, आताच सांगून ठेवतो" आपल्या डेस्कवर आल्या आल्या जेडी बोलला.

"का रे बाबा, काय झाले" त्याच्याकडे वळून बघत सार्थक बोलला.

"काय झाले, माझ्या आख्ख्या खानदानात कोणी गोड वरण भात खाल्ला नाही. नुसत्या दातांनी हाडे फोडणारे आम्ही, ते जाऊ दे, आपलं गोड जेवण कस असत, गुळाची गुळवणी, गरमागरम पुरण पोळी आणि त्यावर साजूक तुपाचा थर, असलं खाणारी माणसे आम्ही, भातात गोड वरण झेपणार कसे. अजून गळ्यापर्यंत आहे, खाली उतरलेच नाही बहुतेक." जेडी रागाने बोलत होता.

"माझे राहू दे, तुझ्या आई बापाला उपाशीच राहावे लागणार बहुतेक लग्नानंतर" जेडी न राहवून बोलून गेला.

"शिकेल ती, तू बघितलस ना माझा डब्बा कसा खात होती, एवढे तिखट असताना देखील. त्यावरून कळते, किती समजूतदार आहे ती" सार्थक तिची बाजू घेत बोलू लागला. त्याच्या तशा बोलण्याने जेडीने त्याला कोपरापासून हात जोडत "बोला सार्थक महाराज की जय" बोलला. "सावन के अंधे को सब हरा ही हरा दिखता है." असे तोंडातल्या तोंडात बडबडत आपल्या कामाला लागला. सार्थकला कळेना की नक्की प्रॉब्लेम काय आहे. तो ही आपल्या कामाला लागला.(क्रमशः)

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.